स्वतःचा स्वतःलाच एक प्रश्न होता कि,” प्रेम “नावाची इतकी सुंदर गोष्ट किंवा भावना बनवली आहे, तरी माणूस दुःखी का..? “खूप विचार केला, खूप शोधण्याचा प्रयत्न केला कि याच उत्तर काय असेल..?
माणूस जन्माला आल्यापासूनच त्याची शोध मोहीम सुरु होते. जन्म घेतल्यानंतर नवजात बालक आपल्या आईला शोधत असत, तिच्यात प्रेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो. तोच व्यक्ती थोडा मोठा होतो, चांगल्या मित्रांना शोधू लागतो, त्यांच्यामध्ये प्रेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आणखीन थोडा मोठा होतो तोच “प्रेयसी ” किंवा ” प्रियकर ” म्हणजेच तुमच्या आमच्या भाषेत ” गर्लफ्रेंड ” आणि “बॉयफ्रेंड ” मध्ये आपल्याला हवं असलेल प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि हीच ती वेळ जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला नवे वळण मिळणार असते.
खर तर ” प्रेम” या गोष्टीचा शोध त्याने इथे येऊन थांबवायला हवा पण तो अस करत नाही.
आपल्या जोडीदारासमोर आपण काहीतरी मोठ्याच अपेक्षांचा डोंगर उभा करतो, कारण त्यावेळी आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःच्या मनाची काळजी असते, तुम्ही कितीही नाकारलत तरीही हि गोष्ट खरी आहे. आपल्या जोडीदाराच वागण आपल्याला नाही पटलं तर आपण त्याच्याशी भांडतो, त्याने आपल्या मनासारखं वागावं हि इच्छा त्याच्यावर लादत असतो, लादणे हा शब्द मी अचूक वापरला आहे. कारण आपल्या जवळ असलेल्या अमुल्य गोष्टीला आपण त्यात मनासारखा बदल घडवून प्रेम करू इच्छित असतो.
प्रत्येक वेळी मनातलं दुःख तुमचा जोडीदार तुम्हाला शब्दानेच सांगेल असं नाही , काही तुम्हीही तुमच्या मानाने समजून घ्यायला हवं, पण काय करणार आपल्याला आपल्या मनातल्या अपेक्षांतून वेळ कुठे मिळतोय… दुसर मन जाणून घ्यायला. असो ….तुम्हाला सांगते तुमचा जोडीदार तो कसा हि असो पण त्याची एक खूप मोठी अपेक्षा असते तुमच्या कडून आणि ती असायला हि हवी.
” संपूर्ण दुनिया एकीकडे माझ्या विरोधात असेल तरी चालेल, पण त्यावेळी माझा जोडीदार माझ्या मतांसोबत आणि माझ्या विचारांना समजून माझ्या बाजूने ठाम उभा असावा ” त्यावेळी पूर्ण दुनियेशी सामना करण्याची ताकद त्याच्यात फक्त तुम्ही त्याच्या सोबत असल्याने येते, आणि हि ताकद खरंच मोठ्यात मोठ्या संकटाला हरवू शकते.
माणसाचा ” प्रेम ” या गोष्टीचा शोध खरच व्यर्थ आहे, कारण ते त्याच्या मनातच आहे, जसा जंगलात कस्तुरीचा सुगंध शोधत भटकणारा हरीण, त्याला तर कधीच नाही कळल कि हि कस्तुरी त्याच्याच शरीरात आहे, तो जिथेही जाणार त्याला तिचा सुगंध येतच राहणार.
मग हा मनुष्य शोध कसला घेतोय…?
” स्वतःच्या मनाच्या सुखाचा ” जो की मरेपर्यंत पूर्ण नाही होत आणि तो असाच शोध घेत राहणार आहे. पण हा शोध कधीच संपणार नाही किंवा पुर्ण होणार नाही.
हा शोध घेणारा व्यक्ती पुढे आणखीन काही वर्षांनी त्या आपल्या जोडीदारामध्ये आयुष्य भर मनासारखा साथ देणारी व्यक्ती शोधू लागतो. पुढे त्याच पती किंवा पत्नी मध्ये तो मनासारखं प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो. आणखीन काही वर्षांनी थरथरत्या हाताला शेवटच्या पावला पर्यंत गच्च हात देणारी व्यक्ती तो आपल्या जोडीदारामध्ये शोधू लागतो. शेवटी तो दिवस येतो जेव्हा याच व्यक्तीला आपली शोध मोहीम थांबवून या जगाचा निरोप घ्यायचा असतो. तुम्हाला काय वाटत याची शोध मोहीम संपली…..?
नाही , जगातून निरोप घेतल्यानंतर फक्त आपल्या मनातलं प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी त्याचे जिवलग त्याचा १२ X १० चा हार घातलेल्या फोटो टांगण्यासाठी घराच्या भिंतीवर जागा शोधू लागतात.
आता तुम्हीच ठरावा जर तुमच्या आमच्या आयुष्याचा प्रवास असा आहे तर, ज्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी आयुष्य घालवलं ते प्रेम होत कुठे…
रूचिरा बेटकर नांदेड
9970774211