मानवनिर्मिती झाल्यापासून किंवा जगात संजीव निर्माण झाल्यापासूनच खाद्यपदार्थाची निर्मिती झालेली आहे.प्राचीन खाद्य संस्कृती व अधुनिक खाद्य संस्कृतीमध्ये निश्चितच फरक पडलेला आहे.या सृष्टिलाच चराचर सृष्टी म्हटले जाते.थोडक्यात संजीव व निर्जीव या सृष्टीवर आहेत.सजीव हे चरणारे खाणारे पिणारे व फिरणारे,वाढणारे होते व आहेत.तर निर्जीव हे अचर आहेत.मानव प्राणी सर्व प्राण्यात बुद्धीमान,हुशार,चालाख समजला जातो व तो आहेच.इतर प्राणी व मानाव प्राण्यात एक महत्त्वच फरक आहे ते म्हणजे मानवाचे डोके त्याच्या पोटाच्यावर आहे.तर इतर प्राण्याचे डोके त्याचा पोटाच्या जवळपास सरळ रेषेत उंची आहे. त्यामुळे प्राणी कदाचीत पोट भरण्यापूरताच विचार करत असतील;पण मानव मात्र पोट भरण्याचं तर विचार करतोच पण त्याच्या पुढे जावून तो विचार करत असल्यामुळे त्याच्या अन्न घेण्यातही विविधता आली.
अन्न शोधण्याच्या साखळीत मानवाने अनेक शोध लावले.त्या अन्नाची उपयुक्तता शरीरासाठी किती आहे हे शोधून काढले.हुशार बुद्धीमान व्यक्तीने त्याचा प्रचार व प्रसार समाजात करत राहीले.खावो पियो और मजा करो असे सिद्धांत मांडणारा चार्वाक आपल्याच देशात होवून गेला. काय खावे ? का खावे? ते शरीराला व आरोग्याला योग्य आहे का? याचा विचार करूनच भारतीय लोक अन्न सेवन करत आलेले आहेत. शरीराला पचनारे पोषक तत्व असलेलेच अन्न आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जतण करून ठेवलेले आहे.काळ बदलत गेला.अन्न पद्धती बदलत गेली.निरक्षराचं रुपांतर साक्षरात होत गेलं.
अधुनिकतेचा नावाखाली नवीन पिढी अधुनिक बणल्याचं आव आणत शरीराला पोषक असलेले खाद्यपदार्थ खायाचे सोडून पाश्चिमात्यचं अंधाणुकरण करत आहेत.
भारतीय विशेष करून शहरी लोक, शहरी बाबू भारतीय अन्न घेण्यापेक्षा फास्ट फूड खाण्यावर भर देत आहे.यामुळे भारतात अनेक जुन्या रोगाबरोबर अधुनिक रोगही जन्मास येत आहेत.चाळीस पन्नास वर्षापूर्वी बहुतेक भारतीय मग तो शहरी असो की ग्रामीण असो भरडधान्याचा उपयोग अन्नासाठी करावयाचा. भरडधान्यापासून विधिव खाद्यपदार्थ बनवले जायचे जे आरोग्यास उपयुक्त होते पण, आजकाल भरडधान्य कशास म्हणतात ?त्याचा उपयोग काय ?ते का खावे?याचं ज्ञान चालू पिढीला नाही.म्हणून भारत शासनाने २०२४-२५ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून साजरा करत आहेत.
भरडधान्य म्हणजे काय ?
भरडधान्य यास तृनधान्य ही म्हणतात. ही पीके कमी पाण्यावर येतात.दुष्काळी भागात तग धरून राहणारी ही पीके आहेत.अल्पभूधारक शेतकरी,गरीब शेतकरी यांच्यासाठी हेच मौल्यवान पीके आहेत.यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी व जणावरांच्या वैरणासाठी हे उपयुक्त आहेत.हे पीक निसर्गाच्या सानिध्यात व कमी पाण्यावर येते. ज्वारी पिवळी,पांढरी,डूकरी,मल्ल्या,कुचकुची आशा अनेक प्रकारच्या व बाजरी या मोठया भरडधान्यात मोडतात.ज्वारी बाजरी व नाचनी यांची रास खळ्यात मळणी लावून करत होते. तर राळा,भगर,रागी,भादली,वरी इत्यादी हे छोटया भरड धान्यात मोडतात.यांची रास खळयात मळणी लावून करत नाहीत.
छोटया तृणधान्याचे अन्न तयार करताना त्यावरील कवच किंवा आवरण हे टणक असते त्यांना जात्याने भरडावे लागते किंवा खलबत्यात घालून उखळाने कांडावे लागते म्हणून यांना भरडधान्य म्हणतात.काळाच्या ओघात ही पीके शिवारातून काही हद्दपार झालेली. आहेत.काहीहद्दपार होण्याच्या वाटेवर आहेत. यामुळेच यांच्यापासून तयार होणारी खाद्यपदार्थही स्वयंपाक गृहातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत.या धान्यापासून आरोग्यास पोषक , पचण्यास सोपे.सर्व गटातीत व्यक्तीस खाण्यास योग्य असे पदार्थ बनवले जायचे ;पण हे पदार्थ ही आता फारशे कोणी करत नाही.
चाळीस पन्नास वर्षापूर्वी स्वयंपाक गृहात रटरट आवाज करत शिजणारा कन्या असो की भादली,राळ्याचा भात असो की वेगवेगळे भरडधान्य वापरुन शिजवलेल्या चवदार घुगऱ्या असोत आज हे पदार्थ आहारातून बाद झालेले दिसतात.किंवा लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत.खळ्यावर होणारी अंबील पार्टी केव्हाच हदपारझालेलीआहे.भरडा,शिंगोळे,मांडे,डाळ- फळे,लापशी,लापडे (हातावर तयार केलेली चपाती) आत दिसत नाहीत.आजच्या अधुनिक आहार तज्ज्ञाच्या मते ही लुप्त झालेली किंवा लुप्त होत चाललेल्या अन्नपदार्थाचे जर आपण सेवन केले तर आपलं आरोग्य चांगलं राहिल.निरोगी आरोग्यासाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खाणे योग्य आहे.फक्त मीठ,साखर यांचा वापर कमी करावा.
महाराष्ट्रात लुप्त होत चालली खाद्यपदार्थ
कन्या/कण्या : आहारतज्ज्ञाच्या मते आपण जर आपल्या आहारात कन्या सेवन केलो तर आपणास त्यातून कॅलीशियम,फॉस्फरस, मॅगनीज ही पोषक तत्वे मिळतात.यामुळे आपल्या शरीरातील हाडांना मजबूती प्राप्त होते.शरीराला समतोल कॅलरीज मिळतात.कन्या सेवन केल्यामुळे मानसाचा उत्साह वाढतो.शरीराला गारवा मिळतो.शरीरातील गर्मी/उष्णता कमी होते. कन्या खाल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे राहते.भूक कमी लागते.यामुळे लठ्ठ माणसाचे वजण घटण्यास मदत होते.पचनक्रिया सुधारते. आजारी माणसाठी कन्या उपयुक्त आहे. बाजरीपासून खिचडा तयार करतात हेही लुप्त झालेले आहे .
धिरडे : धिरडे यासाठी समानार्थी शब्द अंबोळी वापरला जाते.साधरणपणे ज्वारी पीढ,बाजरी पीठ,कांदे,मिरची,मीठ मिश्रण करून त्यास पाण्यात घालून त्याला चांगल घोळून घोळून तव्यावर पोळीसारखा तयार केलेला साच्छिद्र खाद्यपदार्थ म्हणजे धिरडे होय.वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.वजन वाढू नये म्हणून गव्हाचं पीठ शक्यतो वापरु नये.
शेंगोळे : शेंगोळे सेवन केल्याने थंडीत ताकद वाढते.हा पदार्थ पचायला हलके असतो.आरोग्यास हे लाभदायक आहे.
मांडे : मांडे हे खाद्यपदार्थ महाराष्ट्रीयन आहे.मांडे हा एक गोडसर पदार्थ आहे. मुक्ताबाईनी ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीवर मांडे भाजले होते आशी अख्यायिका आहे. गव्हाचं पीठ,पुरण,गुळ वापरून हा पदार्थ बनवतात.मांडे खापरावर शेकतात.मांडे दुध,तूप यासोबत खातात.
गव्हाची लापशी : लापशी म्हणजे आताच्या शिऱ्याचं जुनं रूप.जुन्याच नवीन रुप म्हणजे शिरा खाद्यपदार्थ म्हाणता येईल.हा पदार्थ ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.अतिशय चवदार असलेला हा पदार्थ अमुल्यच म्हणावं लागेल.मऊसूद लापशीची चवच न्यारी आहे.लापशी पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.याच्या सेवनाने बध्दकोष्टता टळते.सकाळी सकाळी लापशी खा पोटाचा त्रास होणार नाही.लापशीचे सेवन केल्याने मेंदू सक्रीय होतो.शरीरातील नवीन पेशीची निर्मिती होते.चरबी कमी होते.हृदयाला उर्जा मिळते.
लापडे ( हातावरची पोळी/चपाती ) : लापडे हा पदार्थ बंजारा समाजात रुढ आहे. गव्हाच्या पीठाची पोळीपाट लाटणं न वापरता पोळी/ चपाती बनवली जाते.ही पोळी येवढी पातळ असते की त्या पोळीतून पालिकडे पहाता येते.हा पदार्थ ही आता लुप्त झालेला आहे किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
याबरोबरच राळ्याच भात,भादलीचं भात भगर बाजरी,ज्वारी,आंबाडी हे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
थोडक्यात सांगावयाचे म्हणजे वर चर्चिलेल्या खाद्यपदार्थ हे शरीराच्या,मनाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.हाडाच्या वाढीसाठी,मजबुतीसाठी,वजन कमी करण्यासाठी या पदार्थाचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.मधुमेहासाठी,मधुमेहावर नियंत्रन ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.शरीरातील स्नायू बळकट होतात.शरीरातील पेशींना इजा होवू देत नाहीत.अधुनिक पिढीला हे समजावून सांगितले पाहिजे.यासाठी शाळा कॉलेजमधील शिक्षक, समाजसेवक,राजकारणी,डॉक्टर्स,नर्स, अंगणवाडी कर्मचारी,आरोग्य सेविका यांनी कामाला लागले पाहिजेत.
सध्या आनंदाची बाब येवढीच आहे की अधुनिक पिढीत आरोग्य व आहार यात थोडीफार का होईना जागृतता दिसून येत आहे. भरडधान्याचे लुप्त होत असलेले पदार्थ ताटात दिसून येत आहेत.सर्व समाज जर जागरुक झालं तर समाजात दिसणारे रोग जसे की,स्थूलपणा, लठ्ठपणा,उच्च रक्तदाब,हृदयविकार,प्रतिकारशक्ती कमी करणारे आजार,पोटाचे विकार व कर्करोग या सारखे जीवघेणे आजार घरात प्रवेशच करणार नाहीत.
भारतातील पारंपारिक भरडधान्याच्या वापराव्दारे या समस्येवर उपाय शोधता येतील.राठोड मोतीराम रुपसिंग
”गोमती सावली “, काळेश्वरनग,
विष्णुपूरी , नांदेड -६
९९२२६५२४०७

