*12 डिसेंबर जयंती विशेष*
लोकनेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एका छोट्या गावात झाला. त्यांचे आई-वडील निरक्षर होते.तरी त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वतःच्या कर्तृत्ववाने,प्रयत्नाने,परीश्रमाने यश संपादन केलेले आहे. हे आपणास विसरता येणार नाही. म्हणून
त्यांनी केलेल्या कार्यकर्तुत्वाचा आढावा आपण या ठिकाणी करून घेत आहोत.. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत कशी करता येईल हे त्यांच्या पुढे आव्हान असायचे. वैयक्तिक बडेजाव व श्रीमंतीचे प्रदर्शन त्यांनी कधीही केले नाही.अनेक प्रश्नांची गुंतागुंत वाढविण्यापेक्षा ते सोडविण्यात आनंद घेत असत. लोकांसाठी सरकारशी दोन हात करायला ते कधीही मागेपुढे पाहत नव्हते. परिणामाची भीती त्यांनी कधीही बाळगली नाही.ध्येय व विचार पक्का असला की शेंडी तुटो या पारंबी याला ते घाबरत नसत. प्रचंड जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभा असल्याने कोणत्याही संकटाला ते कधीही डगमगले नाहीत. उपेक्षितांकडे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून ते पाहत असत.नेहमी सामाजिक,राजकीय चळवळीत मित्र जोडण्याचे काम त्यांनी केले.बोलण्यापेक्षा त्यांचा कृतीवर जास्त भर असे. ऊस उत्पादक व ऊस तोडणारे यांना त्यांनी कधीही वाऱ्यावर सोडले नाही.नेहमी ते दुसऱ्या व्यक्तींना मोठेपणा देत असत. माझ्यापेक्षा माझ्या समाजातील दुर्बल, गरीब,पीडित मोठे झाले पाहिजेत हा त्यांचा ध्यास होता. दिवस-रात्र गोरगरिबांच्या हिताकरता ते जगले. म्हणून ते सर्वांच्या हृदयात राहिले. त्यामुळे आज त्यांना दैवत म्हणून समाजाने, जनतेने स्वीकारलेले आहे.
हे सत्य नाकारून चालणार नाही. सर्वांना छाया देणारे, थोडा ही गर्व नसणारे, सतत ग्रामीण भागाचा विकास करणारे, भारताच्या प्रगतीचा ध्यास घेतलेले ज्ञानयोगी संघर्षयोध्दा, तळागाळापर्यंत लक्ष देणारे महान व्यक्तीमत्व म्हणजेच समाजाभिमुख, विकास पुरूष,विकास तपस्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब होय.
सामाजिक एकात्मतेवर सर्वांनी भर दिला पाहिजे. असे यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला ते आपले वाटत होते. सत्ता केंद्रे त्यांच्या पुढे नतमस्तक होत होती. वृक्षांनी त्यांना सावली दिली असे ते विशेष व्यक्तिमत्व होते.त्यांच्या वागण्यात व बोलण्यात रुबाबदारपणा, समजूतदारपणा होता. लोकप्रियता स्वतः त्यांच्या पाठीमागे लागली होती.रोजंदारी देऊन पैसे देऊन कधी त्यांना सभेला माणसे आणावे लागले नाहीत. परखड वक्ते, ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा, मित्रांचे मित्र, विरोधकांना भुरळ घालणारे ते नेते होते. ज्यांना दिसले, बोलले, त्यानुसार त्यांनी त्यांना अनेक उपाध्या दिल्या. रतन खत्रीला गोपीनाथ मुंडे साहेबांनी अटक केले.तेव्हा त्यांची कार्यकर्तुत्वावरील पकड लोकांना दिसून आली. सतत लोकांचा जनसमुदाय त्यांच्यासोबत असायचा. सारखा प्रवास करून लोकांना भेटत असायचे. शेतकऱ्यांच्या घरी दोन घास खाणारा एकमेव व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब होय. जनतेच्या, रयतेच्या मध्ये जाऊन त्यांनी काम केले. जीवनाला आकार देणारे त्यांचे मित्र प्रमोदजी महाजन हे मेव्हणे होते. स्वर्गवासी विलासरावजी देशमुख, मा. छगन भुजबळ साहेब, गृहमंत्री आर आर पाटील या सर्वांबरोबर त्यांचं नातं जिव्हाळ्याचे,सलोख्याचे,मित्रत्वाचे होते. माणूस हा परिसासारखा असावा.सोन्यासारखा असू नये. असे ते म्हणत असत.याचा अर्थ दुसऱ्याच्या उपयोगाला यावे.ऊसतोड कामगारांना इतके जीव लावले की त्यांनी त्यांना आमचे दैवतच म्हटलेले आहे. परळी येथील वैद्यनाथ साखर कारखाना चांगला चालवला. आशिया खंडातील महत्त्वाचा कारखाना म्हणून त्याचा उल्लेख सतत केला जातो. त्या कारखान्याला अनेक बक्षिसे मिळाली. त्या कारखान्याबरोबर त्यांनी इतर वीस कारखाने सुद्धा पूर्वस्थितीवर आणून लोकांना रोजगार मिळवून दिला. गोधड्या पासून ते गालिच्या पर्यंत त्यांचा हा जीवन संघर्ष होता. अनेक जाती जमातीतील लोकांना त्यांनी पुढे घेऊन जाण्याचे प्रयत्न केलेला आहे. वंचितांसाठी काम करणारे एकमेव व्यक्ती होऊन गेले. मी पुढे जावे असे न म्हणता समाजाला पुढे घेऊन जाणारे ते व्यक्ती होते.पत्रकारांचा त्यांनी नेहमी आदर केला. रस्त्यावर काटे टाकण्याचे काम त्यांनी कधीही केले नाही. इतरांची दुःख स्वतःवर घेऊन सुख सर्वांना देण्याचं काम त्यांनी केले. त्यांची विरोधक त्यांना सोडून इतर पक्षात प्रवेश केले परंतु त्यांनी कुठेही कधी गेले नाहीत .राजकीय परंपरा पार्श्वभूमी नसतानाही ते लोकनेते झाले.त्यांना गरिबाच्या प्रश्नाची जाणीव होती. वकृत्व,नेतृत्व, कर्तुत्व,मातृत्व, दातृत्व यापासून ते कधीही दूर गेले नाहीत.आता महात्मा फुले, राजर्षी शाहू ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,लोकनेते गोपीनाथ मुंडे असे नाव लावून महाराष्ट्राच्या समाज सुधारकां मध्ये त्यांचे नाव घेता येईल असे मला वाटते.संघर्षशील व्यक्तिमत्व असणारे,वास्तवाची जाणीव असलेले, लोकांना प्रेरित करणारे असे ते महान नेते होते. म्हणून आज त्यांच्या विचारांची समाजाला खरोखरच गरज आहे.त्यांच्या 61 व्या वर्षी त्यांनी केलेलं भाषण आज सुद्धा सर्वाना प्रेरणादायी आहे.ते नेहमी बोलताना कार्यकर्त्याच्या अंत :करणाचा ठाव घेत असत. सर्वसामान्य माणूस व कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडणारे, सोडविणारे खरेखुरे ते लोकप्रतिनिधी होते.राजकारणाच्या प्रवासात कार्य करीत असताना सतत समाजाच्या संपर्कात आयुष्यभर राहिले म्हणूनच ते आज दैवत झाले. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यांनी कधीही कोणाच्या पुढे पुढे केले नाही.त्यांचा विरोध चुकीच्या वृत्तीला होता. त्यांच्या बोलण्यातून विनम्रता,आपुलकी, ओसंडून वाहत होती.कौटुंबिक जीवनात ही ते नेहमी आनंददायी होते. त्यांना पंकजाताई मुंडे, प्रितम ताई मुंडे या मुली आहेत,
लोकप्रतिनिधी म्हणून त्या कार्य करीत आहेत.सामाजिक भान ठेवून शेतकरी, कष्टकरी ,कामकरी यांच्या हिताशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. 1980 ते 2014 पर्यंत ते राजकारणामध्ये 35 वर्षे त्यांनी देशसेवा केली.आमदार,खासदार, उपमुख्यमंत्री ,गृहमंत्री या पदावर त्यांनी कार्य केले.12 डिसेंबर 2010 रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या गौरव सभेत मा.लालकृष्ण आडवाणी साहेबांनी त्यांना लोकनायक म्हणून त्यांचा यथोचित गौरव केला होता. अशा या महान लोकनेत्यांस जयंतीच्या निमित्ताने विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड यांच्या वतीने विनम्र अभिवादन*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
संस्थापक: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड