जागर ज्ञानाचा;
परिचय :
श्री समाधान शिकेतोड ( ९४२१०९८१३०),
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) उस्मानाबाद येथे Teacher Educator व Language Pedogogy Expert
• समाधान शिकेतोड हे उपक्रमशील,चिंतनशील अध्यापक आहेत.विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सातत्यानं ते प्रयोगशील असतात. त्यांना २०१५-२०१६ सालचा महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.ते मराठी विषयासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य अभ्यासमंडळाचे सदस्यही आहेत.महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सदस्यही आहेत.
• विविध शैक्षणिक मासिके, वर्तमानपत्रे यामधून ते शैक्षणिक विषयावर सातत्यानं लेखन करत असतात.लहान मुलांसाठी कथा, कविता लिहितात. विविध राष्ट्रीय,राज्यस्तरीय चर्चासत्रे यामध्ये सातत्यानं सहभागी होत असतात. मराठवाडा साहित्य परिषदेचे ते आजीव सभासद असून विविध साहित्य संमेलनात ते सक्रीय सहभागी असतात.’माझा विद्यार्थी’ व ‘पोपटाची पार्टी’ ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.ते एक उत्कृष्ट ब्लाॅगर असुन ‘शिक्षण संवाद’ या ब्लॉगवर नियमितपणे शैक्षणिक लेखन करत असतात.
• स्वतःची शाळा लोकसहभागातून समृद्ध केलेली आहे.लोकसहभागातून शाळा ई-लर्नींग केली.मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले.मुलांच्या अभिव्यक्तीच्या विकासासाठी रचनात्मक कार्य केले.मुलांसाठी काव्यलेखन,कथालेखन कार्यशाळा घेतल्या.मुले कथा,कविता लिहू लागली.मुलांच्या मूलभूत क्षमता व अध्ययन निष्पत्ती प्राप्त व्हाव्यात यासाठी वर्गातील वातावरण अध्ययन समृद्ध बनविले.
• नांदेड जिल्हा परिषदेत कार्यरत असताना सीमावर्ती भागातील मुलांना बोलीकडून प्रमाण भाषेकडे आणण्यासाठी त्यांनी बोलीभाषा-प्रमाणभाषा शब्दकोश तयार केला. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी,समृद्धीसाठी काम करत आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी साहित्य अकादमीचे अध्यक्ष यांना पत्र लिहण्याचा उपक्रम राबविला होता. मुलांनी अध्यक्ष, साहित्य अकादमी दिल्ली यांना पत्रे लिहली होती.वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.
• शासनाच्या शाळा सिद्धी, स्वच्छ महाराष्ट्र विद्यालय, मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे.विविध अभ्यासदौरे केलेले आहेत.
• शिक्षकांच्या, अधिकाऱ्यांच्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण मोड्यूल, घटकसंच निर्मिती करत असतात.
सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) उस्मानाबाद येथे Teacher Educator व Language Pedogogy Expert म्हणून काम पाहत आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बल्लाळ, हाडोंग्री या शाळांमध्ये मुलांसोबत काम करत असताना मुलांच्या भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी प्रयोगशील शिक्षक समाधान शिकेतोड यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केलेली आहे. सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद या ठिकाणी भाषा विषयाचे विषय सहायक म्हणून काम करताना मुलांच्या भाषा शिक्षणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत.
● नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प :
● बोलीभाषा प्रमाणभाषा शब्दकोश : नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात मुलांसोबत काम करत असताना मुलांना बोलीभाषेकडून प्रमाणभाषाकडे घेऊन जाण्यासाठी बोलीभाषा- प्रमाणभाषा या शब्दकोशाची निर्मिती केली. पाठ्यपुस्तकातील पाठ बोलीभाषेत रूपांतरीत करून मुलांना अध्ययन अनुभव दिले. त्यामुळे मुलांना त्यांच्या घरच्या भाषेकडून माध्यमभाषेकडे जाण्यासाठी सोपे झाले.त्यामुळे मुलांची उपस्थिती वाढली.मुलांची गुणवत्ता वाढण्यास मदत झाली.
● हस्तलिखित तयार करणे : मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्य विकासासाठी मुलांसाठी काव्यलेखन कार्यशाळा, कथालेखन कार्यशाळा घेण्यात आल्या. दरवर्षी मुलांच्या सर्जनशील लेखनाचे हस्तलिखित तयार करण्यात आले.यामुळे मुले लिहती झाली.मुलांच्या कविता वर्तमानपत्रांमधून प्रकाशित होऊ लागल्या.
● पत्रलेखन उपक्रम : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाडोंग्री या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या अध्यक्षांना पत्रे लिहली.
● बालकुमार दिवाळी अंक : मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी. मुले वाचनाने समृद्ध व्हावीत यासाठी दरवर्षी दिवाळी मध्ये मुलांना बालकुमार अंक भेट दिले जात होते. दिवाळी अंकाचे वाचन करून त्यावर चर्चा आयोजित केली जात होते.
● काव्यलेखन कार्यशाळा : मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास व्हावा यासाठी कविता कशी लिहावी. कविता लेखनाची वेगवेगळे प्रकार याबद्दल शाळेतील मुलांची कार्यशाळा घेतली.त्यांना किशोर मासिकातील बालकविता वाचून दाखवल्या. किशोरचे अंक वाचयला दिले. त्यानंतर मुले छान छान कविता लिहू लागली मुलांच्या कविता वेगवेगळ्या वर्तमानपत्र, मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या.
● लोकसहभागातून शाळा समृद्धी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाडोंग्री या शाळेचा विकास लोकसहभागातून करण्यात आला. शाळेत ई-लर्निंग,शालेय बाग, वर्गातील वातावरण अध्ययन समृद्ध व्हावे, यासाठी वाचन कोपरा,लेखन कोपरा,अभिव्यक्ती फलक तयार करण्यात आला. लोकसहभागातून हॅडवाॅशस्टेशन तयार करण्यात आले. या बाबी लोकसहभागातून निर्माण करण्यात आल्या. यामुळे मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळायला मदत झाली.
● स्वच्छता दूत : स्वच्छता दूत या उपक्रमामुळे मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागण्यास मदत झाली त्याचबरोबर आपल्या कुटुंबांमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जाते की नाही याबद्दल माहिती जमा करणे. माहितीचे विश्लेषण करणे. या बाबी मुले करू लागली. त्यामुळे कुटुंबांमध्ये स्वच्छतेच्या नियमांची जनजागृती करता आली.
● ग्रामीण बोली भाषा शब्दकोश : मराठी भाषेच्या समृद्धी व अभिवृद्धीसाठी मराठी भाषेतील शब्दांचे संवर्धन व्हावे यासाठी ग्रामीण बोली भाषा शब्दकोशाची निर्मिती करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये अनेक जुनी साधने नष्ट होत चाललेली आहेत. त्या साधनांच्या संदर्भातील शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उदा. ‘बैलगाडी’ या साधनासंबंधित शेकडो शब्द मुलांनी शोधले. अशा शब्दांचे संकलन करून ग्रामीण बोली भाषा शब्दकोश मुलांसोबत तयार केला.
● ज्ञानी मी होणार : मुलांच्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी दर आठवड्याला मुलांची सामान्य ज्ञानावर आधारित एक चाचणी आयोजित केली जात होती.शाळेच्या व्हरांड्यातील फलकावर विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानाचे रोज नवीन दोन प्रश्न दिले जायचे. हे प्रश्न गाव, तालुका, जिल्हा, इतिहास, भूगोल,चालू घडामोडी यावर असत. मुलांना यामुळे अवांतर वाचन करण्याची आवड निर्माण झाली.
● माझं पुस्तक : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाडोंग्री या शाळेत ‘माझं पुस्तक’ हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता तिसरीतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः कथा कविता विनोद संवाद गोष्टी लिहून स्वतःचं माझं पुस्तक तयार केलेलं होतं. त्या पुस्तकाचे मुखपृष्ठही मुलांनी तयार केलेलं होतं. त्यामुळे मुलांच्या अभिव्यक्ती क्षमतेचा विकास झाला.
● मुलांसोबत पुस्तक तयार करणे : मुलांच्या अभिव्यक्ती क्षमतेचा विकास व्हावा. यासाठी मुलांसोबत पुस्तक तयार करणे हा उपक्रम उस्मानाबाद शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक १८ या शाळेत राबविण्यात आला. मुलांना चार शब्द दिले. त्यांनी त्यावर गोष्ट लिहिली. त्याच गोष्टीचे मुलांनी पुस्तक तयार केले.त्या पुस्तकातील मजकुरासाठी मुलांनी स्वतः चित्रे काढली. पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ स्वतः मुलांनी तयार केले. अतिशय सुंदर सुंदर पुस्तके मुलांनी तयार केली.
● मुलांचे प्रतिसादात्मक लेखन : वाचनात आलेल्या मुद्द्याबाबत आपली सहमती किंवा असहमती लिहून दर्शवणे, वाचलेल्यावर आपली प्रतिक्रिया देणे, त्यावर समीक्षात्मक लेखन करणे या लिखाणाला प्रतिसादात्मक लेखन म्हणतात. सर्जनशील लेखनाबरोबरच प्रतिसादात्मक लेखन करण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण व्हायला हवी. कारण लोकशाही समाजव्यवस्थेत एखाद्या घटनेवर आपले विचार प्रकट करता येणे फार महत्त्वाचे असते. मुलांनी वाचन साहित्यातून मुख्य मुद्दे शोधावेत ते आपल्या अनुभवाशी जोडून ताडून पडताळून लिखाणात ते मांडायला हवेत. यासाठी त्यांना मदतीची आवश्यकता असते अशा उपक्रमातून मुलांना मदत मिळाल्यास मुलांच्या लेखनात नक्कीच सुधारणा घडून येते. यासाठी उस्मानाबाद शहरातील नगरपालिकेच्या शाळेत शाळेत काही मुलांसोबत हा उपक्रम राबवला. माधुरी पुरंदरे यांच्या ‘सख्खे शेजारी’ हे पुस्तक मुलांना वाचनासाठी दिले. मुलांसोबत सहवाचन केले. मुलांनी लिहिलेल्या मसुद्यावर चर्चा केली. त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे मुले प्रतिसादात्मक लेखन करू लागले.
● बालकुमार दिवाळी अंकातून भाषा शिक्षण : उस्मानाबाद शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक १८ मध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना साधना साप्ताहिकाचा २०२० चा बालकुमार भेट दिला. त्या दिवाळी अंक मुलांसोबत काम केले. सहभागी वाचन, सहवाचन, मार्गदर्शित वाचन,प्रतिसादात्मक लेखन या कृती घेतल्या. यामुळे मुलांच्या भाषिक कौशल्य विकास मदत झाली.
● यूपीएससी उपक्रम : मुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य वृद्धिंगत व्हावी यासाठी इयत्ता सातवीच्या मराठी विषयाच्या घटकावर मुलांसोबत काम केले. मुलांचे चार वेगवेगळे गट करून मुलांना माहिती देणे, उपयोजन, विश्लेषण, सर्जनशीलता या पातळ्यांवर काम करण्याची संधी दिली.मुले अडतील तेथे त्यांना मदत केली.त्यांमुळे मुलांनी नवनवीन संसाधनांचा वापर करून शिकण्याचा प्रयत्न केला.एकमेकांच्या सहकार्याने मुलांना शिकण्यासाठी मदत झाली. त्यामुळे इयत्ता सातवीच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त होण्यास मदत झाली.
प्रकल्प ;
● आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प : उस्मानाबाद तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या आठ शाळांमधील इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांसाठी आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प राबविला. मराठी, गणित, इंग्रजी वर्ग वातावरण, परसबाग, शालेय व्यवस्थापन समिती व समाज सहभाग या क्षेत्रावर काम केले. शिक्षक प्रशिक्षण, शाळा भेटी या माध्यमातून या प्रकल्पावर काम केले. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी या प्रकल्पाची मदत झाली.
● समजपूर्वक वाचन क्षमता विकास कार्यक्रम : समजपूर्वक वाचन करता येणे खुप महत्वाचे आहे. वाशी तालुक्यामध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन करता यावे यासाठी हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पामुळे वर्गातील ग्रंथालय समृद्ध झाले. विद्यार्थी अवांतर वाचन करू लागले.विद्यार्थी वेगवेगळे साहित्यप्रकार समजपूर्वक वाचन करू लागले. शिक्षकांनी स्वतः वाचन साहित्याची निर्मिती केली.या प्रकल्पामुळे समजपूर्वक वाचनाच्या अध्ययन निष्पत्ती सुधारण्यास मदत झाली.