डॉ. प्रतिभा जाधव यांना मसापचा पुरस्कार जाहीर

 

नाशिक – येथील साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार डॉ.प्रतिभा जाधव यांच्या ‘दहा महिन्यांचा संसार’ ह्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दामाजीनगर(मंगळवेढा) यांचा शिवाजी ढेपे राज्य साहित्य पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे. मराठी वाङ्ममयक्षेत्रामध्ये हा पुरस्कार मानाचा समजला जातो. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. लवकरच पुरस्कार सोहळा मंगळवेढा येथे संपन्न होईल असे म.सा.प. शाखा मंगळवेढाचे अध्यक्ष प्रकाश जडे व सचिव संभाजी सलगर यांनी जाहीर केले आहे.

 

 

कोरोना एकल महिलांच्या वास्तव जगणे मांडणाऱ्या कथा ‘दहा महिन्यांचा संसार’ ह्या कथासंग्रहात आहेत. एकल महिलांचे साहित्य हा नवीन साहित्य प्रवाह ह्या कथासंग्रहाच्या निमित्ताने निर्माण होतो आहे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा एकल महिला राज्य पुनर्वसन समितीचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी मांडले आहे.

पुरस्कार्थी साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव सामाजिक अंगाने वर्तमानावर विचारप्रवृत्त करणारे परखड वैचारिक स्तंभलेखन विविध नामांकित वृत्तपत्रात नियमितपणे करत असतात. त्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र, मुक्त विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासनाच्या सल्लागार समिती सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य आहेत. त्यांची ललित, नाट्य, काव्य, वैचारिक, समीक्षा या साहित्य प्रकारात आजवर आठ पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या ‘संवाद श्वास माझा’ ह्या काव्यसंग्रहाची इंग्रजी व हिंदी भाषेतील अनुवादित पुस्तके दिल्ली येथील नामवंत प्रकाशन संस्थेने नुकतीच प्रकाशित केलेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *