नांदेड:
श्री शिवाजी हायस्कूल नवीन कौठा,नांदेड येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भगवानराव पवळे व उप मुख्याध्यापक सदानंद नळगे यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. कविता तीर्थे या होत्या,तर प्रमुख पाहुणे म्हणून परीक्षा प्रमुख आनंद सुरसे व गणेश मुधोळकर तसेच शाळेचे इन्चार्ज बालाजी टीमकीकर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे वाचन घेण्यात आले तसेच ‘जागतिक हात धुवा’ हा दिवसही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले व हात धुण्याच्या पायऱ्या व्यवस्थित समजावून सांगण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे आनंद सुरसे यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. कविता तिर्थे यांनी वाचनाचे महत्व सांगून अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन व आभार अमोल टेकाळे यांनी केले. याप्रसंगी निलेश देशमुख, शिवाजी कावळे, दत्तात्रय देवकते, सविता पोकले, सपना गरुडकर, लता जाधव, रिहाना पठाण यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.