पर्यावरणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक म्हणजेनैसर्गिक आणि दुसरे मानवनिर्मित. नैसर्गिक पर्यावरणात सजीव तसेच सर्व निर्जिव घटकांचा समावेश होतो. तर मानवनिर्मितमध्ये लोकसंख्या, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, तांत्रिक आदी पर्यावरणाचा समावेश केल्या जातो. नैसर्गिक पर्यावरण हे एक मानवाला मिळालेले वरदानच असून त्यात मानवनिर्मित पर्यावरणाने कमालीचा हस्तक्षेप केल्यामुळे पर्यावरणाचे पतन होत चालले आहे. असा एकंदरीत आशय घेऊन नांदेड येथील एक अत्यंत अभ्यासू लेखक ‘पर्यावरणाचं पतन’ हे पुस्तक घेऊन वाचकांच्या भेटीला येत आहेत. यात पर्यावरणाच्या अभ्यासाबरोबरच औद्योगिकीकरण, प्रदुषण, नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्तींचा वस्तुनिष्ठ अभ्यास, चिंतन मांडलेले आढळते. माहितीचे संकलन आणि आकडेवारींची चपखल मांडणी करणारं पुस्तक आज प्रकाशित होऊन पर्यावरणप्रेमी वाचकांच्या, अभ्यासकांच्या भेटीला येत असून ते त्यांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे. तसेच हे कविता, कथा, कादंबरी किंवा तत्सम साहित्य प्रकारात न मोडणारं परंतु केवळ राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावर भेडसावणाऱ्या समस्यांच्या संदर्भात विशेषतः पर्यावरणाचे पतन या अनिवार्य चिंतनाच्या विषयावरील पुस्तक घेऊन नांदेड येथील लेखक के. एस. लोखंडे दाखल होत आहेत, याचा विशेष आनंद आहे.
वृक्षतोडीबद्दल लेखकाला अत्यंत खेद वाटतो. जैवविविधतेच्या संदर्भाने प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे.पर्यावरणातील वृक्षवेली, वनस्पतीच आपले तारणहार आहेत. आपण कितीही श्रीमंत झालो किंवा कितीही प्रगत झालो आणि आपल्याला शुद्ध हवाच मिळत नसेल तर आपले जगणे काय कामाचे? ‘जगा आणि जगू द्या’ या विचारांचा पुरस्कार मानवाने केला पाहिजे असा संदेश ते पहिल्याच पाठात ते देतात. नैसर्गिक पर्यावरण एक वरदान या पहिल्या पाठात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, बेसुमार वृक्षतोडीमुळे होणारे अपायकारक परिणाम या विषयी अनेक उदाहरणांवरून आणि शास्त्रशुद्ध माहितीच्या आधारावर मांडणी केली आहे. सांस्कृतिक पर्यावरणाच्या संबंधाने ते म्हणतात की, मानवाने नैसर्गिक पर्यावरणात हस्तक्षेप करून सांस्कृतिक पर्यावरण निर्माण केले. पण याचे दुरगामी परिणाम सर्वच जीवजंतूंना भोगावे लागत आहेत. त्यामुळे प्रदुषणाच्या समस्या निर्माण झाल्याच आहेत तर काही सजिवांच्या प्रजातीच नष्ट झालेल्या आहेत.
प्राण्यांच्या बाबतीत होत असलेली हेळसांड, त्यांचा जगण्याचा संघर्ष आणि एकूणच पशुपक्ष्यांच्या नष्ट होत असल्याबद्दल खेद व्यक्त करीत तशी मांडणी ठेवतांना लेखकाने सांस्कृतिक पर्यावरणाला जबाबदार धरले आहे. आजपर्यंतची झालेली संशोधने आणि विविध पर्यावरणविषयक चळवळींच्या आधारे त्यांनी ही मांडणी केलेली आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन शोध लावले जात आहेत. त्यामधून सांस्कृतिक पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. सांस्कृतिक पर्यावरण म्हणजेच मानवनिर्मित पर्यावरण ही थांबणारी प्रक्रिया नाही तर ती वरचेवर वाढत्या गरजांची पूर्तता करणारी आहे. पण यातून होणारे संभाव्य धोके अधिक आहेत. मानवाला सांस्कृतिक पर्यावरण जसे आणि ज्या अंशी उपकारक आहे तसेच ते अपायकारकही ठरु शकते, असे त्यांचे मत आहे. या दुसऱ्या पाठातही ते वृक्ष लागवड, जोपासना आणि जतन या मुद्द्यावर येऊन थांबले आहेत.
वरदान आणि शाप या शब्दांच्या अर्थनिहिततेवर निसर्गाची आजची क्रिया प्रतिक्रिया थांबली आहे. या दृष्टिकोनातून ते पर्यावरणाच्य होत असलेल्या ऱ्हासाकडे पाहतात. देशातील शहरांच्या शहरीकरणाचेच नव्हे तर जगातील सर्वच देशांच्या औद्योगिकीकरणाला आपण औद्योगिक क्रांती या अनुषंगाने आपण मानवी जीवनात आलेल्या क्रांतिकारक बदलांकडे पाहतो. परंतु पर्यावरण निकोप राहणे व ठेवणे या दोन्ही प्रक्रिया मानवी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाच्याच आहेत. त्यामुळे अनेक शहरांचे झपाट्याने शहरीकरण होत असतांना औद्योगिकीकरण, नागरिकरण यामधून उद्योग, लोकसंख्या यांची होणारी अनियंत्रित वाढ व त्याबरोबरच मानवाने आपल्या भौतिक सुखासाठी निर्माण केलेल्या वस्तू, सुविधा वा विविध साधने यातून अनेक समस्याही निर्माण झालेल्या आहेत. याचा उहापोह त्यांनी तिसऱ्या पाठात केलेला आहे. औद्योगिकीकरणातून होणारे प्रदुषण टाळण्यासाठी नवीन संशोधन झाले पाहिजे असे लेखकाचे मत आहे. एवढेच नव्हे तर शासनाने घालून दिलेले नियम औद्योगिकीकरणातील सर्वच घटकांकडून काटेकोरपणे पाळले गेले तर शाप ठरु पाहणारे औद्योगिकीकरण नक्कीच वरदान ठरेल हा आशावाद त्यांनी मांडला आहे.
औद्योगिकणानेच, जलप्रदूषण, हवा प्रदुषण, ध्वनी प्रदुषण, जमिनीचे प्रदुषण यांना जन्माला घातले आहे. हवा एक विनाशकारी सत्य या पाठात मानवाने स्विकारलीच पाहिजेत अशी कटूसत्ये मांडली आहेत.एकवेळ मानवाला अशी येईल की शुद्ध हवा मिळणेही कठीण होऊन बसले आहे, अशा परिस्थितीत शुद्ध हवा मिळण्याचे एकमेव ठिकाण अशा पाट्या लागलेल्या दुकानांची निर्मिती होईल तर नवल वाटण्यासारखे काही नाही असे खोचकपणे म्हटले जायचे. भारत सरकारने हवा प्रदुषण थांबले का? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र सध्याच्या काळात कोरोनामुळे सर्वच जे प्रदुषणकारी उद्योग आहेत ते बंद होते म्हणून हवेचे प्रदुषण थांबले असा आनंद व्यक्त केला गेला. यावर असे सर्व उद्योगधंदे बंद करून ठेवणे हा पर्याय असू शकत नाही. कारण हवा प्रदुषण ही केवळ एका देशाची समस्या नसून ती जागतिक समस्या आहे. त्यामुळे जगभरात कोणकोणत्या घटनांमुळे हवा प्रदुषण होते याची सारासार माहिती लेखक लोखंडे यांनी मांडली आहे. तर ते रोखण्यासाठी आपण आपल्याच घरापासून सुरुवात करायला हवी हे पटवून देतात.
जलप्रदूषणाचा कहर म्हणजे जिवाला घोर असा पाचवा पाठच सदरील पुस्तकात अंतर्भूत करण्यात आला आहे. यात जलप्रदूषणाविषयी काही जागतिक विद्वानांची मते नोंदवतांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणूनच नव्हे तर भारताचे जलपुरुष म्हणूनही ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जलधोरणविषयक मांडणी केलेली आपल्याला वाचावयास मिळते. या धोरणांच्या कार्यान्वयनातून ज्या प्रकल्पांची निर्मिती होईल त्याने एकीकडे जलसंवर्धन होईल तर दुसरीकडे ते प्रदुषणमुक्त राहतील असे ते म्हणतात. जलसंवर्धन, जलव्यवस्थापन, नदी, नाले, समुद्र, धरणे यांचे प्रदुषण होऊ न देणे ही अखिल मानवजातीचीच जबाबदारी आहे असेही ते म्हणतात. कारण जलप्रदूषणाविषयीचे मानवाला भोगावे लागलेले नुकसान मुद्देसूद पद्धतीने मांडण्यात आले आहे. जलजागृतीबरोबरच कायद्याच्या उल्लंघनाच्या बाबतीत करावयाच्या शिक्षाया संदर्भात विशेष उल्लेख लेखकाने केलेला आहे.
बेसुमार जंगलतोड झाल्यामुळे पशुपक्षांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. वन्यजीव शहरांकडे धाव घेऊ लागले. बिबट्या विहिरीत पडला, मानवी वस्तीत घुसला, माॅलमध्ये घुसला…अशा अनेक बातम्या आपण वाचतो, ऐकतो, पाहतो. कारण केवळ बिबट्याचेच नव्हे तर वन्यजीवांंचेच मूळ अस्तित्व धोक्यात आले आहे. मानवाने निसर्गातील विविध घटकांचा आपल्या सोयीसुविधांसाठी मनमानी वापर करून जमिनीचेही प्रदुषण घडवून आणले आहे. रासायनिक खते, औषधे, जमिनिची सतत होत राहणारी धूप यांमुळे जमिनीचे प्रदुषण होण्यास मदत होते. त्यामुळे मानवालाच याचे परिणाम भोगावे लागतात. जमीन मोठ्या प्रमाणावर खारवली गेल्यामुळे विषमुक्त अन्न मिळणेच दुरापास्त झालेले आहे. रासायनिक खतांवर, औषधांच्या फवारणीवर पोसलेले पीक, धान्य खाऊन मानवी अवयव कमजोर होऊ लागले आहेत. शहराशहरांतून निर्माण होणारा मोठ्या प्रमाणावरचा कचरा यांमुळेही जमिनीचे प्रदुषण घडून येते. ज्या घन कचऱ्याचे विघटन घडून येत नाही तो अपायकारकच असतो. त्यामुळे भूमी प्रदुषण रोखले पाहिजे. पंजाबमध्ये गुडगांव या ठिकाणी २०१८-१९ मध्ये प्लाॅस्टिकपासून रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. असे उपक्रम राबविले पाहिजेत असे लेखकाचे स्पष्ट मत आहे.
नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या संदर्भात शेवटचा पाठ आहे. पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो, त्याचे परिणामकारक घटक कोणते, तसेच करावयाच्या उपाययोजना आणि नागरिकांची जबाबदारी याचा सविस्तर परामर्श लेखकाने ‘पर्यावरणाचं पतन’ या पुस्तकात घेतलेला आहे. प्रस्तुत लेखक हे नांदेड जिल्ह्यातील ज्ञानदीप हायस्कूल सावरगाव ता. हदगाव येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अभ्यासक्रमातील गाभा घटक, पर्यावरणविषयक असलेले पाठ्यक्रमातील धडे, पर्यावरणाविषयी जात्याच असलेली ओढ, स्वतंत्र विषय म्हणून पर्यावरणाची आवड, आस्था तसेच पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाचे असंतुलन, त्याचे दुष्परिणाम यांमुळे व्यथित झालेल्या लेखक लोखंडे यांच्या चिंतनाचाच विषय ठरलेला दिसतो. पर्यावरणाचं पतन या पुस्तकाची पाच जून या पर्यावरण दिनानिमित्त ही प्रथमावृत्ती येत असतांनाएकूण २०५ पानांचं पुस्तक नांदेडच्याच राऊत पब्लिकेशनने ते प्रकाशनास सज्ज केलेले आहे. त्यात राजरत्न ढोले यांचे प्रबोधक मुखपृष्ठं, गोकुळ नगर नांदेडच्या मल्टीसर्व्हिसेसची अक्षर जुळवणी आणि मुद्रणकला सामावली आहे. तब्बल अकरा हजार झाडे लावून पर्यावरण चळवळीत अग्रणी ठरलेले हदगाव तालुक्यातीलच तामसा येथील राजुसिंग चौहान यांची पाठराखण संयुक्तिक ठरली आहे.
पुस्तकातील प्रत्येक पाठानंतर रंगित चित्रांनी सजलेले काही संदर्भ लक्षवेधी ठरले आहेत. पण त्यात काही चित्रांची आवश्यकता नव्हती असे वाटते. त्यांनी घेतलेले उपक्रम आणि फोटो पुस्तकात वाचकांचे लक्ष वेधून घेतात. तसेच पर्यावरणाच्या ऱ्हासाचे एक कारण भारतीय उत्सव, परंपरा, तीर्थक्षेत्रे, जत्रा, यात्रा यांना ठरवलेले आहे. मनोगतातही हा मुद्दा आहेच. परंतु या देशात ते पूर्वापार चालत आलेले आहेत. मागच्या काही वर्षांतच पर्यावरणाची समस्या अतितिव्रतेने भेडसावू लागली आहे. पुर्वीच्या काळी विविध सण उत्सव साजरे होत असतांनाही भारत सुजलाम सुफलाम देश होता हे नाकारता येत नाही. कारण याच संस्कृतीतून देवराई या राखून ठेवलेल्या वनांचा, वटपौर्णिमा या सणाचा संदर्भ लेखक स्वतःच देतात. संत तुकाराम महाराजांना आणि राष्ट्रसंत गाडगे बाबांना ही अर्पण पत्रिका समर्पित करतांना भारतीय संस्कृतीतील गौतमबुद्धापासून डॉ. एस. एम. स्वामीनाथन यांच्यापर्यंतचे संदर्भ आलेले आहेत. औद्योगिकरणामुळे होत असलेल्या प्रदुषणाला रोखण्याबाबत संशोधन सुरुच आहे, ही बाब दुर्लक्षिता येत नाही. पृष्ठ क्रमांक ६४ वर मानवनिर्मित धरणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला अशी नोंद करण्यात आली आहे. पण पुढे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने सोननदी प्रकल्प, दामोदर प्रकल्प, हिराकुंड प्रकल्पांचे समर्थन पृष्ठ क्रमांक १२६ वर आले आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व असे लेखक स्वत:च लिहित आहेत तर क्षमा मागता पण चुक काय आहे हा प्रश्न वाचकाला सहजच पडतो.
पुस्तकात काही पाठात लेखकाने अनुभवलेली काही बोलकी उदाहरणे आलेली आहेत. यातून त्यांची पर्यावरणविषयक भावनाप्रधानता लक्षात येते. शेतकऱ्यांनी शेती, शेतीकामासाठी केलेली अवजारांची निर्मिती आणि त्यासाठीची वृक्षतोड यासाठी शेतकरी सर्वस्वी जबाबदार कसे असू शकतात? जंगले नष्ट होण्याची अनेक कारणे आहेत. झाडे तोडलीच आहेत तर आमच्या आज्या, पणज्यांनी ती लावली आणि जोपासलीही आहेत. लेखकाने पुस्तकात विषयाच्या अनुषंगाने काही वृत्तपत्रांच्या आधाराने मांडणी केलेली दिसते. इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके, नेटवरील माहिती, शासन निर्णय हे लेखकाच्या माहितीचे स्त्रोत आहेत. परंतु ही मुद्देसूद मांडणी करीत असताना काही अनावश्यक भाग जोडला गेल्यामुळे अनेक ठिकाणी विषयांतर झालेले आहे. जैवविविधता हा शब्द तर पुस्तकात खूपदा आलेला आहे. ही पुनरुक्ती टाळता आली असती. पर्यावरण हा विषय अत्यंत बहुव्यापक, सर्वसमावेशक असल्यामुळे क्लिष्टही आहे.
पर्यावरण हे स्थलकालाप्रमाणे बदलते. भिन्न भिन्न देशांत, प्रदेशांत एकाच काळात वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरण आढळून येते. पर्यावरण ऱ्हासाचा प्रश्न सावरगाव, तामसा, नांदेड किंवा एखाद्या गावाचा नाही तर तो अख्ख्या विश्वाचा आहे. त्यामुळे पर्यावरणाचा सखोल अभ्यास करुन जागतिक स्तरावर पुन्हा समतोल प्रस्थापित करण्यासाठी चिंतन सुरु आहे. हे पुस्तक पर्यावरण संरक्षण, संवर्धनविचार तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रभावी भूमिका बजावेल अशी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पगारे यांनी मांडलेली भूमिका निःसंशय आहे असे मी इथे नोंदवतो. प्रस्तुत लेखकाने या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकांच्या मनात जी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. थांबतो.
– समीक्षक : गंगाधर ढवळे, नांदेड
मो. ९८९०२४७९५३
————————————————————————————————-
-पुस्तकाचे नांव – पर्यावरणाचे पतनलेखक – के. एस. लोखंडे, नांदेड
पृष्ठे – २०५, प्रथमावृत्ती-२०२०,
पर्यावरण दिनप्रकाशक – राऊत पब्लिकेशन, नांदेड