नांदेड, दि. ७ जूनः
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांदेड शहरात स्मारक उभारण्यास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली असून, त्याबाबतचा शासननिर्णय आज जारी झाला. या स्मारकासाठी पाठपुरावा करून ते मंजूर करून घेऊ, असा शब्द माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिला होता. आजच्या शासननिर्णयामुळे त्यांनी आपल्या वचनाची पूर्तता केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नांदेड शहरात असावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. त्याअनुषंगाने हे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्व स्तरांवर पाठपुरावा करू असा शब्द खा. अशोकराव चव्हाण यांनी दिला होता. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. महानगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केलेल्या प्रस्तावाचा त्यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार राज्याच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी एक शासन निर्णय निर्गमित केला असून, यामध्ये नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे स्मारक उभारण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्याचे घोषित झाले आहे. या स्मारकासाठी अंदाजे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही शासननिर्णयात नमूद करण्यात आहे. त्यामुळे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याचे नांदेडकरांचे स्वप्न पूर्णत्वास येणार हे निश्चित झाले आहे. या स्मारकासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहे.
*अहिल्यादेवी सेवाकार्य व दातृत्वाचे प्रतिकः खा. चव्हाण*
महापुरूषांचे पुतळे व स्मारके ही समाजासाठी प्रेरणास्थळे असतात. राजमाता अहिल्यादेवी होळकर या सेवाकार्य आणि दातृत्वाचे प्रतिक होत्या. त्यामुळे नांदेड शहरात त्यांचे यथोचित स्मारक असावे, या नांदेडकरांच्या मागणीला माझा पाठिंबा व सहकार्य होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाला मान्यता दिल्याबद्दल मी राज्य सरकारचा आभारी असल्याचे खा. चव्हाण यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.