मागच्या दोन तीन महिन्यांपासून आईची प्रकृती खालावत चालली होती.90 वर्षाच्या जवळपास वय असल्यामुळे थोडाही बदल झाला की तबियत बिघडत चालली होती.मात्र मागच्या आठवड्यात प्रकृती अधिकच बिघडली .3 नोव्हेंबरला दादाचा सकाळी सकाळीच फोन आला.”आईची तब्येत खूप बिघडत चाललीय तू लवकर ये.”
5 नोव्हेंबर 2022 ला भारतीय बौद्ध महासभा नांदेड च्या वतीने
ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विराट धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.नांदेड तालुकाध्यक्ष म्हणून माझ्यावरही काही जबाबदारी देण्यात आली होती.रात्रीचा दिवस करून सहकारी कामास लागले होते.त्याही पेक्षा सूर्यपुत्राचा भीमप्रकाश अर्थात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना जवळून पाहण्याचा,ऐकण्याचा योग आलेला.
आई सारखी वाट पाहत होती.मन आईला भेटण्यास अतूर झाले होते.दर रविवारी ती माझी वाट पाहत असायची. सारखी नजर माझ्या रस्त्याकडे लागलेली असायची……काय कराव काही सुचेना.एक मन म्हणू लागले आईसाठी लगेचच निघाव. तर दुसरे मन म्हणे ..बाळासाहेब इथे येत आहेत..आपण कसे जावे? मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.शेवटी दादाला सांगितलं …बाळासाहेबांची सभा संपताच निघतो काळजी घ्या…..
दोन वर्षापूर्वी………
सर्व नातलगाच्या भेटीगाठी घ्याव्यात म्हणून आम्ही गावाकड गेलो.सर्वांच्या भेटीनंतर ती काही दिवस संपतराव गायकवाड माझे मधले बंधू यांच्याकडे थांबली आणि आठवडाभरात लाॅकडाऊन लागले.तेव्हापासून आई गावाकडेच होती.आम्ही येत जात होतो….
सभा संपल्यानंतर आम्ही गावी भपोहचलो.आई कंठात प्राण रोखून माझी वाट पाहत होती जणू . माय मी आलोय म्हणताच तिचा सुखलेला चेहरा फुलला. बोलण्याची शक्ती नव्हती तरीपण सर्व शक्ती एकवटून ती बोलण्याचा प्रयत्न करत होती.कान कमजोर झाल्यामुळे नीट ऐकायलाही येत नव्हते.
“कोण? गणपत?”
“होय. मी गणपत “
“आता आलास…? एवढा उशीर का केलास…?चिमणीवाणी वाट बघत होते तुझी “
“बाळासाहेबांची सभा होती नांदेडला …त्यासाठी थांबलो होतो.
तू बाळासाहेबांना भेटली होती ना मुक्रमाबादला?”
” हां…….मुक्रमाबादला आले होते. आम्ही महिला हार टाकून स्वागत केलो …निवडणुकीला उभे होते….जितू दिले नाहीत “
“माय बाळासाहेब कसे जिततील?
मतपेटया नदीत सापडल्या …”
1987 साली शंकरराव चव्हाण लोकसभेचा राजीनामा देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली.ॲड.बाळासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे होते…मुक्रमाबादला प्रचार सभा होती .बाळासाहेब आंबेडकर येणार आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली .बिहारीपूर ते वळंकी रस्त्याचे काम चालू होत.तेथूनच आम्ही मुक्रमाबाद गेलो.महिला मंडळाने पुष्पहार घालून साहेबांचा सत्कार केला…माधवराव पाटील शेळगावकर बाळासाहेबांबरोबर होते…..सभा खूप जबरदस्त झाली..
बाळासाहेब आंबेडकर निवडणूक जिंकणार असा सर्वाना विश्वास होता.कारण त्यांच्या विरोधात अशोक चव्हाण…चिवारी पोरगा होता…..
मात्र महाराष्ट्राचे सारे मंत्रीमंडळ , शिवराज पाटील चाकूरकर असे दिग्गज रात्रंदिवस धुमाकूळ घालत फिरत होते.साम दाम दंड भेद सारे हातखंडे वापरत होते….निळ पाहिजे की गुलाल पाहिजे असा खालच्या पातळीवरचा प्रचार काँग्रेसवाले करत होते
बाळासाहेब आंबेडकर हरल्याचे दु:ख आजही प्रत्येकाच्या मनात आहे…
माझ्या आईलाही त्या पराभवाचा विसर पडलेला नाही.बाळासाहेबांचे नाव काढताच तिच्या सा-या आठवणी ताज्या झाल्या…..
माझी आई अडाणीच होती पण आधुनिक बहिणाबाईच जणू. प्रचारासाठी तिने त्याकाळी जोडलेल्या चार ओळी
*बाळासाहेब आंबेडकर*
*आले मूक्रामबाद वस्तीला*
*उभे राहिले कुस्तीला*
*ग सखे साजनी…..*
खूप गप्पागोष्टी झाल्या. तिच्या लग्नाची गोष्ट सांगताना तिचा सुकलेला चेहरा फुलून दिसत होता…..पूर्वी लहान वयातच लग्न व्हायची .आठ दहा वर्षाची असताना लग्न ठरलं. आमच्याकडे मुलीचे लग्न वराकडे असतं.त्याप्रमाणे वऱ्हाड वळंकीकडे निघाले.वाहनाची सोय नसल्यामुळे चालतच जावे लागे.चालत जायचं म्हणून वराडी मंडळी पहाटेच निघालेली. पहाटेच्या अंधारातच जाहूर वरून वर्हाडी मंडळी निघालेली.नवरी सकट सर्व पुरुष, महिला ,लहान मुले मुली पायीच चालत निघाली होती.नवरी बोलावण्यासाठी आलेल्या माणसाकडे शिदोरी भरलेली दुरडी दिलेली होती.डोक्यावर ओझं असल्याने तो व्यक्ती भराभरा चालत होता.लहान मुलेही त्याच्या सोबत चालली होती.आता तांबडे फुटू लागले होते..त्यावेळी अंबुलग्याच्या माळावर भरपूर झाडी होती.दुष्काळाचे दिवस .लोकांची भाकरीसाठी धडपड चाललेलीअसे.जंगलातून दोन तीन माणसे घोगडे पांघरूण अली आणि अचानक वऱ्हाडी मंडळीवर हल्ला केला .आरडाओरड झाली फक्त शिदोरीची दुरडी घेऊन ते लोक पसार झाले.या प्रकाराने लहान मुलं भलतीच भेदरली. आईची पाच वर्षाची एक चुलत बहीण या घडल्या प्रसंगामुळे फारच घाबरली. तिच्या अंगात एकदम ताप भरला .त्यावेळी आजच्या सारखे डाॅ. नव्हते.पोरीचा ताप काही उतरेना. शेवटी मांडवातच तिने प्राण सोडला.लग्न घरावर एकदम शोककळा पसरली. आता काय करायचे? सर्वानाच प्रश्न पडला.काही शहाणी माणसे पुढे आली आणि म्हणाली ” घडले ते फारच वाईट घडले पण आता दु:ख करत बसून चालणार नाही.मुलीचा अंत्यविधी करा आणि लग्न उरकून घ्या “
त्याप्रमाणे प्रथम अंत्यसंस्कार करण्यात आला आणि नंतर लग्न पार पडले. त्याकाळी गोडधोड काही घडायचे नाही.पिटले भाकरीचे जेवण जेऊन वर्हाडी परत गेली..,…
अशा अनेक आठवणी सांगून झाल्यावर ती दमली..थोडसं दूध चमचाने पाज म्हणाली. दोनच चमच दूध पाजलं. तेही परत येऊ लागलं. थोड्या वेळाने म्हणाली एखादी कथा तरी सांग. एक एक शब्द उच्चारताना खूप कष्ट पडत होते ………..
कोणती कथा सांगावी ? मला प्रश्न पडला. मी म्हणालो ” माय, बाबासाहेबांचा हातात काठी असलेला फोटो तू पाहिलीस का? ती हो म्हणाली. ती काठी बाबासाहेबांच्या हातात का आली ती गोष्ट सांगतो ऐक.
एकदा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर काही कामानिमित्त भूसावळला गेले होते.रेलवे स्टेशनवर लोकांनी गर्दी केली होती. स्टेशनवरून बाबासाहेबांना टांग्यातून आपल्या वस्तीत न्यायची तयारी सुरु होती.पण टांगा काही मिळत नव्हता.सर्व टांगेवाले बाबासाहेबांना टांग्यातून न्यायला नकार देत होते.कारण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर टांग्यात बसले तर त्यांचा टांगा बाटणार होता.खूप वेळानंतर एक टांगेवाला तयार झाला पण फक्त टांगा द्यायला.तो टांग्यात बसणार नाही,टांगा तुमचा तुम्ही हाका म्हणाला .
काही आपलेच उत्साही कार्यकर्ते टांगा चालवायला तयारझाले पण टांगा चालविण्याचा अनुभव कोणालाही नव्हता. बैलगाडी हाकणे वेगळे आणि टांगा हाकणे वेगळे बाबासाहेब टांग्यात बसले .टांगा चालू लागला…जसाही टांगा पुलावर आला की घोडा उधळला. टांगा एका बाजूला आणि बाबासाहेब दुसऱ्या बाजुला पडले.बाबासाहेबांचा एक पाय मोडला.कित्येक दिवस ते पडून राहिले.पाय काही व्यवस्थित जुडला नाही.तेव्हापासून बाबासाहेबांच्या हातात काठी आली……
कथा ऐकता ऐकता माय थोडी झोपली.रात्रीचे बारा वाजले होते तिने आवाज दिला… पुजा….(पूजा ही नातसून..देविदासची पत्नी.हीनेच माईची खूप सेवा केली)म्हणून हाक मारली.आम्ही सारे धावत जवळ गेलो.थोडीशी अंबील दे म्हणाली .पुजाने दोन चमच अंबील पाजल्यानंतर थोडावेळ झोपली.रात्री दोन वाजताथोडस पाणी मागितली.दादाने पाणी पाजल्यानंतर विचारली…
“आज कोणता वार हाय?”
“मंगळवार “
“दिवस हाय की रात्र?”
रात्र…पौर्णिमेची रात्र आहे….कार्तिक पौर्णिमा”
“उद्या खीरदान करा”
मी म्हटलं, “हो सर्व परिवार जमलेला आहे उद्या छान खीर करू,वंदना घेऊ… “
“मला उजव्या कुशीवर झोपवतो का?”
आम्ही उजव्या कुशीवर झोपवलं…..
बोलत बोलत झोपली ते कायमचीच….
गणपत गायकवाड
बांधावरून चांदावर या हस्तलिखित पुस्तकातून