खूपदा आपण मोठमोठ्या गोष्टींमध्ये आयुष्यातील आनंद शोधत असतो आणि मोठ्या आनंदाच्या एका क्षणासाठी आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींतील अमूल्य आनंदाला पोरखे होतो. मग पदरी पडते नेहमीचीच अस्वस्थता, नकारात्मकता, निरूउत्साहीपणा, अन् जीवन बनून जातं असमाधानाचं न उलगडलेल कोडं…
दैनंदिन जगण्यातून रोजच्या प्रश्नातून, समस्यातून, निर्माण होणाऱ्या ताणतणावातून आनंदी राहण्याचं जगण्याचं आपण हळूहळू विसरून जात आहोत का.. आयुष्याच्या एका टप्पयानंतर, बरचसं पाणी पुलाखालून वाहुन गेल्यावर ….. स्वतःच बनवलेल्या यशाच्या मापदंडाच्या काही पायऱ्या यशस्वी चढल्यानंतरची मानसिक उत्साहाची भरती ओहटी कित्येकदा अनुभवायला मिळते… मग जीवनाला पुन्हा एकदा मागे वळून पाहण्याची मनाला लहर येते….. तेंव्हा कुठे मन थोडस स्थिरावतं, स्मरण, विस्मरण .. आठवणींचा खजिना मनात रूंजी घालू लागतो.
जीवनातील काही प्रसंगानुरूप भेटलेली व्यक्तीमत्वं… त्यांच्या अस्तित्वानं जगण्यात झालेले बदल नकळत का होईना अगदी आपलं अनुभवविश्व कितीही समृध्द असलं तरी आपल्याला खूप काही शिकवून जातात. कारण आयुष्य नित्य काहीतरी आपल्याला शिकवत असतं. शिकण्या शिकविण्याची नित्य प्रक्रिया चालूच असते. म्हणून रोजच्या लहान लहान गोष्टीतला आनंद संचित करून ठेवायला हवा.
सकाळी उठल्यानंतर चा पहिला चहा. आपल्या जीवनातला अविभाज्य भाग, कामाच्या घाई गडबडीत पिलेला चहा अन् झाडांवेलींकडे पहात निवांत पिलेला चहा.शरीराप्रमाणे मनाला ही प्रफुल्लित करतो. मृतिकेचा पहिला मृदगंध मनाच्या गाभाऱ्यात चिरस्थायी स्थान घेऊन मेंदूला आल्हाददायक चेतना प्रदान करतो, जगातल्या महागातल्या महाग अत्तराची सर त्याला येणार नाही… प्रवास करताना खिडकीतून दिसणारा निसर्ग विविध झाडं झुडपं, टेकडया, शेती, अगदी येईल ते रसिकतेनं सगळ पाहणं… रात्रीच्या वेळी टपोऱ्या चांदण्या .
.कलेकलेनं वाढणारा आणिक लुप्त होणारा चंद्र..सगळं आसमंत उजळून टाकणाऱ्या तारका..बेभानपणे चांदण्यात स्वतःला मिळणाऱ्या आनंदाची अपुर्वाई काही औरच… उर्जेला शेकडो धुमारे फुटावेत असा चांदण्यांचा श्वेत प्रकाश ..या शितल चांदण्यात स्वतःला हरवताना खरं तर आपण स्वतःलाच शोधत असतो, स्वतःलाच नव्याने भेटत असतो.. स्वतःच्या स्थितंतराचा नव्याने भास होत असतो, आपल्यालाच नव्याने शोधत स्वतःची व्याख्या करत असतो, कितीदा न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ही सापडतात, आणि आपण स्वतःशीच हसतो…
आयुष्य खरं तर किती साधं सोप होऊ शकतं..
फक्त नजरेचा, विचाराचा विशेषतः जगण्याचा कल तसा हवा, निसर्गापसून दूर जाऊन अलिप्त राहून जगणं, आयुष्याला यांत्रिक करून जातं, आयुष्यात अधिक जीवंतपणा आणायचा तर निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालायला हवेत. एका आदर्श मित्रातले सगळे गुण त्याच्यात आहेत, फक्त आपण त्याला ओळखायला हवे, जगणं जगणं म्हणजे तरी नेमक काय? येणाऱ्या प्रत्येक क्षणाला वेळेला कृतार्थाचे गोंदण देणं, सार्थकतेचं आर्ध्य देणं..अगदी समर्पित भावनेनं.
अनिता दाणे-जुंबाड
7775830740
( लेखिका शिक्षिका व विविध प्रकारात लेखन करतात.)