एक अविस्मरणीय शिक्षण परिषद वाघदरी

नांदेड जिल्हयात प्रत्येक केंद्रात दरमहा शिक्षण परिषद घेण्यासाठी नियोजन केले जाते. त्यासाठीचे शैक्षणिक नियोजन,विषयपत्रिका, एकंदर कामाचे नियोजन,कार्यरत कृतीयंत्रणा याचा विचार केला जातो. या सर्व बाबींचा विचार करून आमच्याही जलधारा केंद्रात माहे नोव्हेंबर-2024 ची शिक्षण परिषद आयोजित केली होती. परंतु या आयोजनात एक आगळे वेगळेपणा होता कारण आमच्या केंद्रात अतिदुर्गम अवघड क्षेत्रात असणारे गाव,ज्याला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी शासन प्रशासन धडपडत होते ते म्हणजे वाघदरी. विशेष म्हणजे ही शिक्षण परिषद केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.अशोक हामदेसर,वाघदरीचे मुख्याध्यापक मौलासर व त्यांचे सहकारी सिद्धेश्वरेसर यांच्या खास आग्रहाखातर तेथे आयोजित करण्याचे ठरले. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणारी ही शिक्षण परिषद कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलतच गेली.शेवटी नोव्हेंबरची शिक्षण परिषद 27 डिसेंबरला वाघदरीला घेण्याचे निश्चित झाले. केंद्रप्रमुख हामदे सरांनी उत्साहाने गटशिक्षणाधिकारी मा.गंगाधरजी राठोड साहेब व शिवणी प्रभागाचे विस्तार अधिकारी मा.संजयजी कराड साहेब यांना निमंत्रित केले. दोघांनीही उपस्थित राहण्याचा होकार दिला व प्रत्यक्ष 27 डिसेंबरला सकाळी 8:30 वाजता केंद्रीय प्राथमिक शाळा जलधारा येथे ते उपस्थित झाले.

गटशिक्षणाधिकारी मा.गंगाधरजी राठोड ,विस्तार अधिकारी मा.संजयजी कराड ,केंद्रप्रमुख मा. अशोक हामदे केंद्र मुख्याध्यापक मा.किशोर कावळे यांच्या समवेत सर्व शिक्षक बंधू-भगिनी ठीक नऊ वाजता जलधारा येथून वाघदरीस निघाले आणि आमच्या एका उत्साहवर्धक, अविस्मरणीय अशा प्रवासास आरंभ झाला.
सर्वांच मन बालमनात रमत होतं. किराणा दुकानावरूनही वस्तू खरेदी करण्यासाठी दुचाकी घेऊन जाणारे आम्ही बंधू- भगीनी वाघदरीस चक्क पैदल मार्च ने निघालो होतो. प्रत्येक जण हसत-खेळत ,बोलत लहान मुलाप्रमाणे चालत होते. सोबतीला जलधारा शाळेतील दुसरी ते सातवीची मुले पण हट्ट धरून आली होती.जलधारा गावाच्या बाहेर आल्यानंतर वाघदरीच्या रस्त्याने जात असताना आमच्या सर्वांच्या मनात विचाराचं काहूर माजलं होतं. गुळगुळीत रस्त्यावरून न चालणारी पावलेही आता डोंगरदर्‍यातील घाटमाथ्यावर चालणार होती. सर्वजण स्वतः चालत चालत इतरांकडेही लक्ष देत होता हळूच चला, सावकाश चढा, पावले आरामाने टाका अशा सूचना देत देत घाट चढत होती. आपसूकच प्रत्येकाच्या मनात सामाजिक भावना जागृत झाली होती. सहलीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी लागते म्हणून आम्हीही सोबतीला आलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊ लागलो पण अनुभव विपरीतच आला कारण सोबतीला आलेली मुलेच आमची सर्वांची काळजी घेऊन डोंगरमाथ्याची नागमोडी वळणाची , घाटदरीतील वाट झपाझप चालून जणू आम्हाला हरवतच होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.आम्हा सर्वांच्या चालण्याच्या गतीवरून आपोआपच आमचे वेगवेगळे गट तयार झाले जसे की,जलद चालणारे; मध्यम गतीने चालणारे व संथ गतीने चालणारे. प्रत्येकाच्या मनात एका वेगळ्याच ऊर्जेने थैमान घातले होते. पुस्तकातील निसर्ग वर्णनमय पाठामध्ये रमणारी मंडळी जणूकाही प्रत्यक्षपणे पाठात अवतरली होती. वाघदरीकडे आगेकूच करताना दोन घाट चढाईनंतर आम्हा सर्वांचा पैदलमार्च मार्गातील पहिला टप्पा मांजरी माथा येथे पोहोचला. मांजरी माथा येथील मुख्याध्यापक शिंदे सर व सहकारी दामले सर यांनी सर्वांना शाळा भेटीची विनंती केली.

मान्यवरांसह सर्व शिक्षक बंधू भगिनींचा त्यांनी यथोचित असे स्वागत व सत्कार केला. गटशिक्षणाधिकारी मा.गंगाधरजी राठोड साहेब व विस्तार अधिकारी मा. संजयजी कराड साहेब यांनी तेथील विद्यार्थ्यांशी हितगुज केली व शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त करून दोन्ही शिक्षकांच्या कामाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. मार्गक्रमनाच्या या टप्प्यात सर्वांना अल्प विश्रांतीची व चहा पाण्याची नितांत गरज होती ,जी मांजरी माथा शाळेतर्फे पूर्ण करण्यात आली. अल्प विश्रांतीनंतर सर्वांचा पुढील प्रवास सुरू झाला जो की, खरोखरच खडतर होता. खडतर शब्द अध्यापनात शिकवणारे सर्व गुरुजन प्रत्यक्ष हा शब्द किती खडतर आहे हे अनुभवत होती.

इयत्ता आठवीतील पद्मश्री गोदावरी परुळेकर लिखित ‘पाड्यावरचा चहा’ हा पाठ शिकवत असताना आम्हालाही तो पाठ म्हणजे एक काल्पनिक कथाच आहे असे वाटत होते परंतु आज वाघदरीच्या मार्गाने मार्गस्थ होत असताना तो पाठ जणू काही आमच्यासमोर येऊन आम्हालाच चिडवत होता.असा हा जंगलातील निर्मनुष्य रस्ता आम्ही मार्गक्रमण करत होतो. माथ्यावरचा रस्ता संपल्यानंतर आम्हाला घाट उतरून डोंगराच्या दरीत, नव्हे तर दरीच्या कुशीत म्हणजेच वाघदरीला पोहोचायचे होते. डोंगर दऱ्या पाहून आम्हाला अनुताई वाघ यांचे ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे पुस्तक न आठवले तर नवलच म्हणावे लागेल.आम्हाला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातील वर्णनाचा, प्रसंगांचा, घटनांचा जणू काही साक्षात्कारच होत होता.जंगल पार करून वाघदारीच्या शिवारात प्रवेशित झाल्यानंतर आम्हाला रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या प्रत्येक शेतामध्ये असणारे झोपडी वजा घर ‘पाड्यावरचा चहा’ मधील आदिवासी वस्तीचे स्मरण करून देत होते.

वाटेने बोटावर मोजण्याइतपत भेटलेली गावकरी मंडळी आमचे प्रेमाने स्वागत करीत होती.आस्थेवाईकपणे चौकशी करत होते.जणूकाही एखाद्या नातेवाईकाप्रमाणे.आम्हा सर्वांना त्यांच्या गावात पाहून त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मांजरी माथा येथील अल्प विश्रांतीसह तब्बल दोन ते अडीच तासाच्या पैदल मार्चनंतर आम्ही सुमारे 12.30 वाजता शिक्षण परिषद स्थळी म्हणजेच वाघदरी येथे दाखल झालो. मुख्याध्यापक मौला सर, स.शि.सिद्धेश्वरे सर ,गावचे पाटील व गावकऱ्यांनी आम्हा सर्वांचे स्वागत केले.आम्ही सर्वजण भारावून गेलो.कारण सिमेंटच्या जंगलातील माणुसकी व वास्तव जंगलातील माणुसकी यामध्ये जमीनअस्मानी फरक होता. आमचा दोन तासाचा पायी प्रवास आता थांबला होता निसर्गराजांनीही जणू काही आमच्यावर कृपाच केली होती कारण सकाळपासूनच आग ओकणारा सूर्य रजेवर होता व मध्ये मध्ये पावसांच्या सरींची झुळूक येत होती त्यामुळे वातावरण आल्हाददायक,उत्साहवर्धक असेच जाणवत होते.परिणामस्वरूप आम्हा सर्वांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. स्वागतानंतर यजमानाने आम्हा सर्वांच्या रुचकर व स्वादिष्ट अशा भोजनाची लागलीच व्यवस्था केली.पंचतारांकित हॉटेल मधील भोजनाच्या स्वादालाही लाजवेल असा स्वाद वाघदरी येथील भोजनामध्ये आम्ही सर्वांनी अनुभवला.तत्पश्चात प्रत्यक्ष शिक्षण परिषदेला प्रारंभ झाला.मान्यवरांना मंचावर आसनस्थ करून कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली व नंतर मान्यवरासह उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींचे स्वागत वाघदरीवासियातर्फे करण्यात आले. शिक्षण परिषदेच्या प्रारंभी भारताचे माजी प्रधानमंत्री आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ.मनमोहनसिंहजी यांना मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अतिदुर्गम अशा शाळेतील चिमुकल्यांचे नृत्य जेव्हा आम्हा सर्वांच्या समोर सादर करण्यात आले तेव्हा खरोखरच त्या मुलांची जिद्द, चिकाटी, धाडसी वृत्ती, आत्मविश्वास आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरला.केंद्रप्रमुख श्री.अशोक हामदे सरांच्या प्रस्तविकानंतर शिक्षण परिषदेचे सुलभक श्री धुमाळ सर,श्री गुळवे सर,श्री आगरकर सर यांनी आपापल्या विषयाची मांडणी कमी वेळात व स्पष्ट शब्दात केली. सूत्रसंचालन करत असतानाच श्री मौला सर यांनी शैक्षणिक चळवळीतील विविध विषयांना हात घालत शिक्षकामध्ये सुसंवाद घडवला.

 

 

शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड साहेब यांनी सर्व शिक्षकांना प्रेरक असे उदाहरणे देऊन प्रत्येक शाळेचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावता येईल या संदर्भात आम्हा सर्व शिक्षक बंधू-भगिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. समारोपीय भाषणात शिक्षण परिषदेचे मुख्य आकर्षण आपल्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा गंगाधरजी राठोड साहेब यांनी प्रथमत: अतिदुर्गम अशा अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या मांजरी माथा व वाघदरी येथील शिक्षक बंधूंचे विशेष असे कौतुक केले. प्रतिकूल परिस्थितीमध्येही ही शिक्षक मंडळी आपली शैक्षणिक चळवळीतील सेवा चोखपणे बजावत आहेत याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. साहेबांनी वाघदरी येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी *कु.आराध्या गायकवाड* या चिमुकलीचा शिक्षणासाठी असलेला संघर्षमय दिनक्रम सर्वांसमोर मांडला त्या क्षणी अक्षरशः सर्वांच्या अंगावर काटे आले.*कु.आराध्या ही शिक्षण घेण्यासाठी सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरून डोंगर दरीचा रस्ता पार करत हिंस्त्र श्र्वापदांची कोणतीही भीती मनात न बाळगता निडरपणे शाळेपर्यंत चालत येते*, जे की जपान मधील एकट्या मुलीसाठी असणाऱ्या रेल्वेने जाणाऱ्या त्या मुलीलाही लाजवते. ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आहे.
मंजिले उन्ही को मिलती है.
जिनके सपनो मे जान होती है ..
पंखो से कुछ नही होता .
हौसलो से उडान होती है……
*धन्य ती आराध्या….* *हॅट्स ऑफ यू बेटा….*
अध्यक्षीय समारोपानंतर आम्हा सर्वांचा परतीचा प्रवास सुरू झाला. सर्वजण हसत,खेळत ,बागडत अगदी लहान मुलाप्रमाणे परत येण्याच्या ओढीने झपाझप पावले टाकत निघालो होतो,परंतु सर्वांच्या मनात विचारांचे वादळ थैमान घालत होते. अति दुर्गम अशा भागात राहणारे हे गावकरी मंडळी आम्हा सर्वांना भेटताच जसे काही आम्ही परिचयाचे आहोत असे समजूनच आमच्याशी बोलत होती ,चौकशी करत होती आणि आम्ही अजून आनंदी होत होतो. पण परत येताना आम्हा सर्वांना आमच्या अंतर्मनात जाऊन विचार करण्यास त्यांनी भाग पाडले .आम्ही सर्वजण एवढ्या सोयी सुविधा उपलब्ध असतानाही आपल्या जीवनामध्ये काहीतरी उणीवच आहे हे रडगाणे उराशी बाळगून जगत असतो पण या डोंगरातील, जंगलातील अतिदुर्गम भागातील लोकांच्या चेहऱ्यावरचा संतोष, समाधान,आनंद व त्यांचं राहणीमान पाहून आम्हालाच आमच्याच स्वतः विषयी अस्वस्थ वाटत होतं.
*ना भूतो न भविष्यती* अशा या शिक्षण परिषदेच्या स्मृतींचा आमच्या सर्वांच्या मनात एक आठवण कप्पा आम्ही सेव्ह करून ठेवलेला होता. प्रेरणादायी विचारांची शिदोरी घेऊन आम्ही सर्वजण आमच्या घरट्यांकडे परत निघालो होतो तो हाच विचार घेऊन की आम्हीही आमच्या शाळेतील असंख्य *आराध्यांना* न्याय देऊ शिक्षण क्रांती घडवू……

 

 

✍🏻 शब्दांकन: श्री विजयकुमार नारायणराव काळे
जि.प.प्रा.शा.नंदगावतांडा
केंद्र -जलधरा ता.किनवट
-९७६७७७३३४९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *