सोशल मिडीया हा अत्यंत गोंडस नावाचा माध्यम समूह अलिकडे आक्राळ-विक्राळ रुप धारण करु पाहतो आहे. त्याचा निर्माताही माणूसच असून त्याचा गैरवापर करणारा आणि माणसाला ठेचून मारणाराही माणूसच आहे. अत्यंत वेगाने संदेश पेरणारा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सामाजिक पण नवाच प्रयोगशील अध्याय आहे, असे मानले जाते. तो तितकाच सवंग आणि वेगानं अफवा पसरवुन समाजमन कलुषित करणारा, जातीधर्मात द्वेष पसरविणारा, दंगल घडविण्यास प्रोत्साहन देऊन माणसं मारणारा नव्या युगाचा हा सर्जनशील अविष्कार होय. या शोधाच्या शोधामुळे माणसाच्या ज्ञानात प्रज्ञानाची भर पडली आणि माणूस अत्यंत शहाणा झाला. अलौकिक बुद्धीमत्तेच्या जोरावर माणूस नेहमीच शहाणपणाच्या क्षितीजावर स्वार होत असतो. पण हाच शहाणपणा कधी-कधी त्याच्याच अंगलट येतो आणि तो फसतो.
सन २००० पूर्वी अगदी तुरळक लोकांकडे मोबाईल फोन होते. त्या काळात एस.टी.डी., पी.सी.ओ. चं पिक जोरात होतं. नंतरच्या कालखंडात गल्लोगल्ली एक रुपयाच्या क्वॉईन बॉक्सनं जागा घेतली आणि माणूस माणसाच्या जवळ आला. संदेश वहनाचं अगदी योग्य, प्रभावी आणि आनंददायी माध्यम मानून माणूस एक रुपया टाकून बोलू लागला. घरोघर लँडलाईन फोन आले आणि त्या बॉक्सचाही प्रभाव कमी कमी होत गेला. त्याचबरोबर साध्या मोबाईलचा शिरकाव झाला आणि तो प्रचंड लोकप्रिय झाला. घरात एकच वापरात येणार्या फोन ऐवजी प्रत्येक माणूस मोबाईल झाला. ठिकठिकाणी टॉवर आले आणि पक्षीमित्रांनी पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड केली. पण ती अनेकांच्या कर्णोपकर्णीच राहिली. तोपर्यंत अफवेमुळं माणूस मरायचाच होता.
गेल्या आठ-दहा वर्षाच्या काळात अनेक संशोधने होऊन विविध कंपन्यांचे अँड्रॉईड मोबाईल फोन बाजारात आले. बोट लावून खालीवर सरकवित टॅप करण्याची स्पर्श भाषा या मोबाईलने माणसाला शिकविली. त्यातूनच टि्वटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसऍप अशा अनेक समाज माध्यमांचा नवा जन्म झाला. माणसाने जग कवेत घेतले. एक छोटा पीसीच त्याच्या हातात होता. हा मोबाईल आता मुलभूत गरजच होऊन बसली होती. आता मोबाईल माणसावर स्वार झाला. त्याने माणसाला गुलाम केले. माणुस मुका झाला. तो माणसाशी संवाद साधेनाशी झाला. भलाथोरला संदेश एका सेकंदात पाठवण्यात तरबेज झालेल्या माणसाने मोबाईलचे पारतंत्र्य मोठ्या आनंदाने स्विकारले.
आपले विचार, आपली भाषा, संस्कृती त्याचबरोबर आपला सभोवताल जगभर पसरविण्यात त्याला आनंद वाटत होता. आपल्या आणि इतरांच्या सुख-दुःखात मोबाईलवरच सहभागी होण्यात धन्यता मानू लागला. मोबाईलही त्याच्या ग्लोबल गरजा पूर्ण करीत होता. म्हणूनच तो अंगभूत घटक बनून राहिला. राजकीय पक्षांनीही निवडणुकीच्या काळात या समाज माध्यमांचा लिलया वापर केला. शाळा, कॉलेज, पोलिस यंत्रणा, औद्योगिक क्षेत्रे, शासकीय कार्यालये आपल्या कामाचा वेग वाढविण्यासाठी विविध ऍपची निर्मिती करीत होती. हीच यंत्रणा आपापल्या ऑनलाईन क्षेत्रात विस्तारली जात होती. ह्या सगळ्या गदारोळात सामाजिक पर्यावरण बिघडविण्याची काळी छाया गडद होत गेली. माणुसकीच्या संवेदना हरवत चाललेला माणूस अपघाताचे, माणूस मरण्याचे, अश्लिलतेचे, बलात्काराचे आणि अशा अनेक अप्रिय घटनांचेही मोठ्या खुमासदारपणे भडक व्हिडीओ बनवित राहिला आणि प्रसारीत करीत राहिला. समाजमाध्यमांद्वारे प्रसारीत होणार्या या सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्या दोन समाजात तेढ निर्माण करणार्या आक्षेपार्ह पोस्टना निषिद्ध मानण्यात येऊन सायबर गुन्ह्याखाली आणले गेले तरीही या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत राहिली.
भारतातील तरुणाई या सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करीत आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधीही दिवसागणिक निर्माण होत आहेत. विविध प्रकारची सॉफ्टवेअर, अँप, साइट यांच्या निर्मितीचा आणि तदनुषंगिक उत्पादनांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. सोशल मीडिया ही एक ताकदच सर्वसामान्य वाचकांना लाभली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इतर माध्यमे जसे टीव्ही, बातमीपत्र इत्यादींमार्फत फक्त एका दिशेने संवाद किंवा संपर्क साधला जाऊ शकतो. याउलट, या सोशल मीडियामधून दोन्ही बाजूंनी म्हणजेच वाचक व संपादक संपर्क होऊन संभाषण घडू शकते. त्वरित माहितीचा प्रसार व आदानप्रदान हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
जगभरात कोरोनाचं संकट आहे, आपल्या देशानंही कोरोना व्हायरस विरोधातील हे युद्ध जिंकण्याचा निर्धार केला आहे. पण हे युद्ध शस्त्राने जिंकता येत नाही, तर जनजागृती हेच कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकण्याचा कानमंत्र आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनीटायझरचा वापर करणे, हात साबनाने कमीत कमी वीस सेकंद स्वच्छ धुणे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या जनजागृतीची मोहिम सुरु आहे. समाजातले अनेक प्रतिष्ठीत लोकं, नेते, अभितेने, याच सोशल मीडियाच्या आधार घेवून आप आपले संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. अनेक कार्यक्रम लोक एकत्र येऊ शकत नसल्याने आॅनलाईन पार पडले. अजुनही चालू आहेत. घरातच राहणाऱ्या अख्ख्या कुटुंबाचा सोशल मीडियाचा वापर वाढला. अनेकांनी संवादासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. शिक्षण विभागाने परीक्षांसाठी आणि शिक्षण सुरु ठेवण्यासाठीही सोशल मिडियाचा आधार घेतला आहे.
शिवाय आपलं सरकार, आरोग्य विभाग आणि पोलीसंही कोरोना विरुद्धच्या या युद्धात सोशल मीडियाचा वापर करत आहेत. यात बऱ्यापैकी यश येतानाही दिसत आहे. त्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. आज बहुतांश लोकांकडे हे माध्यम आहे. आजकाल बऱ्याच गोष्टी आॅनलाईन होऊ लागल्या आहेत त्यामुळे सोशल मिडियाचा वापर वाढला आहे. कोरोनाकाळात सगळ्यात जास्त वापर सोशल मिडियाचा झाला. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या या युद्धात सोशल मीडियाचं योगदान कधीच न विसरण्यासारखं आहे.
पण, या माध्यमाचा गैरवापरही होताना आढळून येत आहे.
प्रसिद्ध व्यक्तींच्या निधनाच्या अफवा, खोट्या बातम्या या माध्यमाच्या शक्तीबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. त्यातच आता विघातक शक्ती फूट पाडून, दंगली, हिंसाचार घडविणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून खोट्या क्लिप्स दाखवत आहेत. चलत्चित्रणात बदल करून आपल्याला हवे ते चित्रण निर्माण करणे व चित्रे अदलाबदल करून विपर्यास व भडक दृश्ये अशा साईटवर टाकणे, हा आता काही समाजकंटकांचा पूर्णवेळ उद्योग झाला आहे. यावर उपाययोजना करणे अवघड आहे. देशातील सायबर कायदे सक्षम आहेत; पण त्यांची अंमलबजावणी वेळखाऊ आहे. काही अपवादात्मक बाबींत त्वरित अटक झालीही आहे.
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले पळविणारी टोळी समजून ग्रामस्थांनी पाच जणांची निर्घृण हत्या केली होती. ही मानवतेला काळीमा फासणारी घटना होती. मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा इतक्या वेगाने पसरली की त्यातून असांस्कृतिक तथा अनियंत्रीत झुंडशाहीचा जन्म झाला. जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात विहिरीत पोहल्याने एका विशिष्ट समाजातील मुलांना उघडे नागडे करुन मारतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. मारहाण करण्यात मर्दुमकी असल्याच्या थाटात व्हिडीओ बनविला जातो. अनैतिक संबंधाच्या कारणावरुन भावाने बहिणीला व तिच्या प्रियकाराला अक्षरशः तोडले. काळीज पिळवटून टाकणारी ती घटना होती. त्यांचा जिव जाताना, तडफडून मरतानाचा व्हिडीओ लोकांनी व्हायरल केला. किती ही असंवेदनशीलता? दोन लोकांची भांडणं सुरु असताना तिसरा माणूस त्यांच्या भांडणाचा, हाणामारीचा व्हिडीओ बनवितो, आणि व्हायरल करतो. राईनपाडाची घटना ताजी असताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मुर्की या गावात ग्रामस्थांनी मुले पळवून नेणारी गाडी समजून एका कारवर हल्ला केला. जमावाने कारवर दगडांसह मिळेल त्या वस्तुंचा वर्षाव केला. त्यात एकाचा मृत्यू झाला. या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रण करुन तो सोशल मिडियावर पाठविण्यात अनेक जण व्यस्त होते. बदनामीकारक व्हिडीओ, मजकूर तयार करुन दोन समाजात तेढ निर्माण करणे, दंगली घडवून आणण्यास प्रोत्साहीत करणे, समाजमन कलुषित करणे, दमन वा शोषणाची व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत ठेवणे अशा अनेक कार्यात समाजमाध्यमे अग्रेसर आहेत.
लोकशाहीत माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माध्यमे नसती तर लोकशाही निरंकुश झाली असती. परंतु, अलिकडे सोशल मीडियावर कोणताही अंकुश नाही. त्यामुळे मनाला येईल ती माहिती प्रसारित केली जात असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नैतिकतेचे अंकुश लावण्याची गरज आहे, असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
लोकशाहीत कुणालाही अमर्यादपणे व्यक्त होण्याची संधी असते. पण त्यातून विपरीत परिणाम घडून येतात. यामुळे असामाजिक तत्वांचा वावर वाढू लागल्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात पत्रकारितेची परंपरा मोठी आहे. माध्यमांनी लोकशाहीतील असामाजिकतेवर अंकुश ठेवणे आवश्यक असून निरंकुश लोकशाहीत मूठभर लोकांचीच प्रगती होते. सध्या सोशल मीडिया मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. सोशल मीडियात प्रगल्भता आणण्याची गरज आहे. माहिती आणि ज्ञान यातील फरक सोशल मीडियातील लोकांनी जाणून घेणे आवश्यक आहे. व्हॉट्सऍपसारख्या माध्यमातून केवळ माहितीपर आधारित बातम्या प्रसारित केल्यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडू शकते.
जेव्हापासून आपल्याकडे सोशल मीडिया तळा गाळा पर्यंत पोहोचलाय तेव्हा पासून या माध्यमांद्वारे स्वतःची मते मंडणाऱ्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे , तसे पाहता ही स्वागतार्ह बाब आहे परंतु कुणीतरी म्हटलेच आहे की समाज्यामध्ये रुजू पाहणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम हि ती गोष्ट आपल्या जन्मबरोबरच सोबत घेऊन येत असते.
तसाच काहीसा प्रकार आपल्या सोशल मीडियाच्या बाबतीत देखील झाला आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. इथं जशी चांगल्या प्रवृत्ती ची मानस समाजप्रबोधनाला उपयुक्त अशी मते मांडताना दिसत आहेत त्याहून हि अधिक विकृत मनोवृत्तीची मानस आपले विषारी विचार या माध्यमातून व्यक्त करून सामाजिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम करत आहेत , त्यांना यासारख्या कृती करून काय साध्य करायचे आहे हे त्यांनाच ठाऊक , परंतु त्यांच्या विषारी मतांना तसेच त्याच्या प्रचाराला बहुसंख्य तरुण वर्ग बळी पडत आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या मतांची , बातम्यांची , व्हिडिओंची , छायाचित्रांची कुठलीच शहानिशा न करता आपण त्यांच्या विषारी प्रचाराला बळी पडतोय .
कुठेतरी महापुरुषांच्या बाबतीत विटंबना करून किंवा कुठल्या तरी घटनेचे विकृत सादरीकरण करून समाजमन कुलुशीत करून आपल्या कडील सामाजिक सलोखा संपविण्याचे फार मोठे कारस्थान सुरु आहे , आपल्या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले ज्यांच्या विचारांनी आणि कर्तृत्वाने त्यांनी या देशाच्या धार्मिक , सामाजिक , राजकीय , आर्थिक , शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभूतपूर्व बदल घडून आणले , त्याच्या कार्य कर्तृत्वाचा ठसा आजही आपल्या समाजाच्या मानांमध्ये तेवत आहे , या महापुरुषयानी आपली संपूर्ण हयात लोक हितांसाठी खर्च केली परंतु दुर्दैवाने आपण सर्वांनी या महापुरुषांना जातीच्या चौकटी मध्ये कैद करून टाकले . त्यांच्या कार्याला जातीय चाकोरीच्या बाहेरून पाहण्यास आपली आजची पिढी तयार होत नाही आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा अशी विकृत मनोवृत्ती असलेली माणसे उचलतात व तुम्हाला आम्हाला या महापुरुषांच्या नावाने एकमेकांची डोकी फोडायला भाग पाडतात. प्रसंगी दंगलही घडून येते.
वरवर पाहता हि गोष्ट साधी सोपी वाटत असली तरी यामूळे आपल्या देशातील सामाजिक समतोलाची दरी रुंदावत चालली आहे , आणि हे असेच चालू राहिले तर याचे दूरगामी परिणाम आपण सर्वाना भोगावे लागतील, आणि हे एक भयानक सत्य आहे. एवढेच नव्हे तर सध्या सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा परिणाम शरीरावर होताना दिसत आहे. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. तुम्ही कदाचित सुट्टीच्या दिवशी केलेली धमाल किंवा चविष्ट पदार्थांचे फोटो तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर करत असाल. पण, या सोशल मीडिया वापराच्या काही नकारात्मक बाजूसुद्धा असू शकतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य करताना सोशल मीडियाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम या विषयावरसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. सोशल मीडियाचा अतिरेक किंवा चुकीचा वापर आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो.
सोशल मिडियावर आलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःला विचारवंतच समजतो. अश्लिल भाषेचा सर्रास वापर ही त्याची वैचारिक देण आहे. तडकाफडकी प्रतिक्रिया देणे तर काही प्रसंग निर्णयच देऊन टाकणे हे काही सेकंदातच घडून येते. कुठलीच शहानिशा होत नाही. त्यातही अनेक बनावट खाती आहेत. राजकीय नेते, उद्योग क्षेत्रातले सर्वच उद्योगपती, छोटे-मोठे व्यावसायिक, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, इतर क्षेत्रातील विधायक बाबी वगळता बाकीचे अफवेचेच बळी ठरले आहेत. सोशल मिडियावर आता ट्रोल करण्याची नवीच लहर आली आहे. एखाद्याचे विचार आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध प्रकाशित झाल्यावर त्याला ट्रोल करुन इतर सर्वांनी मोठ्या संख्येने त्याला निरुत्तर करणे, हे सर्रास होत आहे. एखाद्याचे विचारच दाबून टाकणे ही दमनाचीच प्रक्रिया आहे. समाजमाध्यमांद्वारे अफवा व बदनामीकारक मजकूर पसरविण्याचे प्रकार खूपच वाढलेले आहेत. त्यामुळे भारत सरकारने फेसबुक, व्हॉटस्ऍप, व्टि्टर यांना धारेवर धरले होते. समाज स्वास्थ्य बिघडू नये, कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या समाजमाध्यमांवर कडक नियंत्रण आणणे आवश्यक आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय/
१३.१०.२०२०