नांदेड ;
जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून ठाकूर परिवारातर्फे रेल्वे स्थानक परिसरातील गरजूंना लॉयन्सचे डबे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून दोन लाख एकोणीस हजारापेक्षा जास्त डबे वाटप करण्यात आले आहेत.
शासकीय गुरु गुरुगोविंदसिंघजी रुग्णालय येथे नऊ वर्ष दिलीप ठाकूर यांनी भाऊचा डबा हा उपक्रम चालवला. एक लाख चौसष्ठ हजार पेक्षा जास्त भाऊचे डबे त्यावेळी महिलांनी आपल्या घरी बनवून दिले होते. 1 जानेवारी 2019 पासून रयत रुग्णालय येथे दिलीप ठाकूर प्रोजेक्ट चेअरमन असलेल्या लॉयन्सचा डबा या उपक्रमांतर्गत दररोज तीस डबे देण्यात येतात. आतापर्यंत अठरा हजारा पेक्षा जास्त डबे विविध दानशूर व्यक्तींनी आपल्या नातेवाईकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अथवा वाढदिवसानिमित्त दिले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सतत बावन दिवस बाहेरगावाहून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच डबे देण्यात आले. तसेच पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना लॉक डाऊन च्या काळात बत्तीस हजार पाचशे लॉयन्सचे डबे देण्यात आले. यासाठी तीनशे अन्नदात्यांनी सहकार्य केले. 1 जून 2020 पासून श्री गुरुजी रुग्णालय येथे लॉयन्सचा डबा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दररोज वीस डबे रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येत असून त्यासाठी दोन वर्षासाठी रुपये दोन हजार शुल्क आकारले जाते. वर्षभरातील फक्त बावीस दिवसाची आगाऊ नोंदणी करावयाची शिल्लक आहे.
या उपक्रमात आतापर्यंत अडतीसशे डबे देण्यात आले आहेत. लॉयन्सचा डबा उपक्रमासाठी उप प्रांतपाल लॉ. दिलीप मोदी , झोनल चेअरमन लॉ. डॉ. विजय भारतीया, लॉयन्स क्लब नांदेड सेंट्लचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सचिव लॉ. ॲड. उमेश मेगदे , कोषाध्यक्ष लॉ. जितेंद्र साबू, स्वयंसेवक राजेशसिंह ठाकूर ,मन्मथ स्वामी, हनुमंत येरगे हे परिश्रम घेत आहेत. जागतिक अन्न दिवसाच्या निमित्त्याने नागरिकांनी अन्नाची नासाडी टाळावी तसेच गरजूंना अन्नदान करावे असे आवाहन दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
****video news ***जागतिक अन्न दिन