नांदेड –
निसर्गातील कमालीच्या मानवी हस्तक्षेपामुळेच पर्यावरणाचे पतन होत असून कोरोना सारख्या विषाणूची निर्मिती त्यातूनच झालेली आहे असे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक गंगाधर ढवळे यांनी केले. ते के. एस. लोखंडे लिखित ‘पर्यावरणाचे पतन’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. काल शहरातील चैतन्य नगर परिसरात असलेल्या पेरियार रामास्वामी वाचनालयात प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक शरदचंद्र हयातनगरकर हे होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व भाष्यकार म्हणून युगसाक्षी लाईव्ह चे संपादक गंगाधर ढवळे, प्रकाशक शिवकुमार राऊत, वन विभागाचे सुनिल आटकोरे, शिक्षणाधिकारी विजय कावळे, नाटककार अशोक हनवते, लेखक के. एस. लोखंडे, छाया लोखंडे, सदानंद सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अक्षरोदय साहित्य मंडळाच्या वतीने या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रतीचे पुष्पपुजन करुन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. लेखकाच्या मनोगतानंतर पर्यावरणाचे पतन या पुस्तकाचे प्रकाशन थाटात पार पडले. डॉ. कमलाकर चव्हाण यांनी पुस्तकातील संपूर्ण आशयाचे मुद्देसूद विवेचन केले. प्रमुख भाष्यकार गंगाधर ढवळे पुढे बोलताना म्हणाले की, वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेल्या गरजा, वाढते शहरीकरण, विषारी वायूंचे उत्सर्जन, जंगलांचा ऱ्हास, जंगलातील वणवे, वाढते तापमान, कचरा, ई-कचरा, प्लास्टिकचा अतोनात वापर आदीमुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे. वाढत्या तापमानामुळे ऋतुमानात बदल झाला आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. जागतिक पातळीवर सर्व देशांकडून याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तथापि याबाबत आपण स्वत: काय करू शकतो याचा आता गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदचंद्र ह्यातनगरकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना पर्यावरणाचे महत्त्व सांगून लेखक के एस लोखंडे यांनी केलेल्या लेखनाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाहीर आ. ग.ढवळे यांनी मानले यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव जोंधळे, थोरात बंधू, भुजंगराव मुनेश्वर, विजय सोनसळे, बंडु थोरात, उषा लोखंडे, सुजाता इंगळे, शांताबाई थोरात, मायाबाई गायकवाड, लक्ष्मीबाई वाठोरे चंद्रकलाबाई कांबळे, सुरेखा लोणे, गौतमी कांबळे, पाटील बाई, चंद्रभागा विनायती, सुप्रिया कांबळे, सुप्रिया पतंगे, गयाबाई कांबळे, शुभांगी कांबळे, सुमेध चौदंते आदींची उपस्थिती होती.