कोरोनाकाळात वृत्तपत्रे कशी डबघाईला आली?

शालेय जीवनात वृत्तपत्रे बंदं पडली तर असा एक निबंधाचा विषय असायचा. हा विषय कल्पनाविस्ताराचा असल्यामुळे विस्तीर्ण भरारी घेत मनाला जे वाटेल ते त्यावेळी निबंधरुपाने कागदावर उतरले गेले. वृत्तपत्रे बंद पडली तर काय होईल याबाबत काही मुद्दे प्रकर्षाने येत असत. वृत्तपत्रे समाजमनाचा आरसा असतात. ते माणसाच्या ज्ञानग्रहणाची भूक भागवितात. जगभरातील इत्तंभूत माहिती ते पुरवितात. ती पूर्णतः विश्वासार्ह असते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक घटनांचे प्रतिबिंब वृत्तपत्रांतून उमटले जाते.

मानवाच्या विविध प्रकारच्या प्रगतीचा स्रोतही वृत्तपत्रे असतात. सकाळच्या चहाबरोबर वर्तमानपत्रे वाचणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला असतो. अशी वर्तमानपत्रे बंद पडली तर ? समाजावर त्याचा काय परिणाम होईल ? समाजाचे काय अवस्था होईल ? बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेल्या मराठी भाषेतील पहिल्या वर्तमानपत्राचे नाव ‘दर्पण’ असे होते. दर्पण म्हणजे आरसा. वर्तमानपत्र समाजजीवनाचा आरसा असतो. मग ते सामाजिक , राजकीय, आर्थिक असो‌ की धार्मिक असो त्याचे पडसाद वर्तमानपत्रांत उमटतात.

वर्षानुवर्षाच्या सहवासाने वर्तमानपत्रात येते, ते सत्यच असते, असे सिद्ध झालेले आहे. वर्तमानपत्रे बंद पडली तर सामान्य माणसाची संपूर्ण सकाळ निरस होऊन जाईल. कारण सकाळी सकाळी गरम चहाच्या घोटाबरोबर पेपर मधील कुरकुरीत बातम्या माणसांना हव्या असतात. ही जुन्या माणसांची चांगली सवय आहे. टीव्ही चॅनल्सच्या भाऊ गर्दीत ज्यांचा संपूर्ण विश्वास केवळ वृत्तपत्रांवर आहे अशा वाचकांना वर्तमानपत्र नसेल तर देश – विदेशातील बऱ्या- वाईट घटना कशा कळणार ? सरकारी ध्येयधोरणे सामान्य माणसापर्यंत कशी पोहोचणार ? वर्तमानपत्रे नसतील तर विविध विषयावरील ज्ञानाचे आकलन वाचकांना कसे होणार ? कोणतीही निवडणूक व्हायची असेल तर सुरूवातीपासून घोषणा, प्रक्रिया, रिंगणात किती उमेदवार आहेत ? त्यांचे पक्ष कोणते ? त्यांचे कार्य काय ? त्यांची भावी धोरणे काय ? याचा धांडोळा वर्तमानपत्र घेतात. आपल्याकडच्या निवडणुकांच्या वेळी वृत्तपत्रांना स्वतंत्र पाने ठेवावी लागतात. सोशल मिडियाद्वारे आजची घटना आजच समजत असली तरी उद्या येणारी वृत्तपत्रे आवडीने वाचणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे.

आजच्या झटपट आॅनलाईनच्या जमान्यातही शिक्षण, आरोग्य, साहित्य, कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान, मनोरंजन, प्रबोधन आदी क्षेत्रातले विश्र्वसनीय महत्व वृत्तपत्रांनी अबाधित ठेवले आहे. परंतु आजकाल वृत्तपत्रे चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. लघुवृत्तपत्रे तर फारच डबघाईस आली आहेत. काहीतर बंदच पडली आहेत. वर्तमानपत्राचा इतिहास पाहिला तर असे आढळते की, वेळोवेळी वर्तमानपत्रांनी माणसाची संस्कृती घडवली आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात वर्तमानपत्रांनी सामान्य माणसांत राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवले. वृत्तपत्रांनी जनमानसात राष्ट्रीयत्व, एकतेची भावना रुजवली. तसेच तत्कालीन समाजसुधारकांनी रुढी परंपरांवर टीका करण्यासाठी वृत्तपत्रांचेच माध्यम निवडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीचा प्रारंभ मूकनायक या पाक्षिकाची मुहूर्तमेढ रोवूनच केला होता. चळवळीला मुखपत्र नसेल तर त्याची अवस्था पंख तुटलेल्या पक्षासारखी होते, असे त्यांचे मत होते.

कोणताही नवा विचार करायचा असेल, नवी मांडणी करायची असेल तर लेखकांना, संशोधकांना, अभ्यासकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना वर्तमानपत्राचाच आधार घ्यावा लागतो. आजची वृत्तपत्रे ही उद्याची रद्दी नसतात. जीवनाच्या मूल्यसंरचनेचे त्या वर्तमानाने स्थापित केलेले महत्वाचे भूतकालीन दस्ताऐवज असतात. पूर्वीच्या काळी मॅट्रीकचा निकाल वृत्तपत्रांतून छापून येत असे. त्यात आपण पास की नापास याबाबत त्यावेळची मुले आपला क्रमांक शोधायची. लाॅटरीचे क्रमांकही छापून येत असत.

आजही काही प्रमाणात वृत्तपत्रांतून छापून येतात. नोकरीविषयक जाहिराती, जाहीर प्रगटने, इतर जाहिरातींमुळे अनेकांची आयुष्ये घडविली गेली आहेत. वर्तमानपत्र नसतील तर नवीन संशोधन, वैज्ञानिक प्रगती, नवीन ग्रंथांची ओळख, वाचकांना कशी होणार ? वर्तमानपत्रे बंद पडली तर समाजाची प्रगती खुंटेल. समाजाची वैचारिक वाढ जिथे आहे तिथे थांबेल. बदलत्या काळात वृत्तपत्रे बदलली. तीही आॅनलाईन झाली. इलेक्ट्रॉनिक मिडियाशी स्पर्धा करु लागली. वृत्तपत्रांच्या ई-आवृत्त्या निघू लागल्या.

वृत्तपत्रांचा खप वाढू लागला. टीआरपी वाढवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या मिडीयाला प्रिंट मिडियाने धोबीपछाड दिली. मोजक्याच, सत्य आणि विश्र्वसनीय अशा कागद पिवळा पडलेल्या बातम्यांची कात्रणं ऐतिहासिक दस्तावेज, संदर्भ बनलेली आहेत. आजपर्यंत कितीही संकटे आली तरीपण प्रत्यक्षात वृत्तपत्रे कधीही बंद‌‌ पडली नाहीत.

कोरोनाच्या महामारीमुळे वृत्तपत्रे डबघाईस आली. संपूर्ण मानवी जीवनच प्रभावित झाल्यामुळे त्याचा परिणाम वृत्तपत्रांवरही दिसून आला. पेपर टाकणारा मुलगा अनेक घरी जातो. अनेक लोकांच्या हातातून पेपर येतात. तो कोरोनाचा संसर्ग फैलावू शकतो या कारणांमुळे लोकांनी घरी येणारी वृत्तपत्रे बंद केली. ती बंद करावीत, पेपरला हात लावू नये, घेतला तरी तो एकदिवस वाळत ठेवावा असे संदेश सोशल मीडियावर सातत्यानं फिरु लागले होते.

त्यामुळे वृत्तपत्रे वितरक आणि विक्रेते यांनी पेपर बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. मार्च महिन्यात आठ दिवस ती बंदच होती. जेंव्हा वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा सर्वत्र परसली होती तेंव्हा मात्र युएस सेंटर्स फॉर डिझिझ कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिव्हेंन्शन यांच्या मतानुसार, जिवंत पेशींच्या बाहेरील बहुतेक पृष्ठभागावर कोरोना विषाणू जास्त काळ जिवंत राहत नाही, असे स्पष्ट करण्यात आले. विषाणूशास्त्रज्ञांनीही स्पष्ट केले की, जेव्हा आपण वृत्तपत्राला स्पर्श करता तेव्हा संसर्ग पसरण्याची शक्यता जवळजवळ नसते.

कोझिकोडे येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटल मधील डॉक्टर अनुपकुमार यांनी असे म्हटले होते की, वृत्तपत्र हे कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत धोकादायक असणे ही चुकीची बाब आहे. मात्र जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी वृत्तपत्र वाचत असल्यास कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. याचे कारण वृत्तपत्र नव्हे तर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी उभे असणे हे आहे . तसेच एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या नुसार, वृत्तपत्रावर कोरोना व्हायरसचे विषाणू अधिक काळ टिकत नाहीत. त्यामुळे विविध डॉक्टरांनी त्यांच्या मतानुसार, कोरोना हा वृत्तपत्रामुळे पसरत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

सध्याच्या दिवसांत वृत्तपत्रे ही उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवली जातात. तसेच वृत्तपत्र छपाईमध्ये मानवी हस्तक्षेप नसतोच असेही सांगण्यात आले आहे. पण कोरोनाच्या परिस्थितीत वाचकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, वितरक तथा विक्रेत्यांनी मास्क, सॅनिटाईझरचा वापर सातत्याने करावा आणि सरकारने दिलेले आदेश सर्वांनीच पाळल्यास त्याच्या वाढत्या प्रादुर्भावाला कुठेतरी आळा बसेल. तसेच कोरोना पसरु नये याबाबतची माहिती वृत्तपत्रात अधिकृतरित्या छापली जाते. अशाप्रकारे वाचकांना चोहूबाजूने विश्वास दिल्यानंतर लोकांनी वृत्तपत्रे विकत घेऊन वाचण्यास प्रारंभ केला.

वृत्तपत्रे वाचकांच्या हातात येऊन पडण्याची प्रक्रिया जटीलच असते. पहाटे सहा वाजता वाचायला मिळू शकणारे ताजे वृत्तपत्र इतक्या सहजासहजी आलेले नसते. पत्रकारांच्या मेहनतीपासून ते रात्री उशिरापर्यंत छपाई करुन सकाळी विभाग, जिल्हा, तालुका गावनिहाय वितरण करुन विक्रेत्यापर्यंतचा तो प्रवास असतो. या प्रवासात विहित वेतन तथा मानधनावर उपजिविका चालवणारे अनेकजण असतात. एक वृत्तपत्र दहा ते वीस रुपयांत तयार होते असे म्हटले जाते. ते ग्राहकांना दोन ते सहा रुपयांपर्यंत हाती येते. त्यात सर्वांचा खर्च भागवावा लागतो. दर्जेदार छपाई, कागद, रंगीत आवृत्ती यावरुन त्याची आकर्षकता ठरते तर स्थानिक ते वैश्विक विश्वासार्ह बातम्या तसेच अग्रलेख, विचारमंथन, प्राधान्यक्रम, उपक्रमशीलता, खप यावरून वृत्तपत्रांचा दर्जाही ठरतो.

लोकशाहीतील चौथा स्तंभ मानला गेला तरीही वृत्तपत्र चालविणे हा एक प्रतिष्ठेचा व्यवसाय मानला जातो. संपादक, प्रतिनिधी यांना समाजातील सर्वच स्तरांतून ती बहाल केली जाते. असे असतांना सरकारच्या याबाबतचे धोरण वृत्तपत्रमालकांना अनुकूल नसल्याचे दिसते. त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. दररोजच्या वृत्तपत्रनिर्मितीचा खर्च झेपेनासा झाला की ते आपोआप बंद पडते. लघुवृत्तपत्रधारक व्यावसायिकांचे तर हालच होत आहेत. कोरोनाच्या कहरामुळे ते खूपच अडचणीत सापडले आहेत. वृत्तपत्रांच्या खर्चाबरोबरच या संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित असलेल्या लोकांच्या उपजिविकेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पत्रकार आणि जाहीराती हा या व्यवस्थेचा मुख्य कणा आहे. यासाठी वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती मिळण्याचा दर्जा मिळणे अत्यंत आवश्यक असते. तसेच इतर वैयक्तिक तथा प्रासंगिक स्वरुपाच्या जाहिरातींमुळे वृत्तपत्रांचा पुढील प्रवास सुखकर होतो. यामध्ये छोट्या जाहिरातीसुद्धा मोलाची भूमिका पार पाडत असतात.

जगातील अनेक देशांच्या एकुणच अर्थव्यवस्थेला घेरलेल्या कोरोनाने सर्वसामान्यांचीही अर्थव्यवस्था बिघडून टाकली आहे. आधीच टाळेबंदीने जर्जर झालेल्या अर्थव्यवस्थेला सावरणे जिकिरीचे झाले आहे. अशातच वृत्तपत्रे छोटी झालेली आहेत. पाने कमी झालेली आहेत. काही वृत्तपत्रे तर निघतच नाहीत. याचे कारण बाजारात कागदाची उपलब्धता नसल्याचे सांगितले जाते. कोरोनामुळे छपाई बंद असून पीडिएफ स्वरुपातील वर्तमानपत्रे आॅनलाईन पद्धतीने वाचावित असा सल्ला देण्यात आला होता.

देशभरात भाषानिहाय लहानमोठी शेकडो वृत्तपत्रे चालतात. ती सद्या एकतर आॅनलाईन वाचावयास मिळतात किंवा निघतच नाहीत. अनेक वृत्तपत्रांच्या आवृत्त्या बंद करण्यात आल्या आहेत. या संकटामुळे छोट्या वृत्तपत्रांची कंबरच मोडली आहे. अ, ब, क श्रेणीत असलेल्या वृत्तपत्रांना जाहिरातींचाच आधार असतो. यापूर्वी मिळालेल्या शासकीय जाहिरातींची देयकेही वर्षानुवर्षे प्रलंबित असतात. ते वेळेवर आणि एकरकमी मिळणे गरजेचे असते. कोरोनाकाळ सुसह्य व्हावा म्हणून समाजातील विविध घटकांसाठी अनेक उपाययोजना राबवून त्यांचे आजचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होत असतांना शासकीय जाहिरातींचे पॅकेज कोणत्याही एजन्सीमार्फत न देता शासकीय यंत्रणेमार्फतच देण्यात यावेत अशी मागणी मराठी पत्रकार संघाने नुकतीच केली आहे.‌

कोरोनाकाळात विक्री थांबली असून छपाई मात्र सुरु आहे. याच काळात कोणत्याही आर्थिक स्त्रोतांशिवाय वृत्तपत्रांचा खर्च करणे म्हणजे मालकांनी नाहक भुर्दंड सोसल्यागत आहे,असेही त्यांचे म्हणणे आहे.‌ जाहिरातींची रक्कम मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्यामुळे अनेक मोठ्या वृत्तपत्रांना विभागनिहाय आवृत्त्या काढणे परवडेनासे झाले आहे. देशभरात बऱ्याच वृत्तपत्रांच्या बाबतीतही हेच घडत आहे. अर्थव्यवस्थाच संकटात असल्यामुळे लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या वणव्यात वृत्तपत्रांच्या कार्यालयातील कर्मचारीही होरपळत आहेत. त्यांना पगार देणेही अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडत चालला आहे.

दुष्काळातही एवढी परिस्थिती उद्भवली नव्हती त्यापेक्षा भयंकर परिस्थिती सद्यस्थितीत आहे. ही वृत्तपत्रांच्या अस्तित्वाचीच लढाई आहे. जी काही वृत्तपत्रे प्रकाशित होत आहेत त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.‌ या काळात वाचकांचे आणि जाहिरातदारांचे पाठबळ आवश्यक आहे. यामुळे वृत्तपत्रे तग धरून राहू शकतील. ही एक नागरिकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. या व्यवस्थेचा आर्थिक कणाच मोडला तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा डोलाराही कोसळेल!

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय

१९.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *