आजच्या पिढीचे नवसंबोध आणि भावविश्व- डाॅ.भीमराव तलवाडे
नांदेड ; गंगाधर ढवळे
डाॅ.भीमराव तलवाडे या व्यक्तीस त्यांच्या लहानपणी ‘भीम्या’ असे संबोधले जायचे. तसेच भीम्याची माय त्याला ‘बाबीगोळी’ तर परिवारातले काही जण त्याला ‘गेळं’ असे म्हणायचे. ‘धिम्या’ हे भिम्याचेच अपभ्रंश रुप होते परंतु ‘बाबीगोळी’ आणि ‘गेळं’ या दोन्ही शब्दांचा अर्थ अद्यापही आकळला नाही. कोण आहे हा डॉ. भीमराव तलवाडे? एक सामान्य माणूस. तुमच्या आमच्या सारखा. गेल्या चाळीस वर्षांपूर्वीची महाराष्ट्रातल्या गावखेड्यांची परिस्थिती तशी अनाकलनीयच होती आणि त्यापूर्वीचा गरिबातला गरीब हा काही स्वत:ला माणूस म्हणवून घेण्याच्या फारशा प्रयत्नात नव्हता. भीम्याही या पिढीच्या पोटी जन्माला आला होता. श्रीमंतांना आणि अभावहीन लोकश्रेणींना काही इतिहास आणि काही भविष्य नव्हते. पण ज्यांचा पिढ्यानपिढ्यांचा इतिहास आणि येणारे भविष्य काही सूखकर किंवा आरामदायी नव्हते तर ते संघर्शशीलच होते. इतिहास अत्यंत वेदनादायी पण प्रेरणादायी होता तर भविष्य अत्यंत खडतर असेच होते. वर्तमान नामसंबोधनासारखा अनाकलनीयच होता. तो दररोज यातनांचे कढ पिऊन टाकत असे. या काट्याकुट्यांच्या वर्तमानाने भविष्याच्या रेखा आधीच ओरखडून ठेवलेल्या होत्या. व्यक्ती आणि व्यक्तिमत्वांचे अनेक कंगोरे त्याकाळीही लक्षात येऊ लागलेले होते. सर्वसामान्य कुटुंबात धगधगत्या दारिद्रयाचा प्रबंध लिहिला जात होता तिथे अनेकांनी जन्म घेतला होता. भीमराव, भीमा किंवा भीमू या नावाने हाक मारणारेही अनेकजण त्याच्यासारख्याच गरिबीच्या ज्वलज्जहाल परिवाराचे प्रतिनिधी होते. हे सगळेच एकत्रच राहात. एकत्रच खेळ खेळत आणि जगण्याच्या होरपळीची आनंदाने गाणी गात. या प्रतिनिधींनाही त्यांची टोपणनावे होती पण कुणीही त्यांना आदराने बोलावे किंवा बोलायचे असते अशी शिकवण दिली नाही. परंतु जे शिकत होते ते शिकवित नव्हते. शिकलेल्यांनी गावं सोडली आणि गावाच्या कपाळावर नोंदवलेली नावं मोडली. आम्ही सर्वचजण अडथळ्यांच्या आणि छोट्या मोठ्या संकटांच्या वेगाने वाढणाऱ्या उभ्या पिकांमधून मार्गक्रमण करीत होतो. देशाच्या कानाकोपऱ्यातही हीच किंवा त्यापेक्षाही उग्र परिस्थिती होती. याची त्यावेळी आम्हाला फारशी जाणीव नव्हती. शिक्षण, नवज्ञान, माहिती- माहितीचे स्रोत, भविष्याचे नियोजन, अर्थव्यवस्थापन, मार्गदर्शन आणि भूमिकांची अभावयुक्तताच होती. ही प्रत्येक पावलागणिक होती. फक्त त्याची तीव्रता कमी अधिक होती. हे सर्वभान घेऊन काही खाचखळग्यांच्या पायवाटा एकत्र मिळाल्या होत्या.
या पायवाटा जिथे येऊन मिळाल्या होत्या तिथून काही सहप्रवाशांचा प्रवास सुरू झाला. भीमराव इथेच भेटला. तो भेटला नसता तर त्या दशकाच्या प्रारंभीच त्याची आणि माझी कुठेतरी गाठभेट झालीच असती! एक साधासा, सडपातळ, काळतोंड्या पोऱ्या. त्याच्या हाकमारीची यादी मजजवळ नव्हती. म्हणून भीमराव हेच कायम राहिले. भीमराव हे बाबासाहेबांचे नाव आहे आणि ते आदराने घेतले पाहिजे ही भावना मूळ धरु लागली होती. मी या सर्वच प्रवाशांचा आणि त्यांच्या वर्गाचा नायकच होतो. बालपण तसे खेडवळ, अल्लड आणि खुळचट असेच होते. काहीसे आगतिकही होते. विटा थापण्याच्या कामाला जाणे, वयाला साजेशी मजुरी मिळविणे, कापसाची बोंदरी वेचून आणणे, कडुनिंबाच्या निंबोळ्या गोळा करून त्या विकणे, आंब्यांच्या कोयांमधील खोबळे काढून ते जमा करून विकणे, चिंचा गोळा करुन विकणे, काळे बिब्बे गोळा करण्याचाही छंद होता. आईसक्रिएट किंवा पेप्स्या विकणे असे काही उद्योग त्यावेळी चालायचे. आम्ही या व्यवसायांनी घेरलेलो होतो. दिवसभराच्या मोलमजुरीला फारशी किंमत नव्हती. त्यातून वह्या – पुस्तके घ्यायचे की ‘चितपट’ पैसे खेळायचे, त्या छोट्याश्या व्यवसायातून आलेले पैसे आईकडे द्यायचे की त्याचा व्हिडीओ बघायचा हे काही निश्चित नव्हते. वयाने मोठ्या असलेल्या माणसांनाच दारु पिण्याची किंवा पत्ते खेळण्याची सवय होती. बांडग्या पोरांपैकी काहीचजण फुटकळ चोऱ्या करीत असत. शाळा बुडवून काचेच्या गोट्या खेळण्याचा छंद आमचे मित्र जोपासत. आम्हाला ही व्यसनं आणि सवयी नव्हत्या. त्या लागण्याचाही काही प्रश्न नव्हता. आमच्या संकल्पना, संबोध आणि भावविश्व मर्यादित होते. ते आजच्या पिढीइतके स्पष्ट नव्हते. ते निश्चित नसले तरीही निर्धारित होते. तितकेच ते स्वत:ला आणि इतरांनाही उलगडणारे नव्हते. अनेक दिवस शाळेत न आलेला भीमराव अचानक एका गुरुवारी शाळेत आला. तो आला तेंव्हा शाळा सुटण्याची वेळ झाली होती. दुपारचे २.३८ वाजले असतील. तो येऊन गुपचूप खिडकीजवळ येऊन उभा राहिला. अगदी दबक्या आवाजात ‘गंगाधर, गंगाधर’ असे ओरडत होता. माझे लक्ष गेले. त्याने दप्तर घेऊन बाहेर येण्यास खुणावले. मी हळूच निघून आलो. त्या दिवशी आठवडी बाजार होता. शाळा पाच – सात मिनिटांनी सुटणारच होती. तो मला तडक गावातल्या एकमेव असलेल्या व्हिडिओ पार्लरमध्ये घेऊन गेला. तिथे अमिर खान आणि माधुरी दीक्षित यांचा ‘दिल’ हा चित्रपट सुरु होता. शाळेतून आल्याचे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याने दोन पुस्तके आणि एकच वही असलेले दप्तर पोटात घालायला सांगितले. मी तसे केले आणि भांबावल्या नजरेने चित्रपट पहात बसलो. तो आधीचा पहिला खेळ पहात होताच पण तो लगेच गेला आणि घराकडे जात असलेल्या हुसनाजी, जीवन, रामदास यांनाही घेऊन आला.
मग आम्ही पाच जणांनी सहा वाजेपर्यंत तो चित्रपट पाहिला. भीमरावचे सहा रुपये खर्च झाले होते. मध्यंतरी पाऊस कोसळून गेला होता. आम्ही वेळेत घरी पोहोचलो नव्हतो. इतकावेळ कुठे होतो याचे उत्तर मला द्यायचे होते म्हणून मी घाबरलोच होतो. व्हिडिओ पाहणे त्यावेळी आवारा पोरांचे लक्षण होते. हा नाद लागला तर पोरं बिघडतात अशी समाजाची धारणा होती. शाळेतही मार आणि घरच्यांचाही मार असे समिकरण होते. ते बदलले नव्हते. भीमराव नंतर दोन-चार दिवस शाळेत आलाच नव्हता. त्याचे कारण म्हणजे त्याने भावंडांचा मरेस्तोवर मार खाल्ला होता. त्याचे कारण म्हणजे आम्ही पाहिलेल्या चित्रपटासाठी त्याने घरातल्या तुरी विकल्या होत्या हे होते. तुरी विकून त्याला सात रुपये मिळाले होते. परंतु सात लाखाचा मार त्याला मिळाला होता. एवढे असूनही तो आनंदी होता. त्याला पोटभर खायलाही मिळाले नव्हते. तरीही तो आमच्याबरोबर सहभागी होता. त्याने केवळ चित्रपट पाहण्यासाठी घरातल्या तुरी का विकल्या हे अनाकलनीयच होते. त्याने ते कधीही सांगितले नाही. जाड्याभरड्या दाव्याने मार खाण्याचे प्रसंग अनेक होते. दिवसभर उपाशी ठेवण्याची गंभीर शिक्षा अनेक गंभीर चुकांमुळे मिळत होती. निकालातली टक्केवारी घटली, फारच कमी आली, फक्त उत्तीर्ण झालो किंवा नापास झालो तेंव्हा शिक्षा तर मिळत होतीच पण त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचारही मनाला शिवत नव्हता. त्यावेळी वृत्तपत्रात मॅट्रिकचा निकाल छापून येत असे. त्यात फक्त उत्तिर्णांची आसन क्रमांकच असत. आमची पोरं मोठ्या संख्येने नापासच होत. अनेकवेळा परीक्षा देण्याचा प्रयत्न करीत. काहीजणांचे शिक्षण दहावी-बारावीलाच सुटले. शाळा शिकण्याच्या बाबतीत अनेक अडचणी असूनसुद्धा भीमराव हटला नव्हता. त्यावेळी अनेकांजवळ शिकवणीसाठी, उच्च शिक्षणासाठी पैसे नसत. आजच्या मुलांसारख्या खर्चिक शाळा, शिकवणी वर्ग, मोबाईल, लॅपटॉप, भरमसाठ खर्च असूनही थोड्याशा कारणावरून पोरं टेन्शनमध्ये येतात. मला कुणीतरी त्या नेभळट सुशांत सिंग राजपूतचा ‘छिचोरे’ हा चित्रपट पाहण्याचे सुचवले होते. मला चित्रपट पाहण्याचे वेड आधीपासूनच आहे हे लक्षात आले असेलच. त्यानुसार तो मी पाहिलाच. आजच्या पिढीचे संबोध आणि भावविश्व फारच वेगळे आहे आणि ते खरेच आहे. ग्रामीण भागातील मुले शिकताहेत. पण काहीच पुढे जातात. त्यांचेही भावविश्व मर्यादितच राहिले आहे. ते जेंव्हा आपल्या आणि कुटुंबाच्या मर्यादा तोडून बाहेर पडतात तेंव्हाच ते स्वत:साठी आणि कुटुंबासाठी काही करु शकतात. त्या सगळ्यांना वास्तवाची जाण आणि समकाळाचे भान असणे आवश्यक आहे. मोठ्या कष्टाने भीमराव शिकला आणि डाॅक्टरेट झाला. त्याच्या सारख्यांच्या प्रवासाची कहाणी ऐकायलाही आजची पिढी तयार नाही. त्यांना मागील पिढ्यांच्या चटक्यांची जाणीव होऊ शकत नसेल आणि पुढच्या काळात संघर्षशील राहणार नसतील तर भविष्यकाळ कष्टप्रद असेल.Attachments area