हिंगोली –
राज्यसभेचे खासदार संसदरत्न राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य आॅनलाईन राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात अकोला येथील कवयित्री कु. जुही वानखडे प्रथम आल्या असून द्वितीय क्रमांक कल्याणचे कवी सुरेश पवार यांच्या कवितेला प्राप्त झाला आहे तर तृतीय पुरस्काराचे मानकरी इचलकरंजी कोल्हापूर येथून सहभागी झालेले अशोक पोवार हे ठरले आहेत अशी माहिती आॅनलाईन काव्यस्पर्धा-२०२० संयोजन समितीचे अध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तुषार पंडित यांनी दिली.
खा. राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी गुगलमीटद्वारे वाढदिवसानिमित्त ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या विषयावर आॅनलाईन काव्यस्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर कवी-कवयित्रींचा प्रतिसाद लाभला. विजेत्यांकरिता ११ हजाराचे प्रथम पारितोषिक, द्वितीय ७ हजार पाचशे, तर तिसरे पाच हजारांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. उत्तेजनार्थ पारितोषिकांत दिलीप चव्हाण (रत्नागिरी), शितल ढगे (पुसद) आणि राजश्री विभुते (उमरी, नांदेड) यांचा समावेश झाला आहे.
काव्यस्पर्धेसाठी परीक्षक व निवड समिती प्रमुख म्हणून ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे, मुख्य परीक्षक म्हणून कवी बाबुराव पाईकराव, सहाय्यक परीक्षक म्हणून गंगाधर ढवळे यांनी काम पाहिले तर समन्वयक म्हणून राजाराम खराटे, गजानन साळंके, दीपक गैरवार, बंटी नागरे, शैलेश देशमुख, साईनाथ जाधव, बालाजी करडिले, जुबेर मामू, शासन कांबळे, अजय बांगर, ब्रम्हानंद काळे, सचिन पाईकराव, गोविंद कदम, गौरव खांडरे यांनी परिश्रम घेतले. येत्या काही दिवसांतच विजेत्यांना पारितोषिक वितरण होणार असून इतर सहभागी स्पर्धकांना आॅनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र पाठविण्यात येणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.