सावरकरांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला -यज्ञेश्वर दीक्षित यांचे प्रतिपादन

 

मुखेड:( दादाराव आगलावे)
रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला. असे प्रतिपादन यज्ञेश्वर दीक्षित यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मुखेडच्या वतीने आयोजलेल्या सावरकर जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणाचार्य मठसंस्थांचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुखेड भूषण तथा डब्ल्यू एच ओ चे सदस्य डॉ. दिलीप पुंडे, सत्यवान अण्णा गरुडकर, जगदीश शेठ बियाणी, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मुखेडचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रारंभी वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यज्ञेश्वर दीक्षित पुढे म्हणाले की, एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. यावेळी मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे म्हणाले की, हेमंत कुलकर्णी सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून ते धडपडं व्यक्तिमत्व आहेत. मुखेड येथील मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन जाऊन त्यांनी सावरकरांचे स्मारक व प्रसिद्ध स्थळे पाहून यावीत तरच सावरकरांच्या विचारांना मुखेड येथे चालना मिळेल अशी सूचना त्यांनी केली. ज्यांना सावरकर समजले ते पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत. सावरकरांचे साहित्य हे सहज समजणार नाही त्यासाठी व्यासंग आवश्यक आहे. मुखेड मध्ये सावरकरांची चळवळ रुजत आहे हे पाहून त्यांनी कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले की,

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना केल्या . चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारला.

सावरकरांनी सुमारे ६० वर्षे स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वा.सावरकर प्रतिष्ठान मुखेडचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांनी केले, ते म्हणाले की मुखेड मध्ये सावरकर अनुयायांचे प्रमाण वाढले असून सावरकरांचे विचार जनमानसात रुजताना दिसून येत आहेत ही आनंदाची बाब आहे. ज्या व्यक्तीला सावरकर समजला तो कधीच खचून जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

 

अध्यक्ष समारोप करताना डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणाले की, मुखेड मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा रुजते आहे ही भूषणावह बाब असून असेच कार्य हे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मुखेडच्या वतीने होणे आवश्यक आहेत. यावेळी प्रतिष्ठानचे त्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश पालमकर यांनी केले कार्यक्रमास प्रा.सौ. सुवर्णा देशपांडे (कुलकर्णी), ॲड. आशिष कुलकर्णी, उत्तम कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, नितीन टोकलवाड, अभिजीत महाजन, किशोर मस्‍कले, सचिन देबडवार, भगवान गुंडावार, अविनाश कुलकर्णी यांच्यासह अनेक पुरुष-महिला उपस्थित होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *