व्हेरी गुड मॉर्निंग

सकाळचा गार वारा अंगाला झोम्बला की खूप बरे वाटते. जे सकाळी लवकर उठत नाहीत त्यांना सूर्यवंशी असे म्हटले जाते. पहाटे पहाटे मॉर्निंग वॉक करणे प्रत्येकांसाठी आवश्यक आहे. कारण सकाळची शुद्ध हवा दिवसभरात मिळणे जरा अवघड बनत चालली आहे. शहरात तर आवश्यक आहे. कारण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दूषित वातावरणाचे प्रमाण जरा जास्तच असते.

त्याचसोबत आजकाल बैठे काम वाढल्याने शरीराला कसल्याच प्रकारचा व्यायाम होत नाही. घर ते काम करण्याचे ठिकाणी जाण्यास वाहनांचा वापर होत असल्याने शारीरिक कसरत देखील कमी झाले आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकचे अजून जास्त महत्व वाढले आहे. विशेष करून महिलांना पहाटेची कामे पुष्कळ असतात. अंगण साफ करणे, सडा टाकणे, पाणी भरणे ही कामे सकाळी करावीच लागतात. घराची कळा अंगण सांगते, म्हणून प्रत्येक स्त्रिया सकाळी लवकर उठून हे काम करत असतात. लहान मुले मात्र सकाळी उठण्याचे टाळतात. सकाळच्या झोपेला साखरझोप असे म्हटले जाते. यावेळी त्यांना उठवले तर ते चिडचिड करतात. झोपू दे ना आई असे ते बोलतात. आई मात्र रोजच सकाळी लवकर उठण्याचे महत्व आपल्या प्रवचनातून देत असते. सकाळी उठून अभ्यास केल्यामुळे केलेला अभ्यास दीर्घकाळ स्मरणात राहते, असे म्हटले जाते.

त्यामुळे घरातील वडील मंडळी लहान मुलांना सकाळी लवकर उठण्याचे सांगतात. मात्र ती मुले सकाळी लवकर उठण्यास आळस करतात. जी मुले सकाळी लवकर उठून आपले काम करतात, त्यांना दिवसभर कसल्याही प्रकारचा आळस येत नाही. ग्रामीण भागात सकाळी सकाळी मंदिरावरून भक्तीगीत ऐकू येतात तेव्हा मन प्रसन्न वाटते. कालच्या दिवसाचा थकवा निघून जाऊन सकाळी नव्याने कामाला सुरुवात होते. पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमणामुळे दिवस-रात्र होते आणि एक एक दिवस पुढे सरकत राहतो. प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणारी प्रत्येक पहाट काही ना काही नवीन घेऊन येत असते.

म्हणूनच किती ही संकटे येवो नव्या पहाटची वाट पाहत राहणे आवश्यक आहे. कुणाच्या ही जीवनात उष:काल होता होता काळ रात्र आली असे होऊ नये, प्रत्येकाची मॉर्निंग गुड राहावी, हीच अपेक्षा.

नागोराव सा. येवतीकर
नागोराव सा. येवतीकर
  • नासा येवतीकर, धर्माबाद
    9423625769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *