ज्ञानोपासकांचा आधारवड :प्रा. डॉ.रामकृष्ण दत्तात्रय बदने

 

(05ऑगस्ट 2024 रोजी
प्रा. डॉ.रामकृष्ण दत्तात्रय बदने यांचा वाढदिवस साजरा होत आहे.
त्यानिमित्ताने केलेला हा लेखन प्रपंच.)
———————————————

ज्यांनी माती वरती पाय ठेवून आकाश काबीज केलं, अशा नि:स्वार्थी वृत्ती,कमालीची सहनशीलता,पारदर्शी विचार,समाजाभिमुख नेतृत्व ,
जनहिताचे निर्णय घेण्याची क्षमता,अभ्यासूवृत्ती,सदैव विद्यार्थी हित,
परिवर्तनशील उपक्रम सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे असी अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात.
डॉ.रामकृष्ण दत्तात्रय बदने हे नांदेड जिल्ह्याला लाभलेले एक कृतिशील,उपक्रमशील, समाजाभिमुख नेतृत्व आहे.ते ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता.मुखेड या ठिकाणी हिंदी या विषयाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. ग्रामविकासाच्या ध्येयाने ते झपाटलेले ध्येयवादी साहित्यिक आहेत. शिक्षणातून जनहित साधता येते हे त्यांनी जाणले आहे. प्राचार्य म्हणुन केलेले कार्य व सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य ही लक्षवेधी आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागीय समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,विद्यार्थी कल्याण समिती,बहिशाल व्याख्यानमाला समिती अस्या वेगवेगळ्या समितीवर कार्यरत राहुन काम करत आहेत. संस्थेच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे हे त्यांच्या सहवासात गेल्यानंतर सहज लक्षात येते.नवनवीन कामाचा सदैव ध्यास घेणे हे त्यांचे जीवनसूत्र आहे. स्वच्छ आणि पारदर्शी जीवन जगणे त्यांना आवडते.एक चांगली प्रतिमा त्यांनी जनमाणसात रुजविली आहे.आपण केलेल्या कामाचं आपल्याला समाधान मिळाले पाहिजे असे ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगतात.मला त्यांच्याबद्दल असे म्हणावे वाटते की नसे गर्व अंगी सदा वीतरागी। क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी।।* देव देवतांचे आशीर्वाद आणि संत सहवासातून मिळालेली वैचारिक प्रगल्भता यामुळे त्यांच्या जीवनाची गोडी वाढली आहे.अध्यापनासाठी वाट्याला आलेल्या वर्गावर जाऊन अनेक नवनवीन प्रयोग ते सतत करत असतात.नेहमीच्या चाकोरीबद्ध अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना वेगळे व नवे ऐकण्याची संधी मिळावी म्हणून विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची व्याख्याने आयोजित करतात.त्यांचा उत्साह दांडगा असल्याने मनातला संकल्प सिद्धीस नेण्यासाठी ते नेहमी तळमळ करतात,शुभस्य शीघ्रम या न्यायाने ते कामाला लागतात.तीन दशकाहून अधिक सेवा काळात अध्यापनाचा मनस्वी आनंद घेत घेत त्यांच्याशी वर्गात व वर्गाबाहेर मोकळा संवाद साधतात.विद्यार्थ्यांच्या समस्या, व्यथा,वेदना त्यांना कळतात.

 

मनातून खचलेल्या मुलांना शोधून ते मार्गदर्शन करतात. शिक्षकाचा व्यवसाय म्हणजे निखाऱ्याची शेती हे वाक्य वाचलं होतं. त्याचा अर्थ आता आम्हाला कळत आहे. उत्साही विद्यार्थी वाट्याला येणे हे अध्यापकाचे भाग्य असावे लागते,आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना ते मायेचा आधार देतात आणि स्वतःच्या पायावर उभे करतात.राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व सांगतात म्हणून विद्यार्थी पावलोपावली त्यांच्या संपर्कात असतात

*”कुणीतरी वाट पाहतंय प्राणातून, म्हणून जाण्यात मजा आहे, कुणीतरी ऐकत असतं हृदयातून, म्हणून गाण्यात मजा आहे”* असे त्यांच्याबद्दल बोलावे वाटते, सरांनी ‘विचारधन यशस्वी जीवनाचे,’ ‘ बोलू काही थोरां विषयी,’ गीता अमृताचे प्रवाह: रामकृष्ण महाराज व वारकरी संप्रदाय’ (संपादन) ‘विमुक्त’ (संपादन) ‘नागार्जुन के कथा साहित्य मे जनवादी चेतना,’ ‘आधुनिक हिंदी काव्य’ (संपादन) ‘सत्कर्माचा दीपस्तंभ'(संपादन) असे अनेक ग्रंथ लिहिले आहेत ,त्या ग्रंथातून शैक्षणिक व सामाजिक सेवेचे दाखले देतात. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक शेकडो लेख वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले आहेत. सरांनी त्यांच्या Ramkrishna Badne या युट्युब चॅनलवर विविध विषयांवरील तीनशे व्हिडिओ अतिशय प्रबोधन पर व नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे टाकले आहेत.त्यांच्यामुळेच आम्ही आज शिक्षकी पेशा स्वीकारला आहे, असे म्हटले तर अजिबात वावगे होणार नाही,.

 

 

आई विषयीची अपार कृतज्ञता त्यांच्या शब्दा शब्दांतून व्यक्त होते,बोलताना न अडखळता,आत्मविश्वास पूर्ण ओघवतं व स्पष्टपणे ते बोलतात.आजही त्यांच्या व्याख्यानाला हजर असलेले श्रोते डोळ्यातून अश्रूधारा गाळतात. मायेच्या स्पर्शामध्ये केवढा तरी आधार असतो म्हणून *आई* नावाच्या संस्कार पीठाशी बाळाचे जिव्हाळ्याचे नाते कसे गुंफले जाते हे ते व्याख्यानातून सांगतात.सध्याची पिढी बिघडलेली आहे.यांना संस्कारच नाहीत ? ते कोणाचं ऐकत नाहीत? सदैव मोबाईल हातात घेऊन बसतात.अशी वाक्य नेहमी आता कानावर पडत आहेत, त्यावेळी ते म्हणतात.सध्याच्या पिढीला सर्वस्वी दोष देता येणार नाही? कारण घरातूनच संस्कार होण्यासाठी घरातलं अनुकूल वातावरण, पोषक पर्यावरण, सद्गुणी मित्र या सर्वांची गरज असते.

 

त्यावेळेस मुलांची जडणघडण होते असते.म्हणून आई-वडील,शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे शिल्पकार आहेत. माझ्या बाल मनावर या तिन्ही व्यक्तिमत्त्वांचच्या विचारांचा, आचारांचा, संस्काराचा विलक्षण प्रभाव पडल्याने माझी सुयोग्य जडणघडण झाली असे ते प्रांजळपणे आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतात.आपल्या मुलांनी उत्तुंग भरारी घ्यावी असे सर्वच पालकांना वाटते मात्र ती भरारी घेण्यासाठी त्याच्या पंखात संस्काराचे बळ असावे लागते. आपला मुलगा कर्तबगार व्यक्ती होण्यासाठी त्याच्याशी हितगुज, मनगुज पालकांनी करावे लागतात असे पालकाबद्दल ही ते बोलतात. जन्मदात्यानंतर नि:स्वार्थ व निरपेक्ष भावनेने विद्यार्थ्यांची मने संस्कारीत करणारे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे नीतिमूल्य रुजविणारे चारित्र्याची जडणघडण करणारे त्यांना नीतिमान व गतिमान करणारे महत्वाची व्यक्ती म्हणजे गुरु आहेत. मी जेव्हा माझे आयुष्याचे सिंहावलोकन करतो तेव्हा गुरु महात्म ध्यानी येते. आयुष्याच्या विविध वळणावर भेटलेल्या ज्या शिक्षकांमुळे माझ्या जीवनाला गती आली त्यामध्ये प्रा.डॉ.रामकृष्ण बदने सरांचा सिंहाचा वाटा आहे. सरांची अभिरुची म्हणजे लेखन ,वाचन ,चिंतन,आणि कीर्तन व प्रवचन करणे होय.

या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यात ‘मातृगौरव पुरस्कार’ खैरकावाडी, ता. मुखेड ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ नांदेड. महाराष्ट्र शासन वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड व मानधन वाटप समिती जि.नांदेड तसेच मराठवाडा भूषण पुरस्कार, नांदेड.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आदर्श शिक्षक पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार,किनगांव असे कितीतरी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विद्यार्थ्यांची मने समृद्ध करणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आज सर्वत्र त्यांची ख्याती आहे. वेगवेगळ्या सण उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे, तसेच मंगल प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी हजर राहून समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो म्हणून कार्य करणे, कीर्तनातून प्रबोधन करणे हे सरांचे आवडते विषय आहेत अशा या प्रज्ञावंत,गुणवंत सरांना पुढील आयुष्याच्या वाटचाली साठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.ईश्वर त्यांचे आरोग्य अबाधित राखो.ही ईश्वर चरणी प्रार्थना.

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
*अध्यक्ष:विठूमाऊली प्रतिष्ठान*.
*खैरकावाडी ता. मुखेड जि.नांदेड*
भ्रमणध्वनी-9921208563

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *