प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत काय?

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा निषेध करत आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीने  १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. या बंदला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शविला होता.‌ परंतु खा. उदयनराजे भोसले आणि खा. संभाजीराजे भोसले यांनी विरोध दर्शविला होता.‌ मराठा आरक्षणावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यावर टीका केली, ‘एक राजा बिनडोक’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी खासदार उदयनराजेंचे नाव न घेता टीका केली, तसेच ज्यांना घटनाच मान्य किंवा माहीत नाही त्यांना भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं? असा सवाल उपस्थित केला, त्यावरुन साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


याबाबत सातारा जिल्हा परिषदचे माजी सदस्य संदीप शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांवर घणाघाती टीका केली आहे. संदीप शिंदे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना एकही आमदार निवडून आणता आला नाही, ज्या महामानवाने या देशाला घटना दिली, त्यांचा नातू म्हणूनही तुमची ओळख निर्माण करता आली नाही, महाराष्ट्रात कुठेही उमेदवारी देताना प्रकाश आंबेडकर सेटलमेंट करतात हा आरोप आहे, आम्ही आरपीआयमध्ये काम करतानाही हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत हेदेखील आम्हाला माहिती नव्हते, ते कार्यकर्त्यांना सन्मानाने जय भीम बोलत नाहीत, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कधीही पुष्पहार घालत नाही, त्यामुळे बाबासाहेबांचे आपण नातू आहात का? असा प्रश्न पडतो अशी टीका त्यांनी एका टीव्ही वाहिनीच्या मुलाखतीत केली. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मराठा समाजाच्या काही संघटना ज्या भूमिका घेतायेत ते मराठा समाजाच्या पायावर दगड मारणारी भूमिका घेतात असं सांगत त्यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा न देणाऱ्या संघटनांवर टीका केली, तसेच एमपीएससी परीक्षा शासनाने म्हटलं म्हणजे होणार, आम्ही होऊ देणार नाही ही भूमिका घेणे योग्य नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून परीक्षा होऊ द्या, आरक्षण घटनेच्या आधारे आहे की नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे, ही कायदेशीर बाब आहे असं सांगत त्यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेला विरोध केला.


तसेच दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं कुठेही वाटलं नाही, एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे परंतु ते आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर भर देतायेत. घटना कळत नसताना भाजपानं (उदयनराजेंना) राज्यसभेवर पाठवलं कसं? हा प्रश्न उपस्थित होतो, संभाजीराजे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर जास्त भर देतात अशा शेलक्या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे आणि नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली आहे. तसेच मी कोणाला अंगावर घेण्याला घाबरत नाही असंही त्यांनी सांगितले.

अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगले आहेत, ज्यांनी महाराष्ट्र घडवलेला आहे  राज्यकर्ते आहेत, नेतृत्वाचा विषय त्यांचा आहे. आरक्षणाचा मुद्दा विचलित करण्याचा प्रयत्न काही जणांचा आहे, ज्यांना घटना माहिती नाही, त्यांनी बोलू नये. आरक्षण हे घटनेने दिले आहे, ज्यांना आरक्षण दिलंय त्यांच्याशी उघड भांडण करायचं आहे का? मराठा समाजाचे मोर्चे निघाले तसे ओबीसी समाजाचे निघाले होते, तेव्हा मी शांत राहण्याचं आवाहन केलं अन्यथा महाराष्ट्रात यादवी निर्माण झाली असती.  त्यामुळे शांत असलेल्या वातावरणाला पेटवण्याचं काम करू नये, स्वत:चं अस्तित्व राखण्यासाठी जातीचा वापर केला जातोय अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.

     सर्व समाजाचं आरक्षण रद्द करा आणि मेरिटनुसार आरक्षण द्या अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. याबाबत उदयनराजे म्हणाले होते की, मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळूनही प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना प्रवेश मिळतात, प्रत्येकाला देवाने बुद्धी दिली आहे. मेरिटवर आरक्षण द्यावं, सगळेच आरक्षण रद्द करावं, ज्याने कष्टच घेतले नाही त्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळतो आणि ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते, काहीजण आत्महत्या करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. यामुळे प्रकाश आंबेडकर उदयनराजे यांना बिनडोक म्हणाले आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना  प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले. मराठा समाजाला आरक्षण नाही तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी बिनडोक भूमिका त्यांनी मांडली. भाजपने अशा नेत्याला राज्यसभेत पाठवलेच कसे, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

छत्रपती संभाजीराजेंचा MPSC परीक्षेला विरोध केला आहे.‌मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले असून, सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर मराठा समाज एमपीएससी केंद्र बंद पाडेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे अठरापगड जातींचं होतं. मात्र आज त्यातून मराठा समाज बाहेर का फेकला गेलाय? बहुजनांसाठी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. मात्र आता मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिलाय? असा सवाल करत संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. 

त्यावरुन  नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांना इशारा दिला होता. 
याबाबत शंभुराज देसाई म्हणाले की, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जी टीका केली ती निंदनीय आहे, त्यांची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. छत्रपती घराणं, त्यांच्या गादीला महाराष्ट्रातील जनता वंदन करत असते. दोन्हीही छत्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी छत्रपतींच्या वंशजांवर अशाप्रकारे टीका करणे हे गैर आहे, चुकीचं आहे, आम्ही सातारकर, छत्रपतींचे मावळे म्हणून ही टीका अजिबात सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

तसेच आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडावी, मराठा समाज ठामपणे भूमिका मांडून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला दोन्ही राजेंनी त्यांची भूमिका सरकारकडे ठेवली आहे. सातारच्या गादीचा अवमान कधीही सहन करणार नाही, २०१४ मध्ये खासदार उदयनराजेंवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही विधिमंडळाचं सभागृह कामकाज बंद पाडलं होतं, त्यामुळे सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील जनता, छत्रपती घराण्याचे प्रेमी त्यांच्या छत्रपतींच्या वारसावर केलेली टीका सहन करणार नाही असं शंभुराज देसाईंनी सांगितले.

याबाबत निलेश राणेंनी ट्विट केले आहे की, प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा गरळ ओकली, दोन ठिकाणी लोकसभा निवडणुकीत उभे राहूनसुद्धा जेमतेम फक्त डिपॉझिट वाचू शकलं, त्यांची राजघराण्याबद्दल बोलायची इतकी लायकी नाही, राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील कोणताही पक्ष घेणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

या प्रकरणी उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांना इशाराच दिला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक साईराज कदम म्हणाले की, छत्रपती घराण्यावर टीका करण्याची आपली कुवत आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिष्यवृत्तीसाठी छत्रपतींचे वंशज शाहू महाराज यांनी मदत केली होती, हे त्यांनी विसरू नये, काहीही असो, राजकारण बाजूला राहू द्या, छत्रपती घराणं आहे त्याचा आदर केलाच पाहिजे, आपण काय बोलतोय याचं भान ठेवायला हवं, छत्रपती घराण्यावर कोणी टीका करत असेल तर त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही. 

प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात जे बेताल वक्तव्य केलं त्यांचा जाहीर निषेध करतो, छत्रपती उदयनराजे सर्व जातीजमातीच्या लोकांना एकत्र घेऊन काम करतात, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून काम करत असताना प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींच्या वंशजांबद्दल बेताल बोलणं हे अशोभनीय आहे, यापुढे प्रकाश आंबेडकरांनी स्वत:च्या तोंडाला लगाम घालावा अन्यथा उदयनराजे समर्थक राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तुम्हाला राजे स्टाईलनं उत्तर देतील असा इशारा माजी शिक्षण सभापती सुनील कातकर यांनी दिला. 


राजे प्रतिष्ठानचे नितीन शिंदे यांनी तर उघड उघड आव्हान दिले, राजेंनी आजपर्यंत कधीच कोणत्या व्यक्तीचं काम करताना जातीधर्म पाहिला नाही, १९९० पासून आम्ही राजेंसोबत काम करतोय, जो व्यक्ती अडचणीत आहे त्याला मदत करण्याचा राजेंचा स्वभाव आहे. साध्या कार्यकर्त्याचं कामही प्रकाश आंबेडकरांनी केलं नाही, वंचित समाजाचे प्रश्न उदयनराजे संसदेत मांडतील यासाठीच त्यांना खासदारकी मिळाली, राजेंवर टीका करायची आणि काम करतोय दाखवायचं हे काम प्रकाश आंबेडकर करतायेत, यापुढे असं वक्तव्य कराल तर उदयनराजे समर्थक तुम्हाला फिरू देणार नाहीत. तसेच उदयनराजेंची जनतेशी जोडलेली नाळ आहे, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेतलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राची जनता प्रकाश आंबेडकरांना जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सातारा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा रंजना रावत म्हणाल्या आहेत.

या गदारोळात प्रकाश आंबेडकरांनी कुणालाही प्रत्युत्तर दिले नाही तसेच उदयनराजेही प्रकाश आंबेडकरांनी नाव‌ न घेता आपल्यालाच बिनडोक म्हटले या पार्श्वभूमीवर काहीही बोलले नाहीत. उलट त्यांनी परीक्षेबाबत सशक्त भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असताना लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १५,००० कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घाई राज्य शासनाला का लागले आहे?,असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारने आता मराठा समाजाची परीक्षा पाहू नये, असा इशारा देखील दिला आहे.


खासदार उदयनराजे भोसले यांनी समाज माध्यमावर याबाबत आपले मत व्यक्त केले आहे त्यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे तरीही सरकारने ११ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण समितीचा निर्णय झालेला असताना सुद्धा सरकारला एमपीएससी परीक्षा घेण्याची एवढी घाई का आहे ?

जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमक आहे. याची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये.

येत्या ११ ऑक्टोबर रोजी म्हणजे अगदी परवा, रविवारी एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे, तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर लगेच पंधरा हजार जागा भरण्याची एवढी घाई झाली. आरक्षणाच्या मराठा समाज निर्माण झालेले आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग तसेच राज्य सरकार करत आहे.

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा योग्य न्याय देणारा निर्णय होत नाही, तोपर्यंत सरकारने परीक्षा घेण्याचा घातकी निर्णय घेण्याचे धाडस करू नये, जेणेकरून सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयानंतर त्या परीक्षा नव्याने घ्याव्या लागतील.

विद्यार्थ्यांची अशा परीक्षेसाठीची वयोमर्यादा वाढवून सर्वांना संधी मिळेल, अशी व्यवस्था करावी. वयोमर्यादा वाढल्यामुळे कोणाचीही संधी हुकणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळे शासनाने आज तरी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तत्काळ घोषित करावा, याशिवाय कोरोना महामारीच्या परिस्थितीत कोचिंग क्लासेस, ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य झाले नाही. तसेच परीक्षेसाठी पोषक असे वातावरण नसताना सरकार या परिक्षा कशासाठी घेत आहे.? परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्याना कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोण जबाबदार राहणार? त्यामुळे सरकारने या परिक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील.

एमपीएससीची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या नेत्यांशी काल गुरुवारी दीर्घ चर्चा केली. या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचा दावा बैठकीनंतर मराठा नेत्यांनी केला. मात्र, सरकारने रात्री उशिरापर्यंत कुठलाही अधिकृत निर्णय जाहीर केला नाही.


मराठा संघटनांच्या वतीने खासदार संभाजीराजे, शिवसंग्रामचे विनायक मेटे, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांशी मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळी चर्चा केली. सध्या कोरोनाचा काळ आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी या नेत्यांनी केली. याशिवाय, अन्य काही मागण्यांवरही चर्चा झाली. सरकारने आम्हाला अनुकूल प्रतिसाद दिला, असा दावा मेटे, पाटील यांनी केला. आजच्या बैठकांना दिलीप वळसे-पाटील, विजय वडेट्टीवार, अनिल परब हे मंत्रीही उपस्थित होते.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतर राज्यभरात मराठा समाजाची आंदोलनं, बैठका सुरु झाल्या आहेत. उद्या १० ऑक्टोबरला मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळलेली असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने, मोर्चे,आंदोलने करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनेही उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.  या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या १० तारखेच्या मोर्चाला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती सुरेश पाटील यांनी केली होती. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजातील विविध संघटनांमध्ये अनेक गट तयार होण्याची शक्यता आहे. त्यापैकीच काहीजण भविष्यात आक्रमक भूमिका देखील घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात राज्यातील सामंजस्य बिघडू नये व त्यामुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठीच वंचित बहुजन विकास आघाडी  महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले होते. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ओबीसी गटातून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची काळजी घेतली जावी. आणि दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधिंनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतरच बंद मागे घेण्यात येत असल्याची घोषणा सुरेश पाटील यांनी केली.
गुरुवारी रात्री उशीरा सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजाचे प्रतिनिधिनींसोबत मुख्यंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. याचबरोबर मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार यांनाही या बैठकीला उपस्थिती लावली होती. रात्री उशीरा आमची बैठक पार पडली. सरकारने आमच्या अनेक मागण्या मान्य केल्याने आम्ही उद्याचा बंद मागे घेतोय असं सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे.


 या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात २३ सप्टेंबर रोजी मराठा गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या परिषदेला राज्यातील अनेक मराठा संघटनांचे नेते आणि प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी १५ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याबरोबरच केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला देण्यासाठी अध्यादेश काढावा. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा नोकर भरतीला स्थगिती देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.
मराठा गोलमेज परिषदेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी ९ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्यास बंद मागे घेऊ अशी माहिती देण्यात आली होती. तसंच पुढील काळात राज्यभर आंदोलन सुरु राहील असंही सांगण्यात आलं होतं. ”मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. पण ती कधी आणि कशी दिली जाईल याचा खुलासा होणं आवश्यक आहे. सरकार फक्त घोषणा करत असून त्यांच्याकडे बजेट नाही, अधिवेशनात तरतूद नाही,” असं यावेळी त्यांनी म्हटलं होतं. “सरकारने ठरावांची अमलबजावणी केली नाही तर १० तारखेनंतर थोबाड फोडो आंदोलन करू,” असा इशारा यावेळी देण्यात आला होता.


गोलमेज परिषदेत करण्यात आलेले १५ ठराव कोणते होते?
१. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच. २. मराठा समाजाच्या मुलामुलींना शासनाकडून चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा मिळावा ३. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा ४. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी ५. सारथी संस्थेसाठी १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी ६. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी७. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी ८. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.

९. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी. १०. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. ११. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी १२. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे. १३. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी १४. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी १५. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी असे ते १५ ठराव मंजूर करण्यात आले होते. 

उद्याचा बंद होणार नसला तरीही वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी तलावारीही काढू असा इशारा आता खासदार संभाजीराजेंनी दिला आहे. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे. गरज पडेल तेव्हा तलवारी काढू असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. येत्या १५ तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

राज्य सरकारमार्फत रविवारी होणारी एमपीएससी परीक्षा उधळून लावण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. सांगली शहरातील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनमध्ये आज मराठा समाजाच्या नेत्यांची जिल्हास्तरीय बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाने परीक्षा रद्द करण्याची मागणी केली, अन्यथा गनिमी काव्याने परीक्षा केंद्रे फोडू, अशा इशारा दिला आहे. आता आज आणि उद्या सरकारचा काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सकल मराठा समाज आक्रमक बनला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला आहे. मराठा समाजाचा विरोध डावलून रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत शुक्रवारी सांगलीत मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेऊन एमपीएससी परीक्षेला विरोध दर्शवला. राज्य सरकारने तातडीने परीक्षा फुढे ढकलावी, अन्यथा राज्यभर परीक्षा केंद्रे फोडून परीक्षा उधळून लावली जाईल, अशा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

याबाबत माहिती देताना सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विजय देसाई म्हणाले, ‘मराठा समाजाने विरोध दर्शवल्यानंतरही राज्य सरकारने पोलिस भरती प्रक्रिया जाहीर केली. हा प्रकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला उसकवण्याचा आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत रविवारी होणारी एमपीएससी परीक्षा स्थगित करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सरकार केवळ चर्चेचे नाटक करीत आहे. विरोध डावलून परीक्षा घेतल्यास राज्यभरातील परीक्षा केंद्रे फोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास याला राज्य सरकार जबाबदार असेल.’  परीक्षा घेतली किंवा पुढे ढकलली तरी  आता राजे आणि आंबेडकर यांच्यातील वाद परीक्षेचे केंद्र फोडण्याच्या वळणावर आला आहे.

एकंदरीत आता उद्याचा बंद होणार नाही. पण बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ माजला होता. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंचे समर्थक आमने-सामने आले होते. बाळासाहेब हे इथल्या सत्तावंचितांसाठी अहोरात्र संघर्ष करीत आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. तसेच राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल मराठा समाजाच्या मनात आदराचे आणि भावनिकतेचे स्थान आहे. त्यामुळे या वादविवादातून दोन समाजात संघर्ष पेटण्याची चिन्हे असल्याचे आणि त्यामागे आरेसेसचा हात असल्याचेही कुणीतरी म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेल्या शिष्यवृत्तीपर्यंत नेटीझन आले होते. परंतु जाहीर झालेला बंदच नसल्याने आता या वादातील हवाच निघून गेली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही दोन समाजांतील वितंडवादाने संघर्षाचे किंवा दंगलीचे रुप घेऊ नये असे सर्वांनाच वाटते. परंतु जातीय अस्मिता चेकाळल्या किंवा भावनिकदृष्ट्या लोक पेटले तर काहीतरी अनुचित घडू शकतं हे सगळ्यांना माहीत आहेच. तसेच सगळेच सारवासारव करीत असले तरी काही समाजकंटक काहीतरी विपरीत आणि विचित्र मानसिकतेने बरळणारे व्हिडीओ आणि पोस्ट टाकत असतात आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. त्यात दूरचित्रवाहिन्या आगीत तेल ओतत  असतात. त्या भावना भडकविण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. 

मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक देऊन तो मागे घेतल्यानंतर सगळं काही थंड झालं तरी या संबंधाने बाबासाहेबांच्या विचारांवरच आपली पायवाट बनविणाऱ्या बाळासाहेबांबद्दल जी शंका व्यक्त करण्यात आली ती म्हणजे ही की, प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत काय? हा हास्यास्पद प्रश्न शिल्लकच राहतो. 

गंगाधर ढवळे,नांदेड 

संपादकीय/०९.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *