आताची लग्न हे आधुनिक पद्धतीने लागत आहेत. मोठेमोठे मंगल कार्यालय, लॉन्स यामध्ये थाटामाटात सोहळा उरकला जातोय. आपल्या ऐपती पेक्षा जास्त खर्च करण्याची चढाओढ लागली असते. किमान हजार पाचशे सगेसोयरे लग्नाला आवर्जून उपस्थित राहतात. लग्नाला हजर राहणाऱ्यांची संख्या ही वधूपिता, त्यांचे कुटूंबीय यांच्या ऐपतीवर व त्यांच्या मित्र परिवार, सगे सोयरे किती आहेत यावर अवलंबून रहात असे, सध्याच्या काळात तर काही लग्न हे इव्हेंट मॅनेजमेंटद्वारे लावली जात आहे म्हणजे लग्नाची कॉन्ट्रॕक्ट घेतली जातात.
एकदा का कॉन्ट्रॕक्ट दिले की ते सर्व सुरूवातीपासून ते शेवट पर्यंत सर्व काही सुरळीत करून देतात. अर्थातच यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. त्यांचे नियोजन इतकं व्यवस्थित असतं की, एखाद्या पुस्तकात म्हणा अथवा टि व्ही सिरिययल असल्याप्रमाणे सर्व घडत असतं. हा सर्व प्रकार कोरोना संक्रमण लागण्याच्या आधीचा. कोरोनानंतर मात्र सर्व बाबतीत बंधन आले असल्यामुळे चित्र बदललेले आहे. ५० पेक्षा जास्त माणसे जमवायला बंदी आली आहे. बँड, वरात, घोडा हे लग्नात कुठे दिसेनासे झाले. फार जवळचं असेल त्यांनाच आमंत्रण असे. याबाबतीत शासनाने कडक नियमावली बनवलेली होती. या कोरोनाच्या काळात तर बरीच लग्न ही साखरपुड्यातच उरकलेली पाहण्यात आलेली आहेत.
१९८० ते २००० या कालावधीत ज्यांनी ज्यांनी गावातील लग्नाला उपस्थिती दर्शवली त्यांच्यासाठी लग्न हा एक सोपस्कार नसून आनंदोत्सव होता. कुमार वयातच लग्ने ठरवली जायची. मुलगी पाहायच्या कार्यक्रमात हमखास कांदेपोहे ठरलेले असायचे. वधू परीक्षा घेत असताना टिपिकल प्रश्न विचारले जायचे. काही जुन्या विचारसरणीचे लोक दोंघाची जन्म पत्रिका जुळवून पाहायचे. काही ज्येष्ठ महिला तर मुलीच्या तळपायाचे परीक्षण करायचे आता याच्यातून त्यांना काय साध्य व्हायचं हे त्यांनाच माहित. मुलीसह घरातील प्रत्येक सदस्य काय होईल या चिंतेत असायचा. योग जुळेल का याचा अंदाज घेतला जायचा. मध्यस्त्यामार्फत होकार आला की बोलाचालीची बैठक बसायची. बैठकीत कधी वारा फिरेल याचा भरोसा नसायचा.
मुलाच्या आई वडिलाचा रूबाब तर काही वेगळाच असायचा. मुलीचा बाप तर अगदी दीन गरीब बनून त्यांच्या सरबराईत काही कमतरता तर राहिली नाही ना हे पाहत रहायचा. कारण त्याला वाटायचं की हे लग्न जमलं म्हणजे एक जबाबदारी उरकून तो दुसऱ्या मुलीसाठी वर संशोधन करण्यास मोकळा व्हायचा. कारण त्यावेळी एकूणच कुटूंब मोठे असायचे. म्हणजे दोन तिन भाऊ, दोन तीन बहिणी असा गोतावळा असायचा. बोलण्यासाठी आलेल्या एखाद्या नातेवाईकामुळे जुळत असलेला घाट विस्कटायचा. मग त्याची कशीबशी समजूत काढली जायची. मग देण्या घेण्यावर, मान पानावर चर्चा रंगायची आणि या सर्वावर तोडगा निघाला की, तारखेची सुपारी फुटायची.
प्रत्यक्ष तारखे पेक्षा लग्नाची तयारी दोन तीन महिन्या आधी पासून सुरू असायची.
ज्या घरी लग्न असायचे त्यापेक्षा शेजारच्यांचा उत्साह जास्त असायचा. त्याकाळी शेजार धर्म, आपुलकी या गोष्टींना अतिशय महत्त्व असायचे. मग आपल्या सोयीनुसार बस्ता बांधला जायचा. एक एक पाहुणे आठवून त्यांना पत्रिका पाठवली जायची. सहसा पत्रिका घेऊन येणारा व्यक्ती पत्रिकेवर नाव टाकायचा नाही. पाहुण्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्यासमोरच स्केचपेन अथवा चमकी असणाऱ्या पेनने पत्रिकेवर नाव टाकायचा. काहींना मुळ मिळायचे. मुळ म्हणजे लग्न पत्रिकेस हळद, कुंकू लावुन त्यासोबतच आहेर पाठविला जायचा. ज्यांना मूळ निमंत्रण आले आहे त्यांना लग्नास जाणे क्रमप्राप्त असायचे.
रुखवताची तयारी बाया जोरात करायच्या. दोन-तीन दिवस आधीपासून हळद लावली जायची. मग नवरदेवाला लावण्यात आलेली हळद ही नवरीकडे पाठविण्यात येत असे. मला वाटते याला उष्टी हळद असे म्हटल्या जात असे. सध्या हळद पाठविण्याची पध्दत फार क्वचित ठिकाणी दिसून येत आहे. लग्नाआधी मुला-मुलीच्या घालावयाची आंघोळीचा सोपस्कार असायचा. त्यानंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून कपाळभर भरलेला मळवट, त्यावरून लावलेली चमकीयामुळे महत्वाची माणसे उठून दिसायची. लग्नाच्या दोन दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनविण्यासाठी केलेले जागरण करताना गप्पांना ऊत यायचा.
प्रत्यक्ष ज्या दिवशी लग्न असेल त्या दिवशीची बातच काही और असायची. भल्या पहाटे सगळेजण तयार होऊन वऱ्हाडाची वाट पाहायचे. कधी बैलगाडीतून तर कधी जीप- एसटीने वऱ्हाड दोन तीन तास तरी उशिरा यायचे. एखाद्या घरात त्यांना थांबण्यासाठी जागा दिली जायची. त्या जागेस जनवसा असे म्हटले जायचे. तेथे सर्व व्यवस्था चांगली ठेवावी लागायची, नवरदेव कडील मंडळींचा पाहूणचार करण्यात कधी कधी वधूपित्याच्या नाकी नऊ यायचे.
तरीही काही मंडळीची छोट्या मोठया कारणांसाठी काहीतरी तक्रार असायचीच. तासाभराने तयारी झाल्यानंतर सर्वजण मंडपात जमा व्हायचे. बांबू ताटवे आणि पळसाच्या पानाचा मंडप घातलेला असायचा. कधीकधी टेंट लावला जायचा. लाऊड स्पीकर वरून दोन चारच गाणी वाजवली जायची. साऊंड सिस्टिम वाल्या माणसाकडे लहान मुले घोळखा करून उभे रहायची.
शेवंती साठी नवरा मुलगा तयार झाल्यावर मारुती मंदिरात दर्शनासाठी जायचा. घोड्यावर बसायचा योग काही नशीबवान नवरदेवानांच मिळायचा. नाहीतर कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर आणि क्वचित प्रसंगी पायीच नवरदेव निघायचा. बँड समोर नाचताना वराची दोस्तमंडळी भाव खायाची. आपलीच फरमाईशचे गाणे वाजविण्याचा त्यांचाआग्रह असायचा. मग याच कारणावरून छोटी मोठी भांडणेसुध्दा व्हायची.
तितक्यात एखाद्याचा नागिन डांस हमखास सुरु व्हायचा. नाचणारे फूल्ल जोशात आलेले असायचे .त्यामुळे वेळ वाढत जायचा आणि मग कोणीतरी मोठा माणूस बळजबरी करून सगळ्यांना लवकर लवकर पुढे चलण्यासाठी तगादा लावायचा. शेवटी एकदा वरात मांडवात यायची. मग नवरा, नवरीच्या आजूबाजूला उभे राहण्यासाठी जणू धावपळ व्हायची.
‘लग्नाची वेळ जवळ आली आहे. मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन यावे ” अशी आरोळी भटजी मारायचा. सात आठ वेळेस बोलावणं झाल्या नंतर नवरी मुलगी स्टेजवर यायची. मध्ये अंतरपाट धरून वधू-वर उभे राहायचे. “अक्षदा मिळाल्या का सर्वांना?” असा माईक वरून गलका व्हायचा. पण त्याची खातरजमा न करता मंगलाष्टकं म्हटली जायची. ती म्हणताना चढाओढ लागायची. कधीकधी पाचच्या ऐवजी मंगलाष्टका लांबायच्या. आणि शेवटी “आता सावध सावधान” … संपले की “वाजवा रे वाजवा” अशी भटजीची आरोळी कानावर पडली की ,मुठीत कोंबलेल्या रंगीत अक्षता नवरानवरीच्या अंगावर फेकून सर्वजण बूड झटकायला सुरुवात करायचे.
तिकडे नवरा नवरी गळ्यात हार घालेपर्यंत मंडपातील प्रत्येकजण पंगतीसाठी लाईन धरायचा. पत्रावळी वाला पंगतीत फिरायला सुरुवात करायचा. या पत्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असत. त्यामुळे दोन जोडून घ्याव्या लागत. पत्रावळी वाटणारी मंडळी खडूस का असत कोण जाणे ! फाटलेली पत्रावळ बघून सुद्धा मुद्दाम दुसरी पत्रावळ देत नसत …आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली. जणू लग्न यांच्या घरचे असते अशा थाटात तुच्छ कटाक्ष टाकून बघत. त्यानंतर मीठ, भात वरण, वांग्या बटाट्याची भाजी, चपाती घेऊन वाढपी रांगेत यायचे. बुंदी वाढण्याचा मान ज्याकडे असायचा त्याची ऐट भारी.
पोरां सोरांच्या हाताने पाणी वाढले जायचे. सर्व पदार्थ वाढले याची खात्री झाली की कोणीतरी “वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे” श्लोक म्हणायचा. श्लोक म्हणायला ही चढाओढ लागली की, लोक कंटाळायचे. पोटात कावळे ओरडत असली तरी घासही घेता यायचा नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण व्हायची. मग “बोला पुंडलिक वरदा हरि….. म्हटल्याबरोबर सर्वजण जेवणावर तुटून पडायचे. भातावर टाकलेलं वरण पूर्ण पत्रावळीत भ्रमण करित असे. त्या वरणाला आवरता आवरता जेवणारा घामेघुम होऊन जाई. वरणभात आणि निसून ठेवलेली बुंदी मिठाच्या ढिगाऱ्यासह ओलेचिंब होई.
पोटभर जेवल्यानंतर सर्वांच्या पत्रावळीतील पदार्थ संपेपर्यंत कोणीही उठत नसे. पहाटे पहाटे भरून आणलेला थंड पाण्याचा टँकर एव्हाना आंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असे. जर्मनच्या पांढऱ्या ग्लासातून दोन घोट पाणी पिऊन मांडवाच्या बाजूलाच हात धुतले जात असे. पहिली पंगत उठली की लगेच दुसरी पंगत बसायची. गावातील महिलांची हमखास शेवटची पंगत ठरलेली असायची. गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल त्यांना कोणत्याही हॉटेलात जेवणाची मज्जा येणार नाही हे मी खात्रीने सांगू शकतो, आणि माझ्या या मताशी बरीच जुनी मंडळी सहमत असेल.
जेवणे चालू असताना आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत प्रचलित होती. अमुक अमुक एक रुपया , तमूक तमूक दोन रुपये अशा प्रकारे . ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं . जवळचे पाहुणे मंडळी ही सहसा भांडे आहेर करायचे. मामा किंवा काका स्टीलची टाकी देऊन सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा. कधीकधी काहीतरी शुल्लक कारणावरून भांडणे सुरु व्हायची आणि प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचत असे. अशावेळी सरपंच, पोलिस पाटील, चेअरमन ही मंडळी पुढाकार घेऊन वाद मिटवायची. आणि काही झालेच नाही असे समजून लग्न उरकले जायचे. जमलेले सगळे नवरा नवरीला आशीर्वाद देत सर्वांचा निरोप घ्यायचे. चूक भूल माफ असावी असे सांगून वऱ्हाड परतायचे.
लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून , मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले एचएमटी चे घड्याळ हातामध्ये सगळ्यांना दिसेल दिमाखात दाखवत गावात पूर्ण फेरफटका मारायचा .त्यावेळी त्याचा रूबाब काही वेगळाच असायचा. सर्व गावकरी त्याला थोडी वेगळी वागणूक द्यायचे. मागे चित्रपट गृहात अशीच एक एच एम टी घड्याळाची जाहिरात दाखविली जायची. आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या शंभर पट मिळाले, तरी त्याची सर येणार नाही हे नक्की. आम्हाला लहानपणी अनेक लग्नाच्या गोष्टी जुन्या मंडळीकडून ऐकायला मिळालेल्या आहेत आणि अशा लग्न सोहळ्याचे आम्हाला साक्षीदार होण्याचे भाग्य सुध्दा लाभले आहे.
हे सर्व वर्णन वाचून आजच्या तरुण पिढीला आपण असे लग्न सोहळे पाहिले नसल्याची खंत नक्कीच जाणवेल. म्हणून त्यांनी आपल्या आई वडील, आजी आजोबा यांच्या कडून अशाच एका लग्नाची गोष्ट ऐकायला काय हरकत आहे. असो. तर आजचे हे लग्न पुराण येथेच थांबवूया…..
लेखक ;- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
*94218 39333