उन्हाळी शिबिराची सांगता… जि. प. प्राथमिक शाळा मंग्याळ चे उपक्रमशील शिक्षक साहित्यिक एकनाथ डुमणे यांचा अभिनव उपक्रम

 

मुखेड: (दादाराव आगलावे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंग्याळ तर्फे दिनांक पाच जून ते अकरा जून दरम्यान उन्हाळी शिबिर घेण्यात आले. या शिबिराची सांगता आज दिनांक अकरा जून रोजी साने गुरूजी स्मृती दिनाचे औचित्य साधून समारंभ पूर्वक करण्यात आली. साने गुरूजींना अभिवादन करून खर्‍या धर्माचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. यावेळी शाळेच्या सहा माजी विद्यार्थिनीं दहावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्या प्रित्यर्थ त्यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास होत असताना त्यांच्यात निकोप जीवन शैलीचा विकसित व्हावी. पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण व्हावी. ऊर्जा बचत, जलबचतीची सवय लागावी व जागरूकता निर्माण व्हावी. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे तेव्हा विद्यार्थ्यात वृक्ष विषयक चळवळ निर्माण व्हावी. या उद्देशाने शासनाने पत्रक काढून सर्व शाळांना उन्हाळी शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. जि प प्राथमिक शाळा मंग्याळने या आवाहना नुसार दिनांक ५ जून ते ११ जून दरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन केले होते.
पाच जून रोजी संजय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवनशैली’ जडणघडणीसाठी विद्यार्थ्यांची गाव परिसरात फेरी काढून नदीकाठचे वृक्ष पक्षी यांचे निरीक्षण करण्याची गोडी लावण्यात आली. सहा जून रोजी बाबू घोडके सरांनी ‘शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे’ अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेत उपलब्ध जागेत परसबाग निर्मिती करताना वृक्षारोपनाचे धडे दिले. आपल्या शेतातील बांधावर व घरासमोरील मोकळ्या जागेत वृक्ष, फुलझाडे आदि लावण्यासोबतच त्यांची जपणूक करण्याचे आवाहनही केले. ७ जून रोजी संजय मोरे यांनी ‘ई कचरा कमी करणे’ या विषयावर मार्गदर्शन करताना ‘ई कचरा कसा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट कशी लावायची ? तो पर्यावरणाला कसा हानीकारक आहे ? हे पटवून देताना विद्यार्थ्यांच्या घरातील ई कचरा शाळेत आणावयास लावून त्याचे संकलनही केले. या कचर्‍यापासून पर्यावरण रक्षण कसे करता येईल यावर चर्चा घडवून आणली.

८ जून रोजी चंद्रकांत गोंड यांनी ‘कचरा व्यवस्थापना’चे धडे देताना विद्यार्थ्यांना स्वच्छते प्रति जागरूक केले. घरामध्ये साठून असलेला विविध स्वरूपातील कचरा विद्यार्थ्यांच्या ध्यानी आणून दिला. या कचरा व्यवस्थापनातील 3R सिद्धांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. कमी करा, पूनर्वापर , पूनर-प्रक्रिया (टाकाऊतून टिकाऊ निर्मिती) अशा स्वरुपात कचर्‍याचे व्यवस्थापन केल्यास ते अधिक सोयीस्कर होईल. हे सोदाहरण सांगितले. ९ जून रोजी ‘ऊर्जाबचती” चे महत्व पटवून देताना आपण ऊर्जा बचत कशी करावी ? ऊर्जा बचतीचे फायदे उत्तम बेजलवारांनी घराऊ उदाहरणातून विद्यार्थ्यांच्या ध्यानी आणून दिले. आपण अनवधानाने व बेफिकीर वृत्तीने ऊर्जा घालवू नये. ऊर्जेचा योग्य वापर करून घ्यावा. हे पटवून दिले. ‘ईको कल्ब’ ची निर्मिती केली. पंढरीनाथ बिरादारांनी १० जून रोजी ‘पाणी बचती’चे महत्व विशद करताना पाण्याचा अपव्यय आपल्या हातून कसा होतो. तो कसा टाळला पाहिजे. हे विद्यार्थ्यांच्या ध्यानी आणूम दिले. पाण्याचे दैनंदिन जीवनातील महत्व . पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ओढवणारी परिस्थिती व त्यामुळे होणारे सजीवांचे हाल लक्षात आणून देत पाणी बचत किती महत्वाची आहे. हे पटवून दिले. ११ जून रोजी प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम व प्राण्यांवर होणारे परिणाम या विषयी एकनाथ डुमणे यांनी मार्गदर्शन केले. प्लॅस्टिक च्या कचर्‍याचे पर्यावरणावर होणारे परिणाम समजावून दिले. सांडपाणी निचर्‍यात प्लॅस्टिकचा अडसर ध्यानी आणून दिला. प्लॅस्टिकचा वापर न करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकडून करवून घेतला.

 


अशा विविध माहितीपूर्ण उपक्रमाने संपन्न उन्हाळी शिबीराची सांगता केंद्र प्रमुख डाॅ.शिवाजी कराळे, ब्रँच लोहा संकूलाचे केंद्रप्रमुख वसंत कोंडलवाडे, शा.व्य.स.मंग्याळचे अध्यक्ष हाणमंतराव काटशेव, उपाध्यक्ष विष्णूदास पिटलेवाड, संजय कोरे , संजय मोरे यांचे उपस्थितीत सहभागींना प्रमाण पत्रे देवून करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. डाॅ.कराळे व कोंडलवाडे यांनी समयोचित मार्गदर्शन करीत सर्वांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक एकनाथ डुमणे यांनी मांडले. संजय कोरे यांनी आभार मानले. जि. प. प्राथमिक शाळा मंग्याळ चे उपक्रमशील शिक्षक साहित्यिक एकनाथ डुमणे यांचा अभिनव उपक्रमस विद्यार्थ्यांनी कमालीचा प्रतिसाद दिला असून एकनाथ डुमणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *