नांदेड दि.१२ ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असलेल्या नांदेडला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी शहरात पोषक वातावरण निर्माण करीत ‘एज्युकेशन हब’ बनवण्यात आपल्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत यांनी केले आहे.
शहरातील बाबानगर येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कूल येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात डी. पी. सावंत बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर,यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कबीर रबडे, प्रा कैलास दाड,मुख्याध्यापिका सौ.एस. आर. कदम,यशवंत महाविद्यालय जिनियस बॅचचे समन्वयक सचिन कदम,पर्यवेक्षक अरुण कल्याणकर ,एस.एन.सूर्यवंशी , सौ व्ही.आर. देशमुख आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना डी. पी. सावंत म्हणाले की, अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा अन् सर्वसामान्य कुटुंबाला परवडणाऱ्या खर्चात उत्तम शिक्षणाची संधी आणि पाल्यांच्या सुरक्षिततेची हमी या मिळत असल्याने शिक्षणासाठी पालकांची पसंती नांदेडला असून एज्युकेशन हब’ बनवण्यात आपल्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान आहे. शहरात अध्ययन करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी येत आहेत. त्यामुळे नांदेडची अर्थव्यवस्थाही गतिमान झाली आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेमध्ये मिळवलेले उत्तुंग यश खूप कौतुकास्पद आहे.तुम्ही आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. येणारी दोन वर्षे तुमच्यासाठी बहुमोल आहेत.कठोर परिश्रम घ्या आणि स्वतःला सिद्ध करा. प्रत्येकाने डॉक्टर, इंजिनियर व्हावे असे नाही,तर इतरही शेकडो फॅकल्टी ह्या तुम्हाला तुमचा करिअर घडवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. लॉ, सी.ए. यासारख्या शाखेतही विद्यार्थी उत्तम करिअर घडू शकतात
नवीन शैक्षणिक धोरणावर भाष्य करताना डी.पी. सावंत म्हणाले,की नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना मिळणारी ऐच्छिक विषयी निवडण्याची संधी व त्यातील गतिमानता विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनवेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी जाधव ओंकार तुकाराम व अटकलीकर तेजस चंद्रकांत या १०० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या व 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी स्त्री शिक्षणाचे उद्गगाते, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले व मराठवाड्याचे भाग्यविधाते,देशाचे माजी गृहमंत्री श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मुख्याध्यापिका सौ एस. आर. कदम व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही गौरव याप्रसंगी करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी.नाईक यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.