अशिक्षित समाजाच्या उपेक्षित कवियत्री: संत निर्मळा

 

संत निर्मळा मध्ययुगीन काळातील विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या श्रेष्ठ महिला होत्या. त्यानी भक्तीतून सामाजिक उन्नती घडवली होती. आणि एक नवा आदर्श निर्माण केला होता.त्यांनी लिहिलेल्या अभंगाचा विचार करता ते प्रेरणादायी आहेत. अढळ श्रद्धा अत्यंत शुद्ध चारित्र्य, इतर भक्तांचा त्यांना येणारा कळवळा अशा सर्वच बाजूने त्यांचे व्यक्तीमत्व परिपूर्ण होते. दारिद्र्य, आरोप, अवहेलना, शिक्षा, आळ हे सगळं त्यांनी संयमाने सोसले. आणि त्यातून आपली थोर नैतिकता, संयम किंचितही ढळू दिला नाही. त्यांचे अभंग समाजाला विचार करायला आजही भाग पाडतात. पांडुरंगाला साक्षी ठेवून आपल्या हृदयाच्या अंगणात भक्तीचे रोपटे संत निर्मळाने लावले त्या रोपट्याला त्यांनी कर्मकांडातून मिळत असलेल्या अवहेलना आणि छळ यांचे खतपाणी घातले. त्यांनी या भक्ती रूपी रोपट्याची जोपासना केली. आयुष्य भर या कुटुंबाला उपेक्षा मिळाली. आपल्या समाजाला समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावे.सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर धावत असतो. पण जीवन कसे जगायचं हे त्याला त्याच्या आयुष्यात येणारी दु:ख आणि संकटच शिकवत असतात.हे संत निर्मळांनी फार पूर्वी सांगितले आहे.आजही जातीयवाद पूर्णपणे संपलेला नाही.त्याचे भूत मानगुटीवर बसलेले आहे. त्यावेळी संत निर्मळा यांनी दिव्यात्वातून जाऊन जीवन जगले. संत चोखामेळा यांच्या कुटुंबातील पाचही संताच्या सर्व अभंग रचनेत विठ्ठल भक्तीचाच आविष्कार होता
.त्याच्या मनातील असंतोष खदखदत होता.सामाजिक वेदनेचे दुःख जाणवत होते. गावकुसाबाहेर राहून अंधार पांघरून दारिद्र्याच्या गर्तत ते सापडले होते. उच्चनीचतेच्या कात्रीत अडकून मर्यादा पलीकडे गेल्यानंतर त्यांच्या रचना अभंगाच्या रूपातून पाझरू लागल्या. त्यांचा तो पाझर आजही समाजात काही प्रमाणात दिसून येत आहे. संत निर्मळा म्हणतात.आपले शरीर जरी अमंगळ असले तरी माझी पांडुरंग भक्ती शुद्ध होती.जाती-पातीचे हे खेडे। येथे शिवा शिव बाटे।। हे शूद्र जातीतील आहेत. म्हणून पंढरपूरच्या बडव्यांनी माझ्या बंधूंना मंदिरात सुद्धा जाऊ दिले नाही,तिथेच त्यांना मारहाण केली

याचे दुःख बहिणीने जगासमोर मांडले आहे.’आम्ही नाही गेलो देवळात’ या वाक्यात मनातील आक्रोश,विद्रोह, केविलपणा दिसून येतो.परकीय आक्रमण व येथील सवर्णाच्या वर्चस्वाखाली शूद्रांना जीवन जगावे लागत होते.
त्या काळात या कुटुंबाची घुसमट, घालमेल सारखी होत होती.त्यांनी आपल्या बंधूला गुरुस्थानी मानून अभंगाची रचना केली. सर्व कुटुंबाचे मिळून पाचशे अभंग आज उपलब्ध आहेत. ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे. सवर्णांच्या विरोधात आपण पाऊले उचलू शकत नाहीत. म्हणून या सर्व संतांनी त्यांच्या मनातील विद्रोह अभंगाच्या रूपाने जगासमोर मांडला.आपल्या बंधूला ज्याप्रमाणे बडव्यांनी मारहाण केली. जबरदस्तीने गावची वेश बांधायला लावली. त्यामुळे त्यात त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट निर्मळाच्या काळजाला लागली म्हणून तिने विठ्ठलासमोर आपले दु:ख ,वेदना अभंगाच्या रूपाने मांडल्या.मध्ययुगीन कालखंडात संत चोखामेळा,संत सोयरा,संत निर्मळा, संत कर्ममळा, संत बंका यांच्या अभंगातून दुःख व्यक्त झाले आहे. तत्कालीन कर्मठ लोकांनी वरील संतांना विठ्ठल भक्ती पासून दूर करण्याचा प्रयत्न केला.सर्वाधिक वेदना चोखामेळा यांच्या कुटुंबाला झाल्या आहेत. कारण ते शूद्र जाती तील आहेत.असे वर्णव्यवस्थेने ठरवून दिले होते. संत निर्मळाचे दुःख एकटीचे नसून ते संपूर्ण शूद्र जातीचे होते. त्यांच्या शब्दातून ते व्यक्त होते. दलितांना स्पर्श तर दूर राहिला परंतु सावलीचा विंटाळ होत असे. गळ्यामध्ये थुंकीपात्र बांधून फिरावे लागत.संत निर्मळाच्या अभंगातून माणसांच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या वेदनांचे दर्शन घडते.जाती-जातीमध्ये अस्पृश्य -स्पृश्य विटाळ शिवाशिव या अवास्तव कल्पना मुळे ज्या संवेदना होतात. त्याचे वर्णन संत निर्मळानी केले आहे. वैदिक काळात वर्ण व्यवस्था सुरू झाली. त्यातून समाज विभागला गेला. त्यानुसारच प्रत्येकाने आपापली रोजी रोटी मिळवण्यासाठी कामधंदा करावे.

अशी जाचक पद्धत घालून दिली.
त्यामधूनच अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार पद्धती सुरू झाली. यात सर्वात जास्त चटके शूद्र जाती तील लोकांना बसले. सर्व कामे शूद्र जातीतील लोकांनी करावे.आणि गावकुसाच्या बाहेर राहावे हे मनाला पटण्यासारखी गोष्ट नव्हती.
तरीही राजाने मारले आणि पावसाने झोडपले, मग तक्रार द्यायची कोणाकडे? असा प्रश्न उभा राहितो. प्रत्येक सवर्णांनी स्वतः च्या नावावर शेकडो एकर जमीन त्या काळात करून घेतली.आणि गावकुसा बाहेर राहणाऱ्याच्या नावावर एक गुंठा सुद्धा जमीन करून दिली नाही, ही कोणती न्याय पद्धती होती. ती आपल्या भारतात अस्तित्वात आली.
याचे मर्म आजही सापडत नाहीत. गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांना गायरान शेती कसण्यासाठी दिले.
यावर कोणी संशोधन आज पर्यंत केलेले आढळत नाही. नेमकं उच्च- नीचता म्हणजे काय ? सर्व मानव साठी एकच सूर्य,चंद्र सर्वांचं रक्त लालच आहे. सर्वांसाठी तारीख,वार एकच आहे.
तरीही हा भेदभाव करून बुद्धिमान, हुशार,चाणाक्ष लोकांनी पिळवणूक केली. संत निर्मळा या अशिक्षित समाजातील असून उपेक्षित कवयित्री म्हणून त्या पाठीमागे का राहिल्या? त्या स्वतः अभंग रचून त्यातील वेदना परमेश्वरासमोर मांडतात.परंतु संत निर्मळा सारख्या निर्मळ मनाच्या कवयित्रीची माहिती प्रकाशझोतात का आली नाही. म्हणून संत निर्मळाचे चरित्र आणि कार्य याविषयी या लेखांमध्ये आपण माहिती करून घेत आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणाराजा येथे संत निर्मळा यांचा जन्म झाला. तेथील नदीच्या नावावरून त्यांचे नाव निर्मळा ठेवले. त्यांचा विवाह संत बंका यांच्याशी झाला. त्यांच्या अभंगातून जातीव्यवस्था,अन्याय,असमानता, भेदाभेद यावर वर्णन करणारे आहेत. त्यांनी *अनाथाचा नाथ कृपावंत देवा। घडो तुमची सेवा अहनिर्शी*।असे म्हटले आहे.अनाथाचा नाथ पंढरपुरात आहे. त्यामुळे तो सेवा करण्याची संधी आम्हाला दे ? असे संत निर्मळा कवयित्रीनी या अभंगातून निरूपण केले आहे. वास्तविकता या अभंगातून मांडायचे आहे. संत चोखामेळा यांची धाकटी बहीण म्हणजेच निर्मळा आपल्या अभंगातून अतिशय मार्मिक असे उदाहरण देऊन परमेश्वराची आळवणी करतात. रात्रंदिवस मन करी तळमळ। बहु हळहळ वाटे जीवा।। पाण्यातून मासे बाहेर पडल्या नंतर कसे तळमळ करतात तसे मी तुम्हाला भेटण्यासाठी तळमळ करत आहोत.असे संत निर्मळा म्हणतात.
ज्या समाज व्यवस्थेत शूद्रास माणूस म्हणून कधी जगणेच वाट्याला येऊ दिले नाही.

त्या समाजात महिलांना तर कस्पटा समान मानले गेले. तिचा कोणताही दोष नसताना तिच्यावर या समाजाने वर्ण व्यवस्थेच्या जोखडात अडकून ठेवले. आज ही परिस्थिती काही प्रमाणात आणखीही खेड्यापाड्यात शिल्लक आहे. अधून मधून दलितांना त्रास देणे, अन्याय, हल्ले करणे, घर पेटवणे, मारहाण करणे. चालूच आहे जोपर्यंत हे सर्व कमी होत नाही, तोपर्यंत मानवतावाद उदयाला येत नाही. उचलले पर्वत कष्टाचे
पर्वा न केली या तणाची,
हवे नको ते सारे पाहताना
झाली दमछाक मज मनाची.
याप्रमाणे संत निर्मळाबाईंनी स्वतःच्या कष्टाची माहिती अभंगाच्या रूपाने दिली आहे. आम्ही सर्वजण अतिशय कष्टी आहोत. विठ्ठलाचे भक्त आहोत. तरी आम्हाला का तू दूर केलास? असा आर्त टाहो संत निर्मळांनी फोडला आहे, मौनातल्या वेदना विठ्ठलाला सांगितल्या आहेत. पंढरीच्या पांडुरंगा।
आस तुझ्या दर्शनाची।।
दरवर्षी घ्यावी म्हणतो।
भेट तुझ्या पाऊलांची।।
एवढी ही निर्मळा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेली आहे. दिवस-रात्र तिचे चित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी वाट पाहत आहे. अशा या शूद्र स्त्रीने पंढरीच्या पांडुरंगाला अभंगातून उत्तरे दिली आहेत. कष्टाचा अंधार कोणाला दिसत नाही पण यशाचा तेज मात्र सर्वांच्या डोळ्यात भरतो, अशा त्या म्हणतात.

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव*
संस्थापक: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *