नांदेड-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यातील विविध ठिकाणी शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याचे थेट प्रेक्षपण येथील भक्ती लॉन्समध्ये करण्यात आले. या व्हर्च्युअल रॅलीस जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते व शेतकर्यांची उदंड प्रतिसाद दिला. शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली.
संगमनेर, उमरेड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पालघर या ठिकाणाहून एकाच वेळी राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी कार्यकर्ते आणि शेतकर्यांना संबोधीत केले. या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रेक्षपण आभासी सभेच्या माध्यमातून नांदेड येथे करण्यात आले. राज्यभरात विविध ठिकाणी घेतलेल्या सभांमध्ये राज्याचे प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतला होता.
नांदेड येथे विविध ठिकाणच्या सभा सुरु होण्यापूर्वी स्थानिक नेत्यांनी उपस्थितांना संबोधीत केले. यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद व महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, माजी आ.वसंतराव चव्हाण, माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.मोहिनीताई येवनकर,
जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, स्थायी समितीचे सभापती अमित तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.सरिता बिरकले, उपसभापती सौ.जोत्सना गोडबोले यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना माजी पालकमंत्री डी.पी.सावंत म्हणाले की, ब्रिटिशांच्या काळात एखादा कायदा जनविरोधी झाला तर जनतेच्या रेट्यापुढे तो रद्द केल्या जात असे. परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या काळात एक नव्हे तर अनेक जनविरोधी कायदे केल्या जात आहेत. परंतु जनतेच्या भावनांची कदर न करता हे काळे कायदे रेटून नेण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे.आ.अमरनाथ राजूरकर म्हणाले की,
देशाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी व खा.राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधामध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. हे काळे कायदे रद्द केल्याशिवाय काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. काँग्रेसने केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येंनी जिल्हाभरातून कार्यकर्ते एकत्रित आले आहेत.
याचाच अर्थ या कायद्याला जनतेचा विरोध आहे.यावेळी बोलतांना माजी आ.वसंतराव चव्हाण म्हणाले की, देशातील शेतकर्यांच्या हक्काच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या संपविण्याचा सरकारने घाट घातला आहे. शेतकर्यांचे राज्य संपवून आदानी आणि अंबानी यांच्या हाती देशाची आर्थिक सत्ता देण्याचे हे षडयंत्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या आभासी सभेचे सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.
तर उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले.या व्हर्च्युअल सभेस काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.