अयोध्येतील श्रीराम मंदिर करोडो लोकांची आस्था
अयोध्येतील श्रीराम मंदिर करोडो लोकांची आस्थाअयोध्येतील श्रीराम मंदिर देशातील करोडो लोकांच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. याच श्रद्धेने १९९२ मध्ये बाबरी पाडली. आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की ती जमीन रामलल्लाचीच होती. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला राजकीय आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यादृष्टीने तिथे राम मंदिराची उभारणी होणे साहजिक आहे. हा हिंदुत्ववादाचा आणि हिंदुत्ववादी यांच्या मानसिकतेनुसार हा राष्ट्रीयत्वाचाही मुद्दा आहे. कोरोनाकाळात म्हणजे त्यामुळेच चिघळत्या परिस्थितीत राममंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे काय या शरद पवारांच्या विधानाला वा त्याद्वारे विचारल्या गेलेल्या प्रश्नाला काही अर्थ उरत नाही. अयोध्येत मस्जिदही बनेल आणि पुढे मागे उत्खननात मोठ्या प्रमाणावर बुद्ध मुर्त्या सापडल्याने तिथे बुद्ध विहाराची निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र राममंदिराचे आज प्रकर्षाने विरोधक नसले तरीही जे सौम्यपणाने विरोधकाची भूमिका घेतील त्याला भाजप असंख्य पत्रे लिहून त्याद्वारे सांगतील की आजच्या परिस्थितीत राममंदिराची आवश्यकता आहे. ‘मंदिर वही बनायेंगे’ या राष्ट्रव्यापी आणि कट्टर राष्ट्रवादी घोषणेने देशभरातील चैतन्य आणि राममंदिराची आस्था जागृत ठेवली. तद्वतच आता सर्वच जातीधर्माच्या लोकांना राममंदिराच्या उभारणीकरीता होत असलेल्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेणे ही बाब कोरोनाकाळाच्या संचारबंदीतही राष्ट्रव्यापी, लक्षवेधी आणि जगाने दखल घ्यावी ही श्रीरामप्रेमी लोकांची मनिषा आहे.
गेल्या अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडात राम हा राजकारणाचाच मुद्दा होता. दंगली उसळल्या पण शांत झाल्या. मात्र राजकारण तापत राहिले. हा प्रवासही फार मोठा आहे. अनेक संत,महंत, आखाडे यांच्या विश्वासाला मोदी सरकार पात्र ठरले आहे. भारतभर मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या देशवासियांच्या भावनेचा आदर करीत अनेक वर्षांपासून पिचत पडलेला प्रश्न निकालात निघाल्याने सरकारचे पारडे जडच भरले आहे हे मान्यच करावे लागेल. विरोधकांचा विरोध केवळ विरोधासाठी असेल हे स्पष्टपणे दिसून येत असेल तर समर्थक त्याची पर्वा न करता या मंदिर निर्माणाच्या कार्यात समाजातील विविध घटकांना सहभागी कसे करुन घेता येईल ह्याकडेच लक्ष पुरवित आहेत. हे देशाच्या घरी पवित्र कार्य संपन्न होत आहे. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला निमंत्रणे दिली जात आहेत. समरसतेच्या दृष्टीने हे पाऊल असेल, हा राजकारणाचा मुद्दा नसेलही परंतु लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भक्तीभाव निर्माण करण्याचाही प्रयत्न आहे. देशभरातील लाखो करोडो लोकांचे लक्ष तिकडे लागलेले असेल. देशातील आणि जगातील मिडियाचे प्रतिनिधी मंदिर निर्मितीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असतील. ते भाजपाच्या समरसतावादी भूमिकेला प्रकर्षाने मांडतील देशभरातील निमंत्रणासोबतच वक्फ बोर्ड, समाजसेवक पद्मश्री मोहम्मद शरीफ, बाबरी मशीद खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांनाही निमंत्रण दिले गेले हा त्याचाच एक भाग मानल्या जात आहे.
बुधवारी होणाऱ्या राममंदिराच्या भूमीपुजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. शहराच्या सीमा सील करून संचारबंदी आणि सुरक्षित वावराचे नियम कडकपणे पाळणे आवश्यक आहे. त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचे हे आहे की, मर्यादेपेक्षा जास्त निमंत्रणे गेलेली नाहीत आणि लोक जमा होणार नाहीत. मात्र शहराच्या ८४ कोस परिसरात भजन, पूजन, अनुष्ठान, होमहवन, अनुष्ठान असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी जवळपास आठ हजार पवित्र स्थळांहून माती आणि जल आणण्यात येणार आहे. हा पुजनाचा आणि श्रद्धेचा भाग असला तरी त्याहीपेक्षा सामाजिक समरसतेचा भाग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थान महूची माती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगावची किंवा बोधगया येथूनही माती व पाणी घेऊन जाण्याचे किंवा तत्सम अनेक ठिकाणाहूनही घेऊन जाण्याचे ठरले असेल तर मंदिर उभारणीनंतर एका नव्या समरस समाजाची निर्मिती होईल असा संदेश भारतभर जाईल अशी आशा हिंदुत्ववादी संघटनांना आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड