इथल्या प्रस्थापित साहित्यिकांनी सातत्यानं नवोदित लेखक, कवी, कथाकार, नाटककार आदी साहित्यिकांची अवहेलनाच केलेली दिसून येते. त्यात काही अपवाद असलेत तरी वाहवा म्हणण्यातही जी काही कोती आणि दांभिक मनोवृत्ती दिसून येते, ती कधी ना कधी उफाळून आल्याशिवाय राहत नाही. वयानं ज्येष्ठ असलेली ही साहित्यिक मंडळी फार शहाणीच असतील असे नाही पण ते उपदेशाचे डोस पाजतच राहतात. असे असताना देखील ते नवोदितांना तुमच्या लेखनात काही ‘दम’ नाही असे प्रत्यक्षात बोलून संभावना करतात.
काहींनी तर एका नवोदित कथाकाराला तुमचा कथासंग्रह म्हणजे ‘कचरा’ आहे असे म्हणून हीणवले. तुमच्या कवितेत आशयसंपन्नता आणि शब्दांची जाणिव दिसून येत नाही असेही म्हटले. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘उरबडवे’ साहित्यिक जन्माला येत आहेत. अशीही काहींची आकलनदृष्टी आहे. त्यापलीकडे जाऊन एका पांचट साहित्य संमेलनात ‘कवींची वाढती संख्या : सूज की बाळसे’ हा परिसंवाद ठेवावा लागला. तिथे प्रस्थापितांनी अकलेचे तारे तोडले ते वेगळेच.
नवं लेखन मुद्रणसुलभतेच्या उपलब्धतेमुळं रद्दीत घालण्याच्याच लायकीचं आहे, असा खरकट्या प्रस्थापित साहित्यिकांनी मांडलेला निष्कर्ष हा नवाच संशोधनाचा विषय असल्याचं प्रसिद्धीलोलुप प्रबंधकारांनाही वाटलं. गचाळ मानसिकतेच्या अभिलक्षणांनी अलंकृत झालेल्या या पूर्वग्रहप्रदूषित खोंडांचा खरपूस समाचार घेणं आवश्यक आहे.
नवोदितांची लेखणी तळपत्या तलवारीसारखी असते. ती दुधारी नाही असा अनेकांचा आरोप असतो. नवनवेन्मेषशाली लेखनाचा दर्जा सकस असावा , नव्या सृजनाची आम्ही वाट पाहात आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. आज जगभरात नवोदितांच्या नव्या वेबसाईट भरुन आहेत. सोशल मिडियावर अनेक मंडळे कार्यरत आहेत. ती सवंग आहेत, असे आपणास वाटते. ते चिरकाल टिकत नाही असेही आपणास वाटते. साहित्य चळवळीत दाखल झालेली आणि नव्या तंत्रज्ञानाचा लीलया वापर करणारी तसेच त्यामाध्यमातून सर्व दूर पोहोंचलेली ही साहित्य सेवेची मंचीय विचारधारा निश्चितच स्पृहणीय आहे असे आपणास वाटत नाही.
अनेक स्पर्धा, विविध विषयांवर झडत असलेल्या चर्चा , साहित्य चळवळीला मिळत असलेला आयाम तुमच्या जुनाट , रुढीवादी , परंपरावादी हुजरेगिरी करणाऱ्या तुमच्या कुजलेल्या मानसिकतेला पचनी पडत नाही. आजची नवी पिढी चंगळवादी आहे हे मान्य केले तरी ते सर्वथा त्यातच डुंबून बुडून मरावेत अशी आणि अशीच आपली धारणा आहे, हा आम्हा नवोदितांचा गैरसमज असावा असे वाटत असले, जाणवत असले तरी आरोप आहे हे सगळ्यांनाच बहुधा मान्य आहे.
नव्या पिढीच्या हातात असलेल्या साधनासंबंधाने ते प्रचारकी थाटाचे आहे असेही आपणास वाटते. ते अमंगळ तितकेच अनुल्लेखनीय आहे असेही आपणास वाटत आलेले आहे. भडव्यांना काहीही वाटत असले तरीही नव्या जगाच्या प्रवाही प्रकाशझोतात स्वतःला झोकून देणारे, आपली प्रतिभा अनेक प्रतिमांपर्यंत पोहचविणारे समकाळातल्या विद्वत्तेच्या पातळीवर ‘ऊरबडवे’ कसे काय असू शकतात?
मराठी साहित्याचे काही कालखंड पडतात. तसे साठोत्तरी साहित्याने विद्रोही साहित्य जन्माला घातलं. या आधी आणि नंतर दलित साहित्य म्हणूनच ते वापरात होतं. याला आंबेडकरी विचारधारा नि चळवळीचा आंदोलकीय स्पर्श होता. आजही दलितत्वाच्या प्रेमात आकंठ बुडालेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी याच संवर्गातील नव्यानं समाविष्ट होणार्या लिहित्या जमातीला फिसकारतात. स्वतःला या संवर्गातले साहित्य शिरोमणी समजतात. मराठी साहित्य आणि विद्रोही विचारधारा परस्पर विरोधातले युद्ध होते. त्यामुळे आणि दलितांसंबंधी साहित्यविषयक अस्पृश्यतेच्या मानसिकतेमुळे विद्रोह्यांनी सवतासुभा निर्माण केला. त्याच्यातही अनेक प्रस्थापित प्रतिभावंत निर्माण झाले.
मराठी साहित्यानं काही भाषा, वाङमय आणि सकल साहित्य समृद्ध करणार्या साहित्याला आपलं मानलं नाही. तरीही आज ज्येष्ठ असलेला कवी त्याकाळी कराड येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनात अनेक आर्जवं करुनही त्याला संधी न मिळाल्याने उपेक्षित राहिला. हे उपेक्षिलेपण सन दोनहजार दहा पंधरा या समयापर्यंत काहींच्या वाट्याला येऊ लागलं होतच.
जी साहित्याची मंडळं आणि महामंडळं नव्या पद्धतीने काम करताहेत तिथं नवोदितांसाठी काही चांगलं काम होतांना दिसून येत आहे. अखंड काव्यहोत्रामुळं फारच उत्साही कवींना आणि गझलकारांना आपल्या खतरुडपणाला अधिकच वाव मिळाल्यानं ते जाम खुशच आहेत. पण काही बाजारु प्रवृत्तींच्या लोकांनी स्वतंत्रपणे आपलं धनुष्य उचलण्याच्या नादात कवितेचे ‘कार्यक्रम देणे आहेत’ असा काही कवितेचा बाजार मांडलाय. त्यासाठी नव्यानं सहभागी होणार्या कवीची कविता चांगली, दर्जेदार, सकस वगैरे असेल असे तपासून त्याला सहभागी करुन घेतलं जातं. अशा कार्यक्रमांसाठी एखाद्या नवख्या, सर्वसामान्य कवीच्या प्रतिभेची उंची मोजणारे हे कोण टिकोजीराव?
नाटकांच्या बाबतीतही दलितांना दलित रंगंभूमीची स्थापना करावी लागली. बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आलेल्या नाटकांनी आपली समृद्ध अशी प्रबुद्ध रंगभूमीची निर्मिती करुन आपला साहित्यात वेगळा ठसा निर्माण केला. पण त्यांना व्यावसायिक रंगभूमी निर्माण करता आली नाही. सहभागी झालेल्या स्पर्धेतही परिक्षकांना नाट्यसंवादातून शिव्या घालणारी नाटकं फारशी जम बसवू शकली नाहीत तरी त्यांनी धीर सोडला नाही. म्हणून नव्या नाटककारांना त्यांच्या अप्रतिम कलाकृतींना जेंव्हा मोठमोठ्या पुरस्काराने पुरस्कृत केले गेले तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
नवख्यांच्या पुरस्कारांनी पोटातलं आणि मनातलंही दुखणं वाढवलं. त्याचा ऊलट परिणाम म्हणून पुरस्कारांची सेटिंग करुन पुरस्कार मिळवणार्या चोरांची संख्या हळूहळू वाढत जाऊन अशा बाजारबुणग्यांचा एक उदयकाळ अस्तित्वात आला. यात काही प्रकाशनेही सामील झाली. पण अनुभवी लेखकांनी याबाबतही ‘ब्र’ काढले नाही. ते ब्रश घेऊन आपलीच कोरी पाटी रंगवित राहिले. काही अपवाद वगळले तर सर्व काही आलबेलच आहे. इतर भाषिक राज्यांत परिस्थिती फारशी वेगळी आहे, असे काही नाही. निश्चितच चांगलं लिहिणाऱ्यांना ज्येष्ठांनी जवळ केले पाहिजे. पुरस्कार मिळाला म्हणजे अंगावर मूठभर मांस चढते असे नाही. पण त्यांनी पाठ थोपटली पाहिजे.
दोन चार पुस्तकं नावावर असणाऱ्या काही खुशालचेंडूंना स्वतःचा फार अभिमान वाटत असला तरीही त्यांच्या प्रतिभेचा सन्मान झाला पाहिजे. एखाद्या नव्या साहित्यिकाच्या लेखनाची कठोरपणे समीक्षा झाली तरीही चालेल, पण त्याचं मनोबल खच्चीकरण होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय /१०.१०.२०२०