शिवास्त्र : बोलण्याची शक्ती


माझे वडील – मा. न्या. भि. तु. नरवाडे पाटील साहेब यांच्या तोंडी एक वाक्य मी लहाणपणापासुन ऐकतोय की, “इन्सान के जिस्म का सबसे प्यारा हिस्सा ‘दिल’ है और अगर ‘दिल’ ही ‘साफ’ न हो तो हँसता चमकता चेहरा किस काम का.?” बोलण्याची शक्ती हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्याबद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत. हे इतके महत्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही. “आहे हे असं आहे, माझा आवाजच मोठा आहे, मला अशीच सवय आहे” असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो. बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर.#IPL20 शब्दोच्चार, आवाजाचा चढ – उतार शिकायचं असेल, तर बोलणं अभ्यासायलाच हवं आवाजाची, बोलण्याची साधना व तपस्या म्हणजेच वाक्चातुर्य.! काही शब्दांवर एखाद्याची पकड अशी मजबूत असते की हे शब्द त्याच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही हे हळूहळू उमजत जातं. शब्द जगलेला माणूस होता यायला पाहिजे.! आपण शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो त्यावरून आपला खरेपणा लोकं ओळखत असतात. बोलण्याचा आवाज हा आतून येतो, माणसाच्या चेतनेला, अंतर्मनाला स्पर्शुन.! त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची अभिव्यक्ती आपलं बोलणं असतं.     
शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं.! सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात. वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात. नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचे ठरते. कानात प्राण आणून ज्यांचं बोलणं ऐकावं अशी माणसं या जगात आहेत.! फक्त शोधता – ऐकता आली पाहिजेत. बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये.?  #IPL2020  
फोनवर, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होईल. आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो. बोलणं म्हणजे निव्वळ शब्द थोडीच असतात.? न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं. वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसांमाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते. मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात, पण त्याआधी कसं बोलायचं, ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं. बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड वाटतो पण शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो. तात्पर्य काय तर ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस अशक्य गोष्टी शक्य होतात. बोलण्या-लिहिण्यात ‘दम’ येण्यासाठी ह्रदय, नियत, वृत्ती, आचरण ‘शुध्द’ असावेच लागते. चोर, लबाड, गद्दार, बेईमान व्यक्तीने ‘दमदार’ बोलण्याचा नैतिक अधिकार गमावलेला असतो. इमानदारीचे ढोंग रचणारा बेईमान जगाच्या नजरेतून कायमचा पडलेलाच असतो तरीही निर्लज्जपणे उजळ माथ्याने वावरण्याचा चिल्लर बालिशपणा काहीजण का करत असावेत.? हे कोडे अनाकलनीय.! आयुष्यात काही प्रश्न सोडून दिल्यानेच सुटतात. सबका मंगल हो.!   

 
इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील (नांदेड)     मास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट (MC – JNLI) नवी दिल्ली     राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (NP – VBVP)     [email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *