“पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ,कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे” . असं निर्भिडपणे जगापुढं ज्यांनी आद्वितीय असं तत्वज्ञान मांडलं ते लोकशाहीर अण्णा भाऊ उर्फ तुकाराम भाऊराव साठे यांच्या जयंतीनिमित्न विनम्र अभिवादन
“Literature is the mIrr०r Of society” म्हणणाऱ्या पुरोगामी समाजात खरंच साहित्याचा अभ्यास एक सामाजिक दस्तऐवज, सामाजिक कागदपत्र म्हणून केलाच तर त्या त्या काळातील साहित्याचे प्रतिबिंब त्या साहित्यामध्ये दिसल्याशिवाय राहत नाहीत.
एकंदरीत अण्णाभाऊंच्या साहित्याचा विचार करताना कथा, कादंबऱ्या ,पोवाडे ,प्रवासवर्णन अशा विविध प्रकारातून त्यांचं लेखन मनाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या जशा पुरुषप्रधान आहेत तशा स्त्रीप्रधानही आहेत ,ज्या काळात अण्णा भाऊंनी हातात लेखणी घेतली तो काळच मुळात पुरुषप्रधान संस्कृतीचा होता बरं का ?अनेक प्रकारच्या रूढी, परंपरा पिढ्यानपिढ्या सामाजिक मनावर खोल रुतून बसल्या होत्या. अंधश्रद्धा, जातीयतेच्या दलदलीत केवळ स्त्रीच काय पुरुष सुद्धा भरडला गेलेला होता. अशा काळात साहित्य निर्मिती अण्णा भाऊ सारख्या एखाद्या पुरुषाकडून होणं हे खरंच खूप कौतुकास्पद आणि काळाच्या पुढचं पाऊल होतं.
अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसीच्या साच्यातच वावरत होती ; मात्र अण्णा भाऊंनी या प्रतिमेला आव्हान देत तत्कालीन गावातील व गावकुसाबाहेरील घरंदाजच नव्हे तर उपेक्षित ,श्रीमंत, गरीब ,उच्च नीच, वंचित भटक्या समाजातील स्त्रियांच्या जीवनातील वास्तव खऱ्या अर्थानं जगासमोर मांडलं ते आपल्या कथा कादंबऱ्यातून.
अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यामध्ये स्त्रीला ‘स्त्री’ म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून रेखाटलयं बरं का ? खरं पाहता अण्णा भाऊंचे साहित्य म्हणजे, तत्कालीन काळातील वास्तव जीवनाच अपत्य होय. स्त्रीनं कसं असावं ? कसं नसावं ? याचे ठोकताळे समाज मनाने त्याचे त्यानेच ठरवलेले असतात. ते कालही ठरवलेले होते: आणि आजही ठरलेले आहे बरं का? मात्र अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका या ठरवलेपणाला, साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अवकाश निर्माण करण्याचे प्रयत्न करतात:
तसेच या सर्व नायिका धाडसी, निडर, स्वाभिमानी असून भारतीय संस्कृतीची मूल्यं जीवापाड जपणाऱ्या आहेत. नितिमत्तेसाठी घरच्या इज्जतीसाठी वेळप्रसंगी मरणालाही कवटाळायला त्या तयार असल्याचे दिसून येतं.
अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यात वास्तवाचा आग्रह नेहमीच धरलाय.कल्पकतेला हद्दपार करून,जीवनातील संघर्ष,संघर्षातील आशावाद, चित्रीत करण्याचा त्यांचा धाडसी बाणा समाज परिवर्तनाच्या काळात त्यांनी ओळखलेली साहित्यिकाची जबाबदारी या भूमिकेसाठी उच्च विद्या विभूषित वाचक वर्ग मनापासून मुजरा करतो.अण्णाभाऊंनी प्रथमच स्त्री जीवन हेच साहित्याचे विषय बनविले,त्यांनी स्त्रीचं चारित्र्य, तिचा स्वाभिमान, तिच्या जगण्याची धडपड, जीवन प्रवासातील संघर्षात होणारी तगमग, त्यातूनही तिला सामोरे काढणारा तिचा निर्भीड बाणा, करारीपणा, तिचा तिच्या कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा याचं यथार्थ चित्रण करताना अण्णाभाऊ काडीभर ही बाजूला सरकत नाहीत.ते स्वतः स्त्रीचा आदर करतात व त्यांच्या साहित्यातूनही पावलोपावली त्याचा प्रत्यय आणतात. त्यांच्या नायिका प्रधान कादंबऱ्यातून वेश्या, कामगार, मुरळी, तमाशातील कलावंत इ.रूपात स्त्रियांचे वेगळे रूप मांडून त्यातील वास्तवता, भयानकता मराठी साहित्यात प्रथमच आणली गेली ती अण्णा भाऊच्या लेखन प्रतिभेतून. चित्रा, वैजयंता,चंदन, आवडी, चिखलातील कमळ, वारणेच्या खोऱ्यात , रत्ना इ. कादंबऱ्यांमधून त्याचाच तर प्रत्यय येतो.
“मेलेलं मेंढरू आगीला भीत न्हाय” हेच तत्त्वज्ञान अण्णाभाऊंच्या नायिका त्यांच्या संघर्ष प्रसंगातून प्रत्ययास आणतात. अण्णाभाऊंची प्रत्येक नायिका ही; मग ती वैजंतातील वैजंता असो ,चिखलातील कमळ मधील तुळसा आणि सीता हया मायलेकी असतील ; की आवडीतली आवडी असो , वारणेच्या खोऱ्यातील मंगला असो की, चंदन मधील चंदन असो, रत्नातील रत्न असो की; चित्रातील चित्रा असो या सर्व नाईका प्रचंड कष्ट करणाऱ्या, त्रास सोसणाऱ्या, जीवावर उदार होऊन जगणाऱ्या आहेत. या दीनदलित दुबळ्या, दुभंगलेल्या, टाकलेल्या असल्या तरी स्वातंत्र्याच्या आणि स्वाभिमानाच्या प्रेरणांनी भारावून गेलेल्या आहेत. पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या प्रथा मोडीत काढणारी, वेळप्रसंगी शील रक्षणासाठी जीवावर बेतणारी हीच अण्णाभाऊंची नायिका होय.
अण्णाभाऊ स्त्रीची लाज राखण्याकरिता, तिची शान वाढवण्याकरिता धडपडतात, झिजतात व लिहितात यातच अण्णाभाऊंचा मोठेपणा आहे. अण्णा भाऊंच्या साहित्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंतकरणात स्त्री विषयी असलेलं अपार प्रेम होय. स्त्रीच्या दुःखानं त्यांचं मन हेलावून जातं; ते निवारण्यासाठी जातीने ‘मांग’ असलेल्या, कुठल्याच प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या ‘वाटेगाव’ सारख्या खेड्यात जन्माला येऊन कसल्याच सोयी सुविधा नसलेल्या परिस्थितीत फक्त दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी कोणत्याही विद्वानाला हेवा वाटावा ; असं साहित्य वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षात मराठी साहित्य साता समुद्रापार नेलं. छत्रपती शिवरायांचा पोवाडा रशियात गाऊन, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डफावर थाप मारून महाराष्ट्राच्या नसानसात उभारी भरणाऱ्या या लोकशाहीराला त्याच्या 104 व्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा
रविराज संग्राम केसराळीकर
9970926976