डॉ. देविदास तारु यांचे ‘आता मव्ह काय ?’ हे आत्मचरित्र काही दिवसांपूर्वी वाचायला मिळाले. कारण असे की या पुस्तकाची पुनरावृत्ती लवकरच आपल्या भेटीला येणार आहे म्हणून हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता फार अनावर झाली. तसे पाहिले तर हे पुस्तक वाचायला जरा उशीरच झाला.
प्रथमतः ‘आता मव्ह काय ?’ हे पुस्तक सहजच चाळण्यात आलं परंतु चाळता चाळता पुस्तक कधी वाचून झालं हे कळालं नाही. हे आत्मकथन त्यांच्या जीवनातील कडू-गोड प्रसंगात हरवून नेणारे असून त्यातील प्रत्येक भाग हा वैशिष्ट्यपूर्ण भाव विश्वास घेऊन जाणारे आहे. बालपणाच्या काळात सोसावं लागणा-या गरिबीच्या झळा हा खूप त्रासदायक असल्या तरीही त्यात अतिशयोक्ती दिसून येत नाही. वास्तव जीवनाला स्पर्श करणा-या व्यथा लेखकाने यात मांडल्या आहेत.
प्रत्येक परिस्थितीवर मात करत शिक्षणाचा ध्यास घेऊन आयुष्याची सुंदर, प्रेरणादायी आणि आदर्शदायक मांडणी केलेली आहे.
एका व्यसनाधीन गिरणी कामगाराचा मुलगा त्यातही आजूबाजूची निराशामय परिस्थिती यातून विडी, शिगरेटची धराडे ओढण्यापासून ते गांजा, दारू या व्यसनांच्या संगत गुणांमुळे – चोऱ्या, मारामाऱ्या करू लागतो. पैसे मिळवण्यासाठी कोणतेही कामे करतो. शाळेतून बाहेर पडलेला, शेवटी काय तर आयुष्यावर जणू सुड उगवत जगणाऱ्या या पोराला एका क्षणी आपण कोण आहोत ? आपल्याला कुठे जायचे आहे ? ‘आता मव्हं काय!’ असा प्रश्न पडतो. हा प्रश्न त्याला आतून छळायला लागतो, विचार करायला भाग पाडतो. या सगळ्या घालमेलीत स्वतःला घडवत राहण्याची कसरतही मुळातून प्रेरणादायी आहे.
तिथं पासूनचा ते इथं पर्यंतचा’ त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा
अज्ञान, दारिद्य्र , कौटुंबिक अडचणी यांच्याशी झगडत असतानाच स्वत:च्या व्यसनाधिनतेवर मात करून, वाया गेलेला मुलगा म्हणून होणारी हिनवणुक परिस्थिती, या सर्वांवर मात करून आज एक चारित्र्यसंपन्न, अन्यायाला वाचा फोडणारा व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांसमोर आहे. याचबरोबर एक विद्यार्थीप्रिय शिक्षक,
राज्य, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळवून आपली सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात एक मानाचे स्थान त्यांनी मिळवले आहे. एवढेच नाही तर बालभारतीचे सदस्य म्हणून अभ्यासक्रम निर्मितीत त्यांचा सहभाग आहे.असा इथं पर्यंत चा मोठा प्रवास असणाऱ्या डॉ. देविदास सरांचा प्रवास मला वाचायला आणि पाहायला मिळाला.
डॉ. तारू सरांवर फुले, शाहू, आंबेडकर यांच्याविचारांची झालेली पेरणी यामुळे ते प्रेरित झाले आणि परिवर्तनवादी विचारांनी झपाटून गेले.अन्याय होत असताना सुद्धा त्या विरोधात सुधारणा करून त्याविषयीची तळमळ, त्यांच्या व्यथा या आत्मकथनातून सहजपणे निर्देशित केलेल्या लक्षात येतात.
आता मव्ह काय! ही एक वास्तवदर्शी आत्मकथा आहे जी हादरवून टाकणाऱ्या परिस्थिचीचे वर्णन करते. सुरुवातच दमदार अशा प्रकाशन सोहळ्याने झाली आणि लोकप्रियतेचा प्रचंड असा प्रवास तुफान वेगाने अनुभवला. आता पर्यंत अनेक पुरस्कार का प्राप्त झाले याचे गमक मला कळाले. अतिशय सुंदर पण साधीसोपी भाषा,ओघवतेपणा, तर लयबद्धता,भाषेचा सहजपणा दाखवणारा चढ-उतार,वाचत असताना या प्रत्येक गोष्टीची जाणीव मनाला होऊ लागली. प्रत्येक प्रसंग वाचताना डोळ्या समोर प्रत्यक्ष घडत आहे असा भास होत होता.
कथे मधील एक-एक घटक व त्याचे नेमके वर्णन सहज सुंदररित्या मांडले गेले आहे.
आपल्यापैकीच कोणा एकावर घडलेली ही समाजाची चित्तथरारक कथा मांडण्यासाठी एक धमक लागते ती धमक त्यांच्यात आहे आणि कुठल्याही गर्तेत किंवा विवेचनेत अडकलेल्या व्यक्तीसाठी ही कथा दिशादर्शक होऊ शकते. तसेच स्वतःच्या दृढनिश्चय आयुष्याला एक आगळी वेगळी कलाटणी देऊ शकते. याचे योग्य उदाहरण म्हणजे डॉ. देविदास तारु सरांचे हे आत्मचरित्र होय.
‘आता मव्ह काय!’ हे आत्मचरित्र माणूस म्हणून घडण्याच्या प्रवासाचे योग प्रतिनिधित्व करत आहे. या आत्मचरित्राला मिळालेले इतके मोठे यश खरच खूपच कौतुकास्पद बाब आहे. वाचकांच्या हृदयामध्ये एक वेगळी आशी जागा या आपल्या वास्तववादी कथेने निर्माण केली आहे. त्यामुळे प्रत्येक वाचकांच्या हृदयामध्ये या आत्मकथनाविषयी एक भावनिक कल्लोळ निर्माण झाला आहे. त्यामुळेच वाचकांमध्ये प्रचंड उत्साह, प्रेम, आपुलकी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि ही खरंच आनंदाची बाब आहे. एका लेखकाने असंख्य वाचकांना आपल्या आत्मचरित्राच्या माध्यमातून एक भावनिक भुरळच घातली आहे असेच म्हणावे, लागेल यात शंका नाही.
मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या ह्या आत्मकथनाची दुसरी पुनरावृत्ती होत आहे हे यांच्या यशाचे आणि पुढील ध्येयप्राप्तीसाठी गमक आहे. मी यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया देण्याइतपत नक्कीच मोठी नाहीये परंतु एक छोटा प्रयत्न म्हणून या प्रतिक्रिया देत आहे.
डॉ. देविदास सरांना त्यांच्या पुढील ध्येयप्राप्तीसाठी आणि लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
–सौ.रूचिरा बेटकर (जामंगावकर), नांदेड.
कवयित्री आणि समीक्षक