उपक्रम -स्मृतिगंध (क्र.१७) कविता मनामनातल्या (विजो) विजय जोशी – डोंबिवली**कवी – मधुकर जोशी


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – मधुकर जोशी
कविता – अशीच अमुची आई असती

मधुकर नीलकंठ जोशी (उर्फ मधुकर जोशी).
जन्म – १५/०९/१९३० (अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या नेवासा या ठिकाणी)
मृत्यू – २१/०४/२०२० (डोंबिवली).

प्रसिद्ध कवी आणि गीतकार मधुकर जोशी यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे तर महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले.
त्यानंतर ते कल्याण येथे वास्तव्यास आले आणि तिथून नंतर डोंबिवली येथे.
संसार उपजीविकेसाठी त्यांनी केंद्रसरकारी नोकरी केली.
नोकरी निमित्त रोजच्या रेल्वेप्रवासातच त्यांनी अनेक
कविता आणि गाणी लिहिली आहेत. १९८८ साली ते प्रथमश्रेणी अधिकारी या पदावर सेवा निवृत्त झाले.

सहावीत असताना त्यांनी त्यांची “गांधीवंदना” ही पहिली कविता लिहिली.
काव्यसंग्रह, संगीतिका, धार्मिक काव्ये, चरित्रे, महाकाव्ये, विनोद विडंबनात्मक काव्ये, गझल, नृत्यनाटिका, घटनात्मक काव्ये, भावगीतसंग्रह, स्तोत्रे अनुवाद, महाराष्ट्र गाथा असे विविध विपुल साहित्यिक लेखन त्यांनी केले. श्रीमदभागवतातील श्लोकांचे मराठी काव्यरूप भाषांतराचे त्यांचे कामही सुरू होते.
संत साहित्याबद्दल त्यांना विशेष ओढ होती.
संत साहित्याबद्दल जवळपास २००च्या वरती त्यांचे लेखसाहित्य आहेत.
४००० च्यावरती त्यांनी कविता/गीते लिहिली. त्यातली २५० च्याजवळपास गीते ध्वनिमुद्रीत झाली आहेत.

“मालवल्या नवमंदिरातल्या तारांच्या दीपिका” हे त्यांचे पहिले गीत आकाशवाणीवर ध्वनीमुद्रीत झाले. त्यानंतर त्यांचा साहित्याचा प्रवास अव्याहत सुरूच राहिला. वयाच्या ८८ व्या वर्षांपर्यंत ते सतत लिहीत होते.
कवीवर्य कुसुमाग्रज आणि संत ज्ञानेश्वर यांना त्यांनी गुरूस्थानी मानले होते. त्यामुळे साहजिकच या दोघांच्या साहित्याची छाप मधुकर जोशी यांच्या लिखाणात आपल्याला दिसून येते. गीतकार ग. दि. माडगुळकर यांच्या गीतांमधील रसाळपणाबद्दल मधुकर जोशी यांना विलक्षण प्रेम होते आणि त्यांचे ते चाहते होते.
साधी, सोपी पण अर्थपूर्ण आशयगर्भ शब्दरचना ही मधुकर जोशी यांच्या काव्यरचनेची वैशिष्ट्ये होती.
वसंत प्रभू, विठ्ठल शिंदे, गोविंद पोवळे, राम कदम, अनिल मोहिले, श्रीनिवास खळे, वसंत आजगावकर, दशरथ पुजारी अशा अनेक संगीतकारांनी मधुकर जोशी यांची गाणी संगीतबद्ध केली.
मधुकर जोशी यांनी काव्य/गीत लिहायचं आणि दशरथ पुजारी यांनी ते संगीतबद्ध करायचं असा अलिखित नियमच जणू ठरलेला होता.
सुमन कल्याणपुरकर, माणिक वर्मा, कृष्णा कल्ले, आशा भोसले अशा अनेक मान्यवर गायकांनी आपल्या स्वरातून मधुकर जोशी यांचे शब्द रसिकांपुढे सादर केले.

एक धागा सुखाचा, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी या मराठी चित्रपटांसाठी मधुकर जोशी यांनी गीत लेखन केले.
मधुकर जोशी यांच्या लेखणीतून उतरणाऱ्या सहज सुंदर कवितांची दखल तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी घेतली होती, व्यासपीठावर भरसभेत त्यानी मधुकर जोशी यांना कौतुकाची थाप दिली होती.

जगी ज्यास कोणी नाही…
माती सांगे कुंभाराला…
हले का नंदा घरी पाळणा…
अशीच असती आई अमुची सुंदर रुपवती…
या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार…
रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात…
प्रियाविणा उदास वाटे रात…
आकाश पांघरुनी जग शांत झोपले…
मधुकर जोशी यांची अशी अनेक काव्ये/गीते आजही आपल्या मनामनात जागी आहेत. अजरामर आहेत.

गुरूगीतसंग्रह, गुरूगौरवगाथा, कथा गोड शाहीर गाती रमा माधवाची काव्यसंग्रह अशी त्यांची काव्यविषयक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
तर “मधुशाला” हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावरती आहे.

राज्यनाट्य पुरस्कार, स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृतीगौरव पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठान पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळाले. तरीही अशा महान कवी गीतकाराचे नाव शासन दरबारी नाही याची खंत आपल्या मनाला लागून राहते. याचं महत्वाचं कारण म्हणजे मधुकर जोशी यांनी आयुष्यभर साहित्याच्या सरस्वती त्यांच्या लेखणीद्वारे सेवा केली, परंतू प्रसिद्धी पासून ते नेहमीच दूर राहिले.

१९६६-६७ या वर्षी काव्यरसिक मंडळ, डोंबिवली या सर्वात जुन्या मंडळाचे ते पहिले अध्यक्ष होते.

अशा या महान साहित्यिकाचे (कवी, गीतकार, लेखक) वयाच्या ९० व्या वर्षी २१/०४/२०२० रोजी डोंबिवली येथे निधन झाले.

मी (विजय जोशी) २०१९-२० या वर्षी काव्यरसिक मंडळाचा अध्यक्ष असताना मला मधुकर जोशी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा दोनवेळा योग आला. मी आणि कोषाध्यक्ष श्री.माधव बेहेरे त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी मधुकर जोशी आमच्याशी कविता, गीते, साहित्य, आठवणी याविषयी भरभरून बोलले. कविते विषयीचा त्यांचा ध्यास हा शेवटपर्यंत होता. आणि आयुष्यभर ते कवितेतच जगले.

मधुकर जोशी यांच्या अनेक गाजलेल्या कव्यांपैकी “अशीच अमुची आई असती” या यांच्या प्रसिद्ध गाजलेल्या काव्याचा आनंद आपण घेऊयात. शिवरायांच्या चरित्रातील इतिहासात गौरवित झालेली ही कविता आहे.
स्वराज्य उभारणीसाठी मावळ्यांनी सुरतेचा खजिना लुटला. आणि तो खजिना महाराजांपुढे हजर केला तेव्हा त्यात खजिन्यासोबत सुरतच्या सुभेदाराची सूनही होती. ती लावण्यवती रुपवती स्त्री पाहताच शिवरायांच्या तोंडून जे काही उद्गार निघाले त्याचे वर्णन अनेक कवी शाहिरांनी केले आहे.
तसेच त्या प्रसंगाचे वर्णन मधुकर जोशी यांनीही आपल्या हळुवार मुलायम शब्दांनी त्यांच्या काव्यात चितारले आहे….

अशीच अमुची आई असती

अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्हीहि सुंदर झालो असतो वदले छत्रपती !

शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहक ती
सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती
शब्द ऐकता चकित जाहली हरिणीसम ती रती !

वसंतातले यौवन होते नयनी मादकता
रूप अलौकिक मनमोहक ते कोमल बाहुलता
सौंदर्याची प्रतिमा परि ती प्रभू माता मानिती !

अलंकार ते वस्त्रभूषणे – देउन मानाने
परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने
रायगडाच्या पाषाणांतुन शब्द अजुन येती !

अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्हीहि सुंदर झालो असतो वदले छत्रपती !
◆◆◆◆◆

  • मधुकर जोशी
    ◆◆◆◆◆
    संदर्भ –
    इंटरनेट आणि
    डॉ.अलकनंदा जोशी (मधुकर जोशी यांची कन्या) यांच्या सोबतची चर्चात्मक माहिती.

विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.

Vijay Joshi sir


(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)

सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *