कंधार (एस पी केंद्रे ):
वर्तमानपत्रं वाचल्यावर त्या बातम्यांमधील गांभीर्य, आशय आणि नेमकं काय सांगायचं आहे, हे लक्षात येतं. त्यामुळेच त्यांचा प्रभाव टिकून आहे. वर्तमानपत्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भावना आमदार ॲड. शहाजीबापू पाटील ह्यांनी गुरुवारी (दि. १५) व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पत्रकार संवाद यात्रा पंढरपूर येथून कोल्हापूरकडे जाताना काही काळ सांगोल्यात थांबली. संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे व अन्य पदाधिकाऱ्यांनी ॲड. शहाजीबापू ह्यांच्याशी त्यांच्या कार्यालयात चर्चा केली.
पदाधिकाऱ्यांशी बोलताना ॲड. शहाजीबापू म्हणाले, ‘‘तुमच्याशी संवाद साधल्यावर तुमच्या अडचणी किती महत्त्वाच्या आहेत, हे माझ्या ध्यानी आलं. मी छोटा माणूस असलो तर ‘मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार’ अशी प्रतिमा तुम्हीच केली आहे. यात्रेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ह्यांनी यावे, ह्यासाठी प्रयत्न सुरू करतो. तसा शब्द देतो तुम्हाला.’’
मराठी माणसाला जागं करण्याचं काम वर्तमानपत्रं करतात. तुमच्या समस्या तेरा कोटी मराठी जनतेसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, असं सांगून ॲड. शहाजीबापू म्हणाले, ‘‘समाजात नेमकं काय चाललंय, राजकारणी लोकांची दिशा कोणती आहे, हे सगळं वर्तमानपत्रांमुळेच जनतेपुढे येतं. तुम्ही जागृती करता. बुलडोझरशीच तुमची तुलना केली पाहिजे – आडवं येईल ते सगळं चिरडून पुढे जायचं! मतांचा विषय सोडून द्या. पण तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, एवढंच मला लोकप्रतिनिधी म्हणून वाटतं.’’
…………………………………………