नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पानभोसी या छोट्याशा गावात दररोज हिरव्या स्वप्नांची लागवड करणारा एक हरित सैनिक आज संपूर्ण महाराष्ट्राचा प्रेरणास्थान बनला आहे. हा हरित सैनिक म्हणजेच वनरक्षक शिवसांब बाबुराव घोडके होय. ते पानभोसीचे वृक्षपुरुष म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र वनविभागातील राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेते आणि ‘दररोज एक रोप’या अद्वितीय चळवळीचे ते प्रणेते आहेत.
२७ ऑक्टोबर २०२१ हा दिवस घोडके यांच्या आयुष्यातील आणि पर्यावरणाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरला. स्वतःच्या वाढदिवशी केक न कापता, फटाके न फोडता त्यांनी एका वटवृक्षाचं रोप लावलं आणि मनाशी एक ठाम संकल्प केला. दररोज एक रोप लावायचंच. तेही अखंडपणे. या एका छोट्या कृतीतून जन्म झाला‘दररोज एक रोप’ या चळवळीचा जी आता हरित भारताचं प्रतीक बनली आहे. घोडके यांनी १४०० दिवस अखंडपणे, म्हणजेच एकही दिवस न चुकवता, दररोज एक नवीन रोप लावलं आहे. आजपर्यंत त्यांनी २३,००० पेक्षा अधिक झाडं लावून त्यांचं संगोपन केलं आहे. ही झाडं केवळ आकडेवारी नाहीत, तर त्यांच्या आयुष्याचं सार आहे. प्रत्येक झाडाचं नाव, स्थान, आणि काळजी घेणारा‘सेवक’ ठरवलेला आहे. या चळवळीमुळे पानभोसी गाव आणि परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ आज हिरवाईने नटलेली आहे. जिथे पूर्वी खडकाळ माळरान होतं, तिथे आता वाऱ्याबरोबर फुलांचा सुगंध वाहतो, पक्ष्यांचा कलरव ऐकू येतो.
प्रारंभी घोडके यांनी ही चळवळ एकट्याने सुरू केली. लोकांना वाटलं की, ही जोशाची गोष्ट काही दिवसांचीच. परंतु त्यांच्या चिकाटीने, सातत्याने आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे ही चळवळ गावोगावी पोहोचली. त्यांनी निसर्ग सेवा गट पानभोसी स्थापन केला आणि आज महाराष्ट्रातील अनेक पर्यावरणप्रेमी या गटाशी जोडले गेले आहेत. गावात लग्न असो, वाढदिवस असो, किंवा कोणतंही शुभकार्य प्रत्येक प्रसंग झाडाशी जोडला गेला आहे. आज पानभोसीत वधू-वरांच्या हस्ते झाड लावणं, वाढदिवसाला रोप लावणं, स्मृतिदिनी वृक्षारोपण हे एक संस्कार बनले आहेत. घोडके यांच्या माळावर आणि आसपासच्या परिसरात आज ३५० पेक्षा अधिक देशी व औषधी वनस्पतींच्या प्रजाती फुलल्या आहेत. त्यात वड, पिंपळ, आंबा, बोर, चिंच, जांभूळ, कवठ, आपटा, भोकर, चारोळी, टेटु, बिब्बा अशा अनेक स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरच ६,००० झाडं, पोलीस स्थानक माळाकोळी येथे ४,५०० झाडं, तर अहमदपूरच्या आश्रमातही मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धन होत आहे. ही सर्व ठिकाणं आता निसर्गाचे हरित संग्रहालय बनली आहेत.
दररोज झाडं लावणं एवढंच नाही, तर ती जगवणं हेच खरं आव्हान आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई, जनावरांकडून झाडांची हानी, काही ठिकाणी विरोध या सर्व समस्यांवर घोडके यांनी संयम आणि शिस्त यांचा आधार घेतला. ते स्वतः सांगतात, पहिल्या काही महिन्यांत १५० झाडं उकडून फेकली गेली. पण दुसऱ्याच दिवशी मी तितकीच नवी झाडं लावली. माझं वचन पवित्र होतं. एकही दिवस रोपाविना जाणार नाही. गावकऱ्यांच्या मदतीने बोरवेल आणि ठिबक प्रणाली बसवून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आज त्या माळावर वाळवंट नव्हे, तर हरित ओअॅसिस फुलली आहे. घोडके यांना वाटतं की, केवळ झाडं लावणं पुरेसं नाही, तर लोकांना त्यांचं वैज्ञानिक महत्त्व समजावणं आवश्यक आहे. यासाठी त्यांनी सिद्धेश्वर माळावर निसर्ग अभ्यासिका व निसर्ग ग्रंथालय सुरू केलं. इथं पर्यावरण, औषधी वनस्पती, शेती आणि जैवविविधतेवरील शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. अभ्यासिकेचा अनोखा नियम आहे. ‘झाड लावा आणि पुस्तक वाचा!’ ज्ञान आणि निसर्ग, दोन्हींचं संगोपन हेच त्यांचं ध्येय आहे.
घोडके यांच्या पर्यावरण कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली आहे. त्यांना २०१४ आणि २०१८-१९ या दोन्ही वर्षांत महाराष्ट्र शासनाचं राज्यस्तरीय सुवर्णपदक मिळालं, तेही मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते. तसेच‘राष्ट्रनिर्माता पुरस्कार’, ग्रामपंचायत पानभोसीकडून‘Tree Man of Panbhosi’ असा सन्मान आणि विविध संस्था, संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या संपूर्ण चळवळीत घोडके यांच्या कुटुंबाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून साथ दिली आहे. आई, पत्नी, भाऊ आणि नातेवाईक सर्वजण झाडांना पाणी घालणं, रोपं तयार करणं आणि जनजागृती करणं यात सहभागी झाले आहेत. ‘दररोज एक रोप’ ही आता केवळ वैयक्तिक नव्हे, तर कुटुंबीयांची आणि गावकऱ्यांची सामूहिक साधना झाली आहे.
२७ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवसांब घोडके यांच्या वाढदिवसाचं अनोखं स्वरूप दिसणार आहे. निसर्ग सेवा गट पानभोसी यांच्या वतीने १०१ विविध प्रजातींच्या १०१ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमानंतर सिद्धेश्वर महादेव मंदिरावर महाप्रसादाचं आयोजन आहे. कार्यक्रमात निसर्ग सेवक बाबुराव भोसीकर, मनोहर नाईकवाडे, कैलास घोडके, बळवंत भोसीकर, मोतीराम भोसीकर, पंढरीनाथ भोसीकर, शंकर घोडके, संग्राम नरंगले, चंदु भोसीकर, आशोक पाटील, शिवदास नाईकवाडे, मल्लिकार्जुन नाईकवाडे आदींचा सहभाग असणार आहे. श्री.घोडके यांचं पुढचं ध्येय अत्यंत स्पष्ट आहे. पुढील दहा वर्षांत एक लाख झाडं लावणं आणि प्रत्येक गावात दररोज एक रोप चळवळ पोहोचवणं. त्यांची इच्छा आहे की निसर्ग अभ्यासिका एक दिवस पर्यावरण विद्यापीठ बनावी, जिथून भावी पिढीला निसर्गसंवर्धनाचं शिक्षण मिळेल. मोबाईलमध्ये घालवलेली १० मिनिटं जर झाडाला दिलीत, तर आयुष्यभर सावली मिळेल. रोज एक झाड लावा, पृथ्वी वाचेल, श्वास वाचेल, आणि मनात शांतता उमलेल. श्री.शिवसांब घोडके यांचं आयुष्य हेच एक जिवंत उदाहरण आहे. ‘एक व्यक्ती बदल घडवू शकते, जर तिचा संकल्प निसर्गाशी जोडलेला असेल.’

आज सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर उभी असलेली हिरवाई म्हणजे फक्त झाडांचा समूह नाही, ती आहे एक माणसाच्या हरित स्वप्नाची साकार मूर्ती. फावड्याने सुरू झालेली ही वाट आता हजारो लोकांच्या मनात फुलली आहे. श्री. शिवसांब घोडके यांच्या हरित प्रवासाने महाराष्ट्राला एक धडा दिला आहे.
– राजेश्वर कांबळे
स्वच्छतादूत तथा पत्रकार, कंधार
मो.९९७५११९८३२

