परिवर्तनवादी चळवळीस गती देणारा
कवितासंग्रह ” तरंग – अंतरीचे
नुकताच सुनिल खंडाळीकर सरांचा कवितासंग्रह तरंग अंतरीचे लातूरात प्रकाशित झाला मूळचे सर अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गावचे सामाजिक चळवळीत झोकून देणारे व्यक्तिमत्व
कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर होय एका जेष्ठ सामाजिक कार्यकत्यांच्या व्यथा म्हणजेच सरांचा तरंग अंतरीचे हा कवितासंग्रह फारच बोलका वाटतो
जे आपण जगतो पहातो तेच लिहितो त्याचे ज्वलंत चित्रण सरानी केले आहे
प्रस्थापित व्यवस्थेला छेद देऊ पाहणारा एक सच्चा कार्यकर्ता आणि अनुभव कथन करणारा हा काव्यसंग्रह आहे
वर्तमान परिस्थितीत संविधानाची कशी वाताहत झाली असून कायदा – सुव्यवस्था कशी धाब्यावर बसविली जात आहे याचे चित्रण या कविता संग्रहात पानो – पानी वाचावयास मिळतात
१ ) भीमा तुझ्यामुळे – या कवितेत कवी म्हणतो की ” तोडील्या तु बेड्या
अन् ते साखळदंड …!!
अवशेष गुलामीचे
गाडण्या पाताळात ..!!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरामुळे आपण सारे माणसांत आलो गुलामीच्या बेड्या आपल्या हाती ठोकल्या गेल्या होत्या ते साखळदंड भीमाने तोडिले होते
गुलामीचे अवशेष भीमाने गाडिले होते
२ )बळीराजा : या कवितेत शेतकऱ्यांचे दुःख वेदना त्याची होरपळ मांडली असून स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज शेतकऱ्यांचे सरण आणि मरण इथली प्रस्थापित राजकीय व्यवस्था संपवू शकली नाही पिकाला हमीभाव देऊ शकली नाही
” वाट बघतुया आम्ही …
शतकानुशतके …!!
आज नाही तर
उदया तरी येईल
आमच्या बळीराजाचं राज्य …!!
आपला पूर्वज शेतकऱ्यांचा राजा बळी यांच्या राज्यात शेतकरी सुखी होता ….
४ ) दुष्काळ : या कवितेत कवी दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना म्हणतो की
भेगाळली भुई
करपलं रान
उदासीन मन
खायाला उठलं …!!
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे आयुष्य कसे देशोधडीला लागते याचे ज्वलंत चित्रण यात वाचावयास मिळते
५ ) गोधडीची ऊब !!
या कवितेत सर्वसामान्य माणूस आधी कसा जगत होता आणि आज आधुनिक काळातील व्यक्ती किती स्वकेंद्रित बनत चालला असून गोधडीची ऊब मायेची ममतेची होती परंतु आज ती ऊब दिसत नाही
” गोधडीची ऊब
आज लुप्त झालीय !!
गोधडी अंगावर
टाकणारी माय
गुप्त झालीय !!
माय आणि
गोधडीचं नातं
अतुट होतं !!
लहानपणी मायेच्या हातावर बनविलेली गोधडी
आता राहिली नाही माय आज दिसत नाही तिचं गोधडीशी नातं आता उरलं नाही
६ ) भीमा तुझ्या स्पर्शाची !!!
या कवितेत डॉ बाबासाहेबांनी आम्हांस जगण्याचे बळ दिलं स्वातंत्र्य , बंधूता आणि नवा धम्म दिला प्रस्थापित समाजाकडून होणारे शोषण थांबवून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला
शिक्षण हेच परिवर्तनाचे हत्यार आहे हे समजावून सांगितले
” भीमा तुझ्या स्पर्शाची
किती गावु मी थोरवी !!
भीमा तुझ्या कृर्तत्वाने
झाले मोकळे आकाश “
७) लढा जाती अंताचा ..!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जाती अंताचा लढा दिला होता प्रस्थापित वर्गाकडून जातीची उतरंड ठरलेली होती ब्राह्मण , वैश्य , क्षत्रिय आणि शुद्र जातीस व्यवस्थेने
पूर्णपणे दिशाहिन आणि गुलाम बनविले होते
जातीअंताचा लढा ..
शतकानुशतके
आजपतूर चालूच हाय ..!!
तरी पण जातीचा अंत
का बरं होत नाय
समाजातून जात ही जात नाही सर्व काही जातीच्या चौकटीत ठेवून मनुवादी व्यवस्था इथे राज्य करत आहे
८ ) या बुद्धाच्या भुमीत !!
या कवितेत कवी व्यक्त होताना संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे महाकारूणिक तथागत गौतम बुध्दांच्या विचारांचा जागर या कवितेतून केलेला दिसेल
” या बुद्धाच्या भुमीत
राज्यकर्ते हैवान
आणि समाज मन
षंढ आहे …!!
देशच नव्हे तर अवघे विश्व
उघड्या डोळ्यांनी पाहतेय !!
खऱ्या अर्थाने बुद्धाची शिकवण आज आपण विसरलो आहोत त्यांच्या विचारांचे पाईक
न होता त्यांच्या विचारांचे मारेकरी झालो आहोत
९ ) मरण अटळ आहे ..!!
या कवितेत कवी म्हणतो की
” गद्दारांनो , लक्षात ठेवा
तुमचे मरण अटळ आहे ..!!
दंडवत घाला की लोटांगण
त्याचा काही उपयोग नाही “
या कवितेत समाजात धर्म भक्तीच्या नावावर थोथांड मांडले जात आहे
भक्तीस धंदा केला असून कसे वर्तन करून पुन्हा माफी मागणार असाल तर तुम्हाला ती कदापि मिळणार नाही तुमच्या भक्तीचा बुरखा टरा टरा फाटणार आहे “
१० ) कॉम्रेड :
या कवितेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला लाल सलाम केला आहे प्रस्थापित समाजाने येथील वंचित समाजाला विस्थापित करण्याचे महापाप केले आहे आपल्या लेखणीने आयुष्यभर येथल्या उच्च -श्रीमंत लोकांवर वार करित राहिले
” कॉम्रेड अण्णा भाऊ
लाल सलाम …!!
तुम्ही साहित्याचे
महामेरू …
तुम्ही विचारवंताचे
विचारवंत …!!
तुम्ही क्रांतीचे प्रणेते …
तुम्ही तत्वज्ञानाचे
तत्ववेत्ते ..!!
११ ) धर्माच्या ठेकेदारांनो .…!!!
या कवितेत सदय देशातील परिस्थितीवर
भाष्य करताना कवी फारच संतापतो आणि व्यक्त होतो ते पुढील प्रमाणे
” आता कुठे गुजरात
विझत असताना
मणिपूर जळत आहे ….!!
धर्माच्या नावावर
स्त्रियांची इज्जत
भर रस्त्यावर
लुटली जात आहे …!!
धर्माचा वापर हा स्वतःच्या स्वार्थाकरिता सत्तेकरिता करत असाल तर खबरदार जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही
१२ ) शहीद दाभोळकर अमर रहे …!!
या कवितेत कवी व्यक्त होताना म्हणतो की बुवाबाजी , अंधश्रद्धा यांचा बाजार जोरात असून विज्ञानवादी विचारांची हत्या आज केली जात आहे शहीद नरेंद्र दाभोळकर सरांना अभिवादन करण्याकरिता या कवितेची मांडणी कवी करतो
बुद्ध , शाहू , फुले आंबेडकर …
आम्ही सारे दाभोळकर
बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अजुन
आम्हाला पडला नाही विसर ….!!
नाही तर केंव्हाच
घेतली असती खबर …!!
बुध्दाच्या या देशात विज्ञानवादी दृष्टिकोन विकसित करणाऱ्या व्यक्तीस गोळ्या झाडून ठार केले जाते ही गोष्ट लांछनास्पद आहे
१३ ) शिवबा – या कवितेत कवी व्यक्त होतो
” बा ..!! शिवबा !!
तु स्वराज्याचा शिल्पकार ..!!
बा …!! शिवबा ..!!
तु रयतेचा राजा ..!!
आम्ही मारतो मजा ..
तुझ्या नावावर
आमच्या ईभ्रतीचा डोलारा ….
या कवितेत छत्रपती शिवरायांनी साडे – तीनशे वर्षापूर्वी न्यायाचे समतेचे राज्य दिले समाजाला योग्य मार्ग दाखविला आज त्यांच्या नावाचा केवळ वापर करून सत्तेचा बाजार मांडला जात असून महाराजांच्या विचारांची प्रतारणा होत आहे
अतिशय वास्तविक असा हा कवितासंग्रह असून मानवाच्या कल्याणासाठी अनेक महापुरुष आयुष्यभर जगले त्यांच्या विचारा पासून कृतीपासून आपण खूप खूप दूर गेलेले आहोत अशी खंत कवी व्यक्त करतो हा कवितासंग्रह सर्वांनी अवश्य वाचावा आणि कवीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन माझा शब्दप्रपंच थांबवितो
धन्यवाद !
शीर्षक : तरंग अंतरीचे
कवी – सुनिल उत्तमराव खंडाळीकर
मो नंबर – ९०११८०४८२८
पृष्ठे : १०४
किंमत – ३००
प्रकाशन – मुक्तरंग प्रकाशन , लातूर
प्रथम आवृत्ती १ सष्टेबर २०२४
प्रस्तावना : अंकुश सिंदगीकर
पाठराखण – शिवाजी मरगीळ
शब्दांकन : प्रा पी एस बनसोडे सर
साहित्यिक / समीक्षक लातूर
८३९०३६३२६५/९६०४३५४१४८