महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, प्रसिद्ध चित्रकार, उत्कृष्ट कवी, वास्तववादी कथा लेखक माझे मित्र मिलिंद जाधव यांच्या साठी घर शोधण्यासाठी आम्ही नांदेड महानगरामध्ये फिरत होतो पण घर काही भेटत नव्हते. फिरून फिरून शेवटी एका इमारती जवळ पोचलो. तिथे एक काकू बसलेल्या होत्या. त्यांना मी म्हटलं,
” काकू रूम आहेत का? “
त्या म्हणाल्या,
आहेत ना, किती रूम पाहिजे?
दोन रूमचा एक ब्लॉक आहे आणि तीन रूमचा एक ब्लॉक आहे. तुम्हाला कोणता पाहिजे? “
मी म्हटलं,
“तीन रूम चालतील, भाडे किती? “
त्या म्हणाल्या, “तुम्ही काय काम करता?”
“शिक्षक आहोत.”
काकू म्हणाल्या,
“5000 रुपये भाडं आहे. भाडं महिन्याच्या एक तारखेला द्यावं लागेल.”
“काही हरकत नाही, रूम दाखवा “
त्यांनी रूम दाखविल्या. रूम मिलिंदला पसंद पडली. आम्ही बयाना देऊ लागलो.
काकूंनी विचारलं,
” तुमचं नाव काय? “
मिलिंद म्हणाले,
“मिलिंद जाधव “
काकू म्हणाल्या, आम्ही ही जाधवच आहोत. तुम्ही कुठले जाधव?’
मिलिंद म्हणाले, ” आम्ही भोकर तालुक्यातील पिंपळढवचे जाधव “
काकू म्हणाल्या, अमुक अमुक हे…. तुमचे कोण लागतात? “
मिलिंदनी ओळखलं काकूंना काय विचारायचे आहे. माझी जात कळल्या शिवाय काकूंचे प्रश्न विचारणे थांबणार नाही. मिलिंद म्हणाले, ” आम्ही बुद्धीष्ट जाधव आहोत.. आपणास काही अडचण तर नाही ना होणार? “
खड खड बोलणाऱ्या काकू एकदम अडखळल्या…. काय बोलावं सुचेना. थोडा वेळ थांबून त्या म्हणाल्या, आपण नॉनव्हेज खात असाल?
मिलिंद म्हणाले, “असेच कधीतरी “
काकू म्हणाल्या, ” सॉरी आम्ही नॉनव्हेज खाणाऱ्याला रूम देत नाही”
*****************************
नांदेड जिल्हा परिषदेचे अनुसूचित जातीचे पहिले अध्यक्ष मा. संभाजीराव मंडगीकर साहेब यांचा संपूर्ण कार्यकाळ संपला पण त्यांना मुजोर व्यवस्थेने अध्यक्षाचे निवास्थान काही मिळू दिले नाही.अध्यक्षाच्या केबिनमध्ये सन्नाटा तर उपाध्यक्षाच्या केबिन मध्ये अचाट गर्दी…. सारी कामे उपाध्यक्षाच्याच केबिन मधून चालायची…..
नांदेड महानगर पालिकेचे आयुक्त मा. खोडवेकर साहेब IAS यांना आयुक्ताचे निवास्थान न देण्याचा मुजोरपणा इथे झाला त्या मुळे त्यांना झोपडपट्टीत राहवे लागले ….
माझे एक तहसीलदार मित्र नांदेड येथील एका अधिकाऱ्याच्या कॉलोनीत घर घेण्यासाठी धडपडून धडपडून राहिले. मात्र त्यांना त्या कॉलनीत घर काही मिळाले नाही.
बाराव्या शतकात चोखोबांनी आपली व्यथा एका अभंगात मांडलेली आहे
उंबरठ्याशी कैसे शिऊ?
आम्ही जातिहिन
रूप तुझे कैसे पाहू?
त्यात आम्ही दीन
पायरीशी होऊ दंग
गाऊनी अभंग.
नाथा घरी नाचे माझा
सखा पांडुरंग …..
चोखोबा पायरीवरूनच आयुष्यभर विठोबाचे दर्शन घेत राहिले……… त्यांना उंबरठ्याच्या आत प्रवेश काही मिळाला नाही. आजही उंबरठ्याच्या आत कोणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याची कातडी सोलली जाते…..
शेकडो वर्षांपासूनची ही आवहेलना चोखोबा सहन करीत आहेत.. सामाजिक समतेच्या वांझोट्या गप्पा करणारे आपल्या मागासवर्गीय पदाधिकाऱ्यांना, आपल्या अधिकाऱ्यांना शासनाचे निवासस्थान देण्या इतका मनाचा मोठेपणा दाखविला नाही. म्हणतात भारतात सर्वांचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचावला, सर्वांना समान संधीचे आवसर फेअर वातावरण तयार झाले की आरक्षण खतम करण्याचा विचार करू…
वाढत्या बेरोजगारीचा विचार करता अजून शे दोनशे वर्ष तरी आर्थिक समानता येणार नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही अनुसूचित जाती, जमातीचा लाखोचा अनुशेष भरण्याची राजकार्त्यांनी इमानदारी दाखवली नाही…..
सामाजिक समता तर फार दूरची गोष्ट आहे. कोणी कट्टर तर कोणी सॉफ्ट हिंदुत्ववादी आहे. जो तो आपल्या जाती धर्माच्या कोषात बंदिस्त आहे.बाराव्या शतकातील चोखोबा उंबरठ्याच्या बाहेर अजूनही तिष्टत उभा आहे. त्याचा स्पर्श
चालत नसेल,75 वर्षात साधी मिशी ठेवण्याचा अधिकार सरकार आपल्या नागरिकांना देऊ शकत नसेल, मृत्यू नंतर ही आमचे प्रेत जळण्यासाठी डोकी फोडली जात असतील,संपूर्ण वस्तीवर बहिष्कार टाकला जात असेल, फक्त मुस्लिम आणि बौद्ध समाजाला प्लॉट, फ्लॅट मिळू नये म्हणून टार्गेट केलं जात असेल तर पुढचे पाचशे वर्ष तरी सामाजिक समता स्थापित होणार नाहीआणि म्हणतात असे झाले की आरक्षण रद्द करू, तसे झाले की आरक्षण रद्द करू…
पुढचे पाचशे वर्ष तुम्ही, आम्ही जिवंत असू का? आम्ही जिवंत नसू तर आरक्षण रद्द करण्याचा विचार करू असे कसे म्हणता येईल?
आमच्या पोटार्थी विचारवंत मंडळीच्या सडक्या मेंदूची फार कीव येते. आमच्या विचारवंतांना शोषित वंचितांना राजकीय हक्कदार, सत्तेचा भागीदार बनविणारा लोकलढा म्हणजे आंबेडकर द्रोह वाटतो आणि ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंतपणी आणि मृत्युंनंतरही छळ केला ते आता आंबेडकरवादी आहेत असा भास झालेला आहे. त्यांना मालकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसू लागलेत. आमच्या विचारवंतांना अलीकडेच अचानक
साक्षात्कार झालेला आहे की ज्यांनी नामांतरात आमच्या घराची राख रांगोळी केली, खैरलांजी कांड घडवून उलट आम्हाला नक्षली ठरविले, खाजगीकरण, उदारीकरण, कंत्राटी पद्धत, झिरो बजेट लावून आमच्या तरुणांच्या आयुष्याची राख रांगोळी केली, शिक्षणाचे बाजारीकरण करून शिक्षण महाग केले ते राजकारणी आता लोकशाही वाचवणार आहेत. संविधान वाचवणार आहेत. शोषित वंचितांची ढाल बनून त्यांच्या हक्क अधिकाराचे रक्षण करणार आहेत…………..
मी जे काही लिहितो त्याची कळ काँग्रेसवाल्यांना लागायला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. माझी पोस्ट पडली रे पडली की पोटात भयंकर कळ आल्यागत आमचे विचारवंत चावताळून उठतात आणि काँग्रेसची चमचेगिरी करतात. आम्ही बोलतो तिकडे आणि आग लागते इकडे..एक विद्वान म्हणाले की, “*शासन करती जमात बना हे विधान तेव्हाच सत्यात येईल ज्या दिवशी सर्वांचा मातधिकार काढून घेऊन फक्त बौद्धांना मतांचा अधिकार देणारा कायदा होईल”* मी म्हटलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्धानांच उद्देशून हे विधान केले की सर्व शोषित, पीडित समाजाला उद्देशून केले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर सर्व शोषित पीडितांना उद्देशून हे विधान केलेलं असेल तर बाळासाहेब आंबेडकर कोणाला जागवीत फिरत आहेत? सर्व आरक्षणवादी एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ. ही घोषणा काय सुचविते? आमचे एक विद्वान म्हणाले की येत्या विधानसभेला वंचित पाच लाखाच्या पुढे जाणार नाही. मी म्हटलं पन्नास लाखाच्या वर गेली तर?………. आज प्रत्येक काँग्रेसी हरिजन विचारवंताचा वंचितला शिव्या शाप दिल्याशिवाय घास घशाखाली उतरत नाही… याचा अर्थ असा होतो की वंचितची धडकी त्यांची रात्रीची निंद खराब केलेली आहे हे निश्चित…
आमच्या विचारवंतांनी जर रुसो, वॉल्टेअर सारखी आपली लेखणी चालवून जुल्मी राजसत्ता उलथून फेकण्याची किमया केली असती तर मी त्यांची चरण वंदना केली असती. पण अमुक यांना मत देऊ नका अमुक यांना मत द्या असा पोरकट सल्ला देऊन अमुक एका पक्षाची वेठबिगारी करणारे हे हुजरे वेठबिगार आपली बुद्धीअमुक एका व्यक्तीच्या पायावर गहाण ठेवत असतील तर त्यांची निष्ठा, त्यांची बुद्धिमत्ता त्यांना लखलाभ……….गणपत गायकवाड नांदेड
9527881901