हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत शासकीय कार्यालयांवर दिमाखात फडकला तिरंगा ध्वज ; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे युंच्या हस्ते मोहिमेला प्रारंभ

 

 

 प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन

 

लातूर, दि. 13 (जिमाका) : हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या काळात सर्व कार्यालये, घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते ध्वज फडकावून या उपक्रमाला सुरुवात झाली.

 

सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर वाय. पी. सिंग यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालये, सार्वजनिक बांधकाम कार्यालये, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कार्यालये, शाळा आदी ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांनीही आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावून ‘हर घर तिरंगा अभियान’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. घरावर ध्वज फडकविण्याचा मान कुटुंबातील महिला सदस्यांना देवून आगळावेगळा आदर्श निर्माण घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घ्यावा. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ध्वजासोबत सेल्फी घेवून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *