सिद्धहस्त लेखिका रुपाली वागरे वैद्य यांचा सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने सत्कार
__________________________________
नांदेड – जगात दुःख आहे; त्याला कारणही आहे. त्या कारणांचे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुःखाचे निरोधन कसे करायचा याचा उपाय तथागत गौतम बुद्धांनी आपल्या उपदेशातून सांगितला आहे. म्हणजेच दुःखावर विजय मिळविण्याची शिकवण तथागत गौतम बुद्धांनीच दिली आहे असे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. ते येथील सुप्रसिध्द लेखिका रुपाली वागरे वैद्य यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, सरचिटणीस कैलास धुतराज, उमाकांत बेंबडे, संतोष घटकार, प्रशांत गवळे, गझलकार चंद्रकांत कदम, रुपाली वागरे वैद्य यांची उपस्थिती होती.
राजे संभाजी प्रतिष्ठान आणि स्वराज्य सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लेखिका रुपाली वागरे वैद्य यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणाची दखल घेत त्यांना साहित्यभूषण राष्ट्रीय पुरस्कारांने गौरविण्यात आले. याचेच औचित्य साधून सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील पालीनगर परिसरात वागरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरदचंद्र हयातनगरकर, कैलास धुतराज, प्रज्ञाधर ढवळे, अनुरत्न वाघमारे, संतोष घटकार, चंद्रकांत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर गच्चे यांनी केले. सूत्रसंचालन नागोराव डोंगरे यांनी केले तर आभार रुपाली वागरे वैद्य यांनी मानले.