खलबत्ते विकणारी स्री : जिद्दीला, संघर्षाला सलाम !

डोक्यावर दोन खलबत्ते घेऊन गल्लोगल्ली विकणाऱ्या एका स्रीचे चित्र दोन तीन वर्षांपूर्वी व्हायरल झाले होते. काही जण ते चार वर्षांपूर्वीचे आहे म्हणतात. या चित्रावर कविता पण तयार झाल्या. दारिद्रयाची धग, कुटुंबाची ओढाताण आणि जगण्याची कुतरओढ या संदर्भात हे चित्र फार बोलकं आहे.‌ ही एक स्री नसून ज्या लोकसमुहात अशा प्रकारे दगडाच्या वस्तू बनवून विकतात त्या समुहाचे केवळ प्रातिनिधित्वच नव्हे तर या व्यवस्थेच्या विरोधात आपले लहानुले बळ वळचटीला बांधून खंबीरपणे उभे असलेले युद्धचित्र आहे. तसे पाहिले तर उन्हात चांदणे चमकावे तसे तिचे हास्य आहे. दलिंदरी आयुष्य जगतांना आम्ही कोणत्याही संकटाला घाबरत नाही, नेटानं तोंड देतो. भुकेवर मात करतो. गरिबीवर मात करतो. कष्ट करुन जगण्याच्या खडतर संघर्षाची कहाणी ते चित्र सांगतं.
 या चित्राला एक कहाणी आहे. ती अशी सांगितली जात आहे. ही गोष्ट म्हटली तर साधीच आहे पण ती समजून घेतलीतर नक्कीच प्रेरणादायी आहे.  एका मजूरी करणाऱ्या माणसाची पत्नी गावकुसाबाहेरच्या पालावर राहणाऱ्या या कुटुंबाने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. दोन लहानगी लेकर घेऊन संसाराचा गाडा ओढताना या पती-पत्नीने यातून बाहेर पडण्याची जी असामान्य धडपड केली तिला आज यश आले आहे.


त्या मजूराच्या पत्नीने पदवी परिक्षा उत्तीर्ण तर केलीच पण त्यांनतर तिने चक्क पोलिस दलात अधिकारी पदाची नोकरी मिळवली आहे. ही कहाणी आहे पद्मशीला तिरपुडे या सामान्यांतील असामान्य महिलेची. महाराष्ट्र पोलिस अकादमीत नुकत्याच झालेल्या उपनिरिक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा या यशस्विनीसाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा- अभिमानाचा ठेवा ठरलाच तसाच तो अनेकांना प्रेरणा देणारा क्षण होता. तो अनुभवण्यासाठी तिने प्रचंड संघर्ष केला त्याचीच ही सुखद परिणीती होती. राज्याच्या पोलिस दलास आजवर उपनिरीक्षक दर्जाचे २४ हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीची यंदाची १०८ वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या तुकडीने सर्वाधिक १,५४४ फौजदार दिले आणि त्यात १२० महिला पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकीच एक असलेल्या पद्मशीला यांचा दहा वर्षांतील जीवन प्रवाह अनेकांना प्रेरणादायी आहे.
मुळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे यांचा त्याच जिल्ह्यातील वाकेश्वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे यांच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्या सांगतात “पोलिस अधिकारी” व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खुप सोसलंय. हमाली केली, समोसे विकले, मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले. पद्मशीला तिरपुडे, (पोलिस उपनिरीक्षक) सांगतात. “आयुष्यात एक दिवस असा आला की, घरात अन्नाचा दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. 

 खुप वाईट वाटले. खुप रडलो तसेच उपाशी झोपलो, पण त्या दिवशीच निश्चय केला की, मोठ्ठं अधिकारी व्हायचं.” पद्मशीला शिकल्या अन् मोठी अधिकारी व्हायचं या स्वप्नासाठी त्यांनी खुप कष्ट केले. घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. पद्मशीला यांचे पती पेव्हर ब्लॉकचे मजुरीचे काम करुन घर चालवत होते.
नाशिकच्या गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह त्यांनी संसार थाटला होता. पण त्यांच्या मनात यातून बाहेर पडण्याची, भरारी घेण्याची जिद्द होती, त्यांना त्यांच्या पतीची साथ होती त्यामुळे अनेक आव्हानांशी लढत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनतर एमपीएससीच्या परिक्षेत उत्तीर्ण होत त्यांची निवड राज्य पोलिस दलात आज उपनिरिक्षक पदावर झाली आहे. जीवनात वाईट स्थिती आली म्हणून तिथेच न थांबता त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क पोलिस फौजदार होवून अनेक जणींसमोर आदर्श तर ठेवलाच आहे पण स्वत:च्या जीवनाला असामान्य वळण देण्याची किमया साधली आहे.
परंतु हे चित्र खोटं असल्याचा दावा राज माहोरे यांनी केला आहे. फेसबुकवर अनेक जणांनी तिरपुडेंचं अशा पद्धतीनेच अभिनंदन केले आहे. परंतु माहोरे यांनी हे नाकारलं आहे. ही गोष्ट राजेंद्र गायकवाड यांनी प्रथम लक्षात आणून दिली. कहाणी खरी आहे पण फोटो चुकीचा आहे असे ते म्हणतात. ते म्हणतात,  सोशल मीडियाचे सन्मानीय बंधू आणि भगिनींना नम्र सूचना आहे की, गेल्या काही दिवसा पासून “फेसबुक व व्हाट्सएपवर “पद्मशिला तिरपुडे “यांच्या नावाने एक दगड विकणारी बाई असलेल्या फोटोसहित त्यांच्या संघर्षाची अर्धवट व चुकीची पोस्ट लिहून त्यांच्याबद्दल एक चुकीचा फोटो whatsapp अनेक जण पाठवत आहेत. आपल्याला सांगू इच्छितो की सदर महिला अधिकारी यांच माहेरचे नाव “पद्मशिला उर्फ शीतल तिरपुडे असून “त्यांचं सासरकडील “नाव शीतल पवन खोब्रागडे आहे.. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष व स्पर्धा परीक्षा पास होऊन “पोलीस विभागात “सहाय्यक निरीक्षक म्हणून रुजू झाले तोपर्यंतचा प्रवास “संघर्षमय आहे हे खरं ..पण तो दगळाचे पाटे विकणाऱ्या बाईचा फोटो त्यांचा नाही आहे.. म्हणून कोणी तरी चुकीच्या माहितीच्या आधारावर “वृत्तपत्रात त्यांच्याबद्दल लेख लिहला म्हणून तो फोटो खरा समजू नये..व व्हायरल होत असलेल्या पोस्टमधील तो डिलिट करावा.. याबद्दल कोणीही अफवा किंवा चुकीची माहिती पोस्ट करू नये त्यांच्याबद्दल जर कोणाला काही माहीत हवी असेल तर मला कॉल करा “7066224706 यावर उपलब्ध आहेच  मी तरी काही शंका असलेस तुम्ही विचारू शकता पण कृपया चुकीची माहिती प्रसारीत करू नका अशी विनंती पण त्यांनी केली आहे. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील संतोष साबळे यांनी पण या संदर्भात एक लेख लिहिला आहे. 
‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा !’ 
या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्याची प्रचीती दिलीय ती नाशिक येथील पद्मशीला तिरपुडे या विद्यार्थिनीने. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असली तरी जिद्द अन् शिक्षकांनी लढण्यासाठी दिलेल्या पाठबळाच्या जोरावर पद्मशीलाने यश मिळविले आहे. ध्येय जर प्रबळ असेल, तर यश आपोआप आपल्या पायाजवळ चालत येते, याचा उत्तम नमुना अनुभवण्यास मिळाला.
गोदावरी काठच्या पालात दोन लहानग्यांसह चाललेला संसार… पतीचे मोल मजुरी काम . घरात अठरा विश्व दारिद्य्र अशा अनेक आव्हानांशी लढत तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले अन केवळ एवढ्यावरच न थांबता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क फौजदारही झाली… ही गोष्ट आहे सामान्यांतील असामान्य पद्मशीलाची …! सर्वसामान्य कुटुंबातील बेताची आर्थिक परिस्थिती आणि अनंत अडचणींशी संघर्ष करत पद्मशीला तिरपुडे यांनी मिळविलेले यश महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असेच आहे.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत अलीकडेच पार पडलेल्या फौजदारांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा पद्मशीलाच्या जीवनातील आनंदाचा आणि अभिमानाचा ठेवा ठरला. हा क्षण अनुभवण्यासाठी तिने केलेल्या प्रचंड संघर्षाची ही एक सुखद परिणती असल्याचे चित्र पाहायला मिळाले. भंडारा जिल्ह्यातील वाळकेश्वर जवळच्या पहेला गावातल्या श्री. पवन तुकाराम खोब्रागडे यांच्याशी पद्मशीला रमेश तिरपुडे हिचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही पद्मशीला तीरपुडे यांनी पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. दोन बाय चारच्या खोलीत राहून त्यांनी आपला सुखी संसार सांभाळत पद्मशीला आज या ठिकाणी पोहोचल्या आहेत. या प्रवासात त्यांना त्यांचे पती पवन खोब्रागडे यांची मोलाची साथ मिळाली आहे. मनात एखादी गोष्ट आणली तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ती सिद्ध करु शकतो, याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे.

पद्मशीला यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पवनने अक्षरशः जीवाचं रान केले. लहान मुलांना सांभाळणं, खाऊ-पिऊ घालणं सगळी कामं पवन स्वत: करीत. दहा बाय दहा आकाराचे घर स्टडी रुम झाले होते. कॉटखाली, कॉटवर सगळीकडे पुस्तकेच पुस्तके. या पुस्तकांनीच दोघांचं आयुष्य बदललं. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. कदाचित ते खरं असावं नाहीतर आयुष्यात इतकी मोठी किंमत मोजूनही झगडा देण्याचं बळ क्वचित कोणाच्या हातांना येईल.विवाहानंतर दोघांनीही गाव सोडले आणि थेट औरंगाबाद गाठले. 
तिथे रोजंदारीवर मिळेल ते काम करण्यासाठी भटकंती सुरु झाली मात्र बराच काळ ओलांडला तरी काही केल्या काम मिळेना. अखेर एका कंपनीत रोजंदारीवर मिळेल ते काम करू लागले. अशातच कंत्राटी कामही काही कारणास्तव सोडावे लागले अन मग समोसे विक्रीचा व्यवसाय करू लागले. प्रसंगी गहू तांदळाचे पोते उचलून बराच काळ हमालीही केली. पण काही केल्या संसाराचा गाडा रुळावर येईना. ऊन, वारा, पाऊस असो की थंडी कशाचीही पर्वा न करता काबाडकष्ठ करूनही यश मिळत नाही हे लक्षात आल्यावर दोघांनीही नाशिक गाठले. गोदावरी नदीच्या कडेला पाल ठोकून मजुरीवर गुजराण करणाऱ्यांनी आसरा देऊन दिलासाही दिला अन यातच आशेचा किरण दिसू लागला. काही दिवसांतच पती पवन यांनी पेव्हर ब्लॉक काम सुरु केले आणि या व्यवसायात हळूहळू यश मिळवत पवन तरबेज झाले.
‘मुक्त’ शिक्षणाने मिळाली आयुष्याला दिशा
घर-संसार, काम करता-करता शिक्षण घेण्याची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत उपलब्ध झाल्याने, आज माझे पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झाले याचा आनंद आहे. या प्रवासात माझ्या पतीची भूमिका निर्णायक ठरली. त्यांनी माझ्यासाठी खूपकाही सोसलंय. हमाली केली. सामोसे विकले. मजुरी केली. त्यांनी त्या वेळी घेतलेले कष्टच आज कामाला आले.


– पद्मशीला तिरपुडे (पोलिस उपनिरीक्षक)

शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर शिक्षण घेऊन पुढे काही तरी केले पाहिजे, ही ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मुलांचा सांभाळ, पतीला मदत आणि अभ्यास या सर्वांना वेळ देणे म्हणजे तारेवरची कसरत होती; मात्र हे आव्हान पद्मशीला यांनी स्वीकारले. दोघांनीही मोल मजुरी करता-करता शिक्षण घेण्याचा निर्धार केला. वेळ मिळेल तसे त्यांनी अभ्यास केला आणि अखेर परिश्रमाला फळ आले.पद्मशीलाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. व्यवसायात पतीला मदत करतानाच संसाराचा गाडा ओढत, घरातील सर्व कामे सांभाळत बी.ए. चे पदवी शिक्षण पूर्ण केले. दरम्यान याच काळात त्यांना प्रांजल आणि प्रज्वल ही दोन आपत्येही झाली. 

दोन मुलांना सांभाळताना ‘एमपीएससी’च्या अभ्यासावरही पद्मशीलाने आपले लक्ष केंद्रित केले आणि कसून अभ्यास सुरु ठेवला. गेल्यावेळी अवघ्या एका गुणाच्या फरकाने त्यांची संधी हुकली. परंतु या अपयशाने हताश न होता पुन्हा तहान, भूक विसरून जिद्दीने अभ्यास केला आणि पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. बेताची परिस्थिती असल्याने मदतीचे अनेक हात पुढे आले. सुकामेवा, सकस धान्याची मदत आणि आत्मविश्वासाचे बळ मिळाल्याने. अखेरीस शारीरिक चाचणीतही यश मिळाले अन प्रशिक्षणासाठी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत दाखल झाल्या. सध्या त्या अमरावती येथे कार्यरत आहेत.
तब्बल दहा वर्षे सोसलेल्या वेदना, समाजाने दिलेला आधार, मायेचा हात, आत्मविश्वास, अन काही झाले तरी पत्नीला वेळोवेळी पाठबळ देणारे पती पवन यांचे पाठबळ हा प्रचंड अनुभव त्यांना शांत बसू देत नव्हता. अखेर पद्मशीलाने अठरा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि केवळ शिक्षणामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचे अर्धवट राहिलेले पद्मशीलाचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांना आता पहिलेच पोस्टिंग अमरावतीला दिले आहे. जिज्ञासू वृत्ती, जिद्द, महत्त्वाकांक्षा असेल तर अशक्य काहीही नाही. असे त्या आज ठणकावून सांगतात. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर फौजदार झालेल्या पद्मशीला तिरपुडेच्या संघर्षाची कहाणी वंचित समाजातील महिलांना दिशा आणि बळ देणारी आहे.

इंजि.‌भीमप्रकाश गायकवाड यांनीही पद्मशिला यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. नवरात्रीच्या निमित्तानं सध्या देशभर स्त्री शक्तीचा जागर घातला जात आहे. पण मनुवादी संस्कृतीने तिला अबला का ठरविलं, याचं ठोस उत्तर कुणीही देत नाही. ते देऊच शकत नाहीत ! खरं तर स्त्री शक्तीचा  जागर घालून दवंडी पिटण्याची गरजच नाही. ती सबलाच आहे ! जननी आहे !! गरज आहे बुरसटलेल्या परंपरा, आर्थिक परिस्थिती, सामाजिक पाबंदींवर मात करण्याच्या तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला उजागर करण्याची !!!

स्वप्नांना साद घालत ते साकार करण्याची अशीच एक प्रेरणादायी  यशोगाथा…ही कथा आहे भंडारा जिल्ह्यातील पद्मशीला तिरपुडे या भीमकन्येची. पवन तुकाराम खोब्रागडेसोबत झालेला प्रेम विवाह. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची. पती मजुरी काम करायचा तर पद्मशीला वरवंटे, खलबते विकून संसाराचा गाडा पुढे रेटत होते. पण तिने शिक्षण सोडलं नाही. जिद्दीने तिने मुक्त विद्यापिठातून पदवी संपादन केली. एमपीएससी मार्फत घेतली जाणारी पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि नाशिकच्या पीटीसीत खडतर प्रशिक्षणाला आरंभ केला. दुसरीकडे नाशिकच्या कुशीत पवन आपल्या दोन लेकरांसह पाल थाटून  राहू लागले. हमाली करून ‘पाल’ धकवू लागले…अखेर तो दिवस उजाडला ! पोलिस उपनिरीक्षकाचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून तीन वर्षांपूर्वी पद्मशाली शानने बाहेर पडल्या !
सलाम पद्मशीलाच्या जिद्दीला आणि तिला मुक्त आकाश प्रदान करणा-या पवन खोब्रागडेंना !
परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणा-या अशा यशोगाथांचा जागर केवळ नवरात्रीत नव्हे तर अभ्यासक्रमांमधूनही व्हायला हवा. फुले दांपत्याचे नित्य स्मरण करून कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी…!

फोटो जरी त्यांचा नसला तरी त्यांच्या जिद्दीची मेहनतीची आणि संघर्षाची कहाणी अस्सल आहे. समाजमाध्यमावर त्या वेगाने व्हायरल होत आहेत. त्या अनेकांचे प्रेरणास्रोत बनल्या आहेत. त्यांची ही कहाणी वृत्तपत्रांतही प्रकाशली आहे. या संदर्भात त्यांचा एखादा व्हिडीओ प्रसारित व्हायला हवा. त्यामुळे तो फोटो त्यांचा आहे की नाही हे कळेल. प्रथमदर्शनी पाहतांना त्या फोटोतील चेहऱ्यात आणि त्यांच्या मूळ फोटोतील चेहऱ्यात काहीसे साधर्म्य जाणवते. बरे ते काही असो. पद्मशिला खोब्रागडे तिरपुडे यांच्या जिद्दीला युगसाक्षी सलाम करते आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड 
संपादकीय

२3.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *