*’भाषण कलेत शब्दांचे महत्व ‘* समाजप्रबोधनपर लेख

 

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी शब्दांचे महत्त्व सांगताना शब्द हे शस्त्र आहेत असे म्हटले, म्हणून भाषण करते वेळेस एक एक शब्द तोलून मोजून बोलावे. वक्ता ज्यांना व्हायचे आहे.त्यांनी प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून उमजून घेऊन बोलावे.भोजन करताना भातात जर खडा लागला तर एखादा दात पडण्याची शक्यता असते. पण बोलताना जर शब्दाची गफलत झाली तर तोंडातील पूर्ण बत्तीशी बाहेर येते. म्हणून आपण सायकल शिकते वेळी पडत पडत शिकतो,तसेच जीभ चालवायची असताना ती ही सांभाळून चालवावी लागते. चुकून आपण भाषणात विद्यमान पत्नी,आई-वडील असे शब्द वापरले तर प्रचंड हास्य होते. कारण ते नाते आयुष्यभरासाठी असतात.त्यांचा कालावधी ठराविक नसतो, ज्यांचा कालावधी दोन,पाच वर्षाचा असतो त्याला विद्यमान म्हणून ओळखले जाते. शब्दाच्या जागा बदलू देऊ नका. उदा.तुम्हाला आम्हाला भोजनासाठी बोलायचं आहे यात कोणी कोणाला बोलविले आहे.

असे रंगतदार मजेशीर वाक्य असतात. तयारी केल्याशिवाय कधीही आपण भाषण करण्यास स्टेजवर जाऊ नये. जसे परीक्षेला जाताना अभ्यास करावा लागतो तर त्याचे फळ मिळते. पहिल्याच गायनाच्या तासिकेला कोणी गायक होत नाही. दररोज रियाज करावा लागतो. तेव्हा आपण उत्कृष्ट गायक होऊ शकतो ‘वाहता मळा आणि गाता गळा’ नेहमी भरून दिसतो. असे जाणकार लोक म्हणतात
.भाषण कला ही दैवी शक्ती नसून तुम्ही केलेल्या प्रयत्नपूर्वक यशातून साध्य केली जाणारी उत्तम कला आहे.भाषण करते वेळेस तुम्हाला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामध्ये बोलणारे शब्द कोणाचीही भावना दु:खवणारे निंदा नालस्ती
करणारे नसावेत.निखळ मनोरंजनातून प्रबोधन करणारे असावेत.तेव्हा समाजातील तुम्ही लोकप्रिय वक्ते होता.म्हणून भाषण करते वेळी शब्द महत्वाचे आहेत.

अमेरिकेतील शिकागो येथील धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी “माझ्या बंधू आणि भगिनींनो” या शब्दामुळे जगात ते लोकप्रिय झाले. म्हणून भाषण कला ही म्हणावी तेवढी साधी सोपी नाही. बऱ्याच लोकांना सर्वात मोठे भय मृत्यूचे असते, पण काही लोकांना मृत्यूच्या भया पेक्षा भाषण करण्याची भीती जास्त वाटते. ज्या व्यक्तींना बोलण्याचा सराव नाही ते जर अचानक व्यासपीठावर गेले तर तळपाय, तळहात, थरथर कापतात शरीराला प्रचंड घाम येतो, हृदयाची धडकन वाढते, आपल्या तोंडातून साधा शब्द फुटत नाही, अशावेळी घशाला कोरड पडते,जीभ टाळूला चिकटते, माइक सुद्धा थरथरायला लागतो, म्हणून सराव केल्याशिवाय या गोष्टी आपल्याला करता येत नाही,

त् त् प् प् करत अडखळत बोलणं श्रोत्यांना ओळखू येते. म्हणून तुम्ही श्रोत्यांना बोलताना विचारपूर्वक बोलावे,मनातील भीती काढून टाका,आजही समाजामध्ये हजारो कीर्तनकार,व्याख्याते, प्रवचनकार, समाजसेवक, समाजसुधारक आहेत. परंतु काही वक्ताच्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी होते ते त्यांची बोलण्याची कसब चांगली असते, बोलतात तर सर्वजण परंतु बोलण्या बोलण्यात फरक आहे ,म्हणून संभाषण साधण्याची ही एक कला आहे. कित्येक जनाला लोकांत खाली बसून फार मोठ्या फुशारक्या मारता येतात .

उभे राहून बोला म्हटलं की माफी मागतात.असे अनेक अनुभव आपल्याला सांगता येतात.भाषण हे बऱ्याच जणांसाठी करिअरचे क्षेत्र म्हणून असेल परंतु इतरा समोर ते आत्मविश्वासाने बोलू शकत नाहीत. वकृत्व चांगले असले की नेतृत्व करता येते. म्हणून आपल्या आयुष्यात भाषण कला ही काही जणांसाठी वरदान आहे. म्हणून आजच्या तरुणांनी भाषण शिकण्याचे प्रशिक्षण घ्या,
तेव्हा तुम्ही उत्तम वक्ते होऊ शकता
.हजारो श्रोत्यांची मने जिंकता येतात. जेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण भाषण होते. भाषणातील शब्द विषयाला अनुसरून असावेत. लोकांना समजणारे असावेत. तेव्हा तुम्ही अस्खलित भाषण करू शकता.अनेक भाषा एकत्रित करून भाषण करणं हे योग्य नाही.

व्याकरण हा भाषेचा अलंकार आहे. अधून मधून ते तुम्ही शोभून दिसण्या साठी भाषणात उखाणे, म्हणी सुविचार, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य वापरू शकता. तेव्हा ते भाषण तुमचं प्रभावी होते.बोलणा- याचे हुलगे विकतात पण न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत, असे आपण ऐकतो म्हणून भाषण करणा-यांनी मुद्देसूद बोलावे. ‘बालिश बहु बायकात बडबडला’ असे आपण नेहमी ऐकत असतो. कारण त्याला पुरुष मंडळींमध्ये स्पष्ट बोलता येत नाही. बऱ्याच वेळेस लोकप्रतिनिधी, कीर्तनकार, व्याख्याते यांच्याकडून बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा किंवा अनावधानाने निघून जातो त्या शब्दाची खोलवर माहिती नसते, त्यामुळे ते बोलून जातात परंतु ही घटना त्यांना सावरताना नाकी नऊ येतात. म्हणून भाषणातील शब्दही जपून वापरून भाषण करावे. रागाच्या भरात भाषणातून बोलू नये. ऐकणारे व्यक्ती ही फार हुशार असतात. आपण नंतर कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही ते ऐकत नसतात. तोपर्यंत आदळ-आपट, मानवी पुतळे जाळणे, दंगामस्ती करणे, रस्ता रोको अशा अनेक गोष्टी केल्या जातात. आणि प्रसारमाध्यमासमोर बोलते वेळी मोजके बोलणे व अर्थपूर्ण वाक्य बोलणे हे फार महत्त्वाचे आहे. ध’चा मा’कधी होईल सांगता येत नाही. भाषण करते वेळेस वक्त्यांनी वेळेला महत्त्व द्यावे.आपले मुद्देसूद भाषण करण्यासाठी मुद्दे पाठांतर असावेत. आपण जास्त वेळ बोलतो तर इतरांचा वेळ घेतल्यामुळे त्यांचे भाषण कदाचित रद्द सुद्धा केले जाते म्हणून *खरा वक्ता तोच असतो, ज्यांना वेळेचे भान आणि श्रोत्यांच्या मानसिकतेची जाण असते* त्यांना वक्ता म्हणावे.

तुम्ही एखाद्या व्यक्तीला ‘विख्यात’ म्हणण्याऐवजी ‘कुख्यात’चुकून म्हटले तर सभागृहात सर्वत्र खसखस पिकते. म्हणून शब्दाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी अध्यक्षीय भाषण वाचून दाखवत आहेत. कारण वाचलेले भाषण हे जगातील सर्वात रटाळ भाषण असते. म्हणून श्रोत्याच्या डोळ्यात डोळे घालून धीटपणे अभ्यासपूर्वक भाषण करणाऱ्या व्यक्तीला वक्ता म्हणतात. म्हणून तुम्ही स्वतःची शैली स्वतः विकसित करा. इतरांची कॉपी करू नका. इतरांचे पाहून हातवारे करणे. विशिष्ट ठिकाणी पाणी पिणे, सारख रुमाल हातात धरून चेहरा पुसणे, एकाच बाजूला पाहून बोलणे हे भाषण कलेतील उणिवा आहेत. म्हणून आपण आपले बोलणे भाषणातील महत्त्वपूर्ण शब्द अलंकारिक वाक्य तेवढ्या जोशपूर्ण आवेशात बोलावे. छोट्या मुलाच्या आवाजातील वाक्य बोलताना चढ -उतार असावा. तेव्हा तुमचे भाषण प्रभावी होते. रस्ता जसा सारखाच नसतो ,तसे भाषण करते वेळी नेहमी चढ-उतार घ्यावे लागतात.तेव्हा भाषण कला ही तुम्हाला अवगत झाली असे समजावे, म्हणून आजच्या तरुणांनी भाषण कलेसाठी प्रशिक्षित व्हावे आणि आपल्या मनातील विचार सर्वांसमोर परखडपणे सादर करावेत. शब्द साठा हा बँकेतील पैशासारखा असतो, आपल्या नावावर बँकेत जेवढे पैसे आहेत. तेवढेच आपण काढून खर्च करू शकतो, बँकेतील पैसे वाढवायचे असतील तर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवावे लागते, तसे तुम्हाला भाषणातील शब्दसाठा वाढवायचा असेल तर भरपूर पुस्तकांचे वाचन करूनच पुढे जाता येते, म्हणून वाचन चळवळ अतिशय महत्त्वाची आहे. त्यातून तुम्ही प्रभावी भाषण देऊ शकता म्हणून जिद्द असेल तर तुम्ही प्रभावी वक्ते होऊ शकता, प्राचार्य शिवाजीराव भोसले, ह.भ.प बाबा महाराज सातारकर, ह.भ.प न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री साहित्यिक पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर ,प्र.के. अत्रे ,समाजसेविका सिंधुताई सपकाळ यासारखे अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. ते त्यांच्या शुद्ध वाणीने प्रसिद्ध झाले आहेत.

*प्रा.विठ्ठल गणपतराव बरसमवाड*
*अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड*
*E-mail:[email protected]*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *