भिक्षापात्र अवलंबणे। जळो जिणें लाजिरवाणे* कामिका एकादशीच्या निमित्ताने…. 31/7/2024-बुधवार

 

 

संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज वरील अभंगातून भक्तांना उपदेश करतात. भिक्षा ही कुणालाही देऊ नका? ढोंगबाजी करून फुकट उदरभरण करणे हे त्यांना अजिबात मान्य नाही,भिक्षेचा त्यांनी नेहमी निषेध व तिरस्कार केला आहे,भीक्षा मागणे ही वाईट वृत्ती आहे. चुकारपणाचे लक्षण आहे.भीक्षेमुळे आपण लोचट आणि दीनवाणे होतो,भीक्षा कितीही दिली तरी ती देणारा कृतज्ञ होतो, पण घेणारा समाधानी होत नाही ,तुम्ही काळा बरोबर चला मागे पडू नका, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, परंतु जर भिक्षा मागत राहिले…तर तुम्ही कधीही पुढे जाणार नाही,त्यामुळे माणुसकीचे भान ठेवून तुम्ही चारचौघात वागायला शिका, भिक्षा मागल्यामुळे तुमची इज्जत जाईल आणि लज्जा निर्माण होईल, चार चौघात आपला मान सन्मान राहणार नाही. आपलं जीवन सुखी करण्या साठी तो मार्ग चांगला नाही.म्हणून ते म्हणतात.भिक्षापात्र अवलंबणे । जळो जिणे लाजिरवाणे

ज्या ज्या वेळी भिक्षा मागितली जाते, त्या त्या वेळी लोक आनंदाने भीक्षा देतील असे नाही,
त्यामुळे तुम्ही भिकारी होऊ नका. तुम्ही अंधु किंवा पंगू अशा व्यक्तींना थोडी मदत म्हणून भीक्षा दिल्यास काही हरकत नाही. परंतु देवाबरोबर चांगले वागावे, असे या भिक्षा मागणाऱ्या लोकास वाटत नाही. ते स्वार्थी असून देवाच्या नावाने भिक्षा मागून स्वतःचे पोट भरतात. हे संत तुकाराम महाराजांना मान्य नाही ज्यांचा देवावर अजिबात विश्वास व भाव नाही, देवाविषयी आस्था, आपुलकी, प्रेम,माया,दया,भाव नाही. अशा लोकांनी देवाच्या नावानं भिक्षा मागू नये.असे सडेतोडपणे संत तुकाराम महाराज दुर्बलांना व चुकीचे वागणाऱ्या लोकांना बोलतात.यांनी दांभिकतेचा आव आणू नये, आज महाराष्ट्रात भिकाऱ्यांची संख्या पाहिली तर प्रत्येक मंदिराच्या पुढे रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, तीर्थक्षेत्रे, जत्रा,यात्रा, बाजाराच्या ठिकाणी शेकडो भिकारी भीक मागत आजही फिरत आहेत. ज्यांचे हात, पाय मोडलेले नसून शरीर धडधाकड आहे, असे व्यक्ती सुद्धा आजकाल अंगावरले कपडे फाडून स्वत:चा चेहरा दीनवाणा करून भीक मागून घेत आहेत.ही लाजिरवाणी गोष्ट आहे.परमेश्वराने आपल्याला एवढे बळकट शरीर दिले आहे. त्या शरीराचा वापर स्वतःसाठी व जन सेवेसाठी करावा असे न करता काही ढोंगी लोक आपमतलबी, स्वार्थी,आळशी होऊन भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. आपल्या स्वतःच्या गावाजवळ भीक न मागता थोडं दूर जाऊन अनोळखी ठिकाणी भरपूर माया जमा करत आहेत. पाठीमागे काही वर्षांपूर्वी मुंबई या ठिकाणी भिका-याचा सर्वे करण्यात आला त्या सर्वे मध्ये चार लाख भिकारी मुंबई मध्ये भीक मागत होते. मागणाऱ्यांची संख्या जास्त झाली
.कधीही भिक्षा घेणारा माणूस समाधानी होत नसतो.आजपर्यंत भिक्षा घेणारा स्वार्थी प्रवृत्तीकडेच गेला आहे.गावाकडे शेती घेणे,व्यवसाय करण्यासाठी मुलांना पैसे देणे,आपण खुद्द कपडे फाटके घालून हातात कटोरा घेऊन मोठ्या ठिकाणी भीक मागून घेणे.यात्रा,जत्रा करून भिक्षा मागून माया जमा केली जात आहे.

म्हणून सज्जन हो फक्त हात,पाय मोडले. त्यांना भीक्षा द्या, धडधाकड माणसाला भीक्षा देऊ नये.
शासनाने ही अशा लोकांना पाठीशी न घालता भिकाऱ्यांना भीक मागणे बंद करावे, जेणेकरून त्यांच्यावर नामुष्की होईल इज्जत जाईल, त्यांना भीक मिळणार नाही अशा कठोर अटी घालून भीक मागणाऱ्याचे प्रमाण कमी करावे,खरोखर ज्याना भीक द्यायचे आहे ते लोक यापासून वंचित राहत आहेत. आणि भलताच दुसरा चांगला व्यक्ती अंगावरले कपडे फाटके दाखवून भीक्षा घेऊन जात आहेत, हे कुठेतरी थांबने आता गरजेचे आहे .देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी या देशातील गरिबी संपली नाही. त्याच्या जोडीला भिकारी आहेत.काही जणांनी नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळे तो मुळा सकट उखडून टाकावा लागतो. लाचारी करून भीक मागून माणूस श्रीमंत होत नाही. असे पूर्व म्हटले जात होते पण अक्षरशः आज भारतातल्या चार ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्यात सामान्य माणूस भिक्षा मागून लखपती होत आहेत, दुःखी, पीडित,अत्याचार ग्रस्त दाखवून अनेक जण पैसे कमवत आहेत. *देवाने तुम्हाला काय कमी केले, एक दोन रूपये द्या हो आंधळ्या पांगळ्याला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाबाळांना* असे म्हणून चांगली व्यक्ती सुद्धा काही ठिकाणी भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत. खरोखर या चुकीच्या लोकांमुळे खरे जे दिव्यांग आहेत, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहे, म्हणून सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी यांचा खरमरीत समाचार घेतला आहे. वेगवेगळे पावती पुस्तके छापून लोकांना भावनिक करून त्यांच्याकडून पैसे उकळणे हे सुद्धा एक भिक्षेचा प्रकार आहे.आज आपण समाजामध्ये पाहत आहोत. वर्गणी, देणगी ,सढळ हाताने मदत करा.अशा भूलथापा देऊन जे पैसे काही लोक मागून घेतात त्यांचे जीवन सुद्धा लाजिरवाणे आहे. अशा प्रकारे महाराजांनी सांगितलेले आहे.

सकल संत तुकाराम गाथा 912 वा अभंग *भिक्षापात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे। ऐसियासी नारायणे।उपेक्षीजे सर्वथा।। 1।।*
देवाच्या नावावर कितीही माया जमा केली तरी या लोकांना देवाबद्दल अजिबात आपुलकी नाही,त्यामुळे त्यांची नेहमी उपेक्षाच होते.देवाबद्दल यांच्या मनात कसल्याही पद्धतीचा आदर नाही असे म्हटले आहे.
*देवा पायी नाही भाव। भक्ती वरी वरी वाव। समर्पिला जीव। नाही तो हा व्याभिचार।। 2।।*
देवा बद्दल त्यांना काही घेणे देणे नाही. कसल्याही प्रकारचा त्यांच्या मनामध्ये भाव नाही, त्यांची भक्ती ही वरवर दाखविण्यासाठी आहे. इतरांना वाटते की हे देवासाठी किती फिरत हिंडत आहेत. परंतु ते काहीही खरे नाही हा सगळा केलेला व्याभिचार आहे.
असे सडेतोडपणे ते बोलतात.
*जगा घालावी साकडे। हीन होऊनि बापुडे। हेचि अभाग्य रोकडे। मूळ आणि अविश्वास।। 3।।*
असे हे लोक संपूर्ण देवांना साकडे घालतात. त्यांच्यासमोर हे हीन,दीन,दुबळे, बापूडे होतात, हे नेहमी अभागी असतात. त्यांच्यामुळे यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, हे अविश्वासू आहेत.अशा लोकांना भिक्षा देऊन आपणच मोठे करतो, म्हणून यांचे जीवन जगणे म्हणजे लाजिरवाणे आहे. यांना कुठेही किंमत नाही,असे हे देवाचं खाऊन देवालाच नाव ठेवणारे आहेत. अशा दांभिक लोकांपासून तुम्ही सावध राहा
*काय न करी विश्वंभर।*
*सत्य करिता निर्धार। तुका म्हणे सार। दृढ पाय धरावे।।4।।* म्हणून तुम्ही सर्वांनी सत्याच्या वाटेने जा, चुकीच्या रस्त्याने जाऊ नका? हा विश्वंभर सर्वांवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे तुम्ही त्याचे पाय धरा.

तो तुमचे कल्याण करील, अशा पद्धतीने महाराजांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना भिक्षा मागल्यामुळे काय होते, त्याचे परिणाम काय काय होतात आणि समाजामध्ये त्या व्यक्तीबद्दल काय बोलले जाते,याचे अतिशय व्यवस्थित पणे मार्मिक असे निरूपण केलेले आहे. चुकीचा व्यवहार माणसे तोडतो आणि तो सत्याने आणि सन्मानाने केला की माणसे जोडतो, म्हणून म्हणतो भिकेची हंडी कधीही उंचीवर जात नाही, काही गुंड प्रवृत्तीचे लोक छोट्या बालकांना त्रास देऊन दिव्यांग म्हणून भिक मागायला लावतात असे प्रकार मोठ्या शहरांमध्ये घडताना दिसत आहेत, म्हणून सर्वांनी आपापल्या मुलांवर लक्ष ठेवा. भीक मागू देऊ नका. तुम्हीही दान देते वेळेस व्यक्ती बघून द्या, शक्यतो दान दानपेटीतच टाका ते दान सत्कारणी लागावे, ही अपेक्षा..

शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
*अध्यक्ष:विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *