ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सोमवारी कंधार येथे रास्तारोको


कंधार ;

परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी कंधार येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.


नांदेड जिल्ह्यातील कंधार – लोहा तालुका हा पूर्णतः माळरान शेतीचा भाग असून केवळ खरीपाची पिके या तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीचे ऐन सुगीच्या दिवसात परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे . covid-19 महामारी मुळे दहशत निर्माण केली असताना तोंडाला आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशावेळी शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता असून सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी कंधार येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी दिली आहे. कंधार तालुक्यात एकूण 68 हजार 391 हेक्टर ागवडीखाली असणारी शेती असून यातील 45 हजार 665 हेक्‍टरवर सोयाबीन , कापूस, ज्वारी, मूग, उडीद या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अतिवृष्टी झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार 113 गावातील पंचनामे करण्यात आले. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे मात्र राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी. महाराणा प्रताप चौक मेन रोड कंधार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज देण्यात यावे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार अनुदान तात्काळ देण्यात यावे, शेतकऱ्यांना व शेतमजुरांना एमआरजीएस अंतर्गत त्यांच्याच शेतात व त्याच्या गावात शेतमजुरी देण्यात यावी , शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे संपूर्ण वीजबल माफ करण्यात यावे. शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष शिवा भाऊ नरंगले यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *