भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा: कीर्तन

 

आज घराघरातून लोकांच्या मनात अशांती,चिंता,संकटे,भीती,अनारोग्य, दारिद्र्य,अपयश अशा अनेक विकृतींनी थैमान घातलेले दिसून येत आहे.अनेक ठिकाणी भ्रष्टाचार, अनाचार,दुराचार,अत्याचार, दहशतवाद अंगावर चालून येत आहेत. माणसे एका भयावह स्थितीमध्ये वावरत आहेत.उद्याची नव्हे तर पुढील पाच मिनिटात काय होईल ? याची शाश्वती आज मानवाला राहिली नाही,अशा बिकट प्रसंगी आशेने कोणाकडे पहावे.असे अनेक लोकांच्या मनात विचार घोळत आहेत.त्याच वेळेस कीर्तन ऐकून मनाला शांती मिळेल असे लोकांना वाटत असते. म्हणून ते कीर्तना करी बुवाकडे येत असतात. कीर्तन हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. सध्याच्या कीर्तनसेवेतून समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण समस्या, स्त्री-पुरुष समानता ,स्वातंत्र्य, बंधुता न्यायव्यवस्था,वक्तशीरपणा, स्वाभिमान.देशाभिमान या गोष्टी शिकवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. समाजातील भेदाभेद,
उच्चनीचता, वंशभेद, लिंगभेद,

वर्णव्यवस्था यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याचे ही विचार मंथन कीर्तनसेवेतून व्हावे.
तेव्हाच कीर्तन सेवा हे परिवर्तनाचे साधन म्हणून पाहता येईल, पूर्वी पासून माणसे एकत्रित करून त्यांच्या मनात विचाराचे परिवर्तन करण्याची संधी या सेवेतून अनेक जणांना आता पर्यंत घडली आहे. म्हणून ती अखंड चालू राहण्यासाठी समाजाला ज्ञात करणे गरजेचे आहे– संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात, त्यांच्यापासूनच कीर्तन परंपरा सुरू झाली, त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा व कर्मकांड हे कमी करण्याचा प्रयत्न चालू झाला, त्यावेळेस परकीय सत्तानी उच्छाद मांडला होता,त्यामुळे लोक दैववादाच्या आहारी गेले होते. अशा परिस्थितीत सर्व संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजात
नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले.त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने समतेचा सर्वांना संदेश दिला.कीर्तनाच्या माध्यमातून समाजात धर्माची अवनती होऊ नये म्हणून समाजाचे रक्षण करण्यासाठी कीर्तनातून संतांनी उपदेश केला,

तरी काही कर्मठ लोकांनी त्यांना विरोध करू लागले. म्हणून संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात *तुका म्हणे तोचि संत। सोशि जगाचे आघात*।। वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण सर्वजण परमेश्वराची लेकरे आहोत.अशी शिकवण कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी दिली.विठ्ठल हे त्यांचे दैवत होते.चंद्रभागेच्या तीरावर सर्व मंडळी आणि वारकरी भक्त भक्तीरसात न्हाऊन निघत आणि या कीर्तनातून समतेचा प्रसार होई. त्यामुळेच संत नामदेव, संत सावता,संत एकनाथ, संत गोरोबा, संत चोखामेळा संत तुकाराम,संत सेना, संत निर्मळा,संत सोयरा, संत बंका यांनी परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले, या संतांनी वारकरी संप्रदायाला समतेची प्रतिष्ठा मिळवून दिली.

 

प्रतिकूल परिस्थितीत जीवन कसे जगावे हे ही समाजाला शिकविले,
अनेक संत कीर्तन करीत करीत आपल्या दैनंदिन जीवनातील शेतीची कामही करत असत. आपला व्यवसाय सांभाळून लोकांना उपदेश करीत राहिले. लोकांना माणुसकीचा व समतेचा संदेश कीर्तनाद्वारे दिला. एकमेकांवर प्रेम करावे ,एकत्रित राहावे व एकजुटीने सर्व कार्य करावे,
अशी संतांची शिकवण कीर्तनाच्या माध्यमातून दिले. त्यामुळे लोकांमध्ये कीर्तनाद्वारे जागृती झाली म्हणून कीर्तन हा वारकरी संप्रदायाचा अतिशय मोलाचा अमूल्य ठेवा आहे.
भारताच्या सर्व प्रदेशात सर्व भाषेत आणि सर्व संप्रदायात कीर्तन हा प्रकार आढळतो, कीर्तन म्हणजे काय? काव्य ,संगीत, अभिनय यांच्यासह करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात,
कीर्तनाचे नारदीय कीर्तन,वारकरी कीर्तन,नामसंकीर्तन,तसेच सांप्रदायिक कीर्तन असे अनेक प्रकार सांगितले जातात,वारकरी कीर्तनात टाळ,मृदंग,वीणा,चिपळ्या यांचा वापर करतात.
महाराष्ट्राला कीर्तनाची फार मोठी परंपरा लाभली आहे,संत नामदेवा पासून ते संत तुकाराम महाराजा पर्यंत कीर्तनातून समाज प्रबोधन केले
आहे. नवविधा भक्तीतील कीर्तन हा दुसरा प्रकार आहे,संत ज्ञानेश्वरांनी ” ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाच्या श्लोकावर केलेल्या भाष्याने कीर्तनाचे महत्त्व सिद्ध होते,आजचे काही कीर्तने हे कीर्तनासारखे वाटत नाहीत.कारण जास्त गर्दी जमली म्हणून कीर्तन चांगले झाले असे म्हणता येत नाही, अनेक जातीधर्माचे लोक कीर्तन ऐकण्यास दूरदुरून येतात, आपल्याला काही तरी चांगले ऐकण्यास मिळेल या हेतूने येतात,
सध्या कीर्तनातील अभंग बाजूलाच राहतात, आणि दृष्टांत म्हणून विनोदाची फवारणी सुरू होते,
आजही महाराष्ट्रात एकत्रित कुटुंब पद्धती आहेत, कीर्तन ऐकण्यास वडीलधा-या व्यक्ती जवळ बसून आपण कीर्तन श्रवण करीत असतो.

समाजातील सर्वच व्यक्ती वाईट नाहीत,एखाद्याने काही वाईट कृती केली तर त्या व्यक्तीला वैयक्तिक शिक्षा व्हावी, एका वाईट व्यक्तीचे उदाहरण सर्वांना लागू पडत नाही, प्रत्येकाची विचार सरणी व राहणीमान वेगळे आहे,
कुटुंबातील सर्वच लोकांना दोष देऊ नये, मानहानी करू नये,
कीर्तनातून समाज प्रबोधन व्हावे, समाजातील लोकांमध्ये एकोपा व आपुलकी निर्माण व्हावी,व लोक आपोआप अध्यात्माकडे वळावेत, आज तसे होताना दिसत नाही,
आज अनेक छोटे छोटे कीर्तनकार कसलाही संदर्भ नसताना काल्पनिक गोष्टी सांगून हसवत आहेत.लोक ऐकून घेतात,म्हणून, बोलता बोलता काहीही बोलून द्विधा मन :स्थिती निर्माण करीत आहेत.त्यामुळे कोणता निर्णय घ्यावा,हे सर्व सामान्य लोकांना कळत नसल्यामुळे त्यांना अवघड होत आहे, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी संत तुकडोजी महाराज,पूज्य सानेगुरुजी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सैनिकांना जोशात आणण्या साठी देशभक्ती पर गीते गायले, त्यामुळे करोडो लोक एकत्रित आल्यामुळे भारत स्वतंत्र झाला,
हे आपल्याला विसरून चालणार नाही,
पूर्वीचे महाराज, संत स्वत:अभंग रचून त्या वर कीर्तन करत असत,मानव, निसर्ग,आपत्ती ,पर्यावरण,ओला व कोरडा दुष्काळ, या विषयावर बोलत असत, व कुटुंबातील आई- वडील, आजी,आजोबा यांच्यावर आदरयुक्त रसाळवाणीने बोलून समाज एकजीव करताना काळजी घेतली जात असे,
त्यामुळे समाजाची पायाभरणी भक्कम होत असे, सर्वाना अंधारा कडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य पूर्वीचे कीर्तनकार करत असत,

आज फारच परिस्थिती बिघडली आहे.कोणीही महाराज म्हणून कीर्तन करण्यास उभे रहात असून परिपक्व ज्ञान असल्या शिवाय कीर्तन करू नये, कीर्तनातून महिलांचा, शेतक-याचा
.सैनिकांचा,गुरूजणांचा व इतर कोणत्याही व्यक्तीचा कधीही अपमान करू नये, कीर्तन म्हणजे थट्टा नाही, कीर्तनकारानी संस्कृतीचे रक्षण करूनच कीर्तन करावे,
सध्या कीर्तनातून अनेक अपशब्द उच्चारले जात आहेत, लोक ही खदखदत हसत आहेत.तरूण पिढी वर ही परिणाम जाणवत आहेत.
अखंड हरिनाम सप्ताह,एकादशी, सण- उत्सव,वर्षेश्राद्ध “काला वाढदिवस या निमित्ताने कीर्तन “ऐकण्यास लोक फार मोठ्या प्रमाणात अट्टाहासाने गर्दी करतात,
त्यामुळे अभंगाला धरूनच निरूपण व्हावे, अध्यात्मिक पावित्र्य जपले जावे,
सत्य आहे तेच कथन करावे.उगाच काहीतरी सांगून वेळ मारून नेऊ नये,
या गोष्टीचा विचार करून कीर्तन कारांनी आपल्या मुखातून चांगले शब्द बाहेर काढावेत,त्यामुळे संस्कृतीचे रक्षण होईल,कीर्तन समाजात आपुलकी निर्माण करते.
महाराष्ट्रात कीर्तन शिकण्यासाठी अनेक ठिकाणी मठ,संस्थाने आहेत, तेथील प्रकांड पंडिताकडून ऊत्कृष्ट कीर्तन शिकावे.

संत तुकाराम महाराज म्हणतात, नवसाने जर मुले होत असतील तर पती करायची काही आवश्यकता नाही,या अभंगात किती तरी मोठा भावार्थ लपलेला आहे, खरोखर प्रत्येक व्यक्ती यांचा विचार करतो, आणि समाज अंधश्रद्धेतून बाहेर येण्यासाठी कीर्तनाचा फायदा होताना दिसतो, म्हणून समाजातील लोकांना पटेल असेच कीर्तन करावे,वारकरी संप्रदायात आपण केलेले कीर्तन बसावेत, कीर्तन चालू असताना भक्तमंडळी मंत्रमुग्ध व्हावेत , निरूपणा साठी घेतलेला अभंग शेवटपर्यंत घ्यावा, एवढे रसाळ कीर्तन करावे, की भक्तानी तुमच्या चरणाला स्पर्श करूनच जावावे,अशी त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली पाहिजे. एवढे अफाट ज्ञान तुम्ही त्यांना द्यावे,
आज आपण पाहत आहोत, संस्कृतीचे, अभंगाचे विकृती करण, विडंबनात्मक माहिती चित्रपटाच्या चाली काही प्रमाणात दिल्या जात आहेत
अगोदर भक्त म्हणत होते,
साधु संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा,आज लोकांची मन:स्थिती का बिघडली,काही स्वंयघोषित साधु सध्या तुरूंगात आहेत,यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे.
काही महाराज कीर्तन थोडा
वेळ करतात, नंतर भ्रष्टाचारावर, शिक्षणावर, राजकारणावर, भावकीवर, सासु, सुनेवर शेवटी काॅलेज मधील मुलांमुलीवर विनोद करत आहेत.अगोदरच्या सारखा समाज आता अशिक्षित, निरक्षर, राहिलेला नाही. त्यांनाही बरेच कळते. या गोष्टीची जाणीव ही महाराजांना असावी. पूर्वीच्या काळी ऐकण्यासाठी लोकांना कोणतेही साधन नव्हते. एकत्रित आल्याशिवाय जमत नव्हते.
परंतु आज प्रत्येकाकडे घरात टि व्ही, स्वतःजवळ मोबाईल, रेडिओ अनेक प्रकारच्या सुविधा झालेल्या आहेत. त्यामुळे निरूपण करते वेळेस मार्मिक, मन परिवर्तन करणारे योग्य अशा पद्धतीने दिल्यास कीर्तनाचा दर्जा टिकून राहतो. कीर्तनाला पूर्वीचे वैभव येते आणि समाजामध्ये सुद्धा कीर्तन हा संस्कृतीचा ठेवा म्हणून पाहिले जाते. खेड्यामध्ये आज सुद्धा कीर्तनासाठी लोक वाट पाहत बसलेले असतात. त्यांच्या मनाला चांगले वाटेल असेच कीर्तन करावे. कोणताही संदर्भ कोठेही लागत नाही, असे करू नये. एकाच अभंगातील चरणावर तो पूर्ण करावा, म्हणजे ऐकणा-याचे समाधान होते, व ते कीर्तन वारकरी संप्रदायात बरोबर बसते, कीर्तन करणारे सर्वच महाराज वाईट सांगत नाहीत,हेही लक्षात असु द्या.काही कीर्तनकारामुळे नामवंत विद्वान कीर्तनकाराकडे समाज संशयित दृष्टीने पाहण्याची शक्यता असते. त्यामुळे कीर्तनकारानी आपल्या कीर्तनाचा दर्जा घसरू देऊ नये, प्रसारमाध्यमांनी कीर्तन महोत्सवा तील योग्य निरूपण असलेले निवडक व प्रबोधनपर कीर्तने प्रसारित करून ‘अवघा रंग एक झाला’ हे दाखवून दिल्यास कीर्तन हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणून चिरस्थायी ठरेल,यात अजिबात शंका नाही. जय जय राम कृष्ण हरी
लेखक हे वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आहेत.

*प्रा, बरसमवाड विठ्ठल गणपतराव* संस्थापक : विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *