लातूर पुणे हायवेवरील बार्शी जवळच्या पांगरी या गावातील एक कुटुंब ७२ च्या दुष्काळात मध्ये पुण्यात जाते… तिथंच पती-पत्नी मिळेल ते काम करून आपल्या पाच मुलांना पोसतात… या पाच मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा म्हणजेच दलित युवक आंदोलनाचे आजचे नेते कॉम्रेड सचिन भाऊ बगाडे…!
पुण्यात कॉम्रेड शरद पाटील यांच्या विचाराने प्रभावित झालेले कॉम्रेड किशोर जाधव, काॅ. किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी या सर्वांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटना स्थापन केली होती. या संघटनेमध्ये ऐन तारूण्यात सचिन बगाडे सहभागी झाले. सत्यशोधक विद्यार्थी संघटना ही शरद पाटलांच्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची एक शाखा होती. त्यामुळे शरद पाटलांच्या तालमीत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते घडत होते. सचिन बगाडे यांनाही ती संधी मिळाली. शपांचा सहवास म्हणजे एका ऊर्जादायी महान व्यक्तिमत्त्वाचा सहवास.
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या शिबिरांमध्ये कॉम्रेड शरद पाटलांचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यातूनच सचिन बगाडे यांसारखे तरुण तयार झाले. भांडवलशाही, ब्राम्हणशाही आणि पुरुषसत्ताक व्यवस्था ही शोषणाची केंद्रे नष्ट करण्यासाठी आयुष्यभर पूर्णवेळ कार्यकर्ता बनण्याची शपथच शपांसमोर सचिन बगाडे यांनी घेतली. पुण्यात राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊनही फक्त सामाजिक क्रांतीसाठी नोकरी न करता पूर्णवेळ कार्यकर्ता बनण्याची शपथ सचिन बगाडे यांनी खरी करून दाखवली.
२००३ साली सचिन बगाडे यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली दलित युवक आंदोलन ही चळवळ उभारली.
या संघटनेच्या माध्यमातून पुण्यात अण्णा भाऊ साठे स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर सत्यशोधक लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे स्मारकासाठी आंदोलन उभे केले. जातवर्ग स्त्रीदास्यांताक चळवळींसाठी योगदान देत मार्क्स- फुले-आंबेडकर वाद दलित वंचित, शोषित समाजात रुजविण्यासाठी सचिन बगाडे यांनी जिवाचे रान केले. अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण वर्गीकरणाचा लढा त्यांनी उभा केला. राजकीय भूमिका म्हणून अॅड्. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. बाळासाहेबांचा आरक्षण वर्गीकरणाला पाठिंबा मिळविला.
गणपत भिसे, अशोक उफाडे, रामचंद्र भरांडे , अजिंक्य चांदणे आणि सचिन बगाडे ही तरुण पिढी मातंग आणि तत्सम उपेक्षित वंचितांना फुले-आंबेडकर मार्क्सचे क्रांतिकारी विचार देण्याचे आज कार्य करीत आहे.
राजकारणाबरोबरच सांस्कृतिक चळवळीमध्येही सचिन बागडे यांचे मोठे योगदान आहे. गेल्या चार वर्षांपासून पुण्यामध्ये अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव ते भरवितात. त्याचबरोबर मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत तीन साहित्य- संस्कृती संमेलनेही त्यांनी घेतलेली आहेत.
महामानवांच्या विचारांना कृतीत उतरविणाऱ्या आणि शरद पाटलांचा वैचारिक वारसा चालविणाऱ्या या बहाद्दर कॉम्रेडचा आज वाढदिवस…! कॉम्रेड सचिन बगाडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप मंगल कामना…!!
- डॉ. मारोती कसाब.