संघर्षमय जीवनाची यशोगाथा’* प्रेरणादायी लेख रविवार विशेष

 

 

 

कवी इंद्रजीत भालेराव यांच्या काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता,
चल माझ्या गावाकडे दोस्ता, या कवितेच्या ओळीनुसार माझ्या संघर्षमय जीवनाची यशोगाथा या नवीन पिढीला सांगणे मला
गरजेचे वाटते, स्वतःच्या गावामध्ये विद्यालय नसल्यामुळे शिक्षणाची हेळसांड कशी होते. अनेक पाहुण्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडेच राहून शिक्षण घ्यावे ,ही जिद्द मनात बाळगून आठ ते नऊ विद्यालयात शिक्षण घेऊन मन एकाग्र करून अभ्यास केला आणि जिद्दीने वर्तमान पत्रातून 285 लेख व आठ पुस्तके लिहुन लेखक म्हणून परिचित होत आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण शिकण्याची इच्छा मनात ठेवली. विद्येमुळे माणूस चांगले जीवन जगतो हे माहीत झाले, म्हणून आपण शाळा शिकावी असे वाटले, त्यामुळे आईवडिलांनी हातामध्ये पाटी, खडू दिले, शिक्षकांनी अ आ ची बाराखडी शिकवली, पहिली ते तिसरी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरकावाडी येथे शिक्षण झाले, शाळेच्या फळ्यावर लिहिलेले अक्षरे, काढलेले चित्रे मनात घर करू लागले, आणि दररोज शाळेत जाऊ लागलो
.गावातील शिक्षण पूर्ण झाले,मुखेड येथे जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये चौथी आणि पाचवीचे शिक्षण पूर्ण केलं. तो काळ होता 1986 ते1987 दोन वर्ष दररोज खैरकावाडी ते मुखेड येथे पाय वाटने चिखल तुडवत जावे लागत होते. *काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता दोन वर्षे मुखेडला येणे – जाणे करण्यात आले, त्यानंतर इयत्ता सहावीला जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज ता.कंधार येथे मामाच्या घरी (आंजोळी) राहून एक वर्ष शिक्षण शिकलो, पाहुणेमंडळीचा सहवास लाभला, इतरांच्या घरी राहिल्यानंतर काय अडचणी येतात हे प्रत्यक्ष राहूनच समजते म्हणून
*पाण्यातला मासा झोप घेतो कैसा। जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे*।। असे म्हटले तर वावगे होणार नाही, परत मुखेडला सातवी ते नववीचे शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल मुखेड येथेच परत यावे लागले,कारण
*गड्या आपला गाव बरा* असे मला वाटले आणि इथपर्यंत मी शिक्षण घेत घेत माझे संघर्षमय जीवन चालू ठेवलो, शिक्षणात खंड पडू दिले नाही, 1992 ला इयत्ता दहावीचे वर्षे सुरू झाले, सोळावं वर्ष मोक्याचं असते, आपण दहावी उत्तीर्ण होऊन दाखवायचं, आपल्या घराण्यात दहावी पर्यंत शिक्षण शिकलेला एक ही व्यक्ती नाही म्हणून जिद्दीने पेटून उठलो, रात्री राॅकेलचा दिवा (चिमणी) लावून अभ्यास केलो, एके दिवशी काका शेतीत बैलाचा औत हाकत होते, त्यामुळे त्यांना पिण्याचे पाणी घेऊन जायचे होते, परंतु जाताना वाटेतच मला मित्र भेटले आणि आमचा गोट्याचा खेळ सुरू झाला, तिकडे काकांना तहान लागली त्यांनी औत सोडून चाबूक घेऊन माझ्या कडे आले व त्या चाबुकानेच मला फोडून काढले.आणि म्हणाले “*जर तू दहावी पास नाही झालास तर? तुला बैल सोडून औताला जुंपतो* हे वाक्य माझ्या अंत:करणाला लागले आणि मी तेव्हा पासून अभ्यासाला सुरुवात केलो,का मारले म्हणून माझ्या आई-वडिलांनी थोडेही विचारले नाही , म्हणून मी अभ्यास करू लागलो, आणि 1992 मध्ये श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल येलूर ता, कंधार येथे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो.तेव्हा काका आणि आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला, जुन्या काळात गणित, विज्ञान,स,अभ्यास 150 गुणाचे होते, उत्तीर्ण होण्यासाठी, 52 गुण आवश्यक असत, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला फार सन्मान होता,जुन्या काळी,वर्तमान पेपर मध्ये माझा बैठक नंबर छापून आला तो पेपर मी आजतागायत तसाच जपून ठेवला, घरी आलेल्या पाहुण्यांना मित्र मंडळींना तो पेपर दाखवून मी दहावी पास झालो याचा आजही आनंद माझ्या मनात कायम आहे.
अशा पद्धतीने दहावी पूर्ण झाली,
आता कॉलेजला प्रवेश घ्यायचे ?कॉलेज कसे असेल ? कॉलेजमधल्या गमती यांचे दिवा स्वप्न मी पाहू लागलो आणि 1993 ला श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कोलंबी ता. कंधार येथे कला शाखेला प्रवेश निश्चित केला,चिखली ता. कंधार येथे पाहुण्यांच्या घरी राहुन अभ्यास करू लागलो, माझ्या जीवनाची एक एक पायरी यशाकडे धाव घेत होती,
मी झपाटून उठलो, अकरावीत असताना कॉलेजमध्ये शिक्षक विश्रामिके मध्ये चुकून खुर्चीवर बसलो या खुर्चीचे महत्त्व मला कळाले नव्हते, ,तेथील प्राध्यापकांनी मला *खूर्ची वर बसण्यासाठी लायकी असावी लागते*
असे ते म्हणाले, तो शब्द काळजात घुसला, मी पात्रता धारण करण्यासाठी अभ्यासा कडे लक्ष दिलो.1993 ला माझी अकरावी पूर्ण झाली आणि मी तिथून ही कॉलेज बदलले, आता बारावी कुठे करायची मनात शंका निर्माण झाली, आणि एकदाचे सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंतनगर ता. मुखेड येथे प्रवेश घेतला. डोंगरातील नंदनवन मनाला आकर्षण करू लागले, वय उनाड येणारे- जाणारे मुला -मुली ,तेथे सभोवताली दिसू लागले, निसर्गरम्य वातावरणात शिक्षणाचे हे गुरूकुल पाहून मनाला आनंद हर्ष झाला, शेकडो विद्यार्थी वनात बसून अभ्यास करणारे, वस्तीगृहात राहणारे येऊन -जाऊन करणारे बसमध्ये जागा मिळत नसेल तर बसच्या वर टपावर बसणारे अनेक विद्यार्थी मी पाहिले, एक एक दिवस लाख मोलाचा वाटत होता ,
कॉलेज चालू झाले आणि गमती जमती पाहायला मिळू लागल्या, अंगामध्ये जोश निर्माण होऊ लागला, विषमलिंगी बद्दल आकर्षण वाटू लागले ,शरीराचा तोल आणि मनाचा तोल सांभाळून अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही ,बारावी हे जीवनातील टर्निंग पॉईंट असतो, असे कोणीतरी म्हटले होते; त्यामुळे कला शाखेमधून बारावी उत्तीर्ण झालो, आता मात्र मला थोडी समज आली, आपण दहावी आणि बारावी एकाच प्रयत्नात पास झाल्याचा मनाला मनोमन आनंद वाटू लागला, *अज्ञानात आनंद यालाच म्हणतात* मी फार मोठा तीर मारला नव्हतो,परंतु माझ्या आजूबाजूला नातेवाईकात बारावी पास तुरळक होते ;त्यामुळेच *वासरात लंगडी गाय शहाणी*
असे मला वाटू लागले आणि मी मनोमन आनंदी झालो, आणि अशा पद्धतीने 1994 ला बारावी उत्तीर्ण झालो,तेव्हा औरंगाबाद बोर्ड होते, पुढील शिक्षणासाठी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता, मुखेड या कॉलेजची निवड करण्यात आली, शिक्षणाची गंगा पुढे चालू झाली,
कला शाखेमध्ये प्रवेश घेऊन मराठी, समाजशास्त्र, इंग्रजी, इतिहास यासारखे विषय घेऊन सुरुवात झाली, बघता बघता वय तीन वर्षे वाढले या तीन वर्षांमध्ये कला शाखेतील पदवी ही पूर्ण करण्यात आली ,जीवन काय असते? हे शिक्षणामुळे कळायला लागलं ,तिन्ही वर्षे एकाच प्रयत्नात पास झाल्याचा आनंद गगनात
मावेनासा झाला,या तीन वर्षात पदवीधर झालो,राष्ट्रीय सेवा योजने मधून परिश्रम कळाले, ,ग्रामीण भागामध्ये खेड्यात पदवीधरांची संख्या अतिशय त्रोटक असते, त्यात माझा नंबर आला या महाविद्यालयांने माणूस म्हणून घडवले, त्यामुळे जीवन यशस्वीतेकडे वाटचाल करू लागले, मी कासवासारखा शर्यत जिंकण्याच्या प्रयत्नात सारखा चालत होतो,
*थेंबा थेंबाने तळे साचतात* हे शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अभ्यास करताना म्हण वाचली होती. कोणत्याही गोष्ट एकाएकी घडत नसतात हे कळाले आणि अशा पद्धतीने एकदाचा पदवीधर म्हणून त्या महाविद्यालयातून निरोप घेऊन मी बाहेर पडलो,हे मला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र वाचनातून घडलो हे सांगायला मी इथं विसरत नाही,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी स्वाभिमान शिकविला, त्यांचे साहित्य वाचून जीवनाची दशा संपून दिशा मिळाली
कारण शांतिनिकेतन मध्ये जसे अनेक साहित्यिक घडले ;तसेच मी या डोंगरातून, कोळशाच्या खाणीतून हिरा सापडवा तसा या ग्रामीण भागामधील हिरा म्हणून उदयाला आलो. यानंतर मी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी वन्नाळी येथे राहिलो, आणि देगलूर महाविद्यालय देगलूर येथे जाऊन इतिहास विषयांमध्ये एम, ए केले, शिक्षण पूर्ण करून मी देगलूर कॉलेज सोडलं ,पुढे व्यावसायिक पदवीसाठी मी गावापासून 500 कि, मी अंतरावर दूर असणाऱ्या श्री दिनकरराव केशवराव शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे जाऊन शिवाजी विद्यापीठा मधून बी,एड झालो, अशा पद्धतीने माझ्या शिक्षणाची इथपर्यंतची संघर्षमय यशोगाथा मी वास्तविक पणे वाचकांसमोर मांडली आहे. त्यानंतर मी शिक्षकाच्या नोकरीसाठी फॉर्म भरत होतो ,त्याच्यामधूनच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेत शिक्षकांच्या जागा निघाल्या मुळे मी तिथे अर्ज केला आणि माझे नोकरीचे काम झाले, मी सुरुवातीलाच न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर येथे रुजू झालो ,
पुढे श्री जगदंबा विद्यालय भोकर ता.
श्रीराममपूर त्यानंतर श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोधेगाव,ता.शेवगाव त्यानंतर भारती बाबा विद्यालय चिकणी ता. संगमनेर आणि सध्या महात्मा गांधी विद्यालय.
येळी ता पाथर्डी या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत आहे. माझी सेवा २२ वर्ष पूर्ण झाली आहे, अध्यापन करताना मला साहित्य क्षेत्राकडे वळावे वाटले, आणि मी माझे अध्यापन करून फावल्या वेळेत वर्तमानपत्रातून लेख लिहिण्याची कला मला अवगत झाली,अनेक जणांच्या मार्गदर्शना खाली मी लेख लिहू लागलो ,आणि माझे लेख प्रकाशित होऊ लागले.छोट्या छोट्या पेपरमधून माझे लेख हजारो लोक वाचू लागले, याचाच मला परमोच्च आनंद झाला आणि *करी मनोरंजन जो मुलाचे । जडेल नाते प्रभुशी तयाचे* त्याप्रमाणे मी विद्यार्थ्यासोबत त्यांचा मित्र म्हणून राहु लागलो. त्यामध्ये मला भरपूर आनंद मिळाला .अशा पद्धतीने मला संभाषण व लेखन, कौशल्य अवगत झाले,लिहिता लिहिता,माझे आज 285 लेख पूर्ण झाले. अनेकांनी मला सन्मानाने फोन केले. सर तुमचे लेखन परिवर्तनवादी आणि उत्कृष्ट आहे.म्हणून प्रोत्साहन मिळाले,शैक्षणिक,आध्यात्मिक
,सामाजिक या विषयावर मी लेख लिहिले,नंतर मी विठूमाऊली प्रतिष्ठानची खैरकावाडी ता. मुखेड येथे स्थापना केली , शिष्यवृत्ती,नवोदय, दहावी -बारावी पदवी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे दिल जात आहे, सेवाभावी कर्मचाऱ्यांना पुरस्कार
,दिव्यांगाना आधार, विधवा,परित्यक्ता, घटस्फोटीत महिला यांना जीवन जगण्याची तसेच त्यांच्या जीवनातील नैराश्य काढून टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे,
असे अनेक बहुउद्देशीय उपक्रम डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठान आज आनंदाचे झोके घेत आहे. त्यामुळे शिक्षणाचा फायदा झाला .आज मी या शिक्षणामुळे संघर्षातून पुढे आलो आहे. म्हणून तरुणांना सांगू शकतो, तरुणांनो जिद्द व चिकाटी ठेवा, अभ्यास करा ,जीवन चांगले जगा, व्यसनापासून दूर राहा ,कमीत कमी एका खेळात तरी तुम्ही उत्कृष्ट खेळाडू म्हणून तुमचं नाव लौकिक करा. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे असे म्हणतात ,श्रम करत रहा, अंधाराच्या पुढे उजेड आहे ,डर के आगे जीत आहे,
त्यासाठी जिद्दीने रात्रंदिवस अभ्यास केल्यास कधीच मागे पडणार नाहीत, अंधश्रद्धा बाळगू नका ,विज्ञानाची कास धरा, आधुनिकतिकडे चला अशा पद्धतीने प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची व व्यसनापासून दूर ठेवण्याचे कार्य मी सुट्टीत करीत आहे, थोर पुरुषांच्या विचारकार्यातून समाजाला एकत्रित जोडण्याचे काम सुरू आहे
त्यामुळे माझे हे सगळे जीवन संघर्षमय जीवनाची यशोगाथा या ठिकाणी मी तरुणांना सांगत आहे ,दिव्यांगाना दिव्यत्वाकडे नेण्याचा माझा प्रयत्न आहे ,जे झोपले त्यांना मी जागे करतो, जे जागे आहेत, त्यांना उठून बसवतो, जे उठून बसले आहेत, त्यांना चालायला शिकवतो, चालणाऱ्यांना पळायला शिकवतो ही माझी समाजाबद्दल आणि रंजल्या गांजल्या लोकांबद्दल फार मोठी जिद्द आहे, आत्ता मी एम, ए मराठी घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो आहे .हे माझं काम पाहून मला राजे मल्हारराव होळकर तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे,आणि माझ्या इतिहासातील हिरे माणके ,विठू माऊली, क्रांतीरत्ने या ग्रंथांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
10 ऑगस्ट 2024 रोजी अहमदनगर येथील स्नेहालय रेडिओ केंद्रावर माझी प्रकट मुलाखत झाली हे माझ्या परिश्रमाचे फळ आहे.ही जिद्द ठेवूनच मी माझ्या प्रतिष्ठानच ब्रीदवाक्य *नशीबवादी होण्यापेक्षा। प्रयत्नवादी बना* असे ठेवलेले आहे. हा लेख वाचन केल्यानंतर एक जरी व्यक्ती घडला तर मी माझं भाग्य समजतो , म्हणून काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे,ही काल्पनिक कथा नसून वास्तविकता त्यामध्ये दिलेली आहे, मी दहा ग्रामीण कथा लिहून ठेवलेल्या आहेत त्या प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहेत. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे,
असे समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे.त्यामुळे समाजात आजची परिस्थिती पाहिली तर आजचा तरुण हातात मोबाईल घेऊन बसलेला आहे. आपला अमूल्य वेळ तो वाया घालवत आहे. रील पाहुन अस्वस्थ झाला आहे
,सगळ्या गोष्टी त्याला घरच्या घरी सहज उपलब्ध होत आहेत. स्वातंत्र्य भारतात वावरत आहेत .त्यामुळे असे माझ्यासारखे संघर्षमय जीवन जगणारे विद्यार्थी बोटावर मोजणे इतके सापडतील असे मला वाटते म्हणून *सज्जन हो* टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण मिळत नाही म्हणतात. ते अगदी खरं आहे. कोणीही जन्म:त तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही .त्यासाठी कष्ट करा आणि मोठे व्हा ! यापुढील जीवनात मी 500 लेख पूर्ण करणार असून वीस पुस्तके लिहिण्याचा मानस आहे. सध्या पेटच्या परीक्षेचा फॉर्म भरला असून विद्यावाचस्पती होऊन दाखवावे,
अशी मनोकामना बाळगून आहे,
काय होतास तू? काय झालास तू? यश तुमच्या चरणाजवळ आहे.
परिश्रम करत रहा, चांगले विचार पेरा तेव्हा ते चांगले उगवतात, आयुष्य भर निर्व्यसनी रहा, हा सर्वात मोठा फायदा आहे, त्यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहील, जमीन, जंगल, जल, जनावरे वाचवा.तेव्हा जीवनाचा आनंद घेता येईल आणि खुर्चीवर कायमस्वरूपी बसून रहा, तुम्हाला कोणीही उठवू शकणार नाही. या ठिकाणी तुम्हाला प्रांजळपणे मी सांगू इच्छितो.

*शब्दांकन*
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड
मो. 9921208563

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *