कोविड डायरी

भाग 1
कोरोनाच्या संगतीत

गेल्या सहा महिन्यापासून सर्वत्र एकच चर्चा असायची ती म्हणजे कोरोनाची. सुरुवातीला सर्वांनी खूप दक्षता बाळगली. पण आता रुग्ण वाढले असताना बेफिक्री जास्त जाणवत आहे. लॉक डाऊन च्या काळात 52 दिवस लॉयन्सचा डबा हा उपक्रम चालू होता. प्रत्यक्ष अनेक ठिकाणी मी जायचो. बाहेरून ज्या ज्यावेळी आलो त्यावेळेस आंघोळ करायची. बाहेर कुठे मास्क शिवाय फिरण्याचे स्मरणात नाही. स्वतःला कोरोना होऊ नये याची दक्षता घेत होतो, पण आपल्या परिसरातील नागरिक सुरक्षित राहावे यासाठी दोन-तीन वेळा त्यांची देखील आरोग्य तपासणी शिबिर घेऊन केली. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना जवळचे नातेवाईक नसल्यामुळे त्याचीसुद्धा कोरोना टेस्ट करून घेतली. घरात स्वस्त बसण्याचा पिंड नसल्यामुळे कोणाच्याही मदतीला बाहेर पडायचो.

सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप च्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाची नांदेड महानगरची जबाबदारी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी माझ्यावर सोपवली. मोदींचा 70वा वाढदिवस असल्यामुळे सत्तर कार्यक्रम घ्यायचा चंग आम्ही बांधला. या आठवड्याभरात दररोज 8-10कार्यक्रम व्हायचे. प्रत्येक ठिकाणी जिल्हाध्यक्षां सोबत आवर्जून उपस्थित राहायचो मी. आज कार्यक्रम संपले असता प्रवीणजींच्या कार मध्ये आमची चर्चा झाली सुरू. संघटन सरचिटणीस विजय गंभीरे यांनी माहिती दिली की, आमचे सहकारी अशोक पाटील धनेगावकर हे पॉझिटिव झाले. दोन दिवसापासून माझे अंग थोडेसे दुखत असल्यामुळे कोरोना टेस्ट करावी अशी शंका व्यक्त केली. तुमची प्रकृती ठीक दिसत आहे तुम्हाला काही होत नाही भाऊ असे दोघांनीही सांगितले. तरीपण रिस्क नको असा विचार करून महापालिकेचे कोविड अधिकारी डॉ. सचिन सिंगल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी चार वाजता नाना नानी पार्क ला यायला सांगितले.

बरोबर चार ला नाना नानी येथे पोहोचलो. दोन-तीन काम घेतले असल्यामुळे टेक्निशन झाले होते ओळखीचे. त्यामुळे काही अडचण उद्भवली नाही. डॉ. सिंघल यांनी आधीच सूचना दिली असल्यामुळे ऑंटीजैन चाचणी घेण्यासाठी मला खुर्चीवर बसवले. नाकात सूक्ष्मशी काडी घालून पाच दहा सेकंद हलवले. शिंक आल्यासारखे वाटले. पण संयम धरला शिंकलो नाही मी. पंधरा मिनिटा नंतर रिपोर्ट कळवतो असे टेक्निशन रिजवान ने सांगितले. काय तो सोक्षमोक्ष एकदाच लागेल असा विचार करून तिथेच थांबलो.

हा पंधरा मिनिटांचा काळ माझ्यासाठी पंधरा तासाचा जात होता. एक मन म्हणायचे की, तू सर्व काळजी घेतली असल्यामुळे रिपोर्ट निगेटिव्हच येणार. दुसऱ्या मनात विचार दाटू लागला पॉझिटिव आले तर काय करायचे. आणि मग विचारचक्र काही थांबायचे नाव घेत नव्हता. दवाखान्यात बेड भेटेल का?
घरच्या सर्वांची टेस्ट करावी का? जर आजार झाला तर आपण यातून सुखरूप बाहेर पडू का? असे असंख्य विचार डोक्यात घोळू लागले. पंधरा मिनिटांनी परत गेलो
तिथे. दहा वेगवेगळ्या काचेच्या पट्ट्यावर टेस्टिंग चालू होती. प्रत्येक पट्टीवर नंबर टाकलेला होता. टेक्निशन माहिती दिली की, ज्यांच्या पट्टीमध्ये दोन लाल रेषा उमटतील तो पॉझिटिव. एक लाल रेषा सगळ्याच पट्ट्यात दिसत होती. फक्त दोन पट्ट्यात दोन लाल रेषा दिसत होत्या. त्या पट्ट्या वरील नंबर पाहून हादरलोच एकदम. माझ्या चार नंबरच्या पट्टीवर उमटल्या होत्या दोन लाल रेषा. ज्या गोष्टीला मी भीत होतो ही गोष्ट घडली होती. या क्षणापासून मी पॉझिटिव्ह झालो.
( क्रमशः)


भाग-2
कोरोनाची भीती कुटुंबीयांच्या मनात

पॉझिटिव झाल्याचे सांगून टेक्निशियन ने विचारले की कोणाला सोबत आणले आहे का? टेस्ट करायला मी एकटाच गेलो होतो. आता वाटू लागले की कोणाला आणले असते तर बरे झाले असते.मनात दुसरीच भीती वाटू लागली घरातील आणखी कोण कोण पॉझिटिव निघणार ? डॉ. सिंघल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले घरच्यांना बोलावूनन घ्या त्यांची टेस्ट करुया. छोट्या भावाला फोन केला आणि वडिलां सहित सर्वांना आणण्यास सांगितले. नऊ महिन्याची नात अभिका माझ्याच अंगा खांद्यावर खेळायची. घरातून बाहेर पडताना तिला कडेवर घेऊन शिवशक्तीनगर येथील पुरातन असलेल्या सोन्या मारुती चे दररोज दर्शन घ्यायचो. आजही सकाळी तिला सोबत दर्शनाला नेले असल्यामुळे ती पॉझिटिव्ह येते की काय अशी शंका येत होती. पत्नी, मुलगी ,नात ,नातू ,वडील व छोटा भाऊ असे सहा जण तपासणीला आले.

मला पाहून त्या सर्वांचा चेहरा रडवेला झाला होता. माझ्या लक्षात येणार नाही अशा त-हेने त्यांनी चेहरा फिरवला. वडिलांचे वय होते 87. त्यांची व अभिकाची वाटत होती जास्त काळजी . सगळ्यांची नावे लिहून त्यांची टेक्निशियन ने टेस्ट घेण्यात केली सुरुवात. 9 महिन्याच्या अभिकावर ही वेळ आली म्हणून तुटत होता जीव. छोटा भाऊ राजेशने सांगितले की, त्याला काही त्रास होत नाही कशाला कट करू. मी बळेच राजेश ला सुद्धा टेस्ट करण्यासाठी बसवले. नाकात छोटी काडी घालून सर्वांची केली तपासणी. रिझल्ट साठी परत पंधरा मिनिटाचा अवकाश. हा प्रतिक्षेचा काळ फारच विचित्र. त्यामुळे मी आणि राजेश तिथे थांबून बाकी सगळ्यांना घरी पाठवले.

मनात विचारांचे कोलाहल होते
माजले. नाही नाही ते विचार डोकावून जाऊ लागले. सकारात्मक विचार मनात यावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागलो. वेळ जाता जात नव्हता. टेक्निशियन ने सांगितले कि, एक जण पॉझिटिव्ह आला आहे. अरे बापरे, वडील किंवा छोटी अभिकाच असणार असे वाटू लागले. पण झाले उलटेच. राजेश या छोट्या भावाचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला होता. खरं तर त्याला काहीच त्रास होत नव्हता. फक्त माझ्या आग्रहाखातर त्याने टेस्ट दिली होती. पण तोच पॉझिटिव्ह निघाला.

आता त्याचा पत्नी व मुला मुलीची टेस्ट करणे गरजेचे होते. संध्याकाळचे सात वाजत आले होते. पंधरा मिनिटात सर्वांना तपासणीसाठी आणतो असे डॉक्टरांना सांगितले. त्यांच्यावर किती त्राण पडत होता ते समजत होते. पण इलाज नव्हता. त्या तिघांची चाचणी केल्यानंतर तिघे निगेटीव्ह असल्याचे पाहून जीव भांड्यात पडला. मी आणि राजेश ने घरी न जायचा निर्णय घेऊन इतर काय काय पर्याय उपलब्ध आहेत याचा तपास सुरू केला. माझ्या डॉक्टर असलेला भाचा डॉ. विक्रमसिंह चौहान याला तिथेच बोलावून घेतले. नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात तो कोविड ड्युटी करत होता. पण त्या दवाखान्यात देखील बेड उपलब्ध नव्हते. जास्त काही त्रास होत नसल्यामुळे होम काँरनटाईन व्हा असा सल्ला काहींनी दिला. पण घरी लहान बाळ असल्यामुळे घरी न थांबण्याचा आधीच निश्चय केला होता. त्या अनुषंगाने एकच पर्याय उपलब्ध होता तो म्हणजे पंजाब भवन चा. घरून आमच्या दोघांचे कपडे व इतर साहित्य मागवून घेतले. माझा पुतण्या धनराजसिंह ठाकूर यांने दोन महिन्यापूर्वी कोविड झाला तर घेण्यासाठीच्या काही औषधी आणून दिल्या होत्या. मी कशाला असे त्याला म्हटल्यावर त्याने घरात औषधी पडून राहू द्या असे सांगितले होते. त्या गोळ्या सुद्धा सोबत घेतल्या.विशेष काही त्रास जाणवत नसल्यामुळे अंबुलन्स न करता आम्ही दोघे निघालो ॲक्टीव्हाने एनआरआय कोविड सेंटर कडे.
( क्रमशः)


भाग-3

कोरोना आणि आक्सीमीटर

रात्री साडेसातच्या सुमारास एनआरआय कोविड सेंटर ला पोहोचलो. गेटवर कोणीही नव्हते. कुठे चौकशी करावी याबाबतही काही सूचना लिहिलेल्या नव्हत्या. थोडा वेळ वाट पाहिली कोणी येतो का बाहेर म्हणून. काही अंदाज लागत नव्हता त्यामुळे गेलो आत. आत मध्ये कोणाचीही हालचाल जाणवत नसल्यामुळे डाव्या बाजूला नो ऍडमिशन असा बोर्ड दिसत होता तिकडे गेलो. एका रूमचा उघडा दरवाजा बघून आत डोकावलो. पलंगावर एक जन पहुडलेला दिसला. मला पाहताच त्याने प्रश्न केला इकडे कस काय आलात. मी त्याला सांगितले की ,मी पॉझिटिव्ह आहे आणि कुठे जायचं हे माहीत नाही. तेव्हा त्याने बोटाने इशारा केला . निघालो मी त्या दिशेने.

एका ठिकाणी तीन चार मुली बसलेल्या होत्या. बहुतेक नर्सेस असाव्यात असे वाटले. त्यांना सांगितले मी आणि माझा भाऊ पॉझिटिव झालो आहे. एकीने सांगितले की प्रकृती चांगली असेल तर घरीच थांबा. होम कोरनटाइन करून देते तुमची फाईल. मी नकार दिल्यानंतर त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितले. पाच-दहा मिनिटे गेल्यानंतर मी त्यांना माझा परिचय दिला. लगेच त्यांच्यात बदल जाणवला. तिथे असलेल्या ऑक्सीमीटर मध्ये बोट टाकून ऑक्सिजन लेव्हल तपासले.ऑक्सिमीटरच्या डिस्प्ले पॅनलवर आपल्याला पाहायला मिळतो तो आकडा म्हणजे आपल्या शरीरातील सॅच्युरेटेड ऑक्सिजनचं प्रमाण असतं. समजा ऑक्सिमीटरच्या डिस्प्ले पॅनलवर ९७ टक्के असं रिडींग आलं याचा ढोबळ अर्थ असा तुमच्या शरीरात ९७ टक्के होमोग्लोबीन हे ऑक्सिजन वाहून नेतं आहे. जेव्हा कोरोनाचा संसर्ग होतो आणि आपली प्रतिकारशक्ती त्याचा सामना करू शकत नाही, तेव्हा हा आजार बळावतो ज्यामुळे ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिनची मात्रा कमी होते आणि आपल्याला ऑक्सिमीटरवर दिसणारं रिडींग कमी होत जातं आणि म्हणून कोरोना झालेल्या व्यक्तीने पल्स ऑक्सिमीटर वापरणं, दिवसांतून विशिष्ट वेळा ठरवून रिडींग घेणं, एका रीडिंगवर निर्णय न घेता, रीडिंगचा पॅटर्न बघणं .निरोगी लोकांमध्ये पल्स ऑक्सिमीटर चे रिडींग हे ९५ ते ९८ टक्के असं असतं. जर रुग्णाच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण 92 -94 टक्क्यांच्या खाली असेल तर डॉक्टरांशी बोलून, रुग्णाला मग इस्पितळात भरती करण्याची गरज आहे की नाही हे ठरविले जाते. जो पर्यंत शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण हे ९५ च्या वर आहे, श्वास घेण्यास विशेष अडचण नसेल तर कोरोना योग्य वैद्यकीय उपचारांनी घरच्या घरी बरा होऊ शकतो. माझा ऑक्सिजन रेट 96 तर छोटा भाऊ राजेशचा 98 होता. त्यामुळे विशेष काळजी करायची आवश्यकता नव्हती.

आम्हाला तीन चार रूमच्या चाव्या त्यांनी दिल्या. जिथे आवडेल तिथे राहा असे सांगितले. राजेश ने चारही रुमची तपासणी केली. पहिल्या मजल्यावर गॅलरी असलेली रूम त्याला आवडली. बाकीच्या चाव्या परत केल्या. रूम मध्ये सर्व सामान नेऊन ठेवले. गेट जवळ जेवणाची पाकिटे ठेवलेली होती. खरेतर घरून डबा येणार होता पण म्हटलं आज इथले जेवण करावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल. वरण-भात-भाजी-पोळी चे पाकिट घेऊन रूम मध्ये आम्ही परत आलो. कितीही नाही म्हटलं तरी मनावर तणाव आलेला होता. स्वच्छ हात पाय धुऊन जेवण केले. जेवण खूप चांगले होते असेही नाही तर अन्नपदार्थांचा निकृष्ट दर्जा देखील नव्हता.

एनआरआय कोविड सेंटरच्या खोल्या अतिशय प्रशस्त होत्या. एक डबल बेड,एक सिंगल बेड , एसी, अटॅच बाथरूम सर्वकाही टॉप टीप होते. रूम मध्ये आम्ही दोघेच असल्यामुळे काही अडचण नव्हती. दहा दिवस राहावे लागणार असल्यामुळे जागा तर चांगली मिळाली ही समाधानाची बाब होती. पलंगावर पडल्या पडल्या दिवसभराचा घटनाक्रम एखाद्या चल चित्रपटाप्रमाणे नजरेसमोर जात होता.
( क्रमशः)


भाग-4

सर्वसुविधांचे एनआरआय कोविड सेंटर

सकाळी जाग आली तेव्हा आठ वाजत होते. दररोज घरी दहा-बारा वृत्तपत्र वाचायची सवय असल्यामुळे इथे काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. मोबाईलवर आलेले पेपर चे पीडीएफ वाचले. रूमच्या बाहेर फेरफटका मारला. दिलीपभाऊ असा आवाज ऐकून मागे पाहिले तर जिल्हा परिषदेचे माजी उपकार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे हे मॉर्निंग वॉक करत होते. गेल्यावर्षी अमरनाथ यात्रेला कपाळे पती-पत्नी सोबत होते. त्यामुळे त्यांच्यासोबत घरच्यासारखे संबंध निर्माण झालेले होते . गेल्या आठ दिवसापासून ते सपत्नीक इथेच राहत होते. काही होत नाही निवांत राहा असा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्याकडून बरीच माहिती मिळाली.

जिल्हा जिल्हा प्रशासन ,शासकीय रूग्णालय,आयुर्वेदीक रूग्णालय ,महानगर पालीकाच्या संयुक्त विद्यमानाने
श्री गुरू गोविंदसिंघजी एन.आर.आय. यात्री निवास तात्पुरते कोवीड सेंटर म्हणून चालविते.
इमारतीच्या बाहेर तात्पुरती पोलीस चौकी करण्यात आली असून त्यामध्ये 24 तास पोलीस तैनात असतात. ही
इमारत तिन मजली असून एकूण रूम दोनशे वीस उपलब्ध आहेत. त्यापैकी फक्त तीस-चाळीस रूम मध्ये सध्या पेशंट राहतात.एका शिफ्टमध्ये दोन बीएएमएस डाॕक्टर, एक नर्स ,एक ब्रदर असे कर्मचारी कार्यरत आहेत. सहा तासाची त्यांची ड्युटी असते.साफ सफाई करिता महापालीका तर्फे सहा कर्मचारी नियुक्त गेलेले आहेत.सकाळी आठ वाजता चहा ,सकाळी दहा व संध्याकाळी सहा वाजता जेवण दिले जाते. त्याचप्रमाणे आयुष्य मंत्रालयाने सुचवल्याप्रमाणे दररोज
सकाळी नऊ व दुपारी पाच वाजता आयुर्वेदिक कॉलेज चे कर्मचारी येऊन गरमागरम आयुर्वेद आयुष काढा देतात.कोवीड रूग्णास काही त्रास असल्यास डाॕक्टर गोळ्या देतात व आॕक्सीजन मशीन ने लेवल तपासतात.इमारती मध्ये असलेल्या भव्य गार्डनचा उपयोग रुग्णांना फिरण्या करता होत आहे.

इमारती मध्ये चक्कर मारत असताना स्वच्छता आढळून आली. पण बरेच व-हंड्यातील लाईट चालू असल्याचे आढळून आले. फिरत फिरत त्यांची बटने शोधून लाईट बंद केली. तोपर्यंत काढा आला होता. गरमागरम काढा पिला. काढा मध्ये काहीतरी गोळ्या दिसत होत्या. त्या गिळायच्या की कसे हे माहीत नसल्यामुळे तसेच सोडून दिल्या. नंतर कळाले ते मनुके होते. संध्याकाळी मनुके फेकून न देता खायचा निश्चय केला. स्नानादी सोपस्कार आटपून गणपती स्तोत्र ,हनुमान चालीसा, शिवलीलामृताचा नित्य पठणाच्या ओळी म्हटल्या. प्रसन्न वाटत होते. कोरोना झाल्या तरी
काही त्रास जाणवत नव्हता. फक्त घरापासून दूर असल्यामुळे रुखरुख वाटत होती. छोटा भाऊ राजेश सोबत असल्यामुळे बराच विषयावर आम्ही चर्चा केली.

कोरोना पॉझिटिव आल्यानंतर ज्यांना काही त्रास जाणवत नाही अशांना एन.आर.आय कोविंड सेंटरमध्ये ठेवतात. यापेक्षा थोडीशी लक्षणे आढळली तर त्यांची रवानगी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये केली जाते. आणि जे पेशंट अतिशय सिरियस असतील त्यांच्यासाठी महापालिके समोरील श्री गुरू गोविंद सिंगजी रुग्णालय आणि विष्णुपुरी च्या मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपला पेशंट कुठे ठेवला आहे यावरून पेशंट ची स्थिती लक्षात येते. एन.आर.आय कोविंड सेंटरमध्ये सर्व काही मोफत आहे. कोवीड पेशंटची इच्छा असेल तर त्याला स्वतःच्या घरी होम काँरनटाईन म्हणून राहता येते.

काल रात्री इथले जेवण विशेष आवडले नसल्यामुळे घरून जेवणाचा डबा मागितला. साडेअकराच्या सुमारास जेवण केले. थोडीशी शतपावली करून दिवसभर आरामच केला. संध्याकाळी प्राणायाम करून गार्डन मध्ये फेरफटका मारला. दिसेल त्यांना कसे आहात अशी चौकशी केली. सर्वजण समाधानी दिसून आल्यामुळे आपण या ठिकाणी राहण्याचा निर्णय योग्य घेतला म्हणून खुश झालो.
(क्रमशः)


भाग-5

खा. चिखलीकरांनी दिला धीर

मोबाईलची बेल वाजत होती. पाहिले तर काय खा. चिखलीकर साहेबांचा फोन आला होता. बोलताना त्यांनी काही काळजी करू नका. कोणतीही आवश्यकता लागली तर अर्ध्या रात्री फोन करा. या शब्दात त्यांनी धीर दिला. स्वतः पॉझिटिव्ह असून देखील त्यांनी दाखविलेल्या आत्मीयते बद्दल मनाला समाधान वाटले. आत्मविश्वास वाढला. योग, प्राणायाम, वाकिंग, वाफ घेणे, काढा पिणे यासारख्या अत्यावश्यक बाबी पूर्ण होईपर्यंत दुपारचे बारा वाजले.

माझा भाचा डॉ. विक्रमसिंह चौहान आमची प्रकृती पाहण्यासाठी एनआरआय मध्ये आला. सर्व काही व्यवस्थित होते. तरी देखील त्याने सल्ला दिला की, सिटीस्कॅन करून घ्या. मला आवश्यकता वाटत नव्हती. राजेश ने तर स्पष्ट नकार दिला. माझे वय सत्तावन्न असल्यामुळे रिस्क नको म्हणून बळेबळेच सिटीस्कॅन साठी पाठवले. आमच्या एन्जॉय स्विमिंग ग्रुपचे सदस्य डॉक्टर राजेश अग्रवाल यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये गेलो. गर्दी बरीच होती. ओळखीमुळे पहिला नंबर लागला. शर्ट बनियन काढून सिटीस्कॅन मशिन मध्ये मला झोपवले. टेक्निशियन ने सूचना दिल्या. श्वास घ्या म्हटलं की घ्यायचा. रोकुन धरा म्हटलं की श्वास थांबून ठेवायचा. क्षणभर मनात भीती वाटली, श्वास रोखून ठेवल्यानंतर श्वास घ्यायची सूचना टेक्निशन द्यायला विसरला तर कसे होईल. पण तसे काही झाले नाही. साधारणता तीन-चार मिनिट माझी स्कॅनिंग झाली. पण तो तीन चार मिनिटांचा काळ खूप जास्त वाटला. एक तासांनी रिपोर्ट मिळणार असल्यामुळे तिथे थांबलो नाही.

ऑंटीजेन टेस्ट रिपोर्ट एखाद्यावेळेस चुकीचा येत असल्यामुळे कोरणा ची खात्री करण्यासाठी सिटी स्कॅन करणे आवश्यक आहे. एक मन म्हणत होते की मला कोणतेही लक्षण नसल्यामुळे सिटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल येईल. एक तासाच्या प्रतीक्षेनंतर डॉ. अग्रवाल यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुमचा सीटीएसएस 25 पैकी 3 आहे. कोरोनाची अत्यल्प लागण झाली असली तरी दवाखान्यात उपचार घेतलेला बरा. परत मनात चलबिचल सुरू झाली. प्रकृतीत म्हणत होती दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही पण पण वैद्यकीय सल्लाही महत्त्वाचा होता. डॉक्टर भाच्या सोबत बोलून तो काम करत असलेल्या श्री हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निश्चय केला.डॉ. मनिष देशपांडे आणि डॉ .संजय कदम यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी त्वरित बेड उपलब्ध करून दिला. छोट्या भावाला सोडून दवाखान्यात जायला मन तयार होत नव्हते. त्यामुळे डॉ. विक्कीला दोन दिवसा नंतर पाहू असे सांगितले. पण त्याने आग्रह धरला आणि राजेशने सुद्धा जाण्यास सांगितले.

सध्या नांदेडमध्ये बरीच कोविडची प्रायव्हेट हॉस्पिटल निघालेली आहेत. पण घरातली व्यक्ती डॉक्टर असल्याने श्री हॉस्पिटल ची निवड केली. दुपारी दोनच्या सुमारास गणेश नगरच्या श्री हॉस्पिटल ला पोहोचलो. वॉचमनला सांगितले. मी पॉझिटिव्ह आहे. मला ॲडमिट व्हायचं. थोड्यावेळाने डॉ. मुजाहिद खान आले. त्यांचा आणि माझा पूर्वीच राजकारणात संबंध आलेला असल्यामुळे त्यांनी तातडीने हालचाल केल्या. तिसऱ्या मजल्यावरील डीलक्स रूम मध्ये माझी रवानगी करण्यात आली. रूम तशी सुसज्ज होती. पण एका रूम मध्ये तीन बेड होते. वैभव जोशी हा माझा मित्र एका बेडवर तर दुसऱ्या बेडवर गंगाखेडचे अजय देशमुख होते. मी ऍडमिट झालो आणि वैभवला सुट्टी मिळाली. समोरच्या रूम मध्ये मनपाचे स्थायी समिती सभापती अमितसिंह तेहरा होते. आणखी दोघे तिघे ओळखीचे निघाले. सर्व कर्मचारी पीपीई किट घालून वावरत होते. त्यामुळे वातावरणात आपोआपच गंभीरपणा आला होता. एनआरआय मध्ये एकदम मोकळे मोकळे वाटत होते पण येथे अवघडल्यासारखे जाणवत होते. पण इलाज नव्हता. आलिया भोगासी असावे सादर या उक्तीप्रमाणे मनाची तयारी केली.

भाग-6

रेमडेसिविरः एक वरदान

डॉ .गणेश पावडे,डॉ .सोहेल ,डॉ राहुल जाधव
हे आपसात चर्चा करून मला रेमडेसिविर इंजेक्शन द्यायचे की नाही हे ठरवत होते.
श्री हॉस्पिटल मध्ये एक गोष्ट अतिशय चांगली होती की कोणताही निर्णय सर्व तज्ञ डॉक्टर एकत्रित चर्चा करून ठरवायचे. सहा इंजेक्शनचा कोर्स द्यायचा निश्चित झाले. सध्या
रेमडेसिविरची कोविडमध्ये मध्ये चलती आहे. इतका डिमांड आला आहे की 5400 रुपयाचे एक इंजेक्शन वीस पंचवीस हजारापर्यंत विकल्या गेले . केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गंजेवार यांना फोन करून मी सर्व कल्पना दिली. त्यांनी काळजी करू नका असे सांगितले. येथील मेडिकल वाला सुमित कडे काही स्टॉक उपलब्ध होता. पहिल्या दिवशी दोन इंजेक्शन घ्यायची होती. मी गुगल पे ने पैसे ट्रान्स्फर करतो म्हटलं तर ती सुविधा उपलब्ध नव्हती. राजू मोरे ने नगदी 10800 देऊन दोन रेमडेसिविर माझ्यासाठी बुक केले. छोट्या सलाईनच्या बाटलीत मिसळून इंजेक्शन इन्चार्ज सिस्टर वंदना चव्हाण यांनी दिले.

रेमडेसिविर मुळे कोविडची तीव्रता कमी होते. खरातर याचा शोध इबोला साठी करण्यात आला होता. पण कोविडच्या लढाईत सर्वात प्रभावशाली हत्यार ठरले आहे. शासनाने जीआर काढून याची किंमत चोवीसशे केली असली तरी अद्याप पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सध्या रेमडेसिविर साठा बऱ्यापैकी उपलब्ध आहे.

श्री रूग्णालयात दर दोन तासाला मावशी आशाबाई देवकरे येऊन रूम स्यानिंटायझर करून जायची. डॉ. विक्रम चौहान,डॉ. रुद्रेश गवळी, डॉ. ज्ञानेश्वर भालेराव,
डॉ. मोहसीन आपली ड्युटी चोख बजवायचे.
पेशंट सोबत आत्मीयतेने वागायचे. इन्चार्ज ब्रदर मिलिंद,सिस्टर मनीषा संगोळगीरकर हाक मारली की हजर असायचे. पेशंट किती वेळा गरम पाणी मागितले तरी
वॉर्डबॉय राहुल वाघमारे कंटाळा करायचा नाही.
रिसेप्शनिस्ट शिल्पा जोंधळे ,मॅनेजर रशीदभाई,
उमाकांत असे सर्वजण मिळून व्यवस्थित व्यवस्थित कारभार करत होते.डॉ. मनिष देशपांडे आणि डॉ .संजय कदम ,डॉ. प्रल्हाद कोटकर या त्रिमुर्तीच्या व्यवस्थापनात काही कमी पडत नव्हते.

माझ्यावर उपचार चालू झाले.लोमो हे इंजेक्शन पोटात देण्यात आले. त्याचप्रमाणे पॅन
आणि एमपीएस या इंजेक्‍शनचा डोस देखील दिला. टॉनिक च्या वेगवेगळ्या गोळ्या खाल्ल्या . ईसीजी नॉर्मल आला. रक्ताची तपासणी केली असता त्यातही काही विशेष अडचणीचे न आल्यामुळे चिंतेची बाब नव्हती.
शुगर बीपी नॉर्मल होते. ऑक्सी मीटर वर नेहमी 98 पेक्षा जास्त रीडिंग येत होते. पल्स रेट सत्तरच्या आसपास असायचे. जितका पल्स रेट कमी तितके चांगले. नरेंद्रभाई मोदी यांचा पल्स रेट नेहमी 50 ते 55 असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता विलक्षण वाढलेली आहे.

ज्या रुग्णांना घरचा डबा मिळू शकत नाही त्यांच्यासाठी इथे सशुल्क जेवणाची व्यवस्था आहे. घरून माझ्यासाठी डबा आणण्याची जबाबदारी मन्मथ स्वामी ने उचलली. छोटा भाऊ दिनेश, दीपक तसेच माझे मित्र अनिल चिद्रावार हे एका फोनवर धावून येत होते. डीलक्स रूम मध्ये कलर टीव्ही ची सोय असल्यामुळे आणि वेळही भरपूर असल्यामुळे आयपीएलचे मॅचेस पाहण्यात वेळ घालवत होतो. रूम बाहेर असलेल्या व्हरांड्यात वेळ मिळेल तेव्हा पाय मोकळे करून येत होतो. प्राणायाम, गरम वाफ घेणे यामध्ये खंड पडू दिला नाही .एवढे सर्व असून देखील मन काही रमत नव्हते. सारखी घरची आठवण यायची. देशोन्नती मध्ये लेखमाला रोज प्रसिद्ध होत असल्यामुळे चौकशी करणाऱ्यांची कमतरता नव्हती. पण सारखा फोन वाजत असल्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब नको म्हणून फोन बंद ठेवावा लागला. किमान सहा दिवस तरी हॉस्पिटलमध्ये राहणे भागच होते. त्यामुळे ऍडजेस्ट करण्यावाचून पर्याय नव्हता.
( क्रमशः)


भाग-7

एक लाखापेक्षा अधिक बील

रेमडेसिविरच्या सहा इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाल्या असल्यामुळे व बाकी सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे श्री हॉस्पिटल मधून दुपारी दोनच्या सुमारास डिस्चार्ज मिळणार होता.रूममेट असलेले अजय देशमुख व इतर काही ओळखीच्या रुग्णांना मी आज जाणार असल्याचे सांगितले . पाच दिवसाच्या कालावधीत डॉ. विक्रम चौहान या माझ्या भाच्यामुळे हॉस्पिटल मधील सगळ्या स्टाफचा मी मामा झालो होतो. प्रत्येका सोबत खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी बँड लावून व पुष्पवृष्टी करून मला निरोपाचा सुखद धक्का दिला. यावेळी डॉ. गणेश पावडे, डॉ . मुजाहिद खान, डॉ. ज्ञानेश्वर भालेराव ,डॉ. मोहसीन पठाण, डॉ. रुद्रेश गवळी हे आवर्जून उपस्थित होते. शिवप्रसाद बोडके, विजय वाघमारे, शैलेश रेडेवाड, संतोष महाजन या ब्रदर मंडळींनी माझी प्रकृती सुधारण्याच्या वेगाला टाळ्या वाजवून दाद दिली. सुमित बोधारे ,राज कांबळे, सुनील बलखंडे हे सुद्धा माझ्या आनंदामध्ये सहभागी झाले.माझ्या मोबाईल कवर वर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा माझ्या पाठीवर हात ठेवलेला फोटो एकाने पाहिला. आणि त्याने आश्चर्याने विचारले की ” मामा तुमची मोदीजी सोबत भेट झाली होती का?” मी होकार दिल्यानंतर स्वप्नाली जोंधळे, मनीषा संगरोळीकर, अश्विनी कुरोडे, प्रियंका कांबळे या सिस्टर्सनी माझ्या सोबत सेल्फी काढल्या. पीपीई कीट घातलेल्या त्या सर्वजणी वेगळ्याच भासत होत्या. सात आठ तास पीपीई कीट घालने वाटते तितके सोपे नाही .पीपीई कीट घामाने ओला झाला त्याचा काही उपयोग होत नाही .

पाच दिवसाचे दिवसाचे हॉस्पिटल, मेडिकल व रेमडेसिविर इंजेक्शनचे बिल एक लाखापेक्षा जास्त झाले होते. मी गेल्या पंचवीस वर्षापासून मेडिक्लेम पॉलिसी चे प्रीमियम भरतो पण आतापर्यंत आजारी न पडल्यामुळे क्लेम करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पहिल्यांदाच पॉलिसी काढण्याचा फायदा घेण्याची वेळ आली होती. मेडिकल पॉलिसी काढण्यासाठी बरेच जण ऐपत असून देखील टाळाटाळ करतात. पण अशा आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा फायदा होतो. कोविडमुळे तर प्रकृतीचे सर्व नियमच बदलल्याने यापुढे मेडिक्लेम पॉलिसी काढण्यासाठी नागरिक पुढे येतील अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. ज्याप्रमाणे खाजगी रुग्णालयात सशुल्क का होईना पण व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते तशी ट्रीटमेंट जर शासकीय रुग्णालयात देखील निशुल्क मिळू लागली तर खऱ्या अर्थाने आपल्या स्वातंत्र्याचा नागरिकांना फायदा होईल. तसेच कोविडची आपत्कालीन परिस्थिती पाहून राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोविडचा समावेश करून गरीब जनतेला दिलासा दिला पाहिजे.

मला घेण्यासाठी राजू मोरे, छोटा भाऊ दिनेशसिंह, पुतण्या रोहित, डॉ. सोमेश जयमेत्रे,डॉ.अविनाश कोलते हे आले होते. सर्व सामान व्यवस्थित घेतले की नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. क्यारनटाईन कालावधी पूर्ण न झाल्यामुळे परत एकदा एनआरआय कोविड सेंटरला जाण्याचा निर्णय घेतला. कारने आम्ही तिथे पोंहचलो. आमच्या पूर्वीच्या रूम मध्ये छोटा भाऊ राजेश एकटाच होता .त्याची प्रकृती ठणठणीत असल्यामुळे मनाला समाधान वाटले. श्री हॉस्पिटलच्या बंदिस्त वातावरणातून एनआरआयच्या मोकळ्या वातावरणात आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटले. एनआरआय सेंटरमध्ये पाहिजे तितकी स्वच्छता दिसत नव्हती. गेल्या आठ दिवसात रूम स्वच्छ करायला तर फक्त एकदाच स्वच्छता कर्मचारी येऊन गेल्याचे भावाने सांगितले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या परिस्थितीची कल्पना असणे आवश्यक आहे. त्यांनी पाहिजे तितके लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर कोविड सेंटरमध्ये कमी लक्षण असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती बिघडायला वेळ लागणार नाही.
( क्रमशः)


भाग-8

सकारात्मक परिणाम

कालच्या देशोन्नतीच्या लेखात अस्वच्छतेचा उल्लेख वाचून अतिरिक्त जिल्हाधिकारी कुशालसिंह परदेशी आणि मनपा उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी आदेश दिल्यामुळे स्वच्छतेची तातडीने अंमलबजावणी झाली. एनआरआय कोविंड सेंटरच्या कॅम्पसमधील गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक करत होतो. बरेच जण ओळखीचे दिसत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तणाव दिसत होता. तेवढ्यात माइक मधून आवाज आला. चहासाठी सर्वांनी एकत्र यावे. चहा घेण्यासाठी जन्मल्यानंतर माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली. सर्वांना सांगितले की चहा झाल्यानंतर दहा-पंधरा मिनिटे एकत्र बसून गप्पा मारुया.

चहा पिल्यानंतर ग्राउंड मध्ये सर्वांना सोशल डिस्टन्स ठेवून बसायला लावले. प्रत्येकाने मास्क घातलेला असल्यामुळे काळजीचे कारण नव्हते. प्रथमतः माझा परिचय करुन सर्वांना दिला. ताठ बसण्याच्या सूचना देऊन ओंकार करण्यास सांगितले. त्यानंतर कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी , भसरिका हे प्राणायाम चे प्रकार सर्वांकडून करून घेतले. त्यानंतर टाळ्या वाजवून हास्य योगा करायला लावला. अर्धा तास झाला तरी कोणीही जागेवरून उठले नाही. त्यानंतर प्रत्येकाला आपला परिचय देण्यास सांगितले. प्रत्येकाचा परिचय दिल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवत होते. परिचय देत असताना काहीजणांनी कबूल केले की, आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच चाळीस-पन्नास लोकांपुढे बोलत आहोत. अनेकांनी आपले कोरोनाचे अनुभव शेअर केले. काहीजण भावनातिरक आले होते. एक दोन विनोदी किस्से सांगून तणाव हलका केला. एक तास कधी गेला ते कळाले देखील नाही. संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी परत एकत्र जमायचे ठरले.

या एका तासानत संपूर्ण वातावरण बदलून गेले. इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच आम्ही तणाव मुक्त झाल्याचे अनेकांनी कबूल केले. काहींचा तर आज क्यारनटाईन चा शेवटचा दिवस होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही आल्यामुळे आता इथेच रहावेसे वाटते. आणखी दोन दिवस माझा इथे मुक्काम असल्याचे त्यांना सांगून शुभेच्छा दिल्या. सर्वांचा निरोप घेऊन रूमवर आलो.

पाच वाजता समोसा कचोरी हा गेम सुरुवातीला मी घेतला. सर्व जण वय विसरून त्यात सामील झाले. एकेक व्यक्ती बाद झाला की, त्याने शिक्षा म्हणून गाणे तरी म्हणायचे, भजन तरी करायचे, विनोद सांगायचा किंवा जे आपल्याला जमेल ते सर्वांसमोर करून दाखवायचे. सुरुवातीला बुजणारे सर्वजण हळूहळू खुलू लागले. अशा काही गमतीजमती होऊ लागला की, हसून हसून सर्वांची पोट दुखू लागली. दोन तास जबरदस्त एन्जॉय केला सर्वांनी.

रात्री निवांत बसलो होतो. मोबाईलवर इंटरनॅशनल कॉल आला. समोरची व्यक्ती चक्क मराठीतून बोलत होती. त्याने सांगितले की, अमेरिकेतील अटलांटा जॉर्जिया येथून बोलत असून त्याने व्हाट्सअप वर दैनिक देशोन्नती मध्ये प्रसिद्ध होणारे माझे रोजचे लेख वाचलेले आहे. मला नवल वाटले. सविस्तर बोलणे झाले तेव्हा कळाले की, माझे पुण्याचे जावई सतेजसिंह राजपूत हे त्यांच्या एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये माझे लेख टाकत असतात. मूळचे कोल्हापूरचे असणारे संदीप हिर्डेकर हे सध्या अमेरिकेत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना माझ्या धैर्याचे कौतुक करावेसे वाटले म्हणून त्यांनी मुद्दामून फोन लावला होता. प्रत्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह असताना न घाबरता दररोज दैनंदिनी लिहिणे आणि त्याला एखाद्या वृत्तपत्राने प्रसिद्धी देणे याचे त्यांना नवल वाटले. त्यांच्या मते रोजच्या रोज एखाद्या पॉझिटिव्हचे आत्मकथन पहिल्यांदाच होत असेल. कारण कोरोना झाला म्हटलं की माणूस अर्धा गळून जातो त्यात लिहिणे तर दूरच राहिले. अमेरिकेतील माणसे कोविड मुळे पॅनिक होत असताना एक भारतीय म्हणून संदीपला माझा अभिमान वाटला आणि त्याने माझे मनापासून कौतुक केले. इंग्रजीतून हे लेख सोशल मीडियामध्ये टाकू का अशी विचारणा त्यांनी केली. माझी काही हरकत नसल्याचे मी त्यांना सांगितले. अशा रीतीने देशोन्नती सातासमुद्रापार गेला.

या लेखमालेमुळे शेकडो वाचकांनी माझ्या खुशालीची चौकशी केली. काही मदत लागली असल्यास निसंकोच पणे सांगा असा आग्रह धरला. प्रत्येकाचे एकच म्हणणे होते की, तुम्ही लोकांसाठी सतत समाजसेवेत व्यस्त असता. धार्मिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे तुम्हाला काही होणार नाही. त्यामुळे सर्व हितचिंतकांचे व देशोन्नती परिवाराचे मनापासून आभार मानून उद्या स्वगृही परतायचे असल्यामुळे या ओळींनी सर्वांची रजा घेतो.

पाँझीटीव्ह आहे समजल्यानंतर लांब पळून जाणारे,
निगेटिव्ह झाल्यावर फुलं घेऊन टाळ्या वाजवायला येतात,
ही समाजाची रीतच आहे….

म्हणून जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं,
तेव्हा जिंकणे गरजेचे असते…
आयुष्याची प्रत्येक लढाई
जिंकूनचं पूर्ण करायची असते…

( समाप्त)

लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर नांदेड
94218 39333

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

वाचकांची प्रतिक्रिया

दिलीप भैय्या, यह जानकर अति प्रसन्नता हो रही है कि आप स्वस्थ हो गए और घर जा रहे हैं , बहुत-बहुत शुभकामनाएं। किंतु एक आदत सी हो गई थी आपके लेख को पढ़ने की और इंतजार तो रहता था कि आज क्या अनुभव बताएंगे। आप एक ऐसे इंसान हो कि एक बार आपके साथ जो जुड़ जाता हैं वह आपको कभी नहीं भूल सकता, हम अपनी जिंदगी में करोड़ों लोगों से मिलते हैं , बहुत अधिक लोगों को भूल भी जाते हैं लेकिन आपका स्वभाव बिल्कुल ही भिन्न है आप स्वयं ही सब से मिलकर उन्हें अपना बना लेते हैं, सभी को हंसाते हैं और जो बहुत कम बात करते हैं, अर्थात शर्माते या डरते हैं उन्हें आप ” निर्भीक”बनाते हैं और सब की बातें या शिकायतें बड़े ध्यान से सुन कर उसका पर्याय निकालते हैं, निष्पक्ष, निस्वार्थ भाव से सभी से प्रेम पूर्वक व्यवहार करते हैं, सबकी भावनाओं की कदर करते हैं, आप इन सभी मानवीय गुणों से युक्त हो, आप जहां भी जाओगे वहां के वातावरण को “अल्हादित” बना दोगे अर्थात आपमें सकारात्मक ऊर्जा बहुत है और हमेशा बनाए रखना । आप कम लोगों को जानते होंगे , लेकिन आपको हजारों लोग जानते हैं जिन्हें आप नहीं जानते। जैसे कि,” फूलों की सुगंध दिखाई नहीं देती लेकिन चारों दिशाओं में फैलती है ,उसी तरह आपके कर्तुत्व के कारनामे सभी और फैल जाते हैं, जिस तरह आपका ” देशोन्नति ” का लेख अमेरिका तक पहुंच गया आप हमेशा सामाजिक कार्य करते हैं , समाज के भलाई की सोचते हैं, जितना हो सके अच्छा ही करते हैं, ऐसे व्यक्ति का भगवान कभी बुरा नहीं कर सकतें।” भगवान आपको हमेशा स्वस्थ्य एवं दीर्घायु रखे यह प्रार्थना करते हैं। मेरे विचारानुसार ” आप ऐसे विशाल हृदयरुपि सागर हो, जिसमें समस्त मानव समुदाय के लिए प्यार भरा है , आप समाज को अपना परिवार मानकर उसकी भलाई के लिए सदैव कार्यरत रहते हो। ” मानव कल्याण के लिए किया जाने वाला कार्य ही सबसे बड़ी” पूजा” है और इस कार्य को करने वाला व्यक्ति “कर्मयोगी ” और ” धर्म -पुरुष” कहलाता है, जो अॅड. दिलीप ठाकुर है और वे अतुल्य है ।
” वसुध्येय कुटूम्ब कम् “के
भाव आप में दिखाई देते हैं।

-प्राचार्या स्नेहलता जयस्वाल हैदराबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *