माहूर- वसमतकर मठाच्या वतीने माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन वाटपाचा शुभारंभ आज पासून करण्यात येणार आहे.
गेल्या २५ वर्षापासून सह्याद्रीच्या कुशीत असलेले पवित्र माहूरगडावर अध्यात्मासोबतच विज्ञानाची कास धरून सुसंकृत व अंधश्रद्धा मुक्त राष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने प्रबोधनाचे कार्य करीत असलेल्या आनंद दत्त धाम आश्रमाच्या वतीने आज पर्यत विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले आहे. त्यामध्ये संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडून भयग्रस्त झालेला असतांना आनंद दत्त धाम आश्रम उर्फ वसमतकर मठाच्या वतीने मठाधिपती राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या केवळ “ जो डर गया समझो ओ मर गया ” या संदेशामुळे हजारो भाविक भक्तांना हिम्मत मिळाल्याने अनेकाचे प्राण वाचले. कोरोना कालावधीत माहूर शहरातील गरजू नागरिकांना हजारोच्या संख्येने जीवनावश्यक साहित्याचे किटस वाटप केले.
शिष्यमंडळीचे वास्तव्य असलेल्या माहूर, मुदखेड सह एकूण सहा ग्रामीण रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना सोबतच्या नातेवाईकांना दैनंदिन मोफत जेवणाचे डब्बे पुरवण्याचे काम अविरतपणे सुरु आहे, ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, शेतकरी स्वाभिमान, शिक्षण परिषद, साहित्य संमेलने, वृक्षारोपण, युवा शक्तीला प्रेरणादायी असे विविध प्रवचने कीर्तनाच्या माध्यमातून केलेला बोध प्रबोधन,
गुरुकुंज मोझरी ते सेवाग्राम स्वच्छतेचा संदेश घेऊन संत बाळ गिर महाराज स्वच्छता पदयात्रा देशसीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकासमवेत वाघा बॉर्डर वर केलेले सप्ताहातील प्रबोधन, माहूरगड ते रायगड गडकिल्ले स्वच्छता मोहीम सह कलियुगी सर्वश्रेष्ठ मानले जाणाऱ्या अन्नदानाची अविरत सुरु असलेली परंपरा विशेष करून गत वर्षी अधिक मासात महिनाभर माहूर शहराला चुलबंद भोजनाचे निमंत्रण अशा विविध ह्या उपक्रमाने जगभरात आश्रमाची ओळख झालेली आहे. देशाचे भवितव्य मजबूत होण्यासाठी आर्त तळमळ ठेऊन आश्रमच्या वतीने नागरीकात आणि उद्याची भावी पिढी असणाऱ्या बालकात राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लावण्याच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम यामध्ये आज पासून आणखी नव्या उपक्रमाची भर पडणार आहे.
गुरू आशीर्वादाखाली या सदराखाली माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आनंद दत्त धाम आश्रम उर्फ वसमतकर मठांच्या वतीने वह्या पेन वाटपचा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक 9 रोजी दररोज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळात मठाधिपती राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर समक्ष भेट देऊन “ गुरूचा आशीर्वाद” स्वरूपी वह्या पेन विद्यार्थ्यांना वाटप करणार आहेत. देशाचे भविष्य ज्यांचे हाती आहे अशा बालकांना गुरूंचा हा आशीर्वाद अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.