नांदेड ; दि. 23 :-
जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवर जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची वस्तुस्थिती व पाहणी करण्याच्या उद्देशाने मुदखेड येथे दौऱ्यावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना मुगट गावात उंबरठ्यावर अभ्यास करीत असलेल्या आदिशक्तींना भेटण्याचा मोह आवरता आला नाही. मुगट गावातील आरोग्य केंद्राची पाहणी करुन परतत असतांना त्यांनी एका घरासमोर गाडी थांबविण्यास सांगितले. गाडीतून उतरत त्यांनी एका घराकडे वळत दरवाजात अभ्यास करत असलेल्या दोन मुलींशी मनमोकळ्या गप्पा मारुन त्यांचे भावविश्व मोकळे केले. यातील एकीचे नावे पुष्पा ज्ञानेश्वर कदम तर दुसरी दिपिका रामकिशन कदम. पुष्पा दहावीत तर दिपिका चौथीत शिकते.
या दोन्ही मुलींचे आई-वडिल शेती करतात. शाळा कोविड-19 मुळे बंद असल्यामुळे या बहिणींची शाळा ओसरीवर सुरु होते. यातील एक दहावीत शिकत आहे तर दुसरी चौथीत. घरी तिच्या फक्त भावाकडेच असलेला मोबाईल शिक्षणासाठी तिने जवळ ठेवलेला. मोबाईलच्या माध्यमातून ती गणिताचा सराव करत असतांना कोणीतरी एक महिला आपल्या जवळ बसून बोलते आहे या कृतीमुळे तिचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही आपली ओळख न देता मोकळा संवाद साधल्याने तिच्या स्वप्नांना आणखी बळ घेता आले.
शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी हिरमुसले आहेत. त्यांच्यात कुठेही नैराश्य येऊ नये, अभ्यासाप्रती कटिबद्धता वाढावी यादृष्टिने नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांशी उपलब्ध असलेल्या संसाधनाच्या माध्यमातून सतत संपर्कात राहण्याचे एक अभियान आम्ही लवकरच सुरु करत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले. मुगट गावात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थींनींची अधिक संख्या असल्याने या गावची तशी वेगळी ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असेही त्या म्हणाल्या.
मुगट येथे जिल्हा परिषदेची हायस्कूल पर्यंत शाळा असून एकुण 16 वर्ग, 14 शिक्षक तर 365 पटसंख्या आहे. यात मुलींची संख्या 188 आहे.