कै. साै. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचे वितरण
कुसुम सभागृहात रंगला दैनिक सत्यप्रभाच्या वर्धापनदिनाचा साेहळा
——-
नांदेड, ः मुख्यमंत्री किंवा विविध खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना नांदेड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आपण आग्रही भूमिका घेतली. आजही आपले प्राधान्य मराठवाडा आणि नांदेड हेच आहे. यासाठी काही वेळा संघर्षही करावा लागला. मात्र, मराठवाड्याच्या विकासासाठी आपण आपली सर्व शक्ती प्रत्येकवेळी पणाला लावली आणि विकासाचे प्रकल्प मार्गी लावले असे सांगत माजी मुख्यमंत्री खा. अशाेकराव चव्हाण यांनी नांदेड आणि मराठवाड्याचा विकास हाच आपला अजेंडा असल्याची भूमिका आज पुन्हा अधाेरेखित केली.
राज्याच्या जलसंस्कृतीचे जनक आणि मराठवाड्याचे आधुनिक भगीरथ तसेच माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने आणि दैनिक सत्यप्रभाच्या वतीने आयाेजित कै. साै. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण साेहळ्याचे आयाेजन आज (दि. 14) कुसुम सभागृहात करण्यात आले हाेते. त्यावेळी अध्यक्षपदावरुन खा. अशोकराव चव्हाण बोलत होते. या सोहळ्याला ज्येष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, खा. डाॅ. अजित गोपछडे, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. राम पाटील रातोळीकर, आ. डाॅ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, विधानपरिषदेतील माजी गटनेते अमरनाथ राजूरकर, युवा नेत्या श्रीजयाताई अशाेकराव चव्हाण, माजी जि. प. सदस्या पूनम पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती. प्रारंभी श्रद्धेय डाॅ. शंकरराव चव्हाण व कै. साै. कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संताेष पांडागळे यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका तसेच दैनिक सत्यप्रभाच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली. त्यानंतर राज्यातील एक प्रतिष्ठेचा सन्मान म्हणून नावारुपास आलेल्या कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक डॉ. नीलेश खरे, प्रख्यात चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार आणि ‘फोर्ब्स’कडून गौरव झालेले उद्योजक दाम्पत्य पंकज महल्ले व सौ. श्वेता ठाकरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कारप्राप्त गाैरवमूर्तींनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
अध्यक्षीय समाराेप करताना माजी मुख्यमंत्री खा. अशाेकराव चव्हाण यांनी मराठवाडा आणि नांदेडच्या विकासासाठी मुख्यमंत्री तसेच मंत्री म्हणून विविध खात्याची जबाबदारी सांभाळताना आपण नेहमी आग्रही भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. मराठवाड्यातील विविध नेत्यांना सरकारमध्ये काम करताना पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडून विरोध केला जाताे. त्यांना हवी तेवढी मदत केली जात नाही. मराठवाड्याला एक प्रकारे सापत्न वागणूक मिळते असा मुद्दा ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. प्रल्हाद लुलेकर यांनी आपल्या भाषणात मांडला हाेता. तो धागा पकडून डाॅ. लुलेकर म्हणतात त्यात वास्तव असल्याचे सांगत खा. अशाेकराव चव्हाण यांनी मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न मंत्रिमंडळात मांडताना त्यामागची भूमिका आपण समजावून सांगितली आणि हे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केल्याचेही स्पष्ट केले. मुख्यमंत्री तसेच मंत्री म्हणून विविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना आपण अगाेदर मराठवाडा, नांदेडलाच प्राधान्य दिले. अनेकदा मराठवाड्याविषयीचे प्रश्न, प्रकल्प मार्गी लावताना संघर्षही करावा लागला. पण, आपण त्या प्रश्नाचे महत्व तार्किकदृष्ट्या पटवून देऊन ही कामे मंजुर करुन घेतले. अगदी अलीकडे समृद्धी महामार्गात नांदेडचा समावेश करण्यासाठी सुद्धा आपण मंत्रिमंडळाला हा मार्ग मराठवाडा आणि नांदेडच्या विकासासाठी कसा आवश्यक आहे हे पटवून दिले आणि ताे मंजूर करुन घेतला. मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मात्र, आज राजकीय दृष्टीने पाहून काही बाबतीत नकारात्मक भूमिका घेतली जाते. ती टाळली पाहिजे. विकासाच्या बाबतीत नकारत्मकता साेडून सकारात्मक हाेऊन आणि राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. व्यक्तिगत विराेध करुन विकासाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्याएेवजी काेणीही पुढे येऊन सर्वांना बराेबर घेऊन ते साेडवले जाऊ शकतात यावर आपला विश्वास आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले. डाॅ. शंकरराव चव्हाण यांनी राज्यात उभारलेली अनेक धरणे आज त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. आजच्या पिढीला शंकरराव चव्हाण यांच्या कार्यासह मराठवाड्याचा इतिहास समजावून सांगितला पाहिजे. यासाठी साहित्यिक, कलावंतांनी पुढे यावे, अशी अपेक्षा खा. अशाेकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. खा. अशाेकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
पुरस्कार विजेत्यांच्या कामामुळे तरुण पिढीला सुद्धा वेगळ्या वाटा शोधण्यासाठी प्रेरणा मिळते. दिशा मिळते. पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आपल्या कामातून सामाजिक बांधिलकीबराेबरच आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. पंकज महल्ले आणि साै. श्वेता ठाकरे या दाम्पत्याने उच्चशिक्षित असूनही ग्रामीण भागात येऊन शेती, शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेले काम आजच्या तरुण पिढीला ऊर्जा देणारे आहे. मराठवाडा, विदर्भात वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना महल्ले दाम्पत्याच्या गाेदाम उभारणीमुळे माेठी मदत मिळाली आहे. शेतमालाला बाजारात किफायतशीर भाव मिळेपर्यंत हे धान्य शेतकरी गाेदामात साठवणूक करु शकतात. शिवाय त्यांना त्यावर हवे असेल तर कर्जसुद्धा मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांची माेठी अडचण महल्ले दाम्पत्याच्या या कामातून दूर झाली आहे. आगामी काळातही शेतकरी आणि शेतीच्या समस्यांचा अभ्यास करुन ते आणखी नाविण्यपूर्ण काम करतील असा विश्वास खा. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. चित्रकार डाॅ. नरेंद्र बाेरलेपवार यांच्या कर्तत्वाचा गाैरव करताना ते नांदेडचे भूमीपूत्र असल्याने आपल्याला अधिक आनंद हाेताे आणि अभिमान वाटतो. विविध मुख्यमंत्री ते राष्ट्रपतींनी त्यांच्या कलेचे काैतुक केले आहे. त्यांच्यातील कलात्मकता आणि गुणवत्ता या जाेरावर ते यशाची आणखी शिखरे गाठतील, असा विश्वासही खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक डाॅ. नीलेश खरे यांच्या पत्रकारितेतील याेगदानाचा उल्लेख करुन खा. चव्हाण म्हणाले, की आज माध्यमांतील वाढती स्पर्धा आणि वैविध्यात सुद्धा नीलेश खरे यांनी निष्पक्ष पत्रकारिता केली. पत्रकारांसह माध्यमांवर जनतेचा विश्वास असतो. त्यामुळे सत्य मांडून ही विश्वासहार्यता जपली गेली पाहिजे. आपले लिखाण किंवा इलेक्ट्राॅनिक माध्यामातून परखड विचार मांडले तरी त्यात सत्यता असावी लागते. या कसाेटीवर नीलेश खरे हे त्यांच्या नावाप्रमाणे खरे ठरले आहेत. वर्तमानपत्रांनी किंबहुना माध्यमांनी पक्षातीत भूमिका घेतली पाहिजे. कुठल्याही एका राजकीय पक्षाचे मुखपत्र किंवा तळी उचलण्याचे काम केले तर वाचक, दर्शकांची फसवणूक केल्यासारखे हाेईल. त्यामुळे माध्यमांनी विश्वासहार्यता टिकवण्याचे काम अधिक परिश्रमपूर्वक केले पाहिजे, अशी अपेक्षाही खा. चव्हाण यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत दै. सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संताेष पांडागळे, संचालक बालाजी जाधव, संदीप पाटील, सल्लागार मनाेहर आयलाने, वृत्तसंपादक राजेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. विश्वाधार देशमुख यांनी केले.
——-
जुन्या आठवणींना उजाळा
———
डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्याबराेबर काम केलेल्या माजी आमदार किशनराव राठाेड, संभाजी पवार यांचा उल्लेख करत आज त्यांची दुसरी पिढी म्हणजे आ. तुषार राठाेड आणि आ. राजेश पवार आपल्यासाेबत आहे, असे सांगून खा. अशाेकराव चव्हाण यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.