फुलवळ ग्राम पंचायत च्या वतीने ७० कोरोना योद्धांचा गौरव ;सरपंच बालाजी देवकांबळे यांचा पुढाकार

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

गेली आठ महिन्यापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता सामाजिक भावना जागृत ठेवून कोरोना या संसर्गजन्य विषाणू आजाराला रोखण्यासाठी लढा देणाऱ्या विविध भागातील जवळपास ७० जणांना फुलवळ ग्राम पंचायत च्या वतीने सरपंच बालाजी देवकांबळे यांनी सन्मान चिन्ह , प्रशस्तीपत्र , शाल , पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. असा सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या लोकांचा गौरव करणारी फुलवळ ही तालुक्यातील एकमेव ग्राम पंचायत असेल अशा भावना उपस्थितांनी बोलून दाखवल्या.

माजी सरपंच मारोतराव मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली फुलवळ येथील सांस्कृतीक सभागृहात नुकताच गौरव सोहळा संपन्न झाला. त्यात प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस पी ढवळे , कंधार ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. फिसके , डॉ. प्रदीपसिंह राजपूत , डॉ. वर्षा हात्ते , डॉ. आनंद हात्ते , धोंडीबा मंगनाळे , मुख्याध्यापक बालाजी केंद्रे , बसवेश्वर मंगनाळे , बापूराव मंगनाळे व सरपंच बालाजी देवकांबळे , परमेश्वर मंगनाळे यांची मंचावर उपस्थिती होती.

या गौरव सोहळ्यात आरोग्य विभागातील अधिकारी , आरोग्य सेवक , सेविका , अंगणवाडी कार्यकर्ती , मदतनीस , पोलीस प्रशासनातील अधिकारी , कर्मचारी , गावातील ज्या ज्या तरुणांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली असे तरुण , व वेळोवेळी सकारात्मक बातम्या छापून कोरोना पासून सामान्य माणसाला भयमुक्त केले अशा कंधार व फुलवळ येथील पत्रकारांचा ही यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच बालाजी देवकांबळे यांनी करताना या महामारीच्या काळात माझ्या गावातील जनमानसाला जागरूक करत कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराला एवढे सहजतेने न घेता सतर्कता बाळगत सावधगिरी चा ईशारा देत सावधान करण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून असो का अप्रत्यक्षपणे असो ज्यांनी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचे मनस्वी आभार मानत शासन व प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच कंधार तालुक्यात बाधित रुग्णांच्या यादीत नंबर एक वर आलेल्या फुलवळ गावाला कोरोनामुक्त करू शकलो , दुर्दैवाने काही दुर्घटना ही घडल्या त्याबद्दल दुःख व्यक्त करत कठीण परिस्थिती सावरण्यात आपण यशस्वी झाल्याचे सांगून याकामी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

यावेळी डॉ. वर्षा हात्ते , सागर मंगनाळे , डॉ . प्रदीपसिंह राजपूत , डॉ. एस पी ढवळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वांभर बसवंते यांनी केले तर आभार धोंडीबा बोरगावे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत चे ग्रामविकास अधिकारी , सर्व ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *